दि १९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी शुक्रवारी माघ शुद्ध सप्तमी ला रथसप्तमी हा सण आहे. या दिवशी श्री आदित्य नारायणा ची पुजा करतात श्रीसुर्य देवाला, श्रीनारायण स्वरूप म्हणजे श्रीविष्णु स्वरूप असे म्हणले आहे.

जो नित्य श्री सुर्य देवाची पुजा करतो व रोज अर्घ देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्ऱ्य नष्ट होते आणि तो सुखी होतो.

‘सूर्यग्रहणतुल्या तु शुक्ला माघस्य सप्तमी ।
अरुणोदयवेलायां तस्यां स्नानं महाफलं’ ।।

‘ माघ मासातील शुक्ल सप्तमी ही सूर्यग्रहणासमान पुण्यदायक सांगितली आहे. या दिवशी अरुणोदयी (सूर्योदयापूर्वी दीड तास) तिलयुक्त पाण्याने पुढील मंत्र म्हणून स्नान करावे

‘यदा जन्मकृतंपापं मया जन्मसुजन्मसु ।
तन्मे रोगं च शोकं च माकरु हंतु सप्तमी ।’

या दिवशी सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाच्या प्रतिमेचे पूजन करून गायीच्या गोवऱ्यांच्या विस्तवावर मातीच्या मडक्यात दूध घेऊन दुपारच्या उन्हात ते दूध उतू जाऊ देण्याचा प्रघात आहे. उरलेले दूध प्राशन करावे. या दिवशी सूर्यनारायाणाच्या प्रतिमेस सात धान्ये, सात रुईची पाने व सात बोरे वाहावीत.

surya 2

रथसप्तमी व सुर्यनाराणयाची माहिती…

श्रीसुर्य देवता परिवार

सुर्य पिता:-श्री कश्यप ऋषि
सुर्य माता:- अदिती देवी

श्रीसुर्य देवाला चार धर्मपत्नी होत्या
1) सुर्यदेव- सविता देवी
(याचा पासुन पुत्र व कन्या)
पुत्र:- वैवस्वत मनु व यम देव
कन्या:- यमुना (नदी)

2)सुर्यदेव- राज्ञी देवी
पुत्र- रैवत

3)सुर्यदेव – प्रभा देवी
पुत्र- प्रभात

4)सुर्यदेव- छाया देवी(सविता देवीच्या छाया पासून छाया देवी).  सप्तमीपुत्र:- शनि देव व सावर्णि
कन्या:- भद्रा(विष्टी) व तपती
असा परिवार आहे मत्स्य पुराण नुसार माहिती आहे

रथसप्तमी महत्व :-
जाणून घ्या सौभाग्य, पुत्र, धन प्राप्तीचे व्रत, कथा आणि महत्त्व

माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात. या दिवशी पूजा करून सूर्याला पायसचा नैवेद्य दाखवतात. भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात पण त्यासाठी त्याची अव्याहत घोडदौड चाललेली असते. त्याच्या रथाला सप्त अश्व असतात. हे अश्व म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहेत. अशी लोकमनाची भावना असल्यामुळे रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार आणि अखेरीस तीर्थप्राशन हे नित्याप्रमाणेच करायचे असते. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. देवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांनी पुष्परथ, खेळ, स्पर्धांसाठी क्रीडारथ, स्त्रियांसाठी कणीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ असे रथांचे विविध प्रकार आहेत. रथचक्र हे समाजजीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक आहे.

स्थानपरत्वे बदलती नावे:-

महासप्तमीला स्थानपरत्वे वेगवेगळी नावे प्राप्त झाली आहेत. बंगालमध्ये या दिवसाला भास्कर सप्तमी म्हणतात. उत्तरेत ही तिथी जयंती सप्तमी व अचला या नावांनी प्रसिद्ध आहे. हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी सात अश्व जुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते. या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी म्हणतात. शब्दकल्पद्रुमकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले असून या तिथीला माकरी सप्तमी म्हटले आहे. तसेच सूर्य सप्तमी, भानू सप्तमी या नावांनीही ही सप्तमी ओळखली जाते. त्या त्या प्रांतानुसार पूजेमध्ये बदल होत गेला आहे

(सूर्याचे गुण)

नित्योपासना

सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.

शिस्त

सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.

त्याग

सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा आणि चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.

व्यापकत्व

ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा आणि चैतन्य देत असतो.

समष्टिभाव

सूर्य हा त्याच्याकडील तेज आणि ऊर्जा त्याच्या लोकापुरती मर्यादित न ठेवता विविध लोकांतील जिवांनाही प्रक्षेपित करतो. त्यासाठी तो सतत भ्रमण करीत असतो. समष्टि भाव जास्त असल्यामुळे त्याच्यात उच्च देवतांचे २० टक्के गुण आहेत.

ज्ञानदान आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे

ज्ञान म्हणजे प्रकाश होय. प्रकाश हे ज्ञानाचे एक रूप आहे. सूर्य ज्ञानासंदर्भातही कार्य करतो. त्यामुळे त्याच्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी आणि ज्ञानप्रकाशलहरी प्रक्षेपित होत असतात. या ज्ञानलहरींच्या माध्यमातून तो ३० टक्के इतके ज्ञान देऊ शकतो. कर्णाला सूर्यदेवता रोज दर्शन देत असे आणि सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असे. याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.

ऊत्तम गुरु

सूर्य शास्त्र आणि शस्त्रकला या दोन्हीमध्येही निपुण आहे. या दोन्ही कला अवगत करण्यासाठी रुद्रावतार मारुति सूर्यलोकात गेला होता. तेव्हा त्याला सूर्याने `गुरु’ म्हणून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तो इतरांना ज्ञानप्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील स्थूल आणि सूक्ष्म अहंकाररूपी तिमिर नष्ट करतो.
क्षात्रभाव

इंद्र हा सर्व कनिष्ठ देवतांचा प्रमुख आहे. सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली, तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते आणि इंद्राच्या अयोग्य आज्ञेचे पालन करत नाही. पुढे येणार्‍या वाईट काळात (धर्मयुद्धाच्या वेळी) कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवता ही क्षात्रवीर आणि धर्मवीर साधकांना आणि धर्माच्या बाजूने लढणार्‍यांना सर्वाधिक प्रमाणात मदत करील. कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवतेमध्ये सर्वाधिक सात्त्विकता, व्यापकत्व, त्याग, समष्टि भाव आणि क्षात्रभाव असतो.

समभाव

सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पहातो. तो गुणग्राहक आहे. त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही. याचे उदाहरण म्हणजे मारुतीमध्ये शनीच्या तुलनेत शिष्याचे गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे सूर्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले आणि ज्ञान आणि विविध विद्या दिल्या

सूर्याचा रथ आणि त्याचे पूजन

सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्‍त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गति आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. त्या चित्रातून सूर्याचे तेज आणि तेजतत्त्व हे आजूबाजूला ३० टक्के प्रक्षेपित होत असते. श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादामुळे अन् तेजतत्त्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षककवच निर्माण झालेले असते. त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्‍ती अडथळा आणू शकत नाहीत.

सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्‍त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे `रथसप्‍तमी’ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते.

रांगोळीने किंवा चंदनाने पाटावर सात घोड्यांचा सूर्यनारायणाचा रथ, अरुण सारथी आणि रथात सूर्यनारायण काढतात. सूर्यनारायणाची पूजा करतात. अंगणात गोवर्‍या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात.

सूर्याच्या सारथ्याचे गुण

अरुण हा सूर्याचा सारथी आहे. त्याच्यात सूर्याचे ४० टक्के गुण अहेत. तो केवळ एकाच डोळयाने पाहू शकतो. `एकत्वाकडे जाणे आणि आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे’, हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात.

सूर्यलोक

स्वर्गलोकाच्या बाजूला सूक्ष्म-सूर्यलोक आहे. सूक्ष्म-सूर्यलोकात पंचमहाभूतांपैकी सूक्ष्म-तेजतत्त्वाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दिव्य प्रकाश, अग्नि आणि अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूलरूप आहे. त्यांची अनुभूति सूर्यलोकात येते. अनेक जिवांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यांना सूर्यलोकात जाता येत नाही. पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तेजतत्त्वाची उपासना करता येत नाही. पर्यायाने तेजतत्त्वाचे स्थूलरूप, म्हणजे दिव्य प्रकाश, अग्नि आणि उष्णता सहन होत नाही. सूर्यलोकात स्थान मिळण्यासाठी सूर्यदेवतेचे गुण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आणि जिवाची पातळी किमान ५० टक्के असणे अपेक्षित आहे. रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे.

आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे.

सौभाग्य, पुत्र, धनाची प्राप्ती

वर्षभर सूर्यापासूनचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीची व रूईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघसप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचलासप्तमी इ.प्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून व पाषांतून मुक्तता आणि सौभाग्य, पूत्र, धन, इ.ची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.

अंगणातच शिजवलेली दुधाची खीर:-

महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्य़ा सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखवणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे हे व्रताचे स्वरूप असते. हळदीकुंकू व वाण देणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अन्याध्याय असतो. रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे कार्यक्रम असतात.

सप्तधान्ये, रूईच्या पानांचा नेवैद्य:-

आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशीवृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवतात. त्या पाटावर रवतचंदनाने सात घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्यप्रतिमा काढतात. नंतर ध्येय, सदा सवितुमण्डल मध्यवर्ती, या मंत्राने ध्यान करून पूजा करतात. गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य दाखवतात. सप्तधान्ये, सात रूईची पाने व सात बोरे सूर्याला वाहतात. अष्टांग अघ्र्य देतात, ब्राह्मणाला भोजन घालतात.

रथसप्तमी या सणामध्ये सूर्यदेवाची पूजा सांगितली आहे. आरोग्यं भास्करात् इच्छेत् । म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी, असे शास्त्रवचन आहे. सूर्याचे तेज आपल्या अंगी यावे म्हणून सूर्योपासना. समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेले साष्टांग सूर्यनमस्कार जर नियमितपणे मुलांनी घातले, शरीरबळ आणि मनोबळ वाढवण्याचे सामर्थ्य या नमस्कारांत आहे. जर हे समंत्र घातले गेले, तर आत्मबळसुद्धा वाढते.

श्री सूर्यस्तुती वाचण्याकरिता या लिंक वर क्लिक करा        :        goo.gl/qDtyzM

श्री सूर्यकवच वाचण्याकरिता या लिंक वर क्लिक करा         :       goo.gl/kqo55H

[ हि माहिती सूर्यसिद्धांतिय देशपांडे पंचांग, श्री जयंतराव साळगावकर यांचा धर्मबोध हा ग्रंथ, आंतरजालावरील काही अज्ञात लेखकांचे उत्तम लेख यावरून श्री मंदार संत यांनी संकलित केलेली आहे. ]

surya

Leave a Reply

Your email address will not be published.