पूज्य वरदानंद भारती जयंतीनिमित्त दोन लेख Mandar Sant September 23, 2018 दिनविशेष लेख १ – लेखक श्री सच्चिदानंद शेवडे माझे अप्पा..अर्थात आमचे गुरुवर्य प.पू.ब्र.स्वामी वरदानंद भारती….. पूर्वाश्रमीचे नाव अनंत दामोदर आठवले…पू.दासगणू महाराजांनी त्यांना अंगा-खांद्यावर वाढविले. बालपणीच पित्याचे छत्र हरपल्यामुळे शिक्षणादी सर्व जबाबदारी दासगणू महाराजांनी पार पाडली. वैद्यकीय शिक्षण घेतलेले अप्पा टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य झाले.त्यानंतर नोकरी सोडून ते पूर्ण वेळ व्याख्यान-प्रवचन व कीर्तन यात रममाण झाले. त्यांची लेखन संपदा अफाट आहे. महाभारताचे वास्तव दर्शन(आक्षेपांच्या संदर्भात), मनोबोध, भगवान श्रीकृष्ण-एक दर्शन,यक्षप्रश्न, वाटा आपल्या हिताच्या,ब्रह्मसुत्रार्थ दर्शिनी(ओवीबद्ध),उपनिषदार्थ कौमुदी(५ खंड-२ गद्य व ३ पद्य), संघप्रार्थना,मनुस्मृती-सार्थ व सभाष्य,भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांवरील भाष्यग्रंथ आदी अनेक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. ब्रह्मसूत्रे,भगवद्गीता आणि उपनिषदांवर भाष्य करणाऱ्या अधिकारी व्यक्तीला आपल्याकडे “आचार्य”म्हटले जाते.त्याचप्रमाणे दासगणू चरीत्र आणि वाङ्मयाचे दहा खंड त्यांच्या संपादकत्वाची साक्ष पटवितात.व्याधीविनिश्चय सारखा ग्रंथ त्यांचा वैद्यकक्षेत्रातील अधिकार दाखवतो.पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासन स्थापनेसाठी निधी संकलन करण्यात त्यांच्या कीर्तनांनी मोठाच हातभार लावला होता. । सहा फुटाहून अधिक उंची,गौर काया,तेजस्वी मुद्रेवर सतत आश्वासक हास्य,बोलण्यात निश्चयीपणा, खणखणीत आणि स्पष्ट शब्दोच्चार असलेली वाणी,उत्तम शास्त्राध्ययन,धर्म व राष्ट्रावर नितांत प्रेम, कळणारे व पटणारे दृष्टांत मांडणारी मार्मिक भाषा ही सर्व त्यांची वैशिष्ट्ये होती.असे असूनही निगर्वी व प्रसिद्धीपरान्मुख राहणे त्यांच्या प्रकृतीला मानवित असे. त्यामुळेच की काय कोण जाणे,पण “आधुनिक युगातला रामदास” असलेला हा संत कमी जणांना ठाऊक आहे.वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला.त्यानंतर त्यांचा मुक्काम प्राय: उत्तरकाशीतील कैलासाश्रमात असे. अधूनमधून मुंबई,पुणे,नांदेड व गोरठे येथे ते येत असत. । वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी सांगून समाधी घेतली(५ सप्टेंबर २००२).भक्तीमार्गातील हा अधिकारी पुरुष योगमार्गातही तेव्हढाच अधिकारी होता हे अनेकांना कळले.त्यांच्या अखेरच्या पत्रात शिष्यांना उपदेश आहे. त्यातील काही ओळी….. मी म्हणजे ना शरीर,मी मद्ग्रंथांचा संभार| त्यांचे वाचन-चिंतन, यथाशक्ती आचरण| हीच गुरुपूजा खरी, नीट धरावे अंतरी || ============≠================== लेख २ – श्री तुकाराम चिंचणीकर . *स्वामी वरदानंद भारती – एक चिॅतन !* आमच्या पंढरीतलेच आदरणीय अप्पा उपाख्य पूर्वाश्रमीचे अनंतराव दामोदरराव आठवले जे पुढे संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती झाले ! अप्पांचा, काल पुण्यस्मरणाचा दिवस होता ! योगशास्त्रात ज्या निर्विकल्प व सविकल्प समाधी अवस्थेचे वर्णन केलंय, त्या निर्विकल्प समाधी अवस्थेस प्राप्त झालेला एक महापुरुष म्हणजे आदरणीय अप्पा ! एथ वडील जे आचरिती तया नाम धर्म ठेविती येर तेंचि अनुष्ठिती सामान्य सकळ ! कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या ह्या सिद्धांताप्रमाणे अप्पांचे पूर्ण जीवनच आपल्या सद्गुरुंच्या अर्थात संतकवी दासगणु महाराजांच्या मार्गदर्शनातच व्यतीत झालं ! दासगणुमहाराजांसारखा विद्वान व संतकवी सद्गुरु लाभलेल्या मनुष्यांस बालपणीच कृष्णभक्तीचा लळा लागला व वयाच्या तेवीस-चोविसाव्या वर्षीच अप्पांनी “श्रीकृष्ण कथामृत” हा पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या चरित्रावरचा ओवीबद्ध ग्रंथ रचला ! २००७ ह्या वर्षात हा ग्रंथ सिंबायोसिस महाविद्यालयात असताना माझ्या वाचण्यांत आला. ह्या ग्रंथातून त्या वयात अप्पांची प्रतिभा ही किती संपन्न होती हे दिसून येते ! अर्थात योग्यतेला वयाची मर्यादा नसतेच तरीपण हा ग्रंथ श्रीकृष्णभक्तांसाठी अनुपम आहे. उपमालंकाराने नटलेला हा ग्रंथ कधीकधी डोळ्यात चटकन पाणी आणतो. हा ग्रंथ ऐकायचा तर आमचे गुरुवर्य भागवताचार्य श्री. वा ना उत्पातांच्या श्रीमुखातून श्रीमद्भागवत आख्यानात ! अर्थात वा. ना. महाराज त्यांचे एक प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या मुखातून श्रीकृष्ण कथामृत ऐकणं हा एक वेगळाच अनुभव आहे. अप्पांच्या ग्रंथसंपदेची ओळख आम्हांस आदरणीय वा. ना. महाराजांमुळेच झाली, हे वेगळं सांगायला नको. *अप्पांची विलक्षण ग्रंथसंपदा* श्रीकृष्ण कथामृत, भगवद्गीतेवरच्या प्रत्येक अध्यायावरचं अप्पांचे भाष्य, प्रस्थानत्रयी अशा ब्रह्मसूत्रांवरचं व उपनिषदांवरचंही अप्पांचं भाष्य ही त्यांच्या अलौकिक व प्रखर बुद्धिमत्तेचा व विद्वत्तेचा कळस आहे. *मनुस्मृतीवरचं अप्पांचे भाष्य* ज्यांना मनुस्मृती हा ग्रंथ व्यवस्थित समजून घ्यायचा असेल त्यांनी अप्पांचे सार्थ मनुस्मृती भाष्य वाचायलाच हवे ! अप्पांच्या प्रत्युत्पन्न मतीचा आविष्कार ह्या ग्रंथात आपणांस पहावयाला मिळतो. जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य वाचावा ही विनंती ! ग्रंथाचा विस्तार मोठा असली तरी ग्रंथ निश्चितच वाचनीय व चिंतनीय ! *महाभारताचे वास्तव दर्शन – आक्षेपांच्या संदर्भात* अप्पांच्या एकुणच व्यक्तिमत्वावर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे महाभारताचे वास्तव दर्शन – आक्षेपांच्या संदर्भात ! ह्या ग्रंथात अप्पांनी महाभारतावरच्या आक्षेपांस जे सप्रमाण व साधार उत्तर दिलंय ते पाहिलं की मन थक्क होते ! इरावती बाई कर्वेंपासून ते आनंद साधले व इतर अनेक आक्षेपकांचे नाव घेऊन सप्रमाण व साधार खंडण करणारे अप्पा हे विद्वत्तेचा कळस होते ! त्यांनी कर्णाच्या उदात्तीकरणाला केलेला विरोध, जो त्यांनी सोबत नावाच्या तत्कालीन मासिकातही लेखरुपाने प्रकाशित केला होता तोही वाचनीय आहे. सोबत मध्ये कर्णावर अप्पांचा लेख आलेला आम्ही वाचलाय. सोबत सत्तर व ऐंशीच्या दशकातलं ग. वा. बेहरेंचे एक अभ्यासपूर्ण प्रकाश होते ! ह्या सोबत मध्ये तत्कालीन अनेक विद्वानांचे अतिशय अभ्यासपूर्ण व रोखठोक भूमिकी मांडणारे लेख आपणांस वाचावयांस मिळतील. ते अवश्य वाचावेत. *ज्ञानेश्वरीवर समश्लोकी औवीबद्ध भाष्य करणारे अप्पा !* ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा एक मेरुमणी आहे. गेली सात दशके ह्या ग्रंथराजाने मराठी मनांस जी भूरळ घातलीय ती काही केल्या कमी तर होणार नाहीच नाही. ह्या ज्ञानेश्वरीवर प्रत्येक ओवीवर ओवीरुपातच भाष्य करणारे अप्पा हे काय प्रतिभा संपन्न होते हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तत्कालीन ज्ञानेश्वरीवरील एक आदरणीय भाष्यकार गुरुवर्य धुंडा महाराज देगलुरकरांची त्यांस प्रस्तावना आहे. देगलुरकर हे नाव ज्ञानेश्वरीशी इतकं जोडलं गेलंय की विचारायांसच नको. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर तशाच ओव्या रचणं हे येरागबाळाचे काम नोव्हे ! *आणखी काही ग्रंथाचा परिचय* अप्पांची ग्रंथसंपदा ही विपुल आहे. *यक्षप्रश्न* ह्या ग्रंथात त्यांनी महाभारतातल्या यक्ष-युधिष्ठिर संवादावर केलेलं भाष्य हे निश्चितच चिॅतनीय आहे. *वाटा आपल्या हिताच्या* – अप्पांचा एक महत्वपूर्ण ग्रंथ हिंदुधर्मावरच्या आक्षेपांचं निवारण करणारा हा प्रश्नोत्तररुपी ग्रंथ ज्यात अनेक विषयांवरचे प्रश्न व त्यांस अप्पांनी दिलेलं समर्पक उत्तर असा हा ग्रंथ ! सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकरांच्या एका मासिकांत हा ग्रंथसंवाद छापून आलेला आम्ही वाचलाय. अनेक शंकाकुशंकाचे निवारण करणारा हा ग्रंथ प्रत्येक हिॅदुमात्रांस आवश्यक आहे. *श्रीकृष्ण चरित्र* ह्या ग्रंथात अप्पांनी भगवान श्रीकृष्णावरच्या अनेक आक्षेपांचे साधार नि सप्रमाण खंडण केलंय. श्रीकृष्णावर अनेकांनी अनेक आक्षेप अकारण घेतले आहेत. अप्पांनी ह्या ग्रंथात मांडलेले कृष्ण चरित्र हे निश्चितच अभ्यसनीय आहे. *समर्थ चरित्र प्रवचन !* अप्पांची अनेक प्रवचने व कीर्तने आज ध्वनिमुद्रित स्वरुपात व चलतचित्र स्वरुपात उपलब्ध आहेत. Samarthramdas400.in ह्या संकेतस्थळांवर त्यांचे समर्थ चरित्रावरचे अडीच तासाचे जे प्रवचन उपलब्ध आहे, ते पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मनुष्यांस झाल्याशिवाय राहत नाही. *वारकरी पंथ व रामदासी पंथांचे समन्वय साधणारे अप्पा !* जग्दगुरु तुकोबाराय व समर्थ रामदास ह्या दोन संतश्रेष्ठांच्या जीवन तत्वज्ञानाचे समन्वय साधणारे अप्पा हे तत्कालीन विद्वानांम्ध्ये अग्रणी होते. हा प्रयत्न त्यांनी अनेक दशकांपूर्वी केला होता. कारण वारकरी पंथ व रामदासी पंथांत हेतुपुररस्सर भेद निर्माण करणारे काही नालायक लोकही ह्या महाराष्ट्रात त्याकाळीही होते व आजही ते आहेत हे खेदांने म्हणावंसं वाटतं. अप्पांनी हा समन्वयाचा एक स्तुत्य प्रयत्न त्यावेळी केला होता हे एक नवलपूर्ण होते. आज तोच प्रयत्न आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज(पूर्वाश्रमीचे आदरणीय किशोरजी व्यास) करताहेत हेही नसे थोडके ! *स्तोत्र रचना* अप्पांचे संस्कृत भाषेवरचे असामान्य प्रभूत्व हे त्यांच्या प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यात तर आपणांस दिसून येतंच. पण तरीही त्यांनी रचलेली स्तोत्रे ह्यावरून त्यांची अनुपज्ञ भक्ती व ह्या गीर्वाणवाणीवरचे प्रभूत्व दिसतं. जगत्जननी रुख्मिणी मातेवर रचलेले त्यांचे रुक्मिणी अष्टक हे आचार्यांच्या पांडुरंगाष्टकप्रमाणेच गेय व भक्तीरसाने ओथंबलेले आहे. आमच्या पंढरीत रुक्मिणी सभागृहात ते लावलेलं आहे. *अप्पांची राष्ट्रनिष्ठा* अप्पांनी रचलेले पोवाडे व फटके हे त्यांच्या राष्ट्रभक्तीचे द्योतक आहेत. अप्पा हे त्या न्यायाने एक क्रांतिकारकच होते असं म्हटल्यांस वावगं ठरणार नाही. ते हिॅदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांवर प्रेम करणारे होते. *एक आयुर्वेदाचार्य* अप्पा हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांचा जन्म व बालपण जरी पंढरीत गेलेलं असलं तरी त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा पुण्यातच व्यतीत झाला होता. पुण्यातल्याच एका आयुर्वेद महाविद्यालयात ते प्राचार्यपदावरही आरुढ झाले होते. आयुर्वेदाचं त्यांचं ज्ञान अफाट होते. *तेजाचं चांदणं – अप्पांचे चरित्र* अप्पांच्या समाधीनंतर त्यांच्या अधिकारी शिष्यांनी त्यांचे चरित्र प्रकाशित केलं होते. सिंबायोसिस मध्ये असताना आमच्या ते वाचण्यांत आले होते. ह्या चरित्रांत नावाप्रमाणेच अप्पांचे जीवन हे एका तेजाचे चांदणं हे सार्थ होते ह्याचा प्रत्यय येतो. अप्पांचा शिष्यपरिवार महाराष्ट्रात सुविख्यात आहे. ज्येष्ठ अभ्यासक,वक्ते,राष्ट्रविचार प्रसारक व ख्यातनाम लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे, आदरणीय कल्याणी नामजोशी,भागवताचार्य वा. ना. उत्पात,त्यांचे पुत्रद्वय वैकुठंवासी चंद्रशेखर महाराज अाठवले व कंपनी सेक्रेटरी म्हणून विख्यात असे महेश आठवले हा महाराष्ट्रातला एक अधिकारी व अभ्यासु वर्ग अप्पांस शिष्य म्हणून लाभलाय. *अप्पांची समाधी* अप्पांनी श्रावण कृष्ण त्रयोदशीस समाधी घेतली. योगमार्गाने टाळूतून प्राणत्याग करून ते ब्रह्नलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र प्रणाम !!! भवदीय, *तुकाराम चिंचणीकर* ८८८८८३८८६३ Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website