युद्धाचे ढग आणि भारताची कृष्णनीती [ भाग २ ] — लेखक प्रसाद देशपांडे Mandar Sant July 23, 2017 जागतिक घडामोडी पाकिस्तानचा जळफळाट नेमका कशामुळे होतेय..?? ज्या सौदी राजघराण्याच्या पैशांवर आणि कृपेवर पाकिस्तानची मस्ती सुरु होती त्या सौदीत आज पाकिस्तानची किंमत काय उरली आहे..?? काही महिन्यांपूर्वी रियादमध्ये इस्लामिक परिषद भरली होती. त्यात सौदीच्या नव्या युवराजाच्या (जो पुढे राजा बनणार आहे) आग्रही भूमिकेमुळे पाकिस्तानला हिंग लावून सुद्धा कुणी विचारले नाही, वरून अपमान झाला तो वेगळा. सौदीचा नवा युवराज मोहम्मद बिन सलमान ह्याची भुमिका सदैव भारताशी चांगले सबंध प्रस्थापित करण्याचीच राहिली आहे. अनेक करार मागच्या वर्षी झालेल्या मोदी भेटीत मार्गी लागले ते ह्या सलमानच्या रेट्यामुळेच त्यात संरक्षण विषयक करार सुद्धा आहेत. तिकडे इराण आणि अफगाण फौजांनी पाकच्या नाकात दम आणला आहे रोज पाकच्या पश्चिम सीमेवर कुरुबुरी सुरु आहेत. “पाकची सेना ही मुळात सेना नाहीय ती आहे मुजाहीदांची टोळी आहे जी गडगंज पैसे खाणाऱ्या आणि मग तो सौदीत नेऊन ठेवणाऱ्या सेनाप्रमुखाच्या इशाऱ्यावर नाचते. आताशा त्यांना युद्धाचा सुद्धा अनुभव नाही, जर इराण आणि अफगाणिस्थान ह्यांनी खरोखरंच पूर्ण ताकदीनिशी एकसाथ हल्ला केला तर पाक सेनेची पळता भुई थोडी होईल”. हे सगळं कुणी भारतीय सैन्याधिकारी बोलत नाहीय तर पाकिस्तानचेच काही संरक्षण तज्ञ आणि तारिक फतेह सारखे लोकच बोलताहेत. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी बलुचिस्तानचा उल्लेख करायच्या काही महिन्यांपुर्वी बलुचिस्तानातील बंडाची संख्या अचानक वाढली आणि बलुची लोकांच्या भारताच्या समर्थनार्थ घोषणा सुरु असतांना तिकडे पाक सैन्यावर बलुच लिब्रेशन आर्मी BLA ने आत्मघातकी हल्यांची एक मालिकाच सुरु केली होती, लागोपाठ एकामागुन एक हल्ले सुरु होते. त्यावर Economic Development of Baluchistan चे लेखक सैयद फजल ए हैदर ह्यांनी The Express Tribune ह्या पाकिस्तानी वृत्तपत्रातुन सविस्तर लेख लिहुन टीका केली होती. त्यात त्यांनी BLA चा उल्लेख Indian proxy army असा केला आहे.त्या लेखात त्यांनी विस्तृतपणे ह्याचा संबंध पाकच्या बलुचिस्तान भागात जे ग्वादर बंदर आहे त्याच्या उभारणीशी जोडला होता. पाकिस्तानात अंतर्गत तक्रारी देखील खुप आहेत मुख्य समस्या आहे ती म्हणजे पंजाबी पाकिस्तानी आणि उरलेले इतर पाकिस्तानी. आजपर्यंत जे जे कुणी सत्ताधीश पाकिस्तानात झाले त्यातील बहुतांशी हे पंजाबी मुस्लिम होते. एकूण पंजाबी सुन्नी मुस्लिमांची वृत्ती ही इतर पाक नागरिकांना (पश्तुनी,बलुची,काश्मिरी इत्यादी) कमी लेखण्याची असते. २०१४ नंतर पाकच्या पंजाबी बहुल भागात बॉम्बस्फोटाच्या घटना वाढल्या आहेत आणि त्यात कधी बलुची, कधी पाक व्याप्त काश्मिरी, तर कधी बाल्टिस्तानचे रहिवासी पकडल्या गेले आहेत. हे सगळे पाकचेच नागरिक तरीही आपल्याच नागरिकांवर त्यांनी हल्ला का करावा..?? ह्या सगळ्यात पाक कडुन हा आरोप केला गेला की ह्यामागे भारताची गुप्तचर संस्था RAW आहे. आपण नेहमी प्रमाणे ह्याचा इन्कार केला आणि उलट पाक कांगावा करतोय हा साळसुदपणाचा आव देखील आणला. ह्या सगळ्या गोष्टी कुठेही बोलल्या जात नाहीत फक्त सगळं घडल्यावर नामनिराळं व्हायचं याला गुप्तचर कुटनीती म्हणतात. आपण गुप्तचर यंत्रणांच्या बाबतीत गेल्या काही वर्षात बरीच प्रगती केली आहे. मागे मुशर्रफ भारतात आग्रा शिखर संमेलनात आले होते तेंव्हा त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता (कदाचित भारतीय पत्रकाराने) “भारतात पाक हस्तकांचा (तांत्रिक भाषेत Deep assets) सुळसुळाट फार वाढलाय ह्यावर आपली प्रतिक्रिया काय..??” तेंव्हा मुशर्रफचं उत्तर भारतातील त्याकाळच्या दयनीय गुप्तचर यंत्रणेच्या धाग्यांची साक्ष देतं. मुशर्रफचं हसत हसत स्टेटमेंट होतं “तुम्ही हा प्रश्न तुमच्या पंतप्रधानांना विचारा त्यांनी त्या बद्दल बोलावं पण भारताच्या पाक मधील पकडल्या गेलेल्या (थोडक्यात मारल्या गेलेल्या) वा अजुनही हस्तक म्हणुन लपुन बसलेल्या लोकांची यादी हवी असेल तर मी देतो, पण शिखर परिषद आटोपल्यावर” ह्या एका वाक्यात त्या माणसाने आपल्या सुरक्षा यंत्रणा आणि आधीच्या सरकारने केलेल्या चुकांचे वाभाडे काढले होते. अर्थात ही गोष्ट नवल नव्हती कारण जिथे आपल्याच देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई पाकच्या माजी सैन्यप्रमुख असलेल्या तत्कालीन राष्ट्रपती जिया उल हक ह्यांना फोनवरून RAW च्या गुप्त प्रोजेक्ट्स विषयी माहिती देतात आणि त्यानंतर दुसरे एक पंतप्रधान गुजराल गुप्तचर यंत्रणांची गरजचं काय ह्या नावाखाली RAW चा गाशा गुंडाळायचं काम करतात, वरून तिथेच न थांबता आपले पाक मधील हस्तक मरण्यासाठी वाऱ्यावर सोडुन देतात तिथे अजुन अपेक्षा तरी काय करणार. ह्या दोन पंतप्रधानांच्या बावळटपणाची किंमत आपल्याला आपले deep assets गमावण्यात तर झालीच झाली पण ‘Covert Operation’ ह्या क्षेत्रात आपण निदान दशकभर तरी मागे फेकलो गेलो कारण गुप्तचर यंत्रणांचं जाळं नष्ट होण्यास काही तासही पुरतात पण ते विणण्यास कित्येक दशकांचा कालावधी लागतो. मागच्या वर्षी पठाणकोट हल्ल्यानंतर “The Quint”ह्या वेबसाईटवर चंदन नंदी ह्यांनी एक अप्रतिम लेख लिहिला होता, गुप्तचर विभाग ह्या विषयातील जिज्ञासु व्यक्तींनी तो नक्की वाचावा त्यात त्यांनी एका माजी RAW अधिकाराच्या हवाल्याने बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत. १९९३-९४ पर्यंत भारताच्या गुप्तहेर यंत्रणांच्या मोहिमा ह्या अमेरिकेच्या CIA आणि इतर पश्चिमी गुप्तचर संस्थांकडुन नियंत्रित केल्या जात. त्यातलं एक वाक्य होतं “Their argument was that Pakistan being a rogue state does not mean that you too stoop to its levels,” a former top RAW officer said, quoting his American counterpart at one liaison meeting, adding that “we have been forced to fight but with our hands tied behind our backs just because one of the Western agencies’ stakes in Pakistan are far too deep.” ही भाषा जरा ओळखीची वाटते आहे का बघा भारतात अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ‘झूल’ पांघरून वावरणारे व्यक्ती (नावं मी घेणार नाही, ती शोधणं मी वाचकांवर सोडेन) देखील अगदी हीच भाषा बोलतात.खरं तर इंदिरा गांधींनंतर ‘Covert Operation’ च महत्व ओळखलं ते नरसिम्हारावांनी आणि त्यांच्या कार्यकाळात RAW आणि गुप्तहेर खात्याचं बजेट देखील वाढविण्यात आलं होतं, पण ह्या सगळ्या कामांवर पाणी फिरवलं ते इंद्रकुमार गुजराल ह्यांनी आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका दोन वर्षांनी आपल्याला बसला तो कारगिल युद्धाच्या रूपाने. दुर्दैवाने भारतीय राज्यकर्त्यांची आणि जनमानसाची मानसिकताच ही आहे की त्यांना ‘Covert Operation’ म्हणजे युद्धचं वाटतं, पण हे लक्षात ते कधीच घेत नाहीत की ह्याच ‘Covert Operation’ मुळे मोठाली युद्ध टाळता येऊ शकतात.गुजराल ह्यांनी ती चुक केली नसती तर कारगिल युद्ध टाळता आलं असतं का..?? आता जर तर ला अर्थ नाही पण चुकांमधूनच तर माणुस धडा शिकतो. ह्या सगळ्या घडामोडींनंतर वाजपेयी सरकारच्या कार्यकाळापासुन तर आता मोदींपर्यंतच्या काळात १४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आज जर आपले deep assets पाक सरकारच्या नाकी नऊ आणत असतील (नाकी नऊ आणणे म्हणजे शत्रु पक्षाला हे माहिती असणे की भारताचे deep assets आहेत पण नेमके कळूच नये की नक्की कोण) तर ह्या सगळ्यामागे ७ वर्ष पाक मध्ये deep asset म्हणुन वावरलेला माणुस म्हणुन आजचे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आहेत हा पाकचा आरोप हवा नक्कीच नसावा. गुप्तचर विश्वात अजित दोवल ह्यांची ओळख पाकिस्तानची खडानखडा माहिती असलेला एक निष्णात स्पाय म्हणुन आहे, आणि हे दुसरं कुणी नाही तर पॅन्टगनच्या माजी सुरक्षा सल्लागार म्हणतात. मागे आपण पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता, तो इतका अचुक होता की काही किमी आता हेलिकॉप्टर ने घुसुन आतंकवाद्यांचं लौंचपॅड उडवुन आपले सैनिक सुरक्षितपणे एकही casualty न होता भारतात परत येऊ शकतात ह्याचं कारणंच आहे की पाक मधील कुणीतरी स्थानिक सूत्राने अचुक माहिती भारताला पुरविली. गेल्या कित्येक वर्षात पाक सेनेने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलाच नाहीय, त्यांची पूर्ण भिस्त ही आतंकवाद्यांवर होती म्हणुनच पाकच्या पश्चिम सीमेवर जेंव्हा अफगाणी/तालिबानी मुजाहिद्यांबरोबर युद्ध करायला जेंव्हा ती उतरली तेंव्हा त्यांचं इतकं नुकसान झालं की शेवटी त्यांना त्यांच्या वायुसेनेला पाचारण करावं लागलं. एका साध्या मुजाहिद्यांशी लढतांना त्यांची ही गत होते तर सतत सीमेवर छोट्या मोठ्या युद्धाचा नेहमीच सराव असलेली (थँक्स टु पाकिस्तान) भारतीय सेना जेंव्हा उभी ठाकेल तेंव्हा त्यांची काय गत होईल ह्याचा विचार करा. आज पाकिस्तान त्याच्या अंतर्गत आघाड्यांवर अक्षरशः मेटाकुटीला आलाय, शक्य असेल तर तिथले लोक एकूणच पाक सैन्यला कंटाळुन देशातुन फुटुन बाहेर पडतील ही आज परिस्थिती आहे, त्यामुळेच जेंव्हा मोदी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तान चा उल्लेख करतात तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद बलुची लोकांकडुन दिला गेला. तो इतका असतो की पाकला त्याची गंभीर दखल घ्यावी लागली. इंदिरा गांधींनी पाकचे तुकडे करण्याआधीचा कालावधी बघा बराचसा सारखाच आहे. त्यावेळी इंदिरा गांधींनी युद्धाच्या आधी पाकला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एकटं पाडलं आज ते काम मोदी सरकार करतंय. पाकचे आणखीन तुकडे पडणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, कधी आणि ती कोणाच्या हस्ते पडणार इतकंच बघायचं आहे. आज आपण पाक फ्रंट बद्दल जाणुन घेतलं उद्या बघुयात शेवटचा आणि conclusive भाग ज्यात सगळ्या कड्या जुळवून आपण नेमकी युद्धाची शक्यता काय आणि किती हे बघुयात. परवाचा पहिला भाग पोस्ट केल्यावर माझ्या इनबॉक्स मध्ये, काही कंमेंट्स मध्ये मला बरेच प्रश्न विचारण्यात आले की तुम्हाला कुठल्या पुस्तकात ही माहिती मिळाली..?? १९६२ च्या युद्धासंदर्भात कुठली संदर्भ मिळतील का..?? वैगरे वगैरे. ही लेखमाला लिहितांना मला अनेक references डोळ्याखालुन घालावी लागली. काही समजायला इतकी कठीण होती की ती पुन्हा पुन्हा वाचावी लागली, ह्यात अनेक लोकांचा सहभाग होता.काही प्रसिद्ध संरक्षण विषयातील अभ्यासकांच्या ब्लॉग आणि पोस्टचा सुद्धा मला फायदा झाला. त्या सगळ्यांची आणि मी वापरलेल्या सगळ्या references ची लिंक उद्या शेवटच्या भागात मी देईल, ह्याचं उद्दिष्ट एकच की ज्यांना ह्याविषयावर सखोल अभ्यास करायचा आहे, त्यांना सुरवात करून देता येईल.आपल्या देशाच्या सुरक्षेसंदर्भात शेवटी आपणंच जागरूक असायला हवं नाही का…?? © Prasad Deshpande Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website