त्रिपुरारी पौर्णिमा Mandar Sant November 13, 2016 दिनविशेष त्रिपुरी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते म्हणून त्या वेळी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पध्दत आहे. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. विविध देवस्थानात जे दीपस्तंभ (उंच दगडी दिवे) असतात ते सुद्धा पेटवितात. या दिपोत्सवालाच त्रिपुर पाजळणे असे म्हणतात. तारकासुर नावाच्या असुराला तीन पुत्र होते त्यांची नावे तारक्ष, कमलाक्ष, विद्युन्माली. मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली. कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा : कार्तिकी पौर्णिमेस हे नाव आहे. लोकांनी दीपोत्सव करून त्रिपूरसंहाराचा आनंद व्यक्त केला. लिंगपुराण (१·७०–७२), पद्मपुराण (सृष्टिखंड ५९), मत्स्यपुराण (१३०–३७), शिवपुराण (रुद्रीसंहिता ४·५) व महाभारत (द्रोणपर्व २०२) यांत ह्या कथेचे थोडे वेगळे पर्याय आढळतात. या दिवशी घरोघरी तसेच शिवमंदिरातून आणि इतर देवालयांतून दीपोत्सव साजरा करतात. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. मत्स्यावतारही याच पौर्णिमेस झाला. दुष्टांचा संहार या दिवशी झाल्याने हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. देवस्थानातील दगडी दीपमाळाही या दिवशी पाजळतात व नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडतात. त्रिपुरांतक रूपातील शिवाची सुंदर शिल्पे भारतात अनेक ठिकाणी आहेत. ‘त्रिपुरज्वलनव्रत’ या नावाचे एक व्रत या दिवशी करतात. शिवापुढे वाती लावणे, दीपपात्रे दान देणे, शिवाची पूजा करणे हा या व्रताचा विधी असतो. जे जे चांगले ते ते रुजवावे,.. वाईट तेवढे काढूनी टाकावे.. हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश आहे. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website