||श्री||

|| बोडण ||

चित्पावन(कोकणस्थ) ब्राह्मण समाजात होणारा वैशिष्ट्यपूर्ण समारंभ म्हणजे बोडण! देवीला अर्पण केलेली ही एकप्रकारची विशेष आराधना आहे. वार्षिक, द्वैवार्षिक,त्रैवार्षिक, पंचवार्षिक किंवा मंगल कार्याचे बोडण केले जाते. काही वेळा कारणिक/ नवसाचे बोडणही केले जाते. घरात होणारा हा आनंदाचा मांगलिक समारंभ आहे त्याचा बागुलबुवा करून घाबरून जाऊ नये. ‌सुयोग्य नियोजन आणि घरातील सर्वांनी सहभाग घेतला तर यात अवघड असे काही नाही.

मला उपलब्ध असलेल्या माहितीनुसार व प्रत्यक्ष अनुभवातून ही माहिती देत आहे. प्रत्येकाच्या घरातील पद्धती वेगवेगळ्या असू शकतील, त्यामुळे हेच योग्य किंवा हेच चुकीचे असे म्हणता येणार नाही. योग्य वाटेल ते घ्यावे अयोग्य वाटेल ते सोडून द्यावे. बोडणाची तयारी करणे सहज व सोपे व्हावे यासाठी हा प्रयत्न!

*बोडण कधी करायचे?*

चैत्र,पौष व चातुर्मास बोडणासाठी वर्ज्य आहेत. परंतु दाते पंचांगानुसार बोडण कोणत्याही महिन्यात करायला हरकत नाही. वैशाख व मार्गशीर्ष बोडणासाठी उत्तम महिने आहेत.नवरात्राचे बोडण नवरात्रात चालते. तरीही सर्वसाधारण दिनशुद्धी पाहून तसेच सुवासिनी व मुख्य कुमारिकेची उपलब्धता पाहून बोडणाचा दिवस निश्चित करावा.
घरात गर्भवती असल्यास तसेच घरातील व्यक्तीचे निधन होऊन वर्ष पूर्ण व्हायचे असेल तर मात्र बोडण करू नये.तसेच शक्यतो दोनपेक्षा जास्त बोडणं साठवू नयेत.

*बोडणाची पूर्वतयारी*

१) घरातील साफसफाई
२) तांबे/पितळेची परात व इतर पूजेच्या उपकरणांची स्वच्छता
३)बोडण लाकडी काथवटीत भरायचे असेल तर काथवटीची स्वच्छता. कुठे चिर नाही ना ते पहावे.असल्यास आवश्यक दुरुस्ती व पाॅलिशकाम
४) कापसाच्या वाती व वस्त्रे
५)फुले,फळे,नारळ,गजरे,विड्याची पाने
६) ओटीच्या पिशव्या, भेटवस्तू ,दक्षिणेची पाकिटे तयार करणे.
६) स्वयंपाकाची पूर्वतयारी(किराणा,भाजी, दूध,दही,तूप इ.) दूध,दही,तूप शक्यतो गाईचे असावे.
७) वाढपाच्या भांड्यांची व्यवस्था
८) शक्य असेल तर निमंत्रित सुवासिनींना व कुमारिकेला प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण द्यावे.जातांना सोबत सुवासिक तेल, शिकेकाई (आजकाल शॅम्पू)व उटणे न्यावे. हळद कुंकू लावून हे सर्व साहित्य द्यावे व बोडणाचे तसेच भोजनाचे आमंत्रण करावे. एकापेक्षा अधिक बोडणं असल्यास बोडण कालवायला व फक्त जेवायला कोण ते स्पष्ट सांगावे.
९) काही जणींना बोडणावेळी देवीचा संचार होतो.अशा सुवासिनींना आमंत्रित केले असल्यास विशेष काळजी घ्यावी.त्यांना काय हवे नको ते पहावे.हा वैयक्तिक श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय आहे त्यामुळे त्याबद्दल उगीचच चर्चा किंवा थट्टा करु नये.
१०)येणारी कुमारिका अगदीच अपरिचित असेल तर तिच्या सोबत तिच्या आईलाही आमंत्रित करावे. आई सोबत असेल तर कुमारिका लाजत-बुजत नाही.

*बोडणात सहभागी होणाऱ्या सुवासिनी व कुमारिकेसाठी नियम*

१) सर्व सुवासिनी व कुमारिका या कोकणस्थ ब्राह्मणच असाव्यात.(हा समारंभ कोकणस्थ ब्राह्मणांचाच असल्याने त्यांना या कार्यक्रमाची माहिती असते)बोडण ५ जणींनी भरायचे असते.एक यजमान सुवासिनी व एक कुमारिका आणि अन्य तीन सुवासिनी असतात.काही ठिकाणी ४ सुवासिनी म्हणजे एकूण ६ जणी तर दक्षिण कर्नाटकातील चित्पावन ब्राह्मण लोकांत ७ सुवासिनी म्हणजे एकूण ९ जणींचे बोडण असते.
२) कुमारिका शक्यतो ३ ते ५ जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत वयाची असावी. (३ ते ५ हे वय अगदी निरागस असते. )
३) सुवासिनी याही अनुभवी (४५ते ५० वयातील) असाव्यात. (अशी अट नाही)
४) सुवासिनी, यजमान सुवासिनी व कुमारिका या एकमेकींच्या थेट नात्यातील नसाव्यात.उदा.सासू-सून,आई-मुलगी,जावा-जावा असे नसावे.
५) सर्व सुवासिनी व कुमारिका यांनी सुस्नात, प्रसन्न मनाने वेळेत पोहचावे.(सकाळी १०.३० ते ११ च्या दरम्यान)
६) सुवासिनींनी शक्य असेल तर रेशमी सकच्छ(नऊवारी) किंवा किमान सहावारी साडी नेसून जावे.कुमारिकेने स्वच्छ रेशमी परकर पोलके घालावे. पूर्वी
स्नानापासूनच बोडण असेल तिथे बोलवत.आता ते शक्य नाही.निदान इतपत नियम पाळावेत.
७) सुवासिनी व कुमारिका यांनी आपले केस मोकळे सोडू नयेत. शक्य असेल तर वेणी किंवा अंबाडा घालावा. निदान केस घट्ट बांधलेले असावेत. केसातून उगाचच हात फिरवू नयेत.हाताची व पायाची नखे कापलेली असावीत.
८)कुमारिकेचे नाक टोचलेले असल्यास उत्तम(सध्या दुर्मिळ आहे) कपाळावर कुंकू किंवा टिकली, गळ्यात छोटासा दागिना हातात बांगड्या,पायात पैंजण असावेत.
८) सुवासिनींसाठी मुख्य सौभाग्य अलंकार म्हणजे कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या, कानात कुड्या किंवा तत्सम दागिना,नाकात नथ,आणि पायात जोडवी असावीत.
९)बोडणाला जाताना घरून पंचामृतातील एखादा पदार्थ जरूर न्यावा.
१०) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमंत्रित सुवासिनी या सश्रद्ध असाव्यात.उगीचच चुकीचे तर्क करून चर्चा करणार अशा नसाव्यात.
१०) आपण देवीच्या पूजेसाठी जातो आहोत याचे कायम भान असावे. उगाचच मोबाईल वर बोलत बसणे, निरर्थक चर्चा करणे टाळावे. शक्यतो मौनात रहावे.येत असतील तर देवीची स्तोत्रे,भजने जरूर म्हणावीत.
११)बोडणावेळी आपल्याला देवीचा संचार होत असेल तर तसे स्पष्ट सांगावे.पुष्कळवेळा यांचा संभ्रम असतो , त्यामुळे विनाकारण गैरसमज,वाद निर्माण होऊन मूळ कार्यक्रमाचा बेरंग होतो.

*बोडणाची तयारी*

१) पितळी किंवा तांब्याची परात (कल्हई लावलेली नसावी) किंवा लाकडी काथवट
२) बसण्यासाठी पाट किंवा आसने किमान ६, रांगोळी
३) पाय धुवायची तयारी -गरम पाणी,दूध,पाय पुसायला टाॅवेल,पायाला लावायला चंदन आणि ओले कुंकू असेल तर स्वस्तिकाचा ठसा,अत्तर, गुलाबपाणी, औक्षणाची तयारी, गहू आणि खोबरं वाटी अशा ओट्या,गजरे
४) हळद, कुंकू,गंध,अक्षत, अष्टगंध,बुक्का,अत्तर
५) सुवासिक तेल, शिकेकाई, उटणे आणि गरम पाणी
६)ताह्मने २ ,पळी भांडे, तांब्या,स्वच्छ पाणी (छोटी घागर भरून)
७) विड्याची पाने ६ (तीन विडे), सुपारी (४), सुट्टे पैसे,केळी(२)
८) कापसाची वस्त्रे (२),जानवी(२)
९) निरांजन-फुलवाती-तूप, उदबत्ती,कापूर
१०) समई-तेल,जोडवाती आणि औक्षणाची तयारी
११) पंचामृत स्नान-अभिषेकासाठी थोडे आणि कालवताना घालण्यासाठी वेगळे
चांदीची पळी (त्याला सोन्याची साखळी गुंडाळून ठेवावी)
१२) देवीला घालण्यासाठी अलंकार(लेणी) यासाठी कणीक दुधात घट्ट भिजवावी रंग येण्यासाठी थोडी हळद आणि चिमुटभर साखर घालावी. लेणी करताना लेणी केळीच्या किंवा कर्दळीच्या पानावर ठेवावीत व नंतर आठवणीने झाकून ठेवावीत म्हणजे कोरडी पडत नाहीत व व्यवस्थित वाहता येतात. मुख्य आवश्यक लेणी म्हणजे देवीला बसायला सिंहासन,मागे ठेवायला हारा-डेरा, मंगळसूत्र,नथ, कानातील कुड्या, बांगड्या,जोडवी इ. हौसेने पुष्कळ करता येईल बिंदी, कंबरपट्टा, गळ्यातील हार …आवड असेल तर याला साधे आणि रंगीत मोती लावून आकर्षक सजावट करता येईल.(कालवलेले बोडण गायीला देणार असाल तर मात्र मोती लावू नयेत.) तसेच याच कणकेचे ५ दिवे-२लोड (फुलवाती व तूप घालून) आणि ५ भंडारे (भंडारे म्हणजे मुरड घातलेली अगदी छोटी पुरी)करावेत.
१३)देवीला दाखवायला छोटा आरसा आणि वारा घालायला पंखा(ऐच्छिक.. हौसेचा भाग)
१४) नैवैद्य- गणपतीसाठी गुळ-खोबरे,देवीसाठी दूध साखर आणि ५ महानैवेद्य ( काही ठिकाणी ६ नैवैद्य काढतात)बोडण कालवून नंतर दाखवतात तो कुमारिकेला किंवा काही ठिकाणी देवीचा म्हणून स्वत: भक्षण करतात अथवा गाईला देतात.
महानैवेद्यात मुख्य आवश्यक गव्हाल्याची खीर, पुरणपोळी,भाजाणीचे वडे व मग नेहमीचे सर्व पदार्थ वरणभात, कोशिंबीर,चटणी,तळण,इ.जसे जमेल तसे.हे नैवेद्य वाढताना केळीच्या किंवा कर्दळीच्या पानावर थोडं तूप लावावे त्यावर पुरणपोळी ठेवून मग त्यावर इतर सर्व पदार्थ वाढावेत.
१५)गणपतीसाठी दूर्वा व लाल फुले, देवीसाठीसुवासिक फुले व पत्री ( बेल,तुळस,मुळासकट दूर्वा,मरवा, आघाडा)
१६)बोडण कालवून झाले की हाताला लावायला पुरण, थोडे केशर घालून केलेले गरम पाणी
१७ कालवून झालेले ब़ोडण ठेवायला मोठा डबा किंवा झाकण बसेल असे मोठे पातेले
१८)कहाणीचे पुस्तक,सनई किंवा अन्य मंगलवाद्याची व्यवस्था
१९) जेवणानंतर द्यायला विडे,दक्षिणा,खण-नारळ तांदूळ ओटी किंवा अन्य भेटवस्तू

*बोडणाचा मुख्य दिवस*

शक्य तितक्या लवकर उठून आपले रोजचे आन्हिक आवरावे. रोजची देवपूजा,वैश्वदेव व इतर नित्य अनुष्ठान काही असेल तर ते करून घ्यावे. स्वयंपाकाची तयारी पाहून स्वयंपाक सकाळी १०.३० पर्यंत पूर्ण होईल असे पहावे.ब़ोडण दुपारी १२ चे आत पूर्ण व्हायला हवे.

बोडणाचा संकल्प उपलब्ध आहे. दक्षिण कर्नाटकातील चित्पावन ब्राह्मण कुटुंबात या संकल्पानुसार बोडण केले जाते. मी स्वतः हा संकल्प मिळवून आमच्या घरी तसे बोडण करतो. यात मुख्य संकल्प, पात्रस्थापना, गणेश स्थापना व पूजन, देवी स्थापना व पूजन, बटुक(भैरव)व नाटेश्वरी स्थापना व पूजन, नवदुर्गा व अष्टदिकपाल यांचे आवाहन व पूजन हे घरातील पुरुष यजमान करतो. व नंतर चे विधी यजमान सुवासिनी करते. असो.

*महाराष्ट्रातील बोडणाचा विधी आता पाहूया.*

घरातील मुख्य दरवाजावर तोरण बांधावे. आंब्याच्या डहाळ्या लावाव्यात. तुळशीच्या समोर सडा घालून रांगोळी काढावी. जिथे बोडण कालवायचे ती जागा स्वच्छ करावी. शक्य असेल तर गोमय व गोमूत्र शिंपडून घ्यावे. आंब्याच्या डहाळ्या व फुलांनी जागा सुशोभित करावी. मंगलवाद्ये लावावीत. मधोमध पाट मांडून त्यावर बोडणाची विशिष्ट रांगोळी काढावी. भोवताली पाच पाट मांडावेत. मधल्या पाटावर रांगोळी वर हळद कुंकू ,अक्षत घालून त्यावर परात किंवा काथवट मांडावी. परातीला गंध अक्षत, फुले आणि हळद कुंकू वहावे.
निमंत्रित सुवासिनीं व कुमारिका यांचे स्वागत करावे. त्यांना गुळ पाणी/सरबत द्यावे. त्यांनी आणलेले पंचामृतातील पदार्थ तयारीत ठेवून घ्यावेत.
यजमान सुवासिनी सह इतर सुवासिनी व कुमारिका यांनी आता तुळशीपाशी यावे. घरातील इतर सुवासिनींनी प्रथम तुळशीची पंचामृती पूजा करावी. धूप दीप व फळाचा नैवेद्य दाखवावा. तुळशीची ओटी भरावी. आता प्रथम कुमारिका तिच्या शेजारी यजमान सुवासिनी व मग इतर सुवासिनींनी उभे रहावे. घरातील इतर सुवासिनींनी या सगळ्या जणींच्या पायावर गरम पाणी, दूध परत गरम पाणी घालावे. पाय पुसून त्यावर चंदन लावावे. कुंकवाचे स्वस्तिक काढावे/ठसा उठवावा. हळद कुंकू लावावे, अत्तर गुलाबपाणी शिंपडून,गजरे द्यावेत. ओटी भरावी.ही ओटी बोडण भरताना सुवासिनी व कुमारिका यांनी आपल्या सोबत ठेवावी. औक्षण करावे.आता तुळशीला नमस्कार करून कुमारिकेला पुढे ठेवून तिच्या मागे यजमान सुवासिनी, तिच्या मागे इतर सुवासिनींनी घरात यावे. यांच्यामधून कोणी जाऊ नये. या सर्वांनी देवघरात जाऊन देवाला नमस्कार करावा. यजमान सुवासिनीने घरातील अन्नपूर्णा देवीला हळदकुंकू वाहून विडा नारळ ठेवावा. ताह्मनात देवी व घंटा घ्यावी. बोडण निर्विघ्नपणे यथासांग संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करावी. कुमारिकेस पुढे घेऊन त्याच क्रमाने बोडण भरायच्या जागी जावे. यजमान सुवासिनीने पूर्वेकडे तोंड करून बसावे. तिच्या उजव्या बाजूला कुमारिकेने व नंतर इतर सुवासिनींनी बसावे. मदतीसाठी बाजूला मदतनीसांनी थांबावे.
१)सर्वांनी दोन वेळा आचमन करावे.
२) आता यजमान सुवासिनीने परातीच्या बाहेर पाटावर किंवा छोट्या ताह्मनात अक्षत घालून त्यावर सुपारी मांडावी. सुपारी वर श्री गणेशाचे आवाहन करून पूजा करावी. गंध अक्षत हळद कुंकू लावावे.कापसाचे वस्त्र आणि जानवे घालावे.दूर्वा आणि लाल फुले वहावीत. उदबत्ती व निरांजन ओवाळावे. गूळ खोबरं नैवेद्य दाखवून गणपतीपुढे विडा ठेवावा व सर्वांनी नमस्कार करून बोडण निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना करावी.
यादरम्यान घरातील इतर सुवासिनींनी नैवेद्य वाढायला घ्यावेत.
३) परातीत छोटे ताह्मन ठेवून त्यात अन्नपूर्णा देवीला ठेवावे. शुद्ध पाण्याने स्नान घालावे. मग गंध अक्षत मिश्रित पाणी घालावे. पंचामृत घालावे. पुन्हा शुद्धोदक घालावे.नंतर गंधोदक घालून पुन्हा शुद्धोदक घालावे.सुवासिक तेल, शिकेकाई, उटणे लावून गरम पाणी घालून देवीला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावे. परातीतील ताह्मन आता बाहेर ठेवावे. परातीत मधोमध अक्षत घालून त्यावर देवीला बसण्यासाठी केलेले कणकेचे सिंहासन ठेवून त्यावर देवीला ठेवावे. सिंहासनाच्या मागे हारा-डेरा ठेवून त्यात थोडे दूध घालावे.
४) आता देवीला कापसाचे वस्र वहावे. जानवे घालावे. गंध अक्षत वहावे.हळद-कुंकू, अष्टगंध-बुक्का वहावा.अत्तर लावावे.फुले व पत्री वहावी. भंडारे सोडून कणकेचे अलंकार वहावेत.
५) उदबत्ती, धूप दाखवावा.निरांजन ओवाळावे.
६) दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. परातीत देवीच्या पुढे विडा मांडावा(विड्याची २ पाने,सुपारी,पैसा आणि केळं)
७) आता देवीला महानैवेद्य दाखवावा. यात दोन प्रकार आहेत. एक तर वाढलेले नैवैद्य देवीच्या भोवती परातीत मांडावेत, आधीपासून मांडून ठेवू नयेत. नैवैद्य दाखवावा व नैवैद्याखालील केळीची किंवा कर्दळीची पाने काढून घ्यावीत नैवेद्य परातीत ठेवावेत.
किंवा दुसरा पर्याय म्हणजे पाचही नैवेद्य परातीच्या बाहेर दाखवावेत , झाकून ठेवावेत. आरती झाल्यावर पंचामृत घालून बोडण कालवायला सुरुवात केली की मग पानातील नैवेद्य परातीत घालावेत.पान घालू नये.
८) यानंतर कणकेचे ५ दिवे लावावेत.धूप-उदबत्ती ओवाळावी.
९)इतर सुवासिनी व कुमारिका यांनी देवीला हळदकुंकू वाहून सर्वांनी मिळून आधी गणपतीची व नंतर देवीची किंवा बोडणाची म्हणजे अन्नपूर्णा देवीची आरती करावी.

काही संग्रहित आरत्या येथे देत आहे.
——————-
बोडणाची आरती
(१)
जय देवी जयदेवी जय अंबामाते।. तुमचा मी आज खेळ मांडीते ।।धृ।। सुवासिनी कुमारी ह्या आल्या सदना। पाय धुवूनी करिते आऔक्षणा।। कुंकुम श्रीफल देवुनि ओट्या ही भरिते। लीन होऊनी वंदन करिते ।।१।। जय देवी।। आवड तुम्हा मोठी पंचामृताची। तशीच आहे पुरणा वरणाची।। दूध, दही, तूप, मध, शर्करा नच कमिते ते। तृप्त होऊनि चेले तू माते ।।२।। जय देवी।। सुवासिनी कुमारी बसती प्रेमे भोजना। त्यासी आर्पिते वीडा दक्षणा।। भक्ति भावे केला खेळ मानुनि घेई। सौभाग्य समृद्धी सकला देई ।।३।। जय देवी।।
———————–

(२)
(चाल- आरती ज्ञानराजा) आरती अन्नपूर्णा। माझी येवू दे करुणा। आरती अन्नपूर्णा नवरात्री नवमीला, थाट बोडणाचा केला, कुवार-सुवासिनी, तुम्आ करिते वंदना।। पायावर दुधपाणी, माझ्या तुळशी अंगणी, धरूनि प्रेम भाव, आता यावे हो सदना।। कोरीव काथोट, आत कणिकेचा पाट, वरती बैसविली, तुझी मूर्ती सुवर्णा.. पाच दिवे पुरणाचे, माझ्या प्राणांचे, ओवाळी ते मनोभावे, वरी देते दक्षिणा।। पाच पोळ्या, पाच पानी, वरी दही दूध लोणी, नैवेद्य ताटीचा, तुला करिते अर्पणा।। साडी चोळी जरी काठी, पाच फळांची ओटी, श्रीफळ मानाचे, देते सौभाग्य वाणा।। मनोभावे सेवा केली, त्याची प्रचीती आली, राहो कृपा-दृष्टी, अशी माझी प्रार्थना।।
———————–
(३)
उग्र तूझें रूप तेज हें किती ।
शशी-सुधासम असे तव कांती ॥
अष्टभुजा अष्ट आयुधें हातीं ।
करिसी रिपुसंहार भक्त वंदीति ॥ ध्रु० ॥
जय देवी जय देवी जय कुलस्वामिनी ।
आम्ही बहु अपराधी आलों तव चरणी ॥ १ ॥
पंचामृतीं तुज घालुनी स्नान ।
सर्व अलंकार सर्व भूषण ॥
नीलवर्ण वस्त्र करिसी परिधान ।
अंबे व्याघ्र तुजला आवडे वाहन ॥ जय देवी० ॥ २ ॥
नाकीं तुझ्या नथ पायीं पैंजण ।
जननई शक्ती आदिमाया तूं पूर्ण ॥
धूप दीप कर्पूर करूं आरतीला ।
पंचपक्वान्नांचा नैवेद्य तुला ॥ जय देवी० ॥ ३ ॥
संसारतापाचे भय आम्हां भारी ।
कृपा करूनियां सर्व निवारीं ॥
आमुचे मनोरथ पूर्ण तूं करीं ।
उमा तुझे दृढ चरण धरी ॥ जय देवी० ॥ ४ ॥

१०) परातीत देवीच्या भोवती अक्षत घालून आरतीचे दिवे ठेवावेत. देवीला कापूर ओवाळावा.शक्य असेल तर देवीला आरसा दाखवून पंख्याने वारा घालावा.
११) पाचही जणींनी देवीला भंडारे वहावेत.यजमान सुवासिनी, कुमिरिकेसह इतर सुवासिनींनी एकमेकींना हळदकुंकू लावावे.
१२) आता चांदीच्या पळीला सोन्याची साखळी गुंडाळून यजमान सुवासिनीने त्या पळीने दूध घालून दिवे शांत करावेत.
१३) यानंतर त्याच पद्धतीने दुधापासून क्रमाक्रमाने पंचामृत आधी देवीवर मग सभोवती घालावे. हे करत असतानाच कुमारिका व इतर सुवासिनींनी आपला उजवा हात शेजारच्या सुवासिनीच्या उजव्या हाताला तिने तिच्या शेजारील सुवासिनीच्या उजव्या हाताला आणि डावा हात परातीला लावावा. (सगळ्यांनी मिळून पंचामृत घातले असे होते.)
१४) आता यजमान सुवासिनीने परातीच्या काठाला कुमारिकेसह इतर सुवासिनींचे हात पालथे लावावेत आणि आपण स्वत:ही तसेच हात लावून बसावें.
१५) आता घरातील अन्य सुवासिनींनी यांच्या पालथ्या हातावरून दुधाची धार परातीत सोडावी.
१६) यानंतर यजमान सुवासिनीने कुमारिकेचे हात परातीच्या आत लावावेत (बोडण कालवायला सुरू करावे असा अर्थ)आणि तिने बोडण कालवायला सुरुवात करावी. इतर सुवासिनींचेही हात तसेच परातीच्या आत लावावेत.
१७)आता पाचही जणींनी मिळून शांत चित्ताने, आनंदाने बोडण कालवायला सुरुवात करावी. देवीला आनंदाने खेळवावे.आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना करावी.
१८) कुमारिकेला पंचामृततले काय हवे ते विचारावे व ते परातीत घालावे.सुवासिनींनी आणलेले पंचामृतातील पदार्थ ही परातीत घालावेत.कोणताही पंचामृतातील पदार्थ घालतांना तो पूर्ण संपवू नये.थोडा शिल्लक ठेवावा.
१९)बोडणाला बसल्यानंतर ते कालवून होईपर्यंत काही बोलू नये. देवीची स्तोत्रे, भजने म्हणत रहावीत.
२०) घरातील इतर सुवासिनींनी देवीला आणि बोडण कालवत असलेल्या सर्वांना हळदकुंकू लावावे.
२१)बोडण लाकडी काथवटीत कालवले असेल तर ती खोल काथवट भरायला फळांचे काप (केळी,द्राक्षे, सफरचंद,आंबा,फणस),शहाळ्याचे पाणी,सुकामेवा(काजू,खजूर,बदाम,बेदाणे,मनुका) घालतात.
२२) कुमारिकेला आणखी काय हवे असे विचारायचे? ती सांगेल ते घालायचे. धायलीस का? असे विचारायचे तिने हो धायले, मी तृप्त आहे असे म्हणावे.
२३) कुमारिकेने कालवलेल्या बोडणातून देवी, सुपारी आणि पैसा शोधून काढायचा असतो.
२४) घरातील सर्वांना आता नमस्कार करण्यासाठी बोलवायचे. नमस्कार करून जाताना यजमान सुवासिनीने सर्वांच्या कपाळावर बोडणाचा अंगारा लावायचा.यजमान सुवासिनी पेक्षा वयाने मोठे असलेल्यांनी अंगारा स्वत: लावून घ्यावा आणि यजमान सुवासिनीसही लावावा.
२५) कोणी राहिले असेल तर कुमारिकेच्या हातून थोडा अंगारा वाटीत काढून घ्यावा.
२६) शेवट परातीत थोडी खीर किंवा दही साखर घालावी. पुन्हा लवकरच बोडण व्हावे अशी इच्छा! कुमारिकेने आता तीन वेळा उदंड उदंड उदंड असे म्हटले की कालवायचे थांबवावे.दुपारी १२ च्या आत बोडण कालवून व्हायला हवे.
२७) सर्वांच्या हातावर पुरण घालावे.हात परातीत पुरण चोळून स्वच्छ करावेत.देवीला पुरण लावावे,
२७) देवी,पैसा आणि सुपारी गरम पाणी घालून पुसून घ्यावे. देवीला देवघरात जागच्या जागी ठेवावे.दे गंध अक्षत, हळद कुंकू लावावे. फुले वहावीत.देवीच्या मुखास साखर लावावी.
२८) बोडण कालवून झालेल्या सुवासिनी व कुमारिकेच्या हातावर केशर घातलेले गरम पाणी घालावे. बोडणाचा शेष कुठे ही अपवित्र ठिकाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्यतो हात बागेत झाडाखाली धुवावेत. मुद्दाम साबण लावून बेसिन मध्ये धुवू नयेत.
२९) कालवलेले बोडण मोठ्या डब्यात काढून ठेवावे. पूर्वी गाईंना कालवलेले बोडण देत असत. गाय उपलब्ध असेल तर तर गाईला द्या्वे. गाईला देतांना काही न खाण्यासारखा पदार्थ राहिला नाही ना ते पहावे(उदा.पैसा, सुपारी इ.) असेल तर काढून ठेवावे.
दुसरा पर्याय म्हणजे वाहत्या जलाशयात (वाहती नदी किंवा समुद्र)
विसर्जन करणे. सध्या तसाही पर्याय उपलब्ध नसतो. तिसरा पर्याय म्हणजे आपल्यालाच बागेत किंवा शेतात विसर्जन करणे.हा पर्याय शास्त्र संमत नसला तरी व्यवहार्य आहे. काही झाले तरी बोडण भरल्यानंतर सूर्यास्तापूर्वी बोडणाचे विसर्जन होणे आवश्यक आहे.बोडणाबरोबर गणपतीच्या सुपारीचेही विसर्जन करावे.(जलाशयात किंवा गणपती मंदिरात ठेवावी.)

३०) बागेत झाडाखाली हात धुतल्यानंतर सुवासिनी व कुमारिकेने मिळून गणपतीची व बोडणाची कहाणी वाचावी. तोपर्यंत बोडण कालवलेल्या जागेची आवराआवरी करावी. त्या दिवशी बोडण भरून झाल्यावर शक्यतो केर घेऊ नये. गरज पडल्यास ओल्या कापडाने पुसून घ्यावे.
३१)भोजनाची तयारी करून देवीला, घरातील देवाला,वास्तुपुरूषाला नैवेद्य दाखवावा.गोग्रास काढून ठेवावा.
३२) निमंत्रित सुवासिनीं व कुमारिकेसह यजमान सुवासिनीने ही भोजनास बसावे.बोडणासाठी काढलेले जे पंचामृतातील पदार्थ शिल्लक असतील ते जेवताना वाढावेत.
३३) भोजनानंतर विडा दक्षिणा द्यावी द्यावी. कुमारिका व सर्व आमंत्रित सुवासिनींची ओटी भरावी. बोडण कालवतांना शोधलेला रुपया व सुपारी आणि तुळशीची ओटी ही कुमारिकेला द्यावी.सर्वांचा यथोचित आदरसत्कार करावा.कर्म समाप्तीचे सर्वांनी दोनदा आचमन करावे.

अशा प्रकारे मला माहित असलेल्या आणि प्रत्यक्ष केलेल्या तयारीप्रमाणे हे लेखन केले आहे.सोबत बोडणाची रांगोळी आणि बोडणाच्या संग्रहित आरत्या दिल्या आहेत.

आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घरातील चालीरीती वेगवेगळ्या असू शकतात.त्यामुळे यात थोडाफार बदल होऊ शकतो. हा एक आनंद सोहळा आहे,देवीची मनोभावे करायची सेवा आहे. ती जरूर करावी. पुष्कळ वेळा सध्या
बोडणाला नवनवीन पर्याय शोधले जात आहेत, जरूर शोधावेत पण म्हणून मूळ कर्म बंद करू नये. मूळ रीतीसोबत जमेल ते सामाजिक काम/मदत करावेच(उदा.गायीला ग्रोग्रास म्हणून चारा, पंचामृतातील पदार्थांचे दान, गरजूंना मदत इ.) परंतु हे असे समाजोपयोगी काम केले आणि आमचे बोडण झाले असे समजू नये.

आपल्या चित्पावनांचा हा कुळाचार जरूर करा आणि देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्या. धन्यवाद ! ???

© प्रद्युम्न अशोक गोडबोले, सातारा
9422039383

Leave a Reply

Your email address will not be published.