कामदा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : 23 एप्रिल २०२१ moderator April 22, 2021 दिनविशेष चैत्र शुक्लपक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. धर्मराजा श्रीकृष्णाला म्हणाला की, “हे भगवान मला कामदा एकादशीचे व्रत श्रवण करण्याची इच्छा आहे. तरी कृपा करुन ते सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की, “हे पांडुकुमार ! एकदा दिलीप राजाने वशिष्ठाची प्रार्थना करुन विचारले की, “महाराज मला कामदा एकादशी व्रत ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करुन सांगा.” तेव्हा वशिष्ठ म्हणाले की. “या विषयी तुला एक पूर्वेतिहास सांगतो तो नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी भोगापूर नांवाच्या नगरीत नागलोकींची वस्ती होती तेथे पुंडलिक नावाचा राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता. त्याचे सामर्थ्य अफाट होते. गंधर्वसुद्धा त्याची सेवा करीत असत. त्या ठिकाणी ललित नांवाचा गंधर्व आणि ललिता नांवाची अप्सरा ही एकमेकाशी प्रेमपाशाने बद्ध होऊन सुखाने व आनंदाने कालक्रमणा करीत होती. दोघेही एकमेकावर अवर्णनीय प्रेम करीत होते. ते एकमेकांना क्षणभर विसरत नसत. एकदा राजसभेत राजापुढे ललित गंधर्व गायन करीत असताना त्याला आपल्या प्रियेचे स्मरण झाले तेव्हा त्याचे देहभाव हरपले, चित्त चंचल झाले व तो ताल सूर चुकू लागला. कर्कोटक नांवाचा एक नागराजाचा परम मित्र होता. तो त्या ललितगंधर्वाच्या वाईटावर होता. ललिताचा होत असलेला उत्कर्ष त्याला सहन होत नसे. म्हणून ललिताला हाणून पाडण्याची तो खटपट करीत होता व संधी पहात होता. राजसभेत ललित तालसूर चुकू लागला हे पाहून कर्कोटक राजाजवळ गेला. आणि त्याने राजाला हळूच सांगितले की, “महाराज ललित गंधर्व आपल्याला तुच्छ लेखतो असे दिसते. कारण हल्ली आपल्यापुढे तो तालसूर विरहीत गायन करीत आहे.” कर्कोटकाचे ते भाषण ऐकताच राजा क्रूद्ध होऊन ललिताला म्हणाला की, “हे.दुष्टा ! ज्याअर्थी तूं मला हीन समजून मजपुढे तालसूर विरहित गायन करीत आहेस त्याअर्थी तूं नरभक्षक असा दुष्ट राक्षस होशील.” याप्रमाणे राजाने त्याला शाप दिल्यानंतर सभा बरखास्त केली व ललित गंधर्व राक्षस होऊन अरण्यात भटकू लागला. ललितेला ही बातमी समजल्याबरोबर ती अत्यंत दुःखी झाली. रुदन करीत विलाप करु लागली. व शेवटी मूर्छित होऊन जमिनीवर पडली. थोड्याच वेळात ती सावध होऊन उठून बसली, आणि आपल्या प्रियकराची त्या दुःस्थितीतून कोणत्या उपायाने मुक्तता करावी याचा विचार करु लागली. पण तिला काही सुचेना. तेव्हा ती उठली आणि घराचे बाहेर पडून अरण्यात गेली. व त्याचा शोध करुन त्याच्या पाठोपाठ हिडू लागली. त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना तिला अत्यंत त्रास होत असे. चालताना ठेचा लागून पायाचे रक्त निघत असे. काटे बोचत असत, ऊन लागत असे. खाण्यापिण्याला मिळत नसे. अशा प्रकारे नाना प्रकारचे दुःख भोगित त्याच्या पाठोपाठ हिंडत असताना ती हिमालयपर्वतावर आली. तेथे तिने ऋष्यश्रृंगकृषींचा पाहिला. ऋषीश्वर आश्रमातील पर्णकुटिकेच्या बाहेर मृगाजिनावर बसले होते. तेथे ती त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. आणि हात जोडून म्हणाली की, “महाराज ! संताचे दर्शन झाल्याबरोबर पापाचा नाश होतो.” आश्रमऋष्यश्रृंग मुर्नीनी विचारले की, “हे शुभाननें तूं कोण आहेस? येथे कशी आलीस? हे मला अगोदर सांग.’ यानंतर तिने दीन वदन करुन आपला प्रियकर राजाचे शापाने राक्षस कसा झाला हे सांगितले व त्यातून त्यांची मुक्तता कोणत्या उपयाने होईल हेही विचारले. तिचा हा दुःखद वृत्तांत ऐकून त्या ऋषीश्वरांना दया आली. आणि ते तिला म्हणाले की, “हे साध्वी ! तूं जर कामदा एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) विधियुक्त करशील व त्या व्रताचे पुण्य तूं आपल्या पतीला अर्पण करशील तर राक्षस योनीतून त्याची तात्काळ मुक्तता होईल. पुढे तिने कामदा एकादशीचे व्रत विधियुक्त आचरण करुन त्याचे पुण्य आपल्या प्रियकराला अर्पण केले. तेव्हा त्या ललितगंधव्वाची राक्षसयोनीतून तात्काळ मुक्तता झाली. व पूर्वीप्रमाणे त्याला दिव्य स्वरुप प्राप्त झाले. दोघांनी एकमेकांना पाहताच प्रेमाने मिठ्या मारल्या. चैत्र शुक्लपक्षातील एकादशीला कामदा एकादशी म्हणतात. कामदा एकादशी माहात्म्य श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा। हे वासुदेवा आनंदघना । भक्तिपूर्वक तव चरणां । नमस्कार करितो मी ।१।। तुझ्या कृपेने आम्हांप्रत । श्रवणसौख्य लाभले खचित । तव औदार्य वर्णाया येथ । शब्दही अपुरे जाणतो ।।२।। आता चैत्र शुक्ल एकादशीचे । माहात्म्यही सांग साचे । सखया तुझ्यावाचून आमचे । कोण पुरवील मनोरथ ।।३।। श्रीकृष्ण बदला धर्मा ऐक। तिथि माहात्म्य अलौकिक। त्याविषयी जे कथानक। तेच सांगतो तुजलागी ।।४।। पूर्वकाळी एके दिनी। बसिष्ठांची भेट घेउनी। दिलीप राजाने आदर धरुनी। व्रतमाहात्म्य विचारले ।।५।। म्हणाला भगवन् चैत्रमासात। जी एकादशी शुक्ल पक्षात । तिच्याविषयीची समस्त । हकिकत ती सांगावी ॥६ ॥ थोर जिज्ञासा मम मनी। म्हणुनी प्रश्न केला मुनी । तरी आपण कृपा करुनी। आस एक ही पुरवावी ।।७।। तें वसिष्ठ प्रसन्नवदन । म्हणाले बरवा केलास प्रश्न । एकाग्र होउनी करी श्रवण। विवेचन त्याविषयीचे ।।८।। चैत्र शुक्ल एकादशी तिथी । ‘कामदा’ नामे प्रसिद्ध जगती। अग्री वेढतो काष्ठांप्रती तेवी जाळते पापते ||९।| कथा श्रवणाची थोर महती। अवधी दुष्कर्म नष्ट होती। संतती आदी कामना पुरती। सार्थक नरजन्माचे ।।१० || प्राचीन काळी पाताळात। सुवर्ण रत्नांनी भूषित । अशा भोगी-न गरात । नाग वस्ती होती पां ।।११ ।। पुंडरीक नामक वरिष्ठ। सर्पराजाची सत्ता तेथ । नित्य त्याची सेवा करीत । गंधर्व किन्नर अप्सरा ।।१२।। त्याच्या सेवक वर्गात। होते एक दाम्पत्य । अपार स्नेह पतिपत्नीत । नित्य कार्यरत जरी।।१ ३।। ललिता अप्सरा, गंधर्व ललित । उभयता नांदती सौख्यात । दोघांच्याही हृदयात | बिब एकमेकांचे I॥१४॥ धनधान्य संपन्न सदनात। नित्य सुखे संसार करीत। जोडीदाराच्या सहवासात। कालक्रमणा आनंदे ।।१५॥ एके दिनी सर्पसम्राट । आपल्या अनुचरांसमवेत । बैसला असता राजसभेत। इच्छा जाहली क्रीडेची ।।१६ ।। तैं मनोरंजन करण्यासी । पाचारिले ललित गंधर्वासी। त्याने जाणुनी आजेसी। सुस्वर गायन आरंभिले ।।१७।। सभास्थानी करिता गायन । ललितेचे झाले स्मरण । तेणे गायनात अकारण चुका होऊ लागल्या ।१८।। “आज ललित गंधर्वाचे । । |चित्त थान्यावर नाही साचे स्मरण आपुल्या पत्नीचे । करिताहे या समयी” ।।१९|। हे। गुह्य कर्कोटक नागाने। जाणिले अंतर्ज्ञानाने । कथन केले रागाने। पुंडरीकासी तेधवा ।।२०।। तो प्रमाद येता ध्यानी। सर्पराज संतापला मनी । म्हणे कामातुर होउनी । काय चुका करितो हा ।।२१।। तधी विवेकाते टाकून । क्रीडेत आणियले विघ्न । याचा धडा द्यावा म्हणून । शाप देता जाहला।।२२।। वदला दुर्बुद्धा तुजप्रती। उरली नच चाड कोणती। गात असता माझ्यापुढती। झालास पत्नीवश तू ।।२३|। आता राक्षस होउनी साचे । फळ भोग त्या कृत्याचे। क्षुधा शर्मविण्या मनुष्याचे । मांस खाशील यापुढती ।।२४।। वसिष्ठ म्हणाले नृपाते। शाप भोवला गंधरवते । पूर्वस्वरूप जाउनी त्याते । असुरत्व आले पां ।।२५।। अकराळ विकराळ देहाकृती। बत्तीस कोस तिची व्याप्ती। मान पर्वतासमान होती। मुखं विवर भयंकर ।।२६।। नाकपुड्या गुहेसमान । ओठ-विस्तार दोन योजन । खदिरांगारयुक्त नयन । हातही चार कोसांचे ।।२७।। रूप प्रचंड उग्र अति । दर्शने भय दाटे चित्ती। कानी पडता वार्ता ती। मूर्च्छित झाली अप्सरा ।।२८।। निजपतीची दुर्दशा पाहिली। तेणे ललिता व्यथित झाली । नाना प्रश्न मनी त्या वेळी। निज भविष्य नच कळे । ॥२९॥॥ काय करू ? जाऊ कोठे आता। विवंचनेने नुरली स्वस्थता। पतीसमवेत अरण्यप्रांता। करू लागली संचार ।।३०।। राक्षसरूप गंधर्वासही। नव्हती शांती सौख्य काही। नरभक्षक होउनी पाही। पापाचरण करितसे ।।३१ ।। आपुल्या पतीची अवस्था पाहून । ललिता दुःखिता रडे रात्रंदिन। हिंडता एकदा सहज म्हणून । विंध्याचली पातली ।।३२।। पर्वत शिखर विस्मयकारक । परिसर सुंदर मंगलदायक । त्या स्थानी आश्रम एक । होता क्ष्यशृंगांचा ॥३३|। वणवण करुनी दमलेली। परी तेथे येता सुखावली। येथेच कल्याणाचे काही। विचार करी अंतरी ।।३४।। मनाने ग्वाही दिली तिजला । तत्क्षणी आश्रमी प्रवेश केला। विनयाने त्या मुनीला। वंदन केले आदरे ।।३५।। तैं पाहुनी त्या अबलेला । ऋषी शृंगांनी प्रश्न केला। हे शुभे! तू सांग मजला। कारण येथे येण्याचे ।।३६।। हकिकत तुझ्याविषयीची । कळू। दे मजला एकदाची । तू कोण कन्यका कोणाची । सांग सर्वही सविस्तर ।।३७ ॥ अप्सरा म्हणाली हे श्रेष्ठा । या देहाते म्हणती ललिता । वीरधन्वा गंधर्व मम पिता। आली पतीकारणे मी ।।३८।। शापदोष माथी आला । तेणे असुरत्वा प्राप्त झाला । दुःख भोगीत या समयाला। हिंडताहे वनांतरी।।३९ ।। होता सद्गुणी प्रेमळ जरी। झाला भयंकर मांसाहारी। त्या अवनतीने मम अंतरी। दुःख वसले अनिवार ।।४०।। आज घडले आपले दर्शन । तेणे धन्यता येथे येऊन। तरी आपण कृपा करून । मार्ग दावा मजलागी।।४१ ।। ज्या पुण्याने मम पतीस । मुक्ती मिळेल हमखास। सांगा प्रभावी प्रायश्चित्तास। मी शरण तुम्हांते ।।४२ |। थोर महिमा सत्संगाचा। तो सुदिनच आला साचा । उलटा फेरा दैवगतीचा । सुलटा करा मुनिवरा ।॥४३ ॥ अप्सरेचे आर्त वचन । ऋषी कळवळले मनोमन । ललितेसी धीर देऊन । श्रेष्ठ उपाय सांगितला ।।४४।। म्हणाले चैत्रातील शुक्लपक्षी। येते कामदा एकादशी । व्रत आचरिता त्या दिवशी । पुरती समस्त कामना ।।४५।। तिथी असे ही मंगलकारक। माहात्म्य श्रेष्ठ अलौकिक । काय तुजसी सांगतो ऐक। करी एकाग्र चित्ताते।।४६। । विधीनुसार व्रत करावे । ते पुण्य पतीस द्यावे । त्याच्या परम प्रभावे । मुक्त होईल गंधर्व ।।४७।। शृंगऋषींचे वचन ऐकले । ललिता चित्त सुखावले । कामदा एकादशीस केले । व्रताचरण यथाविधि । ॥४८ ॥ अन्य दिनी द्वादशीस । मुनिवर्यांच्या आश्रमास। आळवुनी वासुदेवास । केली करुण प्रार्थना ।।४९।। मुखे बोलली संकल्प वचन । देवा तुझ्यावर श्रद्धा ठेवून । पतिउद्धार व्हावा म्हणून । व्रत उपोषण केले पां ।।९०।। आता त्याचे पुण्य समस्त । अर्पिते ललित गंधर्वाप्रत । त्या प्रभावे पिशाचता नष्ट । होवो मम पतीची॥५१ ॥ सत्यसंकल्पाचा दाता नारायण । वाक्य उच्चारिता पुण्य मिळून । ललित गंधर्व निष्पाप होऊन । दिव्य-देही जाहला ।।५२।। राक्षसत्व लयास गेले। पूर्वस्वरूप प्राप्त झाले । आदरे वंदुनी ऋषिपावले। केली व्यक्त कृतज्ञता ।।५३।। हरिकृपेने भाग्य उजळले । उभयता संगतीत रमले । दिव्य विमानी बैसून केले । प्रस्थान निजस्थानासी।।५४ । कामदा एकादशी व्रत । त्याचे पुण्य अगणित । प्रयत्ने आचरिता निश्चित । भाग्य लाभते त्या नरा ।॥५५।॥ ब्रह्महत्यादी पातके जळती। पिशाचत्व महादोष जाती। लोककल्याणास्तव तिथिमहती। कथन केली नृपवरा ।।५६।। या माहात्म्य श्रवण पठणे साचे । फळ वाजपेय यागाचे। बोल महर्षी वसिष्ठांचे। त्याची प्रचिती । आजही ।।५७॥ ।। इति श्रीवराहपुराणे चैत्रशुक्लैकादश्याः कामदानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। । श्रीकृष्णार्पणमस्तु ।॥। शुभं भवतु ! कामदा एकादशी दिवशी काय करू नये? मोहिनी एकादशी दिवशी व्रत करणार असाल तर राग,मत्सर यासारख्या नकारात्मक भावनांपासून दूर रहा. मन शांत आणि स्थिर ठेवून उपवास करा.मोहिनी एकादशीच्या उपवासा दरम्यान भात वर्ज्य करावा असं सांगितले जाते. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website