निर्जला एकादशी – ५ जून २०१७ Mandar Sant June 2, 2017 दिनविशेष १] कथा ======== भीमसेनाने विचारले, ‘हे पितामह व्यासा, तुम्ही महाबुद्धिवंत आहात. मी काय म्हणतो ते ऐका. युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे सर्वजण एकादशीला कधीही भोजन करीत नाहीत. ते मला म्हणतात की, ‘हे वृकोदरा, तूही एकादशीला जेवू नकोस.’ आजोबा, मी त्यांना म्हणतो की, मला भूक सहन होत नाही. ‘मी दाने देईन, केशवाची विधीपूर्वक पूजा करीन. पण उपवास केल्याशिवाय एकादशी व्रताचे फळ कसे लाभेल ते सांगावे.’ भीमसेनाचे हे बोलणे ऐकून व्यास म्हणाले,’भीमसेना, तुला नरक अनिष्ट वाटत असेल, व स्वर्गाची इच्छा असेल तर शुक्ल आणि वद्य पक्षातील एकादशांच्या दिवशी तू भोजन करू नकोस.’ भीमसेन म्हणाला,’आजोबा, तुम्ही तर महाबुद्धिवंत आहात. मी तुम्हालाखरे सांगतो की मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मग माझ्याकडून उपवास कसा काय होणार? माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा तो थोडा वेळ शमतो. मला वर्षातून एकच उपवास कसातरी करता येईल. तेव्हा मला नक्की करून सांगा की मी हा एकच उपवास कोणता करावा. ज्या एकाच उपवासाने मला सर्व एकादशींच्या उपवासाचे फळ मिळेल असा उपवास सांगा.’ व्यास म्हणाले,’भीमा, तू मनुष्यानेव् पाळायचे नियम ऐकले आहेस.वैदिक धर्म काय आहे, हेही तू ऐकले आहेस. पण हे राजश्रेष्ठा, हे धर्म कलियुगात आचरणे शक्य नाही. थोड्या उपायात, थोड्या खर्चात, व अगदी कमी श्रमाने महाफल देणारे सर्व पुराणांचे सार मी तुला सांगतो . ऐक. शुक्ल व कृष्ण या दोन्ही एकादशांना भोजन करू नये. जो एकादशीला उपवास करतो, तो कधीही नरकाला जात नाही.’ व्यासांचे हे बोलणे ऐकून भीमसेन खूप घाबरला. आणि पिंपळाच्या पानासारखा थरथर कापू लागला. तो म्हणाला, ‘आजोबा, मी उपवास करण्यास समर्थ नाही. म्हणून पुष्कळ फळ देणारे एकच एकादशी व्रत मला सांगा.’ व्यास म्हणाले, ‘ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते, तिचा उपवास पाणीही न पिता प्रयत्नपूर्वक करावा. स्नान आणि आचमन या कामापुरताच पाण्याचा उपयोग करावा. तसे न केल्यास व्रतभंग होईल. हे व्रत करणार्याने एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे. त्याने हा नियम पाळला तर त्याला प्रयत्न केल्याशिवाय बारा एकादशा केल्याचे फळ मिळते. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करावे, ब्राह्मणाला विधीपूर्वक जलदान किंवा सुवर्णदान द्यावे. नंतर आवश्यक कृत्ये करून आणि इंद्रिये व मन ताब्यात ठेवून ब्राह्मणांसह भोजन करावे. भीमसेना, अशा प्रकारे व्रत केल्यामुळे कोणते पुण्य मिळते ते ऐक : सर्व वर्षात ज्या एकादशा येतात त्या सर्व एकादशाचे फल ही एकादशी केल्यामुळे मिळते, यात संशय नाही. कारण तसे मला शंखचक्रगदाधारी केशवानेच सांगितले आहे. हे वृकोदरा, सर्व तीर्थाचे जे पुण्य, सर्व दानांचे जे पुण्य ते या एकादशीनेच मिळते. सर्व वर्षातील शुक्ल व वद्य पक्षातील ज्या धनधान्य देणार्या पुण्यकारक, पुत्र व आरोग्य वगैरे फळे देणार्या अशा सर्व एकादशांचे उपोषण केल्याचे एकत्र फळ या एकच एकादशीच्या उपवासाने मिळते. हे नरव्याघ्रा भीमा, मी तुला हे अगदी सत्य सांगत आहे. या एकादशीचे उपोषण करणार्याला त्याचे अंतःकाळी मोठ्या शरीराचे अक्राळ-विक्राळ, काळे, पिंगट दंड व पाश धारण करणारे भयंकर यम दृष्टीस पडत नाहीत. हे नरव्याघ्रा, याच्या उलट त्याच्या अंतःकाळी पीतांबर धारण करणारे, सौम्य, शंखचक्र धारण करणारे व मनोवेगाने जाणारे विष्णुदूत येतात आणि त्याला विष्णुलोकाला घेऊन जातात. म्हणून सर्व प्रयत्न करून या एकादशीचे व्रत पाणी न पिता करावे व गाईचे दान करावे. म्हणजे मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो.’ भीमानेही त्या दिवसापासून या कल्याणकारक एकादशीचे व्रत केले म्हणून तेव्हापासून ही *निर्जला एकादशी* *‘पांडव एकादशी‘* किंवा *’भीमसेनी एकादशी‘* या नावाने सर्व लोकात प्रसिद्ध झाली. हे पृथ्वीच्या राजा, भीमसेनाने ज्यावेळी निर्जला एकादशीचे व्रत सुरू केले, त्यावेळी तो भुकेने व तहानेने व्याकुळ झाला. त्याने दिवसाचे दोन प्रहर कसेतरी काढले तिसर्या प्रहरी भीमाला उपोषण व तहान सहन होईना तेव्हा तो गंगेत जाऊन पुष्कळ वेळ पडून राहिला. नंतर त्याने खूप वेळ स्नान केले. तेव्हा त्याला थोडीशी हुषारी वाटली. उपवासाची रात्र त्याने फार कष्टात काढली याप्रमाणे त्याने व्यासाने सांगितल्याप्रमाणे व्रत पाळले. या निर्जला एकादशीच्या भीमाने केलेल्या स्नानाचे स्मरण म्हणून दिवसाच्या तिसर्या प्रहरी पुन्हा एकदा स्नान करावे हे राजा तूही सर्व पापाचे शमन व्हावे म्हणून हा उपवास प्रयत्नपूर्वक कर. आणि भगवंताची आराधना कर. एकादशीच्या दिवशी सकाळी शुद्ध होऊन पुढीलप्रमाणे संकल्प करावा.’ हे देवेशा. आज हरिदिन आहे म्हणून मी पाणीही प्राशन न करता उपोषण करीन व दुसर्या दिवशी पारणे करीन.’ असा संकल्प करुन सर्व पापांच्या नाशासाठी इंद्रियांचे संयमन करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास करावा. स्त्रियांचे किंवा पुरुषांचे पाप मेरू किंवा मंदार पर्वताएवढे जरी मोठे असले तरी या एकादशीच्या प्रभावाने भस्म होऊन जाते. हे राजा, ज्याला धेनू दान करण्याचे सामर्थ्य नसेल त्याने घटात सुवर्ण घालून आणि तो वस्त्राने गुंडाळून दान द्यावा. या एकादशील पाणी न पिण्याचा जो नियम करतो तो मोठाच पुण्यवान होतो. कारण त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरागणिक चार कोटी तोळे सोने दिल्याचे पुण्य मिळते. जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी स्नान करुन दान, जप, होम वगैरे कर्मे करतो त्याचे पुण्य कधीही नष्ट होत नाही, असे श्रीकृष्णानेच सांगितले आहे. निर्जला एकादशीचेउपोषण भक्तीने केले असता वैष्णवपद प्राप्त होते. मग इतर नेम, नियम हवेतच कशाला? उपोषण करून जो मनुष्य या एकादशीच्या दिवशी सोने, अन्न व वस्त्र दान देतो, त्याला त्याचे फळ अक्षय मिळते. या एकादशीच्या दिवशी जो अन्न जेवतो तो जणू पापच भक्षण करतो व त्याला शेवटी दुर्गती मिळते. जे एकादशीला उपवास करून द्वादशीला दाने देतात, ते अंती मोक्ष मिळवतात. ब्रह्मघातकी, मद्यपान करणारे, चोर, गुरूचा द्वेष करणारे, नित्य खोटे बोलणारे असे सर्व पातकी या निर्जला एकादशीचे व्रत करतील तर ते सर्व पापातून मुक्त होतील. निर्जला एकादशीच्या दिवशी इंद्रिय-निग्रह करून श्रद्धायुक्त अंतःकरणाने स्त्री-पुरुषांनी आणखी काय करावे ते मी सांगतो, ऐक. त्या दिवशी जलाषयी नारायणाची पूजा करावी आणि धेनू दान द्यावी. किंवा त्याऐवजी तुपाचे दान द्यावे. मोठ्या दक्षिणा देऊन व मिष्टान्न देऊन ब्राह्मण संतुष्ट करावे. हे धर्मश्रेष्ठा राजा, ब्राह्मण संतुष्ट झाले म्हणजे त्यामुळे मोक्ष देणारा नारायण संतुष्ट होतोच. जो हे निर्जला एकादशीचे व्रत करीत नाही, तो आत्मद्रोही असतो. तो पापी, दुराचारी व दुष्ट असतो, यात संशय नाही. जे शांत, दानपर लोक जागरण करून हे उपोषण करतात, व त्या दिवशी वासुदेवाची पूजा करतात ते आपल्या शंभर पूर्वजांसह विष्णुलोकाला जातात. या एकादशीचे पारणे करतना अन्न, पाणी, शय्या उत्तम आसन, कमंडलू व छत्र ही दाने द्यावीत. जो मनुष्य पारण्याच्या दिवशी सत्पात्र ब्राह्मणाला जोडा दान देतो, तो निश्चितपणे सुवर्णाचे विमानात बसून स्वर्गाला जातो. जे कोणी या एकादशीची कथा सांगतात किंवा भक्तिभावाने ऐकतात ते सर्व स्वर्गलोकाला जातात, याविषयी शंका नाही. कुरुक्षेत्रामध्ये सूर्यग्रहणात श्राद्धविधी केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य हे माहात्म्य ऐकल्याने मिळते. ॥श्रीभारतातील व पद्म पुराणातील निर्जला एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ कथा : आंतरजालावरून साभार ————————————————————————————————— २] एकादशी व्रताचे महत्त्व ================ अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे. अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। [ पद्मपुराण ] अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही. === एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात. मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते. शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते. यश आल्याने धन प्राप्ती होते. साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत. समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात- ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।। ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥ ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।। तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।। “ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.” प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे- एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।। श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥ तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।। “जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.” पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ।।1।। काय तुझा जीव जाते एका दिसे । फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।। स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।। थोडे तुज घरी होती ऊजगरे । देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।। तुका म्हणे कां रे सकुमार झालासी। काय जाब देती यमदूता ।।5।। एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।। काय करुं बहू वाटे तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।। हरिहरासी नाही बोटभरी वाती। कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।। तुका म्हणे नाही नारायणी प्रिती । कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।। एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।। ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।। अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।। शेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तयाजोडे क्षय रोग । जन्मव्याधि बळवंत ।। आपण न वजे हरिकिर्तना । आणिका वारी जाता कोणा । त्यांचे पापा जाणा । ठेंगणा तो महामेरु ।। तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलिया ।। करविता व्रत अर्ध पुण्य लाभे। मोडविता दोघे नरका जाती । शब्दबुध्दी होय दोघा एक मान । चोरासवे कोण जीव राखे । आपुले देवूनि आपलाचि घात। नकरावा थीत जाणोनिया । देवुनिया वेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ। तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग। भक्ती हे मार्ग मोडू नये । छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात- आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥ तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥ कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥ म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥ ” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.” ————————————————————————————————— ३] शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ? ======================== एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा. दूसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे. द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते. शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते. एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते. Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website