शांताबाईंचे स्मरण – काही हृद्य आठवणी : ले उपेंद्र चिंचोरे Mandar Sant June 6, 2017 चर्चा पूज्य शांताबाई शेळके ह्यांच्या बरोबरच्या एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासातील संस्मरणीय क्षण : [ सहा जून त्यांची पुण्यतिथी ] “चिरंजीव चिंचोरे, तुम्ही छान लिहिता, तुम्हाला चांगली संधी मिळाली पाहिजे, मिळेल, मिळेल !” पूज्य शांताबाई शेळके, ह्यांचे हे आश्वासक उद्गार मी अनेकवेळा त्यांच्या मुखातून ऐकत असे ! सहा जून दोन हजार तीन ह्या दिवसाची अशीच एक हृद्य आठवण सांगू कां ? आकाशवाणी पुणे केंद्राच्या, दुस-या मजल्यावरील टॉक स्टुडिओमध्ये, मी माझ्याच कवितांच्या ध्वनिमुद्रणासाठी माईकसमोर उभा होतो. तेथील तंत्रज्ञांनी मला काही सुचना केल्या. माझ्या हातामध्ये कवितांचे कागद होते पण मनामध्ये पूज्य शांताबाईंचे वरील वाक्य जागे झाले होते. शांताबाईंच्या पवित्र आठवणीने मी हललो. आज मला आकाशवाणी केंद्रावरून माझ्याच कविता वाचनाची संधी मिळाली पण त्या ऐकायला शांताबाई कुठे आहेत ? आज त्या लाक्षणिक अर्थाने नाहीत तथापि आजचा दिवस, “सहा जून”, शांताबाईंच्या प्रथम पुण्यतिथीचा ! बरोबर त्याच दिवशी माझे रेकॉर्डिंग व्हावे, हा त्या पावन आत्म्याचा मला लाभलेला खरा कृपाशीर्वाद होय ! खूप लहानपणापासूनच, अगदी मी शाळेत असल्यापासूनच मला शांताबाईंच्या कविता मनापासून आवडायच्या ! त्यांनी लिहिलेली गाणी मी कान देऊन ऐकायचो. त्यांच्या कविता, त्यांचे लेख मी आवर्जून वाचायचो. शांताबाईंचे सोपे शब्द, बोली भाषा, चित्रदर्शी वर्णनं ह्यांनी माझ्या मनाचा केव्हांच ठाव घेतला होता. बघता-बघता, माझ्या त्या पोरवयात, शांताबाई शेळके माझ्या श्रद्धास्थान झाल्या ! मला अजून आठवतंय, एप्रिल १९६७ मध्ये मी त्यांना पहिलं पत्र पाठवलं आणि तेव्हांपासून मी त्यांना पत्रं पाठवीत होतो. तेव्हां पोस्टकार्ड पाच पैशाला मिळायचं ! शांताबाई तेव्हां दादरला राहायच्या. माझ्यादृष्टीने आनंदाचा भाग म्हणजे, माझ्या भाबड्या भावनेला दाद देणारी, शांताबाईंची असंख्य पत्रोत्तरेही मला येऊ लागली. आजवर मला आलेली त्यांची सर्व पत्रं मी मोठ्या आदराने जपून ठेवली आहेत. त्यांची सुवाच्च वळणदार, मोठ्या अक्षरातील पत्रं म्हणजे माझा मोठा ठेवाच होय ! पुढे शांताबाई दादरहून, बांद्र्याला साहित्य सहवासमध्ये राहायला गेल्या. एकदा मी एका पत्रात त्यांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली. शांताबाईंचे मला लगोलग पत्रं आलं, “मुंबईला याल, तेव्हां अवश्य घरी या”. एकदा एका घरगुती समारंभासाठी मी मुंबईला गेलो होतो. तो रविवारचा दिवस होता. सकाळचा समारंभ झाला आणि मनात आलं, आज शांताबाईंच्या घरी जावं, मनातल्या विचारानं, लगेच कृतीमध्ये रुपांतर केलं. प्रभादेवीहून मी बांद्र्याला साहित्य-सहवासमधील शाकुंतल बिल्डींग मध्ये गेलो. दारावरची बेल वाजवली आणि काय आश्चर्य ! खुद्द शांताबाईंनीच दरवाजा उघडला. “नमस्कार, मी चिंचोरे” इति मी ! “पत्रं पाठविणारे चिंचोरे” असं हसत हसत म्हणत, शांताबाईंनी माझं स्वागत केलं. माझ्या अचानक जाण्याने, माझ्या मनावर आलेलं दडपण, क्षणात पळालं. त्या पहिल्या भेटीमध्ये शांताबाईंचा आणि माझा खूप छान सुसंवाद झाला. त्यांनी माझ्या छंदाबद्दल आपुलकीने माहिती करून घेतली. त्यादिवशी संध्याकाळी दादरला त्यांचे “गुरुवर्य गडकरी” ह्यांचेविषयी व्याख्यान होते. त्यांच्याबरोबर त्यांनी मला दादर स्टेशनला सोडून त्या कार्यक्रम स्थळी गेल्या. १९ ऑगस्ट पंच्याऐंशीमध्ये शांताबाई पुण्यामध्ये स्थायिक झाल्या. पुणे-सातारा रोडवरच्या आदर्शनगरमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. आता तर काय ? शांताबाईंकडे माझं वरचेवर जाणे सुरु झालं. पत्रं पाठविणे बंद झालं आणि समक्ष भेटी घडू लागल्या. मला सुरुवातीला एका गोष्टीचं अवघड वाटलं ! ते म्हणजे त्यांना कोणत्या नावानं संबोधायचे ? त्या मला मातेसमान! त्यांच्या घरातील भाऊ, बहिणी, वहिनी सगळे “शांताबाई” ह्याच नावाने हाकारायचे. त्यांची भाचरं त्यांना “आत्याबाई” म्हणत. एकदा मी त्यांना ह्याविषयी बोललो. त्या खळखळून हसल्या, म्हणाल्या, “अहो चिंचोरे मला शांताबाईच म्हणा, मुंबईला मला कॉलेजमध्ये विद्यार्थीही शांताबाईच म्हणत”. एक झालं, माझ्या सारख्या जाण्यानं, मी त्यांच्या घरचा कधी झालो, ते माझं मलाही कळलं नाही. शांताबाईंबरोबरच, त्यांचे भाऊ-भावजय, आप्पा आणि काकी तसेच त्यांच्या आईशी – वहिनीशी (होय, त्या आईला वहिनी म्हणत) माझं घरातलं नातं जडलं ! शांताबाईंचा केंव्हाही सहज माझ्या घरी फोन येऊ लागला. मी घरी असो वा नसो, शांताबाई माझ्या घरातल्यांशीही प्रेमानं बोलत. दर चार-आठ दिवसाआड माझं त्यांच्याकडे जाणं होऊ लागलं ! कधी शांताबाईंकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे कुणी कामासाठी आलेलं असायचं, अश्यावेळी शांताबाईंची आई-वहिनी, माझ्याशी गप्पागोष्टी करायच्या. मध्येच आत जाऊन सांगायच्या, “अगं शांताबाई तुझा चिंचोरे आलाय गं”! शांताबाई जेव्हां मुंबईला होत्या तेव्हां त्यांच्या दर वाढदिवसाला, मी त्यांना शुभचिंतन पत्रं पाठवीत असे. पण आता तर त्या पुण्याला आल्या होत्या. शांताबाईंचा जन्मदिवस, तारखेने बारा ऑक्टोबरला आणि तिथीने नवरात्रातील सातवी माळ ! मी दोन्ही दिवशी शांताबाईंकडे जायचो. तरीही शांताबाईंना माझं वेगळंच कौतुक वाटायचं, ते म्हणजे मी त्यांच्या आईच्याही दर वाढदिवसाला जाऊन त्यांना नमस्कार करायचो. गोकुळाष्टमी हा तो दिवस ! शांताबाईंच्या पुण्यातील घराच्या वरच्या मजल्यावर, त्यांचं स्वतःच असं एक छोटेखानी ग्रंथालय होतं. त्यामध्ये विविध साहित्यिकांचे ग्रंथ शिस्तीमध्ये उभे ठाकलेले दिसायचे. शांताबाई ग्रंथांना जिवापलीकडे जपायच्या. अतिशय नीटनेटकी बांधणी असलेल्या नव्या पुस्तकांनाही त्या स्वतः वेष्टणं घालायच्या. वाचनासाठी पुस्तकांचा मुक्त वापर त्यांना मंजूर होता परंतु पुस्तकाची पानं दुमडलेलं त्यांना कधीही खपायचं नाही. पुस्तकं खराब होतील, कोपरे मुडपतील, बांधणी उसवेल, असा वापर त्यांना अजिबात चालायचा नाही. नव्या-जुन्या पुस्तकांचा तो विशिष्ठ दर्प त्यांना आवडायचा. वाचनानंतर पुस्तकं जागच्याजागी ठेवायची त्यांची सवय स्पृहणीय होती ! शांताबाई गप्पांची मैफल फार छान जमवायच्या. त्यांच्या गप्पांमध्ये नेहेमीच निखळ, निर्मळ आनंद मिळायचा. विनोद, चेष्टामस्करीही चालायची. शांताबाईंची स्मरणशक्ती अफाट होती. कित्येकवेळा त्या नव्या-जुन्या कविता, गीतं, सुभाषितं, श्लोक, आर्या, दिंड्या, ओव्या घडाघड म्हणून दाखवायच्या. ब-याच वेळा सुभाशितांचा अर्थ सांगत. भाषांतरित भागाचा मूळ गाभा समजावून सांगायच्या. कधी कधी आम्ही दोघे, आठवणीतल्या विविध कवितांचे पठण करायचो. “बघ आई आकाशात, सूर्य हा आला”, डॉ. वि. म. कुलकर्णींची “चावडीच्या पाठीमागे, जुना सरकारी वाडा”, केशवकुमार अर्थात आचार्य प्र.के. अत्रे ह्यांची “आजीच्या जवळी घड्याळ कसले”, या आणि अश्या असंख्य कवितांची उजळणी होत असे. पण माझी एक खोड होती, ती म्हणजे, मी ब-याच कविता, जुन्या गाण्यांच्या चालीवर म्हणत असे. उदाहरणार्थ, बघ आई आकाशात, ही कविता, कौन परदेसी तेरा, ह्या गाण्याच्या चालीवर तर, चावडीच्या पाठीमागे, मेरा दिल ये पुकारे आजा, ह्या गाण्याच्या चालीवर म्हणायचो . आजीचे घड्याळ – चक्क शार्दुलविक्रीडीत असल्याने, शुभमंगलच्या चालीत म्हणायचो. तेव्हां हास्याची कारंजी फुटत. एकदा मात्र माझी फजिती झाली. मी एक कविता म्हणली आणि मी त्यांना विचारलं, “शांताबाई ही कविता कोणाची ?” माझ्या त्या प्रश्नावर शांताबाई मिश्कील हसत म्हणाल्या, “भल्या गृहस्था त्या कवितेच्या कवयित्री आपल्या समोर बसल्या आहेत”. ती कविता होती. पैठणी ! शांताबाईंच्या विनोदी पण श्लेशपुर्वक बोलण्याचा एक सुंदर प्रसंग :- आदरणीय स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर आणि मीनाताई मंगेशकर खडीकर पुण्यास आल्या होत्या. त्या दिवशी सकाळी, दिदींच्या घरी, शांताबाई आणि मी गेलो होतो. जेवण झालं, दिवसभर गप्पा झाल्या. संध्याकाळी लतादीदी मुंबईला निघाल्या. आम्ही जिना उतरत होतो. मी खालच्या पायरीवर होतो. शांताबाईंनी डाव्या हाताने जिन्याचा कठडा धरला होता. त्यांना चालतांना, जिना चढता-उतरता त्रास व्हायचा म्हणून त्यांचा उजवा हात मी धरला होता. एकच उंच असलेल्या पायरीवर पाय ठेवल्यावर, शांताबाई म्हणाल्या, “चिरंजीवा, आपापल्या पायरीने राहावे “! निमिशातच दीदी म्हणाल्या, “शांताबाई बरोब्बर, तुम्ही उंच पायरीवर आहात !” सगळेजण खळखळून हसले ! शांताबाई उमद्या मनाच्या होत्या. नवागतांना त्या नेहेमीच प्रोत्साहन द्यायच्या. माझ्यासारख्याने कुठे लिहिले, बोलले, तर त्या उत्स्फुर्तपणे मनमोकळी दाद द्यायच्या. चार जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव हा दिवस मी कसा विसरेन ? भारतरत्न लतादीदी मंगेशकर ह्यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन, “फुले वेचिता” या पुस्तकाच्या रुपात त्या दिवशी प्रकाशित झालं ! तो कालिदासदिन होता. मुंबई येथे डिसिल्व्हा शाळेच्या मैदानावर झालेल्या त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते, संगीतकार दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांच्या शुभहस्ते “फुले वेचिता”चे प्रकाशन झाले होते. समारंभामध्ये, लतादिदींच्या सर्व लेखांचा मी एक संग्राहक – संकलक म्हणून माझंही मनोगत सादर झालं. साहित्य – संगीत – कला क्षेत्रातील अनेक मान्यवर त्या प्रसंगी उपस्थित होते. पंडित जितेंद्र अभिषेकी, मा. दत्ता डावजेकर साहेबांनी, त्यांच्या भाषणामध्ये माझं कौतुक केलं. दुस-या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रात ती बातमी आली. मी मुंबईहून पुण्याला पोहोचायच्या आधी शांताबाईंचा माझ्या घरी चार-पाच वेळा, फोन येऊन गेला, “माझ्या चिरंजीवाचे अभिनंदन”! शांताबाईंकडे जाण्याने एक होऊ लागले, ते म्हणजे, दोन भेटींच्या दरम्यान, त्यांनी जे जे लेखन केलेलं असायचं, ते लेखन, त्या मला आवर्जून वाचायला द्यायच्या ! काही वेळा, त्या स्वतःही लेखनातील काही संदर्भ वाचून दाखवायच्या. विशेष म्हणजे, त्या लेखनाचे प्रयोजन, त्या संदर्भातील मूळ कल्पना, स्मृती, प्रसंग, त्या लेखानाशी कसे निगडीत आहेत, ते सोदाहरण सांगायच्या. मी भाग्यवान असा की, त्यांचं बहुतांशी लेखन, प्रकाशनापूर्वीच मला वाचायला मिळालं ! अगदी शेवटी म्हणजे, त्यांनी केलेलं, ज्येष्ठ कवी गुलझारजींच्या काव्याचं – “त्रिवेणी”चे भाषांतर होय ! शांताबाई उगाचच गंभीर मुद्रा करून बसल्यात, असं पाहिल्याचं मला तरी आठवत नाही. हां, प्रसन्न वृत्तीने लिहिणा-या शांताबाई आजही डोळ्यांसमोर दिसतात. छोट्याश्या लाकडी डेस्कवर, एकाग्र होऊन, तन्मयतेने त्या कागदाचे तावच्या ताव लिहित, तेही शाई पेनने ! बॉलपेनने लिहिणे, त्यांना कधीच आवडले नव्हते. शांताबाईंनी संपादित केलेला, माझ्या मते सर्वोत्तम ग्रंथ म्हणजे, “लता” होय ! ती. लतादिदींच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, म्हणून मौजने हा ग्रंथ, १९ एप्रिल १९६७ रोजी प्रकाशित केला होता. सप्टेंबर १९८८ मध्ये एके दिवशी संध्याकाळी, शांताबाई आणि मौजचे श्री. पु. भागवत माझ्या घरी निवांत आले होते. माझ्या छंदाविषयी, शांताबाईंनी, श्री. पु. भागवत ह्यांना काही सांगितले होते. गप्पांची ती अविस्मरणीय संध्याकाळ होती ! शांताबाईंबरोबर प्रवास करणं, म्हणजे आनंदपर्वणी असायची. वेगवेगळ्या निमित्ताने, त्यांच्यासह मी प्रवासाचे अनेक सुखद अनुभव घेतले आहेत. एके दिवशी भल्या पहाटे, शांताबाईंचा मला फोन आला, म्हणाल्या, “चिरंजीवा, काल तुमचा फोन खूप वेळ एंगेज होता, आज, आत्ता आपल्याला मुंबईला प्रभुकुंजमध्ये {ती. लतादीदी मंगेशकरांचे घरी} जायचं आहे. लवकर आवरा, मी घ्यायला येते आणि मग पुढे जाऊ.” बाळकृष्णाप्रमाणे मी एका पायावर तयार झालो. आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. तासाभरात आम्ही लोणावळ्याला पोहोचलो. चहासाठी गुरुकृपा हॉटेलमध्ये गेलो. त्या ठिकाणी कुठल्याश्या कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहलीसाठी आलेले दिसले. “अरे त्या बघा, शांता शेळके”! त्या घोळक्यातील एकाची आरोळी ! झालं, बघता-बघता, शांताबाईंच्याभोवती तिथेच गोलगर्दी जमली. कुणाला त्यांची स्वाक्षरी हवी होती, तर कुणाला त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते. शांताबाई मुलांमध्ये मस्त रममाण झाल्या. सह्या झाल्या. फोटो झाले आणि नंतर आम्ही गाडीत बसलो. वळणावर गाडी वळेपर्यंत ती सगळी मुलं – मुली हर्षभराने टाटा करत होती. नारळी पौर्णिमेचा तो दिवस होता, मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट १९८६ ! खंडाळ्याच्या डोंगरमाथ्यावर पाउस अक्षरशः कोसळत होता. निसर्गाची ती लीला पाहून, शांताबाई, थोड्याच गप्प बसल्या असतील ? शक्यच नाही. शांताबाईंनी कालिदासाच्या मेघदुतापासून अनेक कवींच्या पावसाच्या काव्यपंक्ती भराभर म्हणण्यास सुरुवात केली. ते डोंगर, त्या द-या, ती रानझाडे, ते धबधबे, सारेजण जणू शांताबाईंकडून स्वतःचे कौतुक ऐकून घेऊ लागले ! आम्ही मुंबईला पेडररोडवरील मंगेशकरांच्या प्रभुकुंजच्या दाराशी पोहोचलो, तरी आमच्या गप्पागोष्टी सुरु होत्या. तो दिवस होता रक्षाबंधनाचा ! आदरणीय लतादीदी, मीनाताई, आशाताई, उषाताई, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पण कर्तृत्वाने महान असलेल्या आपल्या लाडक्या भावाला, हृदयनाथांना राखी बांधून औक्षण करीत होत्या. शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी, पंडितजी चालीत बांधत होते. मालकंसमधील “आले रे गणपती आज दारी रे”, तसेच, हंसध्वनीमधील “दाता तू गणपती गजानन”, तेव्हांचा हा प्रसंग, मी माझ्या मनामध्ये जपून ठेवलाय ! “मंगेशकर” घराविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा सर्वज्ञात आहे. त्या असंख्य प्रसंगांचा साक्षीदार होण्याचं सौभाग्य त्या परमेश्वराने मला दिलं, मी भरून पावलो. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही बरोबर जायचो. मग तो कार्यक्रम गाण्याचा असो, शुभविवाहाचा असो, किंवा अगदी एखादा अनौपचारिक घरातला सुखसोहळा असो ! माझ्या लग्नाला तर शांताबाई आवर्जून आल्या होत्या ! शांताबाईंना रेखाचित्रांची खूप आवड होती. लहान वयात आईच्या रांगोळ्यांनी, त्यांना आकृष्ट केलं होतं. त्यामुळे कुठल्याही पुस्तकात, अथवा मासिकात रेखाचित्र आढळलं, की, त्या आधी ते रेखाचित्र नीट बघायच्या आणि मग तसंच रेखाटायचा सराव करत असत. रेखाचित्रांची पुस्तकही त्या स्वतःच्या संग्रहामध्ये जपून ठेवायच्या. शांताबाई गप्प बसल्या आणि त्यांच्या हातामध्ये कागद-पेन दिसलं की, खुश्शाल समजावं, की रेखांकन चालू आहे. मांजर हा त्यांच्या जिव्हाळ्याचा प्राणी होता. त्यांच्या घरात, खोलीत, आजू-बाजूला सतत मांजर असायची. कधी कधी त्या कौतुकानं मांजराला जवळ घेऊन, अगदी माणसांप्रमाणे गप्पागोष्टी करायच्या. तर अश्या मांजराचे चित्र रेखाटणे, त्यांच्या सरावाचं होतं. अगदी एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर, मधल्या छोट्याश्या फुरसतीच्या क्षणी, निमंत्रण पत्रिकेवर, झटकन, बोकोबांची छबी, शांताबाईंच्या पेनमधून साकारली जायची. ज्येष्ठ गायिका-चित्रकार उषाताई मंगेशकरांनी काढलेली असंख्य चित्रं – ग्रामोफोन रेकॉर्ड्सची कव्हर्स, सी डी, कॅसेट कव्हर्स, मोठी पेंटींग्ज पाहतांना तर शांताबाई भान हरखून जायच्या. श्रीक्षेत्र आळंदी येथे संपन्न झालेल्या, साहित्य संमेलनाच्या शांताबाई शेळके अध्यक्ष होत्या, तर मा. लतादीदी मंगेशकर प्रमुख पाहुण्या होत्या. त्या तीन दिवसामध्ये आळंदीला साहित्य प्रेमींचं जे उधाण आलं होतं, त्याला तोड नाही. शब्द-स्वरांच्या पावन इंद्रायणीमध्ये श्रोतृवृंद यथेच्छ चिंब भिजला होता. शांताबाईंचा वाचकवर्ग, चाहतावर्ग केवढा मोठा होता, त्याचे एकत्रित दर्शन त्या ठिकाणी अनुभवावयास मिळालं होतं . शांताबाई, पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये तीनशे पंधरा क्रमांकाच्या खोलीमध्ये औषधोपचार घेत होत्या. मी, रोज सकाळी आणि संध्याकाळी तसेच सुटीच्या दिवशी दिवसभर तिथेच असायचो. अशाच एका सकाळी, मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हां शांताबाई म्हणाल्या, “चिरंजीवा, तुझी शांताबाई आंधळी झाली, आज सकाळीच, माझ्याहातून चष्मा खाली पडला, काडी तुटली.” त्या दिवशी रविवार होता. चष्म्याची दुकानं बंद. मी, रास्ता पेठेत, पॉवरहाऊस स्टेशनजवळ दुकानं शोधीत फिरत होतो. एका बंद दुकानापाशी गेल्यावर कळलं, दुकानं-मालक वरच राहतो. मी वरती गेलो. दुकानदाराला सांगितले, “अहो, शांताबाई शेळके, कविता लिहिणा-या, गाणी लिहिणा-या, इथेच के.ई.एम.मध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या चष्म्याची काडी तुटली आहे. प्लीज बसवून देता कां ?” शांताबाईंच्या त्या रसिक चाहत्याने, खाली येऊन दुकान उघडलं. त्यानं चष्म्याची काडी दुरुस्त करून दिली, इतकंच काय, तो भला गृहस्थ, माझ्याबरोबर शांताबाईंना भेटायला दवाखान्यात आला. शांताबाई समक्ष भेटल्याचा आनंद, त्यांच्या चेह-यावरून ओसंडून वाहू लागला. चष्मा दुरुस्तीचे पैसे घेण्याचेही त्यांनी विनम्रपणे नाकारले ! असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग ! शांताबाई आणि मी के.ई.एम.मध्ये बोलत होतो. वेळ दुपारी चार-सव्वाचारची होती. एवढ्यात दारावर टकटक असा आवाज आला. मी म्हणालो, “शांताबाई कुणीतरी व्ही.आय.पी. असणार.” मी दार उघडलं, अन् मी अवाक होऊन बघतच राहिलो ! “या, या, शांताबाई, बघा कोण आलंय तुम्हाला भेटायला…..” शांताबाईंनी पडल्या-पडल्या दाराकडे वळून पाहिलं. “या-या भाई-सुनीताबाई या” ! महाराष्ट्राचं लाडकं दैवत, साक्षात पु. ल. देशपांडे आले होते ! “शांताबाई गप्पांची मैफल घरी जमवू या, इथे काय करता ? लवकर ब-या व्हा आणि घरी या”, इति पु.ल.! माझ्या मनात विचार आला, दोन मोठी माणसं ब-याच दिवसांनी भेटत आहेत. त्यांना बोलू द्यावे. म्हणून मी खोलीच्या बाहेर जाऊ लागलो. शांताबाईंच्या ते लक्षात आलं, “चिरंजीवा, इकडे या, मला माहितंय, बाहेर कां निघाला. बसा इथेच, भाई आणि तुम्ही मला एकाच प्रेमाने भेटता, भाई हे चिंचोरे….”! “हो, लताबाईंवर लिहिणारे”! पु.लंच्या मुखातील हे शब्द ऐकून माझ्या अंगावर आनंदाने काटा आला. पु. ल. आणि सुनीताबाईंना मी नमस्कार केला आणि तिथेच बाजूला उभा राहिलो ! पुढे शांताबाई ब-या होऊन घरी आल्या आणि एक दिवशी पु.लंना देवाज्ञा झाल्याची कुवार्ता कळली. बालगंधर्वमध्ये झालेल्या शोकसभेला, स्वतःची तब्येत बरी नसतांना, शांताबाईंनी येण्याचा हट्ट धरला. मी त्यांना घेऊन बालगंधर्वमध्ये गेलो.शांताबाई बोलल्या, पण नंतर त्या खूप काळ बेचैन होत्या. बरेच दिवस जुन्या आठवणीत गुरफटल्या होत्या. शांताबाई थोर साहित्यिका तर मी एक त्यांचा सामान्य वाचक ! पण आमच्यात आपलेपणाचं, आपुलकीच अकृत्रिम नातं शेवटपर्यंत टिकून राहिलं. शांताबाईंचं माझ्या घरी येणं म्हणजे आनंद पर्वणी असायची. माझी आई आणि सौ.भारतीशी त्यांचं घरगुती नातं निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे, माझ्या विवाहसमारंभाला शांताबाई आवर्जून पुण्याला आल्या. दिवसभर जमलेल्या गणगोतावळ्यामध्ये आनंदाने रमल्या. लक्ष्मी-पूजनाच्यावेळी शांताबाई मला म्हणाल्या, “चिरंजीवा, सौ.चे नाव बदलू नकोस, “भारती”च राहू दे. पुढे माझ्या कन्येच्या बारश्याला त्यांनी सुचविले, “अरे तिचे नाव मेधा ठेवा, मेधा म्हणजे बुद्धी.” माझी मुलगी त्यांना नेहेमी “शांताआजी” असं म्हणायची. त्याचे त्यांना खूप अप्रूप वाटायचे. त्या म्हणायच्या, “घरा-दारातली सर्व मुले मला शांताबाई म्हणतात. फक्त मेधा मला शांताआजी म्हणते.” मेधाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी छानशी खुर्ची भेट दिली होती. लहान मुलांची अनेक पुस्तके त्यांनी मेधाला दिली. त्या प्रत्येक पुस्तकावर त्यांनी लिहिले, “चिरंजीव मेधाला, शांताआजी- कडून.” पुस्तकावरून आठवलं, शांताबाई मोठ्या मनानं ज्याला-त्याला पुस्तकं निर्मितीतलं श्रेय द्यायच्या. एकदा मी त्यांच्याकडे गेलो असता, त्यांनी नुकतीच लिहिलेली प्रस्तावना मला वाचायला दिली. शेवटच्या परिच्छेदापाशी मी घुटमळलो. म्हणालो. “अहो, शांताबाई, माझे कसले आभार मानता ?” त्यावर त्या म्हणाल्या, “अरे बाबा, माझ्या जुन्या कविता, गाणी इतस्ततः विखुरलेली होती. ती गोळा करण्यात तुमचा मोठा वाटा आहे. त्याचे श्रेय तुम्हांला द्यायलाच हवे !” ते पुस्तकं होतं “फुलांचे दिवस, कळ्यांच्या राती”! एकदा मी एका कार्यक्रमासाठी नाशिकला जाणार होतो. शांताबाई म्हणाल्या, “चिरंजीवा, ही दुर्मिळ इंग्रजी पुस्तके, तात्यांना – कुसुमाग्रजांना द्यायची आहेत, माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे.” मी त्या पुस्तकांचा गठ्ठा बांधला आणि नाशिक मुक्कामी वंदनीय कुसुमाग्रजांच्या घरी गेलो, त्यांची नि माझी ती पहिली समक्ष भेट होय ! त्या पूर्वी त्यांची मला आलेली तीन पत्रोत्तरे माझ्या संग्रहात होती ! कुसुमाग्रंजाच्या सहवासाने मी भारावून गेलो. त्यांचे प्रेमळ बोलणे, घरगुती अगत्याने वागवणे, हे माझ्यासाठी खूप काही होते. सतत भरभरून बोलणा-या शांताबाई, अखेर एका दुःसाध्य आजाराला बळी पडल्या. दुस-याच्या मदतीने कां होईना, पण शांताबाई चालत-फिरत होत्या. अखेरीस दवाखान्यामध्ये दाखल करायच्या आधी काही दिवस, मी आणि माझी सौ. भारती त्यांच्याकडे गेलो होतो. गुढीपाडव्याचा तो दिवस, काही अनाहूत हुरहुरीत गेला. संगीतकार मीनाताई मंगेशकर-खडीकर ह्यांनी स्वरबद्ध केलेली ध्वनिफीत नुकतीच प्रकाशित झाली होती. ती कॅसेट त्यांना देण्यास मीनाताईंनी मला सांगितले होते. शांताबाई म्हणाल्या, “चिरंजीवा, आत्ताच ऐकू या ही कॅसेट” शांताबाई ह्यांनी लिहिलेल्या त्या गाण्याचे शब्द होते, “तू नसता, मज संगे, वाट ही उन्हाची | संगतीस एकांती वेदना मनाची”! ते गाणं गायले होते, उषाताई मंगेशकर ह्यांनी. त्या गाण्यानेही रसिकांना वेड लावले होते. आता जाणवतं शांताबाईंनी ते गाणं लिहिलं म्हणजे त्यांच्या माघारी, चाहत्यांची जी मनोवस्था होईल, त्याचं शब्दचित्रण त्यांनी आधीच लिहून ठेवलं की काय? एके सकाळी मी दवाखान्यात गेल्यावर, डॉक्टरांनी मला विचारले, “तुमचे आणि त्यांचे नाते काय”? मी झटकन म्हणालो, “अहो काय सांगू ? रक्ताच्याही पलीकडचे, नात्या पलीकडचेही नाते आहे आमचे”! शांताबाई दवाख्यान्यात असतांना, समस्त मंगेशकर कुटुंबियांचा आणि माझा फोनवर अगदी नित्त्याचा सकाळ-संध्याकाळ संपर्क होता. चार जून २००२ ला दुपारी, डॉक्टर मला म्हणाले, “आता तुम्ही मनाची तयारी करा”. माझ्या पायाखालची वाळू सरकली, मी कोलमडलो. “अहो दोन दिवसांनी त्यांची वहिनी अमेरिकेतून येत आहे. काहीही करा.” अखेर सहा जूनची काळी पहाट झाली, ती काळीज फाडून गेली… मंगेशकर कुटुंबियांच्या साक्षीने, “चिरंजीव चिंचोरे ” हे बिरूद शांताबाईंनी मला मोठ्या प्रेमानं बहाल केलं होतं ! “चिरंजीव चिंचोरे, आज अमुक कार्यक्रमाला जायचंय, चिरंजीवा प्रकाशकांकडे जायचंय …”, आजही माझ्या कानामध्ये शांताबाईंचा तो मधाळ आवाज सतत घुमत असतो, अन् माझं व्याकुळ मन आठवणींच्या हिंदोळ्यावर वर-खाली झुलू लागतं …… {वंदनीय शांताबाई शेळके ह्यांच्या विषयी, ह्यापूर्वी माझे तीन लेख प्रसिद्ध झाले होते ! (१) सकाळ, (२) {महाराष्ट्र राज्य शासन आयोजित “शांता शेळके गौरवग्रंथ – काव्य कार्यशाळा” (३) स्वरप्रतिभा ! } लेखक : उपेंद्र चिंचोरे Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website