परमपूज्य गुळवणी महाराज : संपादीत लेख : श्री अनंत देव , वाई Mandar Sant December 15, 2017 दिनविशेष *प. पू. योगिराज श्री गुळवणी महाराज* *जन्म:मार्गशिर्ष वाद्य १३, गुरुवार २३ डिसेंबर १८८६* *आई/वडील:उमाबाई/दत्तभट गुळवणी* *कार्यकाळ: १८८६ – १९७४* *गुरु:* *प. पू . वासुदेवानंद सरस्वतींकडून अनंतचतुर्दशीला दिक्षा.* *प. पू . लोकनाथतिर्थ स्वामींकडून शक्तिपात दिक्षा अधिकार.* *समाधी: पौष वाद्य ८, दिनांक १५ *जानेवारी १९७४ ला दत्त चरणी विलीन.* *विशेष:* *२७ जानेवारी १९६५ वासुदेव निवास वास्तुशांती.* *श्री वासुदेवानंद सरस्वती समग्र वाग्मय पुनर्मुद्रण* *शिष्यवर्ग:* *१) श्री दत्तमहाराज कविश्वर* *२) श्री मामासाहेब देशपांडे* *३) गुरुताई सुगंधेश्वर* *४) श्री केशवराव जोशी* *५) डॉ. हरिश्चंद्र जोशी* *आणि हजारो भक्त शक्तिपात दिक्षेने कृपांकीत* *कौटुंबीक पार्श्वभुमी* गुरुमाऊली प. पू. योगीराज गुळवणी महाराजांचे पणजोबा गुळवणी कोल्हापूर जवळ कौलव ग्रामी परंपरागत वैदिक व्यवसाय करत होते. प. पू. नारायणस्वामीनी त्यांना अनुग्रह दिला होता, म्हणून प. पू नागेशरावांना जी पुत्र रत्न प्राप्ती झाली. त्याचे नांव त्यांनी नारायण ठेवले श्री नारायण भटजी ना जो पुत्र झाला त्याचे नाव त्यांनी दत्त ठेवले. श्री दत्तोपंत भटजी कुलाचार संपन्न व शास्त्रोक्त विधी निष्ठेने करणारे वैदिक होते. त्यांची दुसरी पत्नी उमा हिच्या सह श्री दत्तोपंतानी डोंगर उतारा वरील निसर्गरम्य अशा कुडुत्री गांवी स्थलांतर केले. श्री दत्तोपंत भटजीं चा दिनक्रम – स्नान संध्या, पूजा-अर्चा, अग्निसाधना, रुद्र एकादशिनी, पंचसूक्त पवमान युक्त आभिषेक पूजा, गुरुचरीत्र पारायण भोगावती नदीवर ब्रह्मयज्ञ घरी नैवेद्य- वैश्वदेवा नंतर भोजन, दुपारी विष्णुसहस्त्र नाम, सायंसंध्या, अग्निसेवा व रात्री कुलगुरु नारायण स्वामींचे भजन, अशा परिपूर्ण धार्मिक कार्यक्रमांनी भरलेला असे. त्यांची व्दितीय पत्नी उमा ही देखील साध्वी, सात्विक, सदाचारी वृत्तीची व पतीच्या प्रत्येक धार्मिक कृत्यात तितक्याच उत्कटतेने साथ देणारी होती. *पादुकांचा कृपाप्रसाद* प्रत्येक पौर्णिमेस श्री दत्तोपंत व सौ. उमामाता उभयता न चुकता नृसिंहवाडीस श्री दत्तप्रभूंच्या दर्शनास जात होते. त्या काळी वाहन व्यवस्था आजच्या सारखी नव्हती. श्रीदत्तोपंत भटजी व सौ. उमामाता उभयता घोड्यावरुन नृसिंहवाडीस पौर्णिमा वारीस येत असत. उभयतांची उत्कट इच्छा ही होती की, श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त प्रभूनी आपणांस कृपा प्रसाद रुपाने आपल्या पादुका द्याव्यात. त्यांच्या नृसिंहवाडी वारीस २० वर्षे पूर्ण झाली तरी श्रीदत्त प्रभूंच्या कृपाशिर्वादाचे फळ त्यांना अद्याप मिळायचे होते. या वीस वर्षात सौ. उमा दत्तोपंताच्या संसार वृक्षाचा विस्तार होऊन बापू नरहरी आणि गोविंद अशा तीन सुंदर फळांनी संसार वृक्ष लगडला होता. या खेपेस सौ. उमामाता पुन्हा गरोदर होत्या. त्यांना सात महिने झाले होते, म्हणून श्री दत्तोपंत एकटेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीस गेले होते. अशा अवस्थेत सौ. उमामातानी श्री स्वामीच्या पादुका प्रसादाचा ध्यास घेऊन उत्कट भक्तीभावाने उपोषण सुरु केले. या उपोषणात परमेश्वराचा अखंड जप सुरु केला काही दिवस लोटल्यावर सौ. उमामातांना थकवा जाणवू लागला. तशाही स्थितीत देवापुढे अखंड जप चालूच होता. एके दिवशी, दुपारी १२ वाजता त्यांच्या कानी “नारायण” ध्वनी आला आणि कुणी संन्यासी जवळ आल्याची चाहूल लागली..! त्यांना आपल्या मांडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि वस्तू मांडीवर पडल्याची जाणीव झाली. उमाबाईनी प्रयत्न पूर्वक डोळे (ग्लानीने घेरले असल्यामुळे) उघडले. मांडीवर एक कागदाची पुडी होती. पुडी उघडली आणि उमाबाईंचे अष्टसात्विक भाव जागृत झाले ! आपले उपोषण, आपली सेवा देवाला रुजू झाली. या अत्यानंदाने त्या भारुन गेल्या. कारण त्या पुडीत चांदीच्या पादुका होत्या. अष्टगंधाने माखलेल्या सुरेख पादुका ! पुडी कोणी टाकली हे पाहण्यासाठी उमाबाईनी मान वळवून पाहिले तो एका संन्याशाची भव्य आकृती लगबगीने जाताना दिसली हाक मारण्यापूर्वीच ते अदृष्य झाले…. आणि उमाबाईना पादुका प्रसाद मिळाला. नृसिंहवाडीत बरोबर याच सुमारास श्री दत्तोपंत भटजीनाही एक साक्षात्कार झाला. श्री दत्त जयंती दिवशी ते श्री पादुकांवर पाणी घालत स्पर्श करताना- “मी तुमच्यावर प्रसन्न आहे !” असे उद्गार कानी पडले. समोर कोणी नाही फक्त समोर श्री पादुका ! श्री दत्तोपंत मनोमन आनंदले. या दोन्ही शुभ साक्षात्कारांचा प्रत्यय मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला शके १८१८ म्हणजे गुरुवार दि. २३ डिसेंबर १८८६ साली रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी पुत्ररत्न प्राप्तीने आला. सौ. उमामाता प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली. सौ. उमामाता व श्री. दत्तोपंत भटजीनी श्री दत्त प्रभूंची जी अहर्निश सेवा केली. त्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळाला, बाळाचे नाव ठेवले ‘वामन’ ! हेच आमचे परमपूज्य योगिराज गुळवणी महाराज ! *बालपण व शिक्षण* प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचे प्राथमिक ४ थी पर्यंतचे शिक्षण तारळे या छोट्याशा गावी झाले तालुक्यात पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाल्यामुळे वामनला ४ थी ची स्कॉलरशिप मिळाली. बुद्धी एकाग्रचित्त, आकलनक्षम असून तिला तीव्रस्मरणशक्तीची जोड मिळाल्यामुळे एका प्रयत्नात सर्व कांही मुखोदगत होऊन जाई. कोल्हापूर येथील संस्कृत व्यासंगी जगदगुरु पंडित आपटे व वे. शा. सं. आत्मरामाशास्त्री पित्रे यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन झाले. विद्यार्थी दशेत असताना वामनराव पोहायला शिकले. व्यायामाची व चित्रकलेची ही त्यांना आवड होती. इयत्ता नववीत असताना त्यांच्या कलाशिक्षकानी त्यांच्या ठायी असलेले कला गुण हेरले. चित्रकलेची फर्स्ट ग्रेड व सेंकडग्रेड वामनराव उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याचा त्यांच्या कला शिक्षकास सार्थ अभिमान होता. चित्रकलेची, थर्डग्रेड परीक्षा देण्यासाठी वामनरावानी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला. याच वेळी मॅट्रीकला पण ते प्रविष्ट झाले. “कोणती परीक्षा द्यावी” ? हे द्वंद्व त्यांच्या मनात सुरु झाले. या द्वंद्वात मनस्वी कला विजयी झाली हे सांगणे नकोच ! मॅट्रीक नंतर नोकरीची शाश्वती असताना देखील वामनरावानी ती वाट सोडून दिली. याच निर्णयाचा त्यांच्या संपूर्ण जीवनावर परिणाम होऊन गुळवणी “ड्रॉईंग चे मास्तर” म्हणून विश्वविख्यात झाले. याच कलागुणामुळे त्यांना प.पू. टेंबे स्वामींचे दर्शन घडले. *नृसिंहवाडी येथे श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी (थोरले महाराज) यांच्याशी भेट* प. पू योगिराज गुळवणी महाराजांचे थोरले बंधू शंकरशास्त्री यांनी प. पू. सद्गुरु टेंबे स्वामीना या विषयी सांगितल्यावर त्यांनी. “पत्रात लिही की येताना श्री दत्ताची प्रतिमा काढून गळ्यात श्लोकबद्ध हार घातल्यांचे दाखव आणि ते चित्र घेऊनच ये” श्लोक बद्ध हारासाठी महाराजानी श्लोक सुद्धा दिला. पत्रा प्रमाणे प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे ध्यान केले. त्या वेळी उत्कट भक्ती मुळे त्यांना एकमुखी दत्तप्रभूंचे हृदयात साक्षात दर्शन झाले. तेच चित्र त्यांनी कागदावर साकारले व प. पू. सद्गुरु टेंबे स्वामीनी दिलेल्या श्लोकाला एक सुंदर हाराचे स्वरुप प्रदान केले. फुलांच्या चार पाकळ्या, व मध्यभागी पराग प्रत्येक पाकळीत मध्ये एक-एक अक्षर लिहून श्लोक बद्ध हार एक मुखी मूर्तीच्या गळ्यात घातला. असे विशुद्ध भक्तीने भारलेले ते चित्र जेव्हा प. पू. टेंबेस्वामीनी पाहिले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला, त्यांनी आपल्या परमशिष्यावर स्नेह दृष्टीने कृपावर्षाव केला. प. पू. टेंबे स्वामीनी प. पू. गुळवणी महाराजांची ही सेवा रुजु करुन घेऊन वामनरावांना हातात बांधण्यासाठी एक यंत्र करुन ते चांदीच्या पेटीत घालून ती पेटी स्वत:च्या हाताने वामनरावांच्या हातात बांधली. एक संरक्षक कवच प. पू. टेंबेस्वामीनी आपल्या परमप्रिय शिष्याच्या हातात बांधले ! हा दिवस होता नृसिंहवाडीकरांच्या परमभाग्याचा. तो म्हणजे गुरुव्दादशीचा ! या दिवशी प्राप्त झालेल्या या अनमोल ठेव्याची (संरक्षक कवचायी) आठवण सदैव रहावी म्हणून प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. *हावनूर येथे प. पू. टेंबेस्वामींचे प. पू. गुळवणी महाराजाना अभूतपूर्व दर्शन* गाणगापूरहून निघून सतत दोन महिने बऱ्याच अंशी अनवाणी पायी प्रवास करत, कधी उपाशी तर कधी अर्धपोटी राहून बऱ्याच वेळा अन्नपाण्या विना ही राहून दर्शन भेटीचा ध्यास घेऊन पायपीट करीत योगीराज गुळवणी महाराज कर्नाटकातील हावनूर येथे तुंगभद्रेच्या काठी त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात प. पू. टेंबेस्वामी महाराजांच्या दर्शनासाठी पोहचले. स्वामी महाराजाना पहाताच प. पू. गुळवणी महाराजानी साष्टांग दंडवत घातले व आनंदाश्रूना वाट करुन दिली. सलग अकरा दिवस हे गुरु शिष्य एकत्र राहिले. तेथून परतताना प. पू. टेंबेस्वामीनी प. पू. गुळवणी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून कृपाशीर्वाद दिला प्रसाद नारळ, अंगारा देऊन सांभाळून राहण्याचा सल्ला दिला. जड अंत:करणाने प. पू. योगिराज गुळवणी महाराजानी प. पू. टेंबेस्वामीना निरोप घेताना विचारले, “महाराज, आता पुन्हा दर्शन” ? ते ऐकून प. पू. टेंबे स्वामीनी मानेला एक ऊर्ध्व झटका देऊन भावपूर्ण स्वरात सांगितले. “हे असं लक्षात ठेव म्हणजे झालं !” समोर उभ्या असलेल्या वामनरावांना या वाक्या बरोबरच स्वामी महाराजांच्या शरीरातून निघालेली व्याघ्रांबरधारी एकमुखी श्री दत्त प्रभूंची मूर्ती साक्षात दिसू लागली. या मूर्तीचे चरण स्वामी महाराजांच्या हृदयाजवळ होते स्वामी महाराजांचे शरीर पारदर्शक होऊन त्या मध्येच व्याघ्रांबर पांघरलेली श्री दत्तप्रभूंची सुकोमल, प्रसन्न हास्य चेहऱ्यावर आसणारी मूर्ती वामनराव पहात होते त्या अवर्णनीय आनंदातून भानावर येत त्यानी स्वामीना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि वर पाहिले तर दत्तप्रभूंची मूर्ती नसून स्वामी महाराजच बसलेले आहेत. “हे असं लक्षात ठेव म्हणजे झालं !” हे प. पू. टेंबेस्वामीचे शब्द व श्री दत्तप्रभूंची व्याघ्रांबरधारी मूर्ती चित्तात कोरुन, एके दिवशी याच मूर्तीला भगवान दत्तात्रेयांच्या मनभावन मनोहारी रूपात चित्रित केलं. एका चित्रकाराच्या अप्रतिम हस्त कौशल्याने जणू दत्तप्रभू कागदावर प्रकटले ! तेव्हाचा प. पू. गुळवणी महाराजांचा आनंद अप्रतिम, अवर्णनीय होता हे मात्र निश्चित ! *प. पू. टेंबेस्वामी कडून मंत्र दीक्षा* नागपूर जवळ भंडारा जिल्ह्यात वैतगंगा नदीच्या काठी पवनी हे गाव वसलेलं आहे. या ठिकाणी प. पू. टेंबे स्वामींचा चातुर्मास सुरु होता. या क्षेत्री अनंत चतुर्दशीला प. पू. गुळवणी महाराजाना, त्यांच्या मातोश्री उमामाता व भगिनी गोदावरी सह मंत्र दीक्षा देताना प. पू. टेंबेस्वामीना खूप आनंद झाला. *प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींकडून शक्तीपात दीक्षा* प. पू. गुळवणी महाराज दैनंदिन कार्यक्रमात प्राणायामाचा अभ्यास करत असताना एके दिवशी त्यांच्या स्वप्नात प. पू. टेंबेस्वामी महाराज आले. ते म्हणाले, “ही विद्या दत्त संप्रदायाची आहे. आम्ही एकच आहोत. तुझ्या हातून पुढे मोठे कार्य करुन घ्यावयाचे आहे. ही विद्या घे !” स्वप्नातून जाग आल्यावर प. पू. गुळवणी महाराजानी समोर स्वामी चिन्मयानंदाना पाहिले व त्यांना नमस्कार केला. (हे स्वामी चिन्मयानंद म्हणजेच कलकत्याचे श्री योगेश चक्रवर्तीजी – योग साधनेव्दारा, शक्तिपात दीक्षे मुळे ते स्वामी चिन्मयानंद सरस्वती झाले – व कालांतराने गुरु दीक्षे मुळे ते प.पू. लोकनाथतीर्थ स्वामी झाले). प. पू. टेंबेस्वामींच्या आदेश प्रमाणे प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींच्या कडून शक्तिपात साधनेची दीक्षा घेतली. प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींनी प. पू. गुळवणी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवून परमेश्वर प्राप्तीचा हा मार्ग, अर्थात कुंडलिनी जागृती – शक्तिपात साधनेचा हा अमोघ ठेवा प्राप्त करुन दिला. *शक्तिपात साधना व्याप्ती :* शक्तिपात (दीक्षा) साधना याचा सरळ सोपा अर्थ – गुरुकडून योग्य अशा शिष्याच्या निद्रिस्त शक्तीस जागृत करणे – त्याच्या वर गुरुकृपेचा वर्षाव करणे. कठीण गुरु साधनेसाठी शरीर वृत्ती तयार करणे, हा आहे. अनेक गुरु भक्तांना प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी शक्तिपात साधनेची दीक्षा दिली. ही दीक्षा देताना त्यांनी जात, धर्म पंथ, स्त्री-पुरुष असा कोणताही भेद केला नाही. ढाक्याहून मुंबईस आलेल्या एका मुस्लीमधर्मीय व्यक्तीस, जो भिकाऱ्याच्या वेशात हिंडत होता त्याला देखील शक्तिपात दीक्षा देऊन त्याला चरीतार्थासाठी योग्य बनवले. शक्तिपात साधनेचे कार्य प. पू. गुळवणी महाराजांच्या संकल्प शक्तीने महाराष्ट्र प्रांत, संपूर्ण भारत- भारताबाहेर युरोप, अमेरिका, आफ्रिका इ. देशात पोहचले आहे. न्यूयॉर्क येथील श्री. वॉलकॉट यांना देखील पुण्यातूनच संकल्पाव्दारे प. पू. गुळवणी महाराजानी अनुग्रह दिला. हे त्यांचे शक्तिपात साधनेचे महान कार्य पाहून विष्णुतीर्थ स्वामी महाराजानी “शक्तिपात साधना” ही वेद प्राणित चैतन्यशक्ती दीक्षेच्या व्दारा गुरुकृपेच्या स्वरुपात या चैतन्यशक्तीचे संस्कारक्षम अनुभव प्रत्येक साधकाला येत असतात हे स्पष्ट करताना म्हटले की, या अंधकारपूर्ण युगात श्री गुळवणी महाराजांचा प्रभाव या प्रांतात चहू दिशांना सर्वत्र पसरत आहे, किंकर्तव्यमूढ होऊन भटकणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे कार्य आहे. *प. पू. योगिराज गुळवणी महाराजांचा नृसिंहवाडीशी ऋणानुबंध* प. पू. टेंबेस्वामी महाराजानी नृसिंहवाडी मुक्कामी प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात गुरुव्दादशी दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक यंत्रसंरक्षक कवच बांधले असल्यामुळे गुरुकृपेची आठवण सतत राहण्यासाठी प. पू. गुळवणी महाराजानी प्रत्येक गुरुव्दादशीस नृसिंहवाडीस येण्याचा संकल्प सोडला. मनोमन ठरवले. त्या नुसार ते प्रत्येक गुरुव्दादशीस न चुकता येत असत. त्या पवित्र दिवशी नृसिंहवाडीतील माता- भगिनी परंपरेनुसार प्रथम देवाला ओवाळून मग प. पू. गुळवणी महाराजाना देखील ओवाळत असत. प. पू. गुळवणी महाराज प्रत्येक सुवासिनीस एक रुपया ओवाळणी घालत. एका गुरुव्दादशीस ओवाळणीसाठी प. पू. गुळवणी महाराजांकडील पाचशे रुपये खर्च झाले. याचाच अर्थ त्या दिवशी सुमारे पाचशे सुवासिनीनी महाराजांना ओवाळले, औक्षण केले ! प. पू. योगिराज गुळवणी महाराज बालपणापासूनच नृसिंहवाडीस येत होते. नृसिंहवाडीतील त्यांचा दिनक्रम – पहाटे उठून कृष्णेचे स्नान करणे, श्री चरणांवर पाणी घालणे, माधुकरी मागणे, अनुष्ठान, महापूजा करणे, श्रीदत्तप्रभूंची यथाशक्ती सेवा करणे, अन्नदान करणे इत्यादि ते अंत:करणपूर्वक समर्पित भावनेने आनंदाने करीत असत. एकदा तर देवस्थान समितीने वाडी बाहेरच्या कोणाही व्यक्तीला श्री स्वामीच्या चरणावर पाणी घालण्यासाठी बंदी केली होती. प. पू. गुळवणी महाराजाना ही बंदी म्हणजे एक प्रकारची शिक्षाच वाटू लागली. त्यांनी आपल्या मनातील ही खंत पुजारीजनांना बोलून दाखविली. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूनी पुजाऱ्यांना विचार प्रवृत्त करायला लावून प. पू. गुळवणी महाराजाना या कठीण नियमातून मुक्त करून आपल्या पादुकांवर पाणी घालण्याची इच्छा पूर्ण करुन घेतली. या बाबतीत पंडित श्री. आत्माराम शास्त्री जेरे पुजारी यांनी पुढाकार घेऊन प. पू. गुळवणी महाराजांची श्री पादुकावर पाणी घालण्याची नित्य सेवा अबाधित ठेवली. या वरुन श्रीदत्तप्रभूंचा प. पू. गुळवणी महाराजांवरील लोभच दृष्टोत्पत्तीस येतो. नरसोबावाडीस असताना प. पू. योगीराज गुळवणी महाराज रोजच्या पहाटेच्या काकड आरतीला न चुकता उपस्थित रहात. देवासमोरच्या खांबा जवळची जागा एक शिंपी न चुकता त्यांच्यासाठी धरुन ठेवत असे. त्या खांबा जवळून प. पू. गुळवणी महाराजाना दरवाजा उघडल्यावर श्री दत्तप्रभूंचे अगदी व्यवस्थित दर्शन घडत असे. त्या शिंप्यास ते प्रतिवर्षी धोतर जोडी प्रसाद म्हणून देत असत. प. पू. योगीराज गुळवणी महाराजानी वंदनीय अशा नृसिंहवाडीतील श्री दत्त मंदिर व परिसरातील अनेक मंदिर वास्तूंचे जीर्णोद्धार केले. जुन्या ओवऱ्या पाडून नवीन प्रशस्त ओवऱ्या बांधल्या. श्रीराममंदिर, नारायणस्वामी, गोपाळस्वामी मंदिर, श्री ब्रम्हानंद स्वामी मठाचे नूतनीकरण केले. श्री उमामातेच्या स्वामी भेटीच्या जागी एक तुळशी वृंदावन उभे केले. प्रशस्त धर्मशाळा बांधली सर्वात उल्लेखनीय व अविस्मरणीय कार्य म्हणजे प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी प्रदक्षिणा मार्गी बांधलेली गोलाकार शिल्प कृती ! सभा मंडप- उत्कृष्ट शिल्पकृतीचा एक नमूना ! मजबूत पायावर सोळा खांबावर आधारलेली कमळाच्या कोरीव कामाने सजलेली ३५० टन वजनाची मजबूत गोलाकार स्लॅब – बांधकाम क्षेत्रातील एक नवलच आहे ! भव्य दिव्य उत्कृष्ट शिल्पकृती ! हा सभा मंडप उत्तम नटलेला असून त्यात गुरुचरीत्रातील उल्लेखनीय प्रसंग चित्रित केले आहेत. प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या संकल्पातून साकारलेला हा गोलाकार प्रदक्षिणा मंडप पाहताना श्री दत्तचरणी लीन झालेले मन प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या देखील सुकोमल चरणांवर भक्तीभावाने मस्तक टेकते ! ज्यांच्या कडून काम करून द्यायचे असते त्याला प्रत्यक्ष श्री दत्त प्रभूच अशी प्रेरणा देतात हे वादातीत सत्य नृसिंहवाडीकर नित्य अनुभवत असतातच. प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या मनी मानसी अहर्निश नृसिंहवाडीच वसली होती. कारण प्रत्येक वेळी वाडीस येताना पाट्याभरुन पिवळी शेवंतीची फुले ते श्रीचरणांवर अर्पण करण्यासाठी घेऊन येत असत. वाडीस असताना कित्येक वेळा पार्सलने देखील त्यांनी पिवळी शेवंती मागवून घेतली होती. नृसिंहवाडीहून कोणी व्यक्ती आली किंवा पुण्याहून कोणी वाडीस जाणारी व्यक्ती भेटली तर त्याच्याबरोबर प. पू. गुळवणी महाराज पिवळ्या शेवंतीची हाराभर फुले न चुकता पाठवत असत. सर्व काही आपल्या लाडक्या आराध्य दैवतासाठी ! स्वारींच्या पोशाखातील जरीची पगडी देखील प. पू. गुळवणी महाराजांनी मापा प्रमाणे बनवून वाडीस श्री स्वारींच्या सेवेस पाठवून दिली होती. देवासाठी उत्तमतेचा ध्यासच जणू प. पू. गुळवणी महाराजानी घेतला होता ! वाडीस दरवर्षी गुरुव्दादशीस जाताना श्री दत्त प्रभूना अर्पण करण्यासाठी उत्तम छाट्या बेळगांव, धारवाडच्या हातमाग वाल्यांकडून ते मागवून घेत. श्री दत्त प्रभूना अर्पण करण्याचे उत्कृष्ट केशर ते थेट काश्मिरहून मागवून घेत असत. ऑगस्ट १९७३ मध्ये प.पू. योगीराज गुळवणी महाराजानी आपल्या जवळील सर्व चांदीची भांडी तसेच त्यांच्या रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी मंडप शिल्पाचे इंजिनियर साहेब श्री. वि. मो. वैद्य यांच्याकडे दिली व सांगितले की ही सर्व भांडी आटवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीने मढवा. हीच सर्व चांदी आटवून प. पू. योगीराज गुळवणी महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री. दत्तप्रभूंचे दर्शनी दरवाजे चांदीने मढवलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या इष्टदेवासाठी सर्वस्व वेचले पण कुठे ही वाच्यता नाही ! जाहिरात नाही ! परमेश्वरांचेच परमेश्वराला । हीच पराकोटीची निस्वार्थी भावना त्या मागे कार्यरत होती असेच म्हणावे लागेल ! जन्मास येणे ही सूर्योदयाप्रमाणे एक नैसर्गिक घटना आहे. तद्वत मृत्यु हे सूर्यास्ता इतके गहिरे सत्य आहे. या दोन्ही घटनांच्या मधला काळ हेच मानवी जीवन व त्याचे कार्य मानावे लागेल. परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांचे संपूर्ण जीवन हे गुरुसेवेला वाहिलेले होते. एका मुमुक्षू जीवनाचे शक्तिपात साधनेने व अखंड भक्तीने एका शक्तिपाताचे महामेरु मध्ये रुपांतर झाले होते. प. पू. सद्गुरु टेंबे स्वामी महाराज व प. पू. लोकनाथतीर्थ स्वामींच्या या परमशिष्याने अनेकांचे संसार फुलवले अनेकांना शक्तिपात साधनेची प्राप्ती करून दिली. अनेक स्त्री – पुरुषांचे पारमार्थिक जीवन समृद्ध केले. शक्तिपात साधनेचा वारसा जपणारा शिष्य संप्रदाय यांच्याच कृपाशीर्वादाने निर्माण झाला. गुरुभक्तीची अवीट गोडी अनेक भक्तांना यांनी लावली. कित्येकांचे जीवन अक्षरश: सुवर्णकांती प्रमाणे उजळून टाकले. जो प. पू. गुळवणी महाराजांच्या सानिध्यात आला. त्याच्या ऐहिक व पारमार्थिक जीवनाचे विशुद्ध कल्याणच झाले ! प. पू. गुळवणी महाराजानी स्वत:कडे कांही ही शेष न ठेवता दोन्ही हातांनी भरभरून वाटले. परमेश्वरी कृपेचा खजिनाच जणू सर्व भक्तांमध्ये रिता केला ! *दत्त म्हणता काय उणे ? उभी त्रिमूर्ती साक्षात ।* *काळजाच्या पायावाटे उतरे काळजात ॥* या उक्तीप्रमाणे देण्यासाठी जन्म आपुला ! दत्त म्हणजे दिले ! हेच प.पू. गुळवणी महाराजानी आपल्या जगण्यांतून सिद्ध केले त्यांचे जीवन कार्य हे श्री दत्तप्रभूंच्या कृपाशीर्वादाचेच फलित होते त्यांची दृष्टी, संकल्प, त्यांची स्वप्ने, त्या स्वप्नांची परिपूर्ती, सामान्यालाही असामान्य घडविणारी त्यांची कृपा दृष्टी सारे कांही अलौकिकच ! या सर्वांचे वर्णन करताना वाणी मूक होते, लेखणी मूक होते, अनिमिष नेत्रांनी नुसते पाहणेच उरते ! कारण दृष्य केवळ हृदय पटलावर अंकित करून नेत्र ही मूक होतात. मन हृदय तर या श्रेष्ठ विभूतीच्या सामर्थ्याच्या प्रभावाने अधीच भारून गेलेले असते, त्यामुळे ते ही मुके ! यासर्व मुक्या घटकांनी प. पू. गुळवणी महाराजांची थोरवी ती काय वर्णावी ? *श्री गुळवणी महाराज म्हणतात,* उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान.भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंता कडे घेऊन जाते.दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे तसे भगवंताचे अनुसंधान राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. *नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे । स्वानंदामृततृप्त।य श्री वामानाय नमो नमः ।।* *॥ श्री गुरु शरणम् ॥* *गुरुपरंपरा* *श्री नृसिहसरस्वती* । *श्री वासुदेवानंद सरस्वती* । *श्री गुळवणी महाराज* ????????? *संपादन:-( अनंत देव वाई।)* Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website