आंबटशौकीन म्हातारे – ले. डॉ. पुष्कर वाघ Mandar Sant November 5, 2019 आरोग्य दिल तो बच्चा है जी काय मित्रांनो, लेखाचं नाव वाचून दचकलात ना ? पण मला सांगा त्यात खोटं काय आहे ? ‘आंबटशौकीन म्हातारे’ असतातच ना ? आणि हे काय फक्त माझ मत नाहीये ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु. ल. देशपांडे यांच ‘असा मी असामी’ वाचलंय ? त्यात “बायका बायकांकडे जितक्या निरखून पाहतात तितके पुण्यातील पेन्शनर सुध्दा नाही” असा स्पष्ट उल्लेख आहे. आता स्वतः पुणेकर असलेले पुलंच असं म्हणतात तर ते खोटं कसं असेल ? आता तुम्ही म्हणाल आम्ही नाही करत वाचन बिचन. ठीक आहे तुम्ही पिक्चर तर पाहता ना ? १९८०च्या दशकाच्या सुरवातीला रिलीज झालेला ‘शौकीन’ नावाचा पिक्चर आठवतोय ? अशोक कुमार, ए. के. हंगल आणि उत्पल दत्त असे तीन तीन म्हातारे होते त्यात. तिघेही रती अग्निहोत्रीच्या मागे लागलेले दाखवले आहेत. काय म्हणताय जुना झाला तो पिक्चर ? बर मग २०१० मध्ये आलेला ‘इश्कीया’ माहितीये ? तोच तो विद्या बालन आणि नसिरुद्दीन शाहचा आणि त्यातलं ‘राहत’च्या आवाजातलं ‘दिल तो बच्चा है जी’ गाणं तर तुमच्यापैकी अनेकांचं फेव्हरेट असेल. अर्थात त्याला तोडीस तोड आपल्या माय मराठीत ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ आहेच की. थोडक्यात काय तर या सर्व पुराव्यांनी हे सिद्ध होते ‘आंबटशौकीन म्हातारे’ असतात हे निर्विवाद सत्य आहे. गंमत म्हणजे आयुर्वेदाचेही असेच मत आहे. फक्त एक छोटासा फरक आहे. *जग म्हणते की ‘आंबटशौकीन म्हातारे’ असतात तर आयुर्वेद म्हणतो की ‘आंबटशौकीन (लवकर) म्हातारे होतात’.* कसे ते समजून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. आंबट एके आंबट इतर लोक खात असतील पण आम्ही कुठे एवढं आंबट खातो ? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल. तेव्हा बघूया आपण काय काय आंबट खातो ते ? सकाळपासूनच सुरवात करूया. वजन कमी होण्यासाठी दररोज लिंबू पाणी आणि मध घेणाऱ्यांची संख्या काही कोटींच्या घरात असेल. बर पिळून पिळून फक्त लिंबू बारीक झाले पण लिंबू पाणी पिणारे जशेच्या तसे. ब्रेकफास्टसाठी काहीही बनवले तरी त्याच्यासोबत टोमॅटो सॉस असतोच. अत्यंत स्वस्त दरात मिळणारे वाईटात वाईट प्रतीचे टोमॅटो वापरून सॉस बनवला जातो. पण ‘उंगली घुमाके बोल’ अशा जाहिराती करून या केचपच्या कंपन्या अक्षरशः आपल्याला बोटावर नाचत असतात. काही जण तर इतका सॉस खातात की कधीकाळी ब्लड टेस्टसाठी यांच्या शरीरातून रक्त काढावे लागले तर सिरींजमध्ये रक्ताऐवजी सॉस येईल कि काय ? अशी त्या सॉसइतकीच दाट शंका मला येते. टोमॅटो सॉससोबतच सोया सॉस आणि शेझवान सॉस यासारखे इतर चायनीज सॉस आज घराघरात शिरू पाहतायत. लोणचे थोडेच खायचे असते म्हणून ताटाच्या डाव्या बाजूला वाढले जाते. पण वर्षाला दहा – बारा किलो लोणचं फस्त करणारी मंडळी आहेत त्यांच्या शरीरात किती उष्णता जात असेल ? बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड लोणच्यात व्हिनेगर घातलेले असते त्यामुळे ते तर प्रचंड आंबट असते. दही भात आणि लोणचे हा ‘अद्भुत संयोग’ तर अनेक स्त्रियांचा जीव कि प्राण आहे. काही घरात तर कैरी, लिंबू, मिरचीपासून ते मटणापर्यंत अशी लोणच्याची पूर्ण रेंज उपलब्ध असते. ‘डाळ भात लोनचा कोन नाही कोनचा’ असं अस्सल मालवणी तत्त्वज्ञान ऐकूनसुद्धा या लोकांचे लोणच्यावरील प्रेम काही कमी होत नाही. ‘पाणीपुरी’ तर बायकांना इतकी आवडते उद्या एखादी स्त्री पंतप्रधान झालीच तर ‘पाणीपुरी’ हे ‘राष्ट्रीय खाद्य’ म्हणून घोषित केले जाईल. भेळपुरी, ओली भेळ, शेव बटाटा पुरी, रगडा हि पाणीपुरीची मागची पुढची भावंड देखील तितक्याच ताकदीची आहेत. आज काल घरोघरी दिसणारी ‘रेडी टू इट’ चायनीज सुप्स शरीरात किती आंबटपणा वाढवत असतील याची कल्पना केलेलीच बरी. ‘देसी चायनीज’ हा महान प्रकार आजच्या तरुणांचा वीक पॉइंट आहे. खऱ्या चायनीज माणसांनी हे देसी चायनीज खाल्ले तर ते झीट येऊन पडतील. रोजच्या रोज व्हेज मंचुरियन, सोया चिल्ली, पनीर चिल्ली हे प्रकार खाणारी मंडळी ‘शेखचिल्ली’ प्रमाणे आपल्याच आरोग्याचा घात करत आहेत. पाण्याऐवजी कोल्ड ड्रिंक पिणारी पिढी आता भारतातही दिसू लागली आहे. भारतातल्या अनेक खेड्यात अजूनही पुरेसे शुध्द पिण्याचे पाणी मिळत नाही पण पेप्सी कोक मिळते हे चित्र प्रगतीच्या कोणत्या पाऊलखुणा दाखवते ? आयुर्वेदानुसार दही हा क्वचित खाण्याचा पदार्थ आहे पण लोक ते सर्रास खातात. बरं हे दहीसुध्दा बाहेरून आणले जाते. दही जेवढे जुने होईल तितका त्याचा आंबटपणा देखील वाढत जातो. महिनाभर महिनाभर जुने असलेले दहीसुध्दा आपल्या गळ्यात मारले जाते अनेकांना ठाऊकच नसते. ‘ओल्ड फॅशन्ड’ लोक दही खातात तर आजची नवी पिढी दह्याचा सावत्र भाऊ असलेल्या ‘योगर्ट’च्या मागे आहेत. आजकाल आईसक्रिम प्रमाणेच वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट बाजारात मिळते. शरीरात चांगले बॅक्टेरिया हवे असतील तर योगर्टला पर्याय नाही हे सतत जाहिरातीतून मनावर बिंबवले जाते आहे. जेवणानंतर ताक घेतले पाहिजे हे आयुर्वेद सांगतो पण ते किती ? तर अर्धी किंवा एक वाटी. हल्ली ताकाला ‘कच्छी बियर’ असे म्हणतात. दिवसाला लिटर लिटर ताक पिणारे गुजराती पेशंट आमच्या पाहण्यात आहेत. पनीर, बंगाली मिठाई यासारखे पदार्थ दुध नासवून तयार केले जातात त्यामुळे त्यांची चव कशीही असली तरी शेवटी ते शरीरात आंबटपणा वाढवतात. ईडली डोसा यासारखे आंबवलेले साउथ इंडियन पदार्थ आपण किती खातोय याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. तीच गोष्ट बेकरी प्रॉडक्टची. पाव, ब्रेड खाताना गोड लागले तरी ते मुळात आंबवलेले असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्या आंबट शौकीन पणाची खात्री पटवण्यासाठी सध्या इतकी यादी पुरे. तन मन आंबट बनते गं मधुर (गोड), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटू (तिखट), तिक्त (कडू) आणि कषाय (तूरट) या सहा चवी आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. या सहाही चवीचे पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजेत म्हणजेच आहार हा ‘षड्रस’ असला पाहिजे असे आयुर्वेद सांगतो. याउलट *कोणत्याही एकाच चवीचा अतिरेक शरीराला दुर्बल बनवतो* असाही ईशाराही दिलेला आहे. *(एकरस अभ्यासो दौर्बल्यकराणां)* आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात हे चरकाचार्यांनी सांगितले आहे. तेच आता आपण पाहूयात. उष्णता वाढणे आंबट पदार्थ स्पर्शाला थंड वाटतात उदा. संत्रे, मोसंबे त्यामुळे ते थंड असतात असा गैरसमज होतो. स्पर्शाला थंड वाटले तरी आंबट पदार्थ अंतिमत: शरीरात उष्णता वाढवणारे असतात. (उष्णवीर्य हिमस्पर्श) उष्णता वाढते म्हटले की आपण पहिल्यांदा तिखट गोष्टी खायच्या बंद करतो पण *आंबट आणि खारट पदार्थ तिखट पदार्थांपेक्षाही अधिक उष्ण असतात असे आयुर्वेद सांगतो.* त्यामुळे अतिप्रमाणात आंबट गोष्टी खाल्ल्याने शरीरात पित्त आणि उष्णता वाढते. म्हणूनच उन्हाळ्यात दही खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो आपण मात्र नेमके उलट वागत असतो. माझ्याकडे पेशंट म्हणून आलेली एक कॉलेज युवती. गेले अनेक दिवस मासिक पाळीच्या वेळी जास्त ब्लीडिंग होते अशी तक्रार होती. दोन गायनॅककडे दाखवून झाले पण औषध घेतले की थोड्या दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’. तिची व्यवस्थित हिस्ट्री घेतल्यावर ती रोज मीठ लावलेल्या चिंचेच्या गोळ्या खाते असे लक्षात आले. ते कटाक्षाने बंद करायला सांगून शरीरातली उष्णता कमी होण्याची औषधे दिली तेव्हा तिचा त्रास पूर्णपणे गेला. वारंवार तोंड येणे, नाकाचा घोळणा फुटणे, डोळ्यांची आग होणे, पित्ताची डोकेदुखी (मायग्रेन) अशा आजाराच्या अनेक पेशंटमध्ये जास्त प्रमाणात आंबट खाण्याची सवय बघायला मिळते. त्वचारोग त्वचेवर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जी विशेषतः तीव्र सूर्यप्रकाशाची ॲलर्जी (Photo sensitivity) असलेले रुग्ण ‘आंबट शौकीन’ असलेले बघायला मिळतात. याशिवाय अंगावर वारंवार गळू (Abscess) होण्याची प्रवृत्ती असलेले रुग्ण हल्ली बघायला मिळतात हे देखिल बऱ्याचदा अतिप्रमाणात आंबट पदार्थ खात असतात. अकाली केस पांढरे होणे, टक्कल पडणे यामध्ये सुध्दा आंबट आणि तिखट चवीचा अतिरेक दिसून येतो. मुलांचे आजार आपल्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी आहे असा जगातल्या प्रत्येक आईचा समज असतो. मग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुणीतरी ‘व्हिटामिन सी’ घेण्याचा सल्ला देते. गुगलवर सर्च करून संत्रे आणि मोसंबे या लिंबूवर्गीय फळात (म्हणजे मराठीत Citrus Fruits) मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असल्याचे समजते आणि त्यानंतर संत्री मोसंब्याचा मारा सुरु होतो. सोबतीला Tangy फ्लेवर असलेले लेज, कुरकुरे आहेतच. या सगळ्यांमुळे या मुलांची प्रतिकारशक्ती वाढायची राहते बाजूला उलट त्यांना सर्दी खोकला सुरु होतो. वारंवार सर्दी खोकला होणाऱ्या मुलांपैकी अनेक मुलं ‘संत्री मोसंबीग्रस्त’ असतात. उन्हाळा सुरु झाला कि नाकाचा घोळणा फुटणारी मुलं जास्त प्रमाणात आंबट खाणारी असतात. लहान वयात चष्मा लागणे, डोळा आळशी होणे (Amblyopia) या मध्ये मोबाईल आणि टी.व्हीच्या अतिरेकासोबत अति आंबट खाणेसुद्धा बऱ्याचदा दिसून येते. अम्लपित्त खाल्लेले अन्न वरवर येणे, घशाशी आंबट पाणी येणे, छातीत पोटात आग होणे, चक्कर येणे, तोंड आंबट वाटणे अशी अम्लपित्ताची लक्षणे असलेले असंख्य रुग्ण आहेत. आधुनिक वैद्यकशास्रात सांगितलेले GERD, Peptic Ulcer, Duodenal Ulcer, Non Ulcer Dyspepsia, Oesophagitis, Gastritis, H Pylori infection अशी आणि यासारखी अनेक नाव धारण करून येणाऱ्या रुग्णांची चिकित्सा अम्लपित्ताप्रमाणे करावी लागते. यातले बहुतांश जण आम्ही आंबट खात नाही असे सांगत नसले तरी आजाराची लक्षणे दिसण्याआधी हि मंडळी ‘आंबट शौकीन’ असल्याचे बऱ्याचदा बघायला मिळते. अम्लपित्ताच्या रुग्णात दिसणारी दात शिवशिवणे, फ्रेश न वाटणे, सांधे दुखणे, डोकेदुखी, घामाला दुर्गंधी येणे, कपड्यांवर घामाचे डाग पडणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे ही लक्षणे शरीरात अम्लता वाढल्याची आहेत. सांध्याचे आजार तरुण वयातच सुरु होणारी सांधेदुखी आणि आंबट खाण्याचा अतिरेक हे समीकरण बर्याचदा बघायला मिळते. अशा प्रकारच्या सांधेदुखीमध्ये हातापायांची बोटे, पायाचा अंगठा, घोटा, मानेची हाडे, टाचदुखी या छोट्या सांध्यांवर परिणाम झालेला बघायला मिळतो. अम्लपित्त आणि टाचदुखी ही तर कॉंग्रेस राष्ट्रवादीसारखी एकत्रित जोडी आहे. (भाजप शिवसेनेसारखी म्हणता येईल अशी परिस्थिती सध्या तरी नाही.) यातली बरीचशी मंडळी आंबट खाण्यात आल्यावर सांधे धरतात आणि दुखणे वाढते असे निरीक्षण नोंदवतात. काहीही काम न करता थकवा येणे याला आयुर्वेदात म्हणजे ‘क्लम’ असे म्हटले आहे. सर्व शरीर जड वाटणे, विश्रांती घेऊनही बरे न वाटणे, सर्व शरीर ढीले झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसतात. सर्व शरीरात पित्ताचा आंबटपणा वाढल्याने आलेले हे शैथिल्य असते. आधी कडक असलेल्या कणकेच्या गोळ्यात यीस्ट मिसळून थोडा वेळ ठेवल्यास कणिक फुगते आणि कडकपणा कमी होऊन तो गोळा थुलथुलीत बनतो तसाच प्रकार बऱ्याचदा अम्लपित्ताच्या रुग्णात बघायला मिळतो. आधुनिक शास्रानुसार Fibromyalgia, Chronic fatigue syndrome असे निदान केलेले पेशंट ‘क्लम’ या कॅटगिरीत बघायला मिळतात. अत्यम्लं जरा साक्षात् आंबट पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीर शिथिल होते, लवकर चष्मा लागतो, सांधे दुखतात, केस लवकर पांढरे होतात, लवकर टक्कल पडते, दात कमकुवत होतात म्हणजेच माणूस लवकर म्हातारा होतो. म्हणूनच ‘अत्यम्लं जरा साक्षात्’ म्हणजेच ‘अधिक आंबट खाणे म्हणजे साक्षात म्हातारपण आहे’ असे वाग्भट म्हणतात. असा ‘आंबट शौक’ आपल्याला लवकर म्हातारा बनवत असला तरी त्याचा प्रतिकार करणारा आणि आपले तारुण्य दीर्घकाळ टिकवणारा एक आंबट पदार्थसुध्दा आहे. तो कोणता हे पुढील लेखात पाहूया. लेखक © डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ एम.डी. (आयुर्वेद) आयुष आयुर्वेद क्लिनिक, A – 5, पाम व्ह्यू, RX – 37, MIDC, डोंबिवली (पू) 9224349827 drpushkarwagh@gmail.com हा लेख शेअर करण्याची इच्छा असल्यास कोणताही बदल न करता शेअर करावा ही विनंती. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website