उत्पत्ति एकादशी कथा व एकादशी व्रताचे महत्त्व : ११ डिसेंबर २०२०, शुक्रवार Mandar Sant December 11, 2020 दिनविशेष १] उत्पत्ति एकादशी ================= उत्पत्ति एकादशी ची कथा हि देवी एकादशीच्या जन्माची अर्थात उत्पत्तिचीच गोष्ट आहे. याच कारणामुळे उत्पत्ति एकादशी चे व्रत करणाऱ्यास त्याने केलेल्या उपासनेच्या शुद्धी च्या व समर्पण युक्त भावनेच्या प्रमाणात शत्रूवर विजय मिळवण्यास सहाय्यभूत होते. . सत्ययुगात दानवकुळामध्ये तालजंघ नावाचा राक्षस राहात होता. जो अति भयंकर व पराक्रमी होता. . त्याचा पुत्र मुर हा त्याच्याहून पराक्रमी व भयंकर होता. त्याने साव्र्गाव्र स्वारीकरून सर्व देवतांना पराभूत करून तिथून हाकलून लावले. कितीही युद्ध केले तरी मुर ला हरवणे देवराज इंद्राला शक्य झाले नाही. . मुर इतकेच करून थांबला नाही तर चांदवती नावाच्या नगरीमध्ये निवास करत असणाऱ्या या दैत्याने स्वर्गात दुसऱ्याच दैत्याला इंद्रपदी बसवले. इतकेच नव्हे तर अग्नि, चन्द्रमा, सूर्य, वायु तथा वरुण हे सुद्धा दुसरेच बनवले आहेत . इंद्राला पराजित करणे इथपर्यंत ठीक पण या पुढे जाऊन या दैवी योजनेत फेरफार करण्याचा अधिकार कुणालाच नव्हता. हि बाब इंद्राने श्री महादेवांच्या कानी घातली. त्यावर महादेवांनी इंद्राला श्री विष्णूंना हे सांगण्याचा सल्ला दिला. . . भगवान श्री विष्णूंना इंद्राने हे सांगितल्यावर दैवी योजनेत फेरफार केल्याचा श्रीविष्णूंना खूप राग आला. त्यांनी गरुडावरून चांदवती नगरीवर स्वारी करून मुर दैत्याला शरण येण्यास सांगितले. चतुर्भुज भगवंताला आपण जिंकू शकणार नाही हे ओळखून मुर दैत्याने त्याच्या प्रचंड सेनेला प्रतिकारार्थ पाठवले. भगवान विष्णूंनी त्या दैत्यांचा पराभव केला . सूर्यास्ताला युद्ध थांबल्यावर श्रीविष्णू बदरिकाश्रमात विश्रामाकरिता गेले . तेथे जवळच असलेल्या बारा योजने लांब असलेल्या सिंहावती नावाच्या गुहेत श्रीविष्णू रात्री विश्रामार्थ झोपले. . . मुर राक्षस लपून छपून श्रीविष्णूंचा झोपेतच घात करण्याकरिता गुहेत प्रवेशला. अश्यावेळी भगवंतांच्या नेणीवेतून एक अतिशय रूपवान , सौभाग्यशालिनी व दिव्या अस्त्रांनी युक्त अशी कन्या प्रकट झाली. तिने मुर ला युद्धासाठी आव्हान दिले. एक स्त्री आपला काय पराभव करणार ? या गर्वाने मुर ने आक्रमण केले. एकादशी आणि मुर दोघेही युद्धात निपुण होते . त्या युद्धात एकादशी ने मुर ला ठार केले. . . निद्रेतून जागे झाल्यानंतर भगवंतांनी त्या भयंकर राक्षसाला कुणी मारले असा प्रश्न केला. तेव्हा एकादशी ने त्यांना सारा वृत्तांत कथन केला . भगवंतांच्या नेणीवेतूनच प्रकट झालेल्या त्या कन्येला भगवंतांनी वर मागण्यास सांगितले. तिने भगवंतांना वर मागितला कि [१] सर्व तीर्थांमध्ये सर्वोत्तम [२] सर्व विघ्नांचा नाश करणारी [३] सर्व सिद्धी देवू शकणारी अशी देवी होवून दे . . यावर तथास्तु !! म्हणून भगवान श्री विष्णू म्हणाले कि प्रत्येक पक्षाच्या अकराव्या दिवशी अर्थात एकादशी च्या तिथीस जे नर उपवास , नक्त भोजन अथवा एकभुक्त राहून दिवसभर तसेच पुढे रात्रभर माझ्या भक्तीत रममाण होतील त्यांना धन, धर्म व मोक्ष मिळेल. . मित्रांनो एकादशीचा जन्म रात्रीचा आहे त्यामुळे एकादशीच्या रात्री भगवद्भक्ती चे कोणतेही साधन अंगीकारून भगवंतांच्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे. ब्रह्मज्ञानी श्री सुतमुनी ब्रह्मवृन्दांना संबोधित करताना सांगतात कि , १] चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहणातील स्नान २] अन्नदान अथवा जलदान ३] सुवर्ण दान ४] भूमिदान ५] कन्यादान ६] अश्वमेध आदी महान यज्ञ ७] चारधाम सारख्या मोठ्या तीर्थयात्रा या महान पुण्यकारक गोष्टींपेक्षाही मोठे पुण्य एकादशीच्या व्रताने मिळते. २] एकादशी व्रताचे महत्त्व ================ अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे. अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। [ पद्मपुराण ] अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही. === एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात. मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते. शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते. यश आल्याने धन प्राप्ती होते. साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत. समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात- ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।। ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥ ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।। तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।। “ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.” प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे- एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।। श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥ तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।। “जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.” पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ।।1।। काय तुझा जीव जाते एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।। स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।। थोडे तुज घरी होती ऊजगरे । देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।। तुका म्हणे कां रे सकुमार झालासी। काय जाब देती यमदूता ।।5।। एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।। काय करुं बहू वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।। हरिहरासी नाही बोटभरी वाती। कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।। तुका म्हणे नाही नारायणी प्रिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।। एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।। ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।। अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।। शेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तयाजोडे क्षय रोग । जन्मव्याधि बळवंत ।। आपण न वजे हरिकिर्तना । आणिका वारी जाता कोणा । त्यांचे पापा जाणा । ठेंगणा तो महामेरु ।। तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ।। करविता व्रत अर्ध पुण्य लाभे। मोडविता दोघे नरका जाती । शब्दबुध्दी होय दोघा एक मान । चोरासवे कोण जीव राखे । आपुले देवूनि आपलाचि घात। नकरावा थीत जाणोनिया । देवुनिया वेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ। तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग। भक्ती हे मार्ग मोडू नये । छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात- आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥ तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥ कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥ म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥ ” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.” ————————————————————————————————— ३] शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ? ======================== एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा. दूसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे. द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते. शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website