नमो स्तवन अनंताय सहस्त्र मूर्तये, सहस्त्रपादाक्षि शिरोरु बाहवे।
सहस्त्र नाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटि युग धारिणे नम:।।

*अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णुची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते.*

अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरातून पाळले जाते. १४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजे दोरा अनंत म्हणूनच ओळखला जातो.

अनंत संसार महासमुद्रे ,मग्नं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व, ह्यनंतसूत्राय नमो नमस्ते।।

हा उजव्या हाताच्या वरील मंत्राने मनगटावर बांधतात आणि तो सर्वप्रकारच्या संकटापासून रक्षण करतो, अशी श्रद्धा असते. ह्या व्रताचा विशेष असा की, ही पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करण्याची रुढी आहे. हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते आजन्म पाळत असतात.

ह्या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथे सारखीच आहे. म्हणजे कोणी अडचणीत सापडला असता त्याला दुस-या कोणी तरी अनंताचे व्रत करण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचे दुःख निवारण झाले. पुढे तो हे व्रताचरण विसरला आणि त्याच्यावर घोर आपत्ती आल्या, अशा स्वरुपाच्या *या व्रताच्या कथा आहेत*. एक ब्राह्मण होता . त्याच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिला, तिचे नाव शीला! तिच्या जन्मानंतर ब्राह्मणाची पत्नी दिवंगत झाली. सुमंतुने म्हणजे त्या ब्राह्मणाने दुसरा विवाह केला. ती पत्नी अतिशय कर्कशा होती. पुढे ह्या शीलेचा विवाह कौंडिण्य ॠषीशी झाला. ‘निरोप देताना जावयाला काहीतरी देऊ या,’ असे सुमंतुने म्हटल्यावर त्याची कर्कशा पत्नी आडवी आली. तिने सुमंतुला ते देऊ दिले नाही. उलट जावयाला आणि लेकीलाही दुरुत्तरे केली. ती पतीबरोबर सासरी जात असताना वाटेत एकेठिकाणी काही स्त्रिया अनंताचे व्रत आचरित असताना तिला दिसल्या. त्या स्त्रियांकडे शीलेने व्रताची चौकशी केली आणि ती त्या दिवसापासून ते व्रत आचरु लागली. व्रताच्या प्रभावाने तिला म्हणजे कौंडिण्याला वैभवाचे दिवस आले. तो खूप श्रीमंत झाला आणि त्याला श्रीमंतीची धुंदी चढली. एके दिवशी त्याने शीलेच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला आणि त्यामुळे अनंत त्याच्यावर रागावला. कौंडिण्याचे सर्व वैभव गेले. त्याला पश्चाताप झाला आणि मग त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहून अनंताने ब्राह्मणरुपात त्याला दर्शन दिले आणि पुन्हा व्रताचरण करण्यास सांगितले. त्यामुळे कौंडिण्याला पुन्हा वैभव प्राप्त झाले.

ही कथा साधारणपणे आपल्या सत्यनारायणाच्या कथेशी मिळतीजुळती असली तरी सत्यनारायणाच्या पूजेपेक्षा हे व्रत खूपच प्राचीन आहे यात शंका नाही. सत्यनारायणाची पूजा ही आपल्याकडे अलीकडे आली.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे उद्या गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही.

=====

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.