पुत्रदा एकादशी कथा व एकादशी व्रताचे महत्त्व : १३ जानेवारी २०२२ Mandar Sant January 12, 2022 दिनविशेष पौष शुक्लपक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला पुत्रदा एकादशीव्रताचे माहात्म्य सांगतो ते ऐक.पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. तो महापुण्यशील व पराक्रमी असा होता. त्याला शैब्या नांवाची लावण्यखनी, महान पतिव्रता अशी एक स्त्री होती. उभयताना सर्व सुखे अनुकूल होती, संपत्ति त्याची दासी झाली होती,ऐश्वर्य हुजऱ्या बनले होते, ज्ञान भाट झाले होते, सामर्थ्य रक्षक बनले पण हे धर्मराजा ! त्यांना पुत्र संतान नव्हते. ज्या घरात सर्व प्रकारची सुखे आहेत पण त्या घरात तान्हुले हंसत नसेल, चिमुकले बोबडे बोल बोलत नसेल, सोनुले खेळत नसेल, तर ते घर तेजस्वी तारकांनी व्यापलेल्या पण चंद्रप्रकाश नसलेल्या सुंदर आकाशाप्रमाणे, वस्त्रालंकारांनी सजलेल्या पण कपाळी कुंकुमतिलक नसलेल्या स्त्री प्रमाणे, सुराज्याने जिवंत दिसणाऱ्या पण स्वातंत्र्य नसल्यामुळे मेलेल्या देशाप्रमाणे, नवविधा भक्तीने नटलेल्या पण भावावाचून विटलेल्या संताप्रमाणे होय. वनांत संचार करीत असताना नानाप्रकारचे पशु पक्षी, लतावृक्ष निसर्गाचे देखावे पाहिले, पण जेव्हा त्यांनी गाई आपल्या वासरांना पाजित असलेल्या, चिमण्या आपल्या पिलांना भरवित असलेल्या, हरिणी आपल्या पाड्यासह उड्या मारित असलेल्या पाहिल्या, तेव्हा त्यांना फार दुःख झाले. मनुष्यावर दुःखाचे संकट कोसळले म्हणजे त्याला देवाची आठवण होते याच न्यायाने त्यावेळी राजाला भगवंताचे स्मरण होऊन त्याने श्रीकृष्णाची प्रार्थना केली की, “हे श्रीकृष्णा, जगत्रियंत्या ! पुत्रसंतान नसल्यामुळे आम्ही उभयता अत्यंत दुःखी झालो आहोत. आता हे दुःख आम्हाला सहन करवत नाही. तेव्हा यातून आम्हाला मुक्त कर, तूं सर्व शक्तिमान व कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम समर्थ आहेस.अशा प्रकारे तो भगवंताची प्रार्थना करीत आहे, तो त्याला समोर एका सरोवर ऋषींचा समुदाय स्नान करीत आहे असे त्यास दिसले. तेव्हा तो आपल्या पत्नीसह त्यांच्याकडे जाण्यास निघाला. ते सरोवर मानसरोवराहूनही अत्यंत रमणीय होते. त्यातील पाणी अमृताच्या तोडीचे होते त्यात राजहंस पोहत होते, जागजागी कमले विकसीत झाली होती, त्यावर भ्रमर गुंजारव करीत होते, भोक्ताली आंब्याची, चिंचेची, पेरुची, वडाची, पिंपळाची, नारळाची, फणसाची सर्व प्रकारची दाट अशी झाडी होती त्यापैकी प्रत्येक वृक्ष फलांनी लादले होते, पुष्पाना फुलले होते, म्हणून ते आनंदित दिसत होते त्यातून ज्यांना सौगंधिक पुष्पांनी फुललेल्या जाई जुई सारख्या वेलींनी आलिंगन दिले होते त्यांच्या आनंदाचे पर्यवसान रंगेलपणात झाले होते. असल्या कित्येक रंगेल वृक्षावर पोपट मैना एकमेकांना खुलवित होत्या. कोकिळा गायन करित होत्या, बुभुक्षित पक्षी फळांवर ताव मारीत होते. माकडे एकमेकांना वाकुल्या दाखवित होती, सरोवराचे काठावर एका बाजूला पांढरी शुभ्र कबुतरे वर मान करून छाती काढून ऐटनि डुलच चालत होती, तर दुसऱ्या बाजूला हरिणांचा कळप पाणी पित होता. तिसऱ्या बाजूला हिरव्यागार गवतात गाई आपल्या वासरांसह चरत हेत्या व मस्त बैल आपल्या शिंगानी माती उकरुन डरकाळ्या फोडीत होते तर चौथ्या बाजूला निवांत अशी जागा पाहून बगळे, कासवादि जलचरांना भिऊन कांठाशी आलेल्या माशांना गिळण्याकरिता एका पायावर उभे राहून त्यांचे ध्यान करीत होते. अशा त्या रमणीय सरोवरात त्या ऋषीजनांपैखी कोणी स्नान करीत होते, कोणी स्नान करुन अंग पुसून दुसरी वस्त्रे नेसीत होते, कोणी आपला जटाजूट नीटनेटका करीत होते, कोणी रुद्राक्ष, स्फटिक इत्यादि प्रकारच्या आपल्या माळा ठाकठीक बसवित होते, कोणी भस्म लावित होते. कोणी वेद घोष व स्तोत्रपाठ करीत होते. अशा त्यांच्या स्थितीत तो राजा व राजकांता तेथे आली ते त्या ऋषीजनांना साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभे राहिले. आणि म्हणाले की,”महाराज, आपण कोण आहात हे आपल्या या सेवकाला कृपाकरुन सांगा, मी भद्रावती नगरीचा राजा आहे. आपल्या या साऱ्या प्रकारावरुन आपण धर्मशील व समर्थ आहात असे दिसते.” राजाचा हा प्रश्न ऐकून ते ऋषी म्हणाले की, “हे राजा आम्ही विश्वेदेव आहोत. आज पुत्रदा एकादशी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी स्नानास आलो आहोत. जे कोणी पुत्राची इच्छा धरुन हे एकादशी व्रत करतील त्यांना पुत्रप्राप्ती होईल.” ऋषीजनांचे हे भाषण ऐकून राजाला अत्यंत आनंद झाला आणि तो म्हणाला की, “महाराज मला पुत्रसंतती नसल्यामुळे मी दुःखित झालो आहे. माझ्या पितरांचा उद्धार कसा होईल याचीच मला अहोरात्र काळजी लागून रहिलेली आहे. तेव्हा या पुत्रदा एकादशीचे व्रत कसे करावे हे. विधीयुक्त सांगा. म्हणजे मला या दुःखसागरातून आपण तारल्यासारखे होईल. महाराज, या आपल्या सेवकावर कृपा करा.. पुढे त्या ऋषीजनांनी त्या राजाला पुत्रदा एकादशीच्या व्रताचा विधि (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) कथन केला व राजाने आपल्या पत्नीसह आणि त्या ऋषीजनांनी तेथे पुत्रदा एकादशीचे व्रत केले. नंतर राजा आपल्या घराकडे परत आला. काही दिवसानी त्याला रुपवान, गुणवान असा पुत्र झाला व अंती सद्गती मिळाली. हे धर्मराजा ! जे कोणी हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन मोक्षाला जातील.’ पौष शुक्लपक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात पुत्रदा एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला श्रावण शुक्ल एकादशीविषयी विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! ही एकादशी पुत्रदा नावाने विख्यात आहे. ज्याला इहपरलोकी सौख्य मिळावे अशी इच्छा आहे त्याने या तिथीचे व्रत करावे. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने मनुष्याला वाजपेय यज्ञाचे फल मिळते. संततीचे सुख लाभते. तो पापमुक्त होऊन स्वर्गलोकी जातो. आता हिची पावन कथा सांगतो. द्वापरयुगाच्या प्रारंभी महिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा आपल्या प्रजेचे प्रेमाने पालन करीत असे. त्याचा विवाह होऊन पुष्कळ काळ लोटला तरी त्याला संतती झाली नाही. त्याने अनेक उपाय-उपचार केले, पण त्यांचाही उपयोग झाला नाही. उतारवयात त्याला राज्याची फार चिंता वाटू लागली. कशातच सुख वाटेना. शेवटी त्याने प्रजाजनांची सभा बोलावली व म्हणाला, लोक हो ! मी कधीही पाप, रण, अन्याय, ब्राह्मणांची नाडणूक अशी दुष्कर्मे केली नाहीत. नेहमी स्वधर्माला अनुसरूनच वागलो. तुम्हा सर्वांचे हित केले. असे असतानाही मला संतानप्राप्ती झाली तेव्हा उपाध्यायासह अनेक श्रेष्ठ ब्राह्मण नाही. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा.” राजाला संतती व्हावी म्हणून – तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात गेले तेथे लोमश ऋषींची भेट झाली. विप्रांनी त्यांना नमस्कार केला व राजाची चिंता कथन करून – त्याला संतती होण्यासाठी -उपाय 3 विचारला. ते म्हणाले, “विप्रांनो ! महिजित पूर्वजन्मी वाणी होता. तो व्यापारासाठी गावोगाव हिंडत असे. एकदा ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला भर दुपारी तहानेने व्याकूळ होऊन तो एका ग्रामसीमेपाशी आला. तेथील झऱ्याकडे पाणी पिण्यासाठी गेला. तेवढ्यात नुकतीच व्यालेली एक गाय आपल्या वासरासह तेथे आली. ती उन्हाने तापली होती व तहानेने कासावीस झाली होती. पण त्याने तिला हाकलून दिली व ते पाणी स्वतःच प्यायला. त्या दुष्कर्मामुळे या जन्मी तो संततिहीन झाला आहे. आता उपाय ऐका. श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही सर्व प्रजाजनांनी भजन, पूजन, उपोषण व जागरण करा. द्वादशीला विष्णुपूजन करून तुम्हां सर्वांचे एकत्रित पुण्य राजाला अर्पण करा. त्यामुळे त्याला अपत्यप्राप्ती होईल.” ते ऐकून सर्वांना आनंद झाला. त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले. त्या पुण्यप्रभावाने राणी गर्भवती झाली. तिने पुत्राला जन्म दिला. श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा। मम हृदयीच्या नारायणा । ऐकून कामिका महिम्ना । संतोष वाटला चित्तासी ।।१ ।। आता श्रावण शुद्ध एकादशी। सांग श्री तिचेही माहात्म्य मजसी। कृपया प्रथम या समयासी। करी विशद कथानक ।। २ ।। श्रीकृष्ण वदला धर्माप्रत । या तिथीला पुत्रदा म्हणतात । पापहारक म्हणुनी प्रख्यात । कथा हिची ऐकावी ।।३।। कारण महत्त्व या तिथीचे । असे अतिश्रेष्ठ साचे । श्रवणे वाजपेय यागाचे । फल मिळते श्रोतया ॥४ ॥ फार पूर्वी द्वापरात । महिष्मती नामक नगरीत । राजा एक महीजित । प्रजापालन करीतसे।।५ । समस्त सुखे हात जोडून । परी नव्हते काही संतान । तेणे दुःखित अंतःकरण । काही रुचेना त्यालागी ।।६।। कधी कधी होउनी व्यथित । विचार करी एकांतात । काय अर्थ या जगण्यात । व्यर्थ वाटते राज्यही।।७।। संतानहीन मनुष्याते । नच इहपर सौख्य लाभते । काय करावे ते नच कळते। पितृक्रण राहिले ।।८।। अशा प्रकारे तो राजन । संततीस्तव मनोमन । झुरू लागला रात्रंदिन । तेणे नैराश्य आले त्या ।। ९ ।। प्रयत्नांती निरुपाय । शेवटी त्याने केले काय । जाणुनी आपले उतारवय । पाचारिले जनांते ।।१०।। निजचिंता सांगण्या जाण । सभेमाजी केले भाषण । म्हणाला या जन्मी हातून । नच घडले दुष्कर्म ।।११।। देवद्रव्य वा विप्र सर्वस्व। अथवा दुसऱ्याची काही ठेव । याची कदापि नव्हती हार । म्हणुनी नित्य रक्षिले ।।१२।। पापमूलक आचार-विचार। कधी न घडला खरोखर । औरस पुत्रासमान पौर। सांभाळिले प्रेमाने ।।१३।। क्षात्रधर्मासी निजकत्तव्य । जाणुनी केला दिग्विजय । कोणी मजसी जरी प्रिय । तरी दंडिले अपराधा ।।१४।। शिष्ट आणि महाजन । यांचा विरोध होता आतून । द्वेषयुक्त त्यांचे मन । तरी पूजिले त्यांनाही ।॥१५॥॥ याप्रमाणे धर्म युक्त । सन्मार्गाने असता वागत । अपत्यजन्म का नच होत । सांगा माझ्या सदनासी।। १६।। अहो ब्राह्मणादी प्रजाजन । हेच एक ते दुःख दारुण । तरी तुम्ही विचार करून । सांगा उपाय मजलागी।।१७ ॥॥ नृपे व्यथा उघड केली। हेलावली सर्व मंडळी। गांभीर्याने करू लागली। विचार त्याच्या हिताचा ।।१८।। तैं उपाध्यायासह विप्रगण । यांनी त्यावर केले चिंतन । निजकर्तव्याते स्मरून । गेले गहन काननी ॥१९।। तेथे एकत्रित विचार करुनी। हिंडले अनेक आश्रमस्थानी। तधी अवचित एके दिनी। लोमश ऋषी भेटले ।॥२०।। हे तपोनिधी महान । दीर्घायुषी विधीसमान । धर्मतत्त्व शास्त्रकारण । जाणत होते सर्वही I॥२१ ॥ आत्मस्थितीत मग्न तयांना। नव्हते दुःख वा यातना । क्रोध आणि इंद्रियांना। होते स्वाधीन ठेविले ।।२२ ।। प्रत्येक कल्पांती देहावरचे । एक लोम | गळतसे त्यांचे । म्हणुनी त्या महामुरनीचे । नाव लोमश होते पां ॥२३|| त्या निराहारी तपस्व्याते पाहून । पुरोहितासह विप्रगण । मनी अपार संतोष पावून । गेले निकट त्या समयी ।।२४।। जनरितीला अनुसरून । आदराने केले वंदन । विनयाने नम्र होऊन । काय वदले परस्परा ।।२५।। म्हणाले आपले भाग्य म्हणून । या श्रेष्ठाचे झाले दर्शन । येथेच पुढील मार्गदर्शन । प्राप्त होईल निश्चये ।। २६ ।। तोच मंडळीते पाहुनी। काय बोलले महामुनी । कवण उद्देश धरुनी मनी । केले येणे विप्रांनो ॥२७॥। माझ्या दर्शने तुम्हांला । कशासाठी आनंद झाला। का केलेत मम स्तवनाला। नवल वाटते मजलागी।।२८।। तरी कोण आहात आपण । आणि येथवर आलात कोठून । नाव गाव सर्वही सांगून । द्यावा परिचय मजलागी ।।२९।। तदनंतर जे हिताचे । ते सर्वही करीन साचे । उपकारास्तव जन्म आमचे। सत्य जाणा सज्जन हो।।३०।। ऋषिवचन श्रवण केले। तेणे द्विज ते सुखावले । विनम्रभावे सांगितले । कारण तेथ येण्याचे ।।३१।। म्हणाले आपण तपस्वी ज्येष्ठ । विधीहूनही आहात श्रेष्ठ । काही कारणास्तव येथ । आलो संशय निवटाया ।।३२|॥ आमचा राजा महिजित । आहे कर्तव्यतत्पर निश्चित । आपले राज्य प्रजा समस्त । रक्षितो निजधर्माने ।।३३।। नगरजन अपत्ये त्याची । म्हणुनी काळजी सकलांची। परी एक व्यथा तयाची। उद्धृत करितो महाराज ।।३४।। राजा असूनी सामर्थ्यवान । नाही तयाते काही संतान । त्याचे दुःख तेच आमुचे म्हणून । आलो उपाय शोधाया ।।३५।। त्यास्तव बुद्धी दृढ केली। तपाकारणे आलो या वेळी। परी महद्भाग्ये झाली । भेट आपुली मुनिवरा ।।३६।। साधु-दर्शनेच केवळ | कार्यसिद्धी होते सकळ । अनंत विघ्ने तत्काळ । जाती निघून दशदिशा ।।३७।। तरी नृपदुःखाते जाणून । सांगा काही उपाय आपण । तेणे धन्यता येथे येऊन । करा सुखी आम्हांते ।।३८।। ती आर्त विनंती ऐकून । लोमश जाहले ध्यानमग्न । मुहूर्तपर्यंत बैसून। जाणिले नृपकर्माते ।।३९ ।| मग म्हणाले तुम्ही सर्वांनी । – एक गोष्ट घ्यावी ध्यानी । तुमचा राजा होता वाणी । पूर्वी एका जन्मात ।।४०।। दरिद्री तरी क्रूरकर्मरत। असा तो नित्य व्यापार करीत। हिंडुनिया गावागावात। व्यवहाराते करीतसे।।४१ ।। एकदा ज्येष्ठ शुक्ल द्वादशी दिनी। सूर्य माथ्यावर भर मध्यान्ही । आला तृषेने आर्त होउनी। एका ग्रमसीमेसी।।४२।। तेथे रम्य निर्झर पाहून । कासावीस तो धावला तत्क्षण । एक धेनूही तेथ येऊन । पिऊ लागली पाण्याते ।|४३।। तिची प्रसूती होती झाली। त्यात उन्हाने कळवळली। तहान लागली म्हणुनी आली। वत्सासह। तेधवा ।।४४।। परी त्या दुष्टाने तेथ । धेनू पाणी असता पीत । हाकलुनी तिजप्रत प्यायला आधी सर्व ते ।।४५ ।। ते दुष्कर्म असे भोवले । संतानहीनत्व नशिबी आले काही पुण्य होते चांगले । म्हणुनी राजा झाला तो ।।४६।। ऐकुनी तो पूर्ववृत्तान्त। विप्र म्हणाले क्षीप्रत । आम्ही तुम्हांते शरण तात । तरी करावा उपदेश ।।४७।। पुराणांतुनी आम्ही ऐकले । पुण्याने अरिष्ट लयास गेले । त्याचे अनेक दाखले। असती आजही सन्मुख ।।४८।। तरी जेणे हमखास । नृपकर्माचा होउनी न्हास । होईल उत्तम संतती तयास। ऐसा उपाय सांगावा ॥४९ ॥ लोमश म्हणाले तयांप्रती। श्रावण शुक्ल एकादशी तिथी। ‘पुत्रदा’ नामे प्रसिद्ध जगती । व्रत करावे तियेचे ।|५० ।। शास्त्रविधीला अनुसरून । करावे आदरे उपोषण । रात्रसमयी करुनी जागरण । आचरावे त्या व्रता ।।५१।। आणि त्या शुभकर्माचे । एकत्रित पुण्य तुमचे । अर्पिता नृपास साचे । होईल संतान त्यालागी ।।५२।। कृषिवचन कानी पडले। तेणे जन ते आनंदले। चरण वंदुनी निघाले । आले निजसदनासी ।।५३।। पुढती श्रावण मास येता । केले पुत्रदा एकादशी व्रता । प्रजेसंगे राजाही होता । व्रताचरणी आसक्त ।।५४ । यथाविधि व्रत केले। द्वादशीस रायाते पुण्य अर्पिले । त्या प्रभावे श्रवणी पडले । मंगल वर्तमान ते ।।५५।। हरिकृपेने त्या । महाराज्ञीते गर्भ राहिला। नवमास पूर्ण होता तिजला। झाला पुत्र वेळेला । तेजस्वी ।।५६।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी। कथा सांगितली तुजसी । त्यातून पुत्रदा एकादशी- । महिमा विशद केला पां ।।५७।। तरी इहपरलोकी ज्याला । सौख्य मिळावे वाटते त्याला। हाच एक तो उत्तम सल्ला । करावे या सुव्रता ।।५८।। माहात्म्य श्रवणाची फलप्राप्ती । अवघे दोष दिगंती पळती। संततिसुख लाभून शेवटी । जातो नर तो स्वर्गाला ।।९९।। ।। इति श्रीभविष्योत्तरपुराणे श्रावणशुक्लैकादश्याः पुत्रदानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् । ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु।॥ शुभं भवतु ! ?कथा सारांश? पुत्र नसणे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुर्भाग्यवश बाब आहे, मुलगा कुपुत्र असणे हि अधिक दुर्दैवी बाब आहे, म्हणून सर्वगुण संपन्न आणि सुंदर मुलगा असणे फारच दुर्लभ आहे. असा पुत्रा केवळ संतांच्या आशीर्वादाने आणि ज्यांच्या मनात देवाची भक्ती असते त्यांनाच प्राप्त होतो. या कलियुगात, योग्य पुत्र मिळण्याचे उत्तम साधन म्हणजे पुत्रदा एकादशीचे व्रत. ?ओम नमो भगवते वासुदेवाय नमः? . मित्रांनो एकादशीचा जन्म रात्रीचा आहे त्यामुळे एकादशीच्या रात्री भगवद्भक्ती चे कोणतेही साधन अंगीकारून भगवंतांच्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे. ब्रह्मज्ञानी श्री सुतमुनी ब्रह्मवृन्दांना संबोधित करताना सांगतात कि , १] चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहणातील स्नान २] अन्नदान अथवा जलदान ३] सुवर्ण दान ४] भूमिदान ५] कन्यादान ६] अश्वमेध आदी महान यज्ञ ७] चारधाम सारख्या मोठ्या तीर्थयात्रा या महान पुण्यकारक गोष्टींपेक्षाही मोठे पुण्य एकादशीच्या व्रताने मिळते. २] एकादशी व्रताचे महत्त्व ================ अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे. अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। [ पद्मपुराण ] अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही. === एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात. मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते. शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते. यश आल्याने धन प्राप्ती होते. साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत. समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात- ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।। ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥ ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।। तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।। “ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.” प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे- एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।। श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥ तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।। “जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.” पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ।।1।। काय तुझा जीव जाते एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।। स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।। थोडे तुज घरी होती ऊजगरे । देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।। तुका म्हणे कां रे सकुमार झालासी। काय जाब देती यमदूता ।।5।। एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।। काय करुं बहू वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।। हरिहरासी नाही बोटभरी वाती। कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।। तुका म्हणे नाही नारायणी प्रिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।। एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।। ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।। अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।। शेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तयाजोडे क्षय रोग । जन्मव्याधि बळवंत ।। आपण न वजे हरिकिर्तना । आणिका वारी जाता कोणा । त्यांचे पापा जाणा । ठेंगणा तो महामेरु ।। तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ।। करविता व्रत अर्ध पुण्य लाभे। मोडविता दोघे नरका जाती । शब्दबुध्दी होय दोघा एक मान । चोरासवे कोण जीव राखे । आपुले देवूनि आपलाचि घात। नकरावा थीत जाणोनिया । देवुनिया वेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ। तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग। भक्ती हे मार्ग मोडू नये । छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात- आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥ तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥ कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥ म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥ ” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.” ————————————————————————————————— ३] शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ? ======================== एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा. दूसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे. द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते. शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website