ज्येष्ठ व. एकादशी दिवशी प्रातःस्नानादी नित्यकर्मे आचरुन

‘मम सकल पापक्षयपूर्वक कुष्ठादिरोगनिवृत्तिकामनया योगिन्येकादशीव्रतमहं करिष्ये ।’

असा संकल्प सोडून श्रिपुंडरीकाक्ष भगवंताचे (विष्णूचे) पूजन करावे. त्याच्या चरणोदकाने सर्वांगावर मार्जन करावे आणि उपवास करुन रात्री जागरण करावे, म्हणजे कुष्ठादी सर्व रोगांपासून मुक्त होतो.
—————————————————————————————
कथा –
युधिष्ठिराने विचारले, ‘हे मधुसूदना, जेष्ठ वद्य पक्षातील एकादशीचे नाव काय? आणि तिचे माहात्म्य काय? हे मला कृपा करून सांग.’

श्रीकृष्ण म्हणाले, ‘राजा, सर्व पापांचा क्षय करणारे, ऐश्वर्य व मोक्ष देणारे व सर्व व्रतांत उत्तम असणारे व्रत तुला सांगतो. हे नृपश्रेष्ठा, जेष्ठ वद्य पक्षातील ही ‘योगिनी’ नावाची एकादशी महापातकाचा नाश करणारी आहे. ही सनातन एकादशी संसाररुपी सागरात बुडणार्‍यांना नौकेप्रमाणे वाटते. हे नराधीषा, ही योगिनी एकादशी त्रैलोक्यात सारभूत आहे. या एकादशीची पाप हरण करणारी प्राचीन कथा मी तुला सांगतो.

अलका नगरीचा राजा कुबेर शिवपूजक होता. त्याच्याकडे पूजेकरता फुले आणण्यासाठी हेममाली नावाचा माळी होता. त्या माळ्याला विशालाक्षी नावाची पत्‍नी होती. ती फार सुंदर होती. हेममाली तिच्या कामपाशत सापडून तिच्यावर फार प्रेम करीत होता.

तो एकदा नेहमीप्रमाणे शिवपूजेसाठी फुले आणायला गेला होता. त्याने नित्याप्रमाणे मानस-सरोवरातून फुले आणली, पण पत्‍नीचे मुख पाहून तो मोहीत झाला व फुले कुबेराच्या घरी न पोचवता पत्‍नीप्रेमात गुंतून घरीच राहिला.

इकडे कुबेर देवालयात बसून पूजा करीत होता. माध्यान्ह काल होईपर्यंत तो फुलांची वाट पाहत बसून राहिला. हेममाली आपल्या घरी आपल्या प्रेयसीसह क्रीडा करीत राहिला.

यक्षराजा कुबेर फुले मिळण्यास उशीर झाल्यामुळे रागावला. तो आपल्या दूतांना म्हणाला, ‘यक्षांनो, तो दुराधम हेममाली अजून का येत नाही. याचा तपास करा पाहू.’

कुबेर पुन्हा पुन्हा असे म्हणाला तेव्हा यक्ष म्हणाले, ‘राजा, तो स्त्रीलंपट त्याच्या घरी स्वतःच्या पत्‍नीसह क्रीडा करीत आहे.’

हे ऐकताच कुबेर क्रोधाने जणू भरून गेला. त्याने तात्काळ हेममालीला बोलावून आणले. फुले पोचवायला उशीर झाला हे जाणून हेममाली घाबरला. त्याच्या नेत्रात भय दिसू लागले. तो कुबेरासमोर येऊन नमस्कार करून उभा राहिला.

त्याला पाहताच कुबेराला क्रोध आला व त्याचे नेत्र संतापाने लाल झाले. तो रागाने ओठ चावून म्हणाला, ‘अरे पाप्या, दुष्टा, दुराचार्‍या तू देवाची अवहेलना केलीस म्हणून तुझा व तुझ्या पत्‍नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी (पांढर्‍या कोडाचा) होशील व येथून भ्रष्ट होऊन वाईट जागी जाऊन पडशील !’

कुबेराचा हा शाप ऐकताच हेममालीच्या अंगात कोड भरले. आणि तो स्थानभ्रष्ट होऊन अरण्यात पडला. त्याला प्रचंड दुःख झाले. त्या भीषण वनात त्याला अन्नपाणी मिळेना. त्याला दिवसा चैन पडेना व रात्री झोप येईना. त्याला कोड असल्याने सावलीत थंडी वाजे व उन्हात तर फार पीडा होत असे. पण त्याने केलेल्या शिवपूजेच्या प्रभावामुळे त्याची स्मृती मात्र कायम राहिली.

तो पातकांनी व्याप्त झाला होता तरी पूर्वकर्माचे स्मरण करीत भटकत राहिला. फिरता फिरता तो हिमालय पर्वतावर आला. तेथे त्याला श्रेष्ठ मुनी तपोनिधी मार्कंडेयांचे दर्शन झाले. त्या मार्कंडेयाला ब्रह्मदेवाचे सात दिवस म्हणजे सात कल्पे आयुष्य आहे.

तो पापी हेममाली मार्कंडेयाच्या आश्रमात गेला. तो आश्रम ब्रह्मदेवाच्या सभेसारखाच होता. त्याने त्या ऋषीच्या चरणांना दुरूनच वंदन केले.

मार्कंडेय ऋषीने त्या कुष्ट्याला पाहिले. जवळ बोलावून ऋषीने त्याला विचारले, ‘अरे, तुला असे कुष्ट कशामुळे झाले? तुझी अशी निंदास्पद स्थिती कशी झाली?’

त्यावर हेममाली म्हणाली, ‘मी यक्षराजा कुबेराचा हेममाली नावाचा सेवक आहे. हे मुनी, मी कुबेराला रोज शिवपूजेच्या वेळी मानस-सरोवरातून फुले आणून देत असे. एके दिवशी मी कामासक्त होऊन स्त्रीसौख्यात रमल्यामुळे फुले द्यायला मला उशीर झाला. ऋषीश्रेष्ठा, त्यामुळे कुबेर रागावला व त्याने मला शाप दिला. त्या शापामुळेच माझा व पत्‍नीचा वियोग झाला. माझे शरीर कुष्टाने भरले. आणि मी अरण्यात जाऊन पडलो. आता पूर्व पुण्यामुळे मी तुमच्याजवळ येऊन पोचलो आहे. साधुपुरुषांच्या अंतःकरणाचा कल नेहमीच परोपकार करण्याकडे असतो, हे तुम्ही जाणताच. म्हणून हे मुनीश्रेष्ठा, मला अपराधाची शिक्षा करून या दुःखातून सोडवा.’

मार्कंडेय ऋषी म्हणाला, ‘तू माझ्यासमोर सत्य बोललास व अपराध लपवला नाहीस म्हणून मी तुला कल्याणकारक व्रताचा उपदेश करतो. जेष्ठ वद्य पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत तू कर. त्या व्रताच्या पुण्यामुळे तुझे कुष्ठ निश्चितपणे जाईल.’

मुनीचे हे बोलणे ऐकून हेममालीला फार आनंद झाला. त्याने जमिनीवर आडवे होऊन मुनीला दंडवत घातला. मुनीने त्याला उठवले.

मार्कंडेयाच्या उपदेशाप्रमाणे त्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या प्रभावाने त्याचे कुष्ट गेले व देवांप्रमाणे तो दिव्य देहाचा झाला. त्याचा व पत्‍नीचा संयोग झाला आणि त्याला उत्तम सौख्य प्राप्त झाले.

नृपश्रेष्ठा, योगिनी एकादशीचे व्रत हे असे आहे. अट्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन घातल्याने जे फळ मिळते, तेच फळ योगिनी एकादशीचे व्रत केल्याने मिळते. ही एकादशी महापापाचे क्षालन करते व महापुण्याचे फल मिळवून देते हे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने हजार गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभते.

॥याप्रमाणे ब्रह्मवैवर्त पुराणातील योगिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले||

khapre.org वरून साभार

=======================================================

२] एकादशी व्रताचे महत्त्व
================

अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे
पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।
[ पद्मपुराण ]

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
===
एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात.

मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते.

शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते.

यश आल्याने धन प्राप्ती होते.

साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते.

एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.

एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत.

Image 28 - Tukaram maharaj

समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात-

ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।।
ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥
ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।।
तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।।

“ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.”

प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे-

एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।।
श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥
तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।।
तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।।

“जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.”

पंधरा दिवसा एक एकादशी ।
कां रे न करिसी व्रतसार ।।1।।

काय तुझा जीव जाते एका दिसे ।
फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।।

स्वहित कारण मानवेल जन ।
हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।।

थोडे तुज घरी होती ऊजगरे ।
देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।।

तुका म्हणे कां रे सकुमार झालासी।
काय जाब देती यमदूता ।।5।।

एकादशी व्रत सोमवार न करिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।।

काय करुं बहू वाटे तळमळ ।
आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।।

हरिहरासी नाही बोटभरी वाती।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।।

तुका म्हणे नाही नारायणी प्रिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।।

एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।।
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।।
अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।।

शेज बाज विलास भोग ।
करिती कामिनीचा संग ।
तयाजोडे क्षय रोग ।
जन्मव्याधि बळवंत ।।

आपण न वजे हरिकिर्तना ।
आणिका वारी जाता कोणा ।
त्यांचे पापा जाणा ।
ठेंगणा तो महामेरु ।।

तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलिया ।।

करविता व्रत अर्ध पुण्य लाभे।
मोडविता दोघे नरका जाती ।
शब्दबुध्दी होय दोघा एक मान ।
चोरासवे कोण जीव राखे ।

आपुले देवूनि आपलाचि घात।
नकरावा थीत जाणोनिया ।
देवुनिया वेच धाडी वाराणसी
नेदावे चोरासी चंद्रबळ।

तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग।
भक्ती हे मार्ग मोडू नये ।

छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात-

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥
तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥
म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥

” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.”
—————————————————————————————————

३]  शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ?
========================

एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा.

दूसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे.

द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते.
शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते.

एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.

Image 10C -shri vishnu

2 Responses

  1. अरूण चापोरकर

    ।ओंम नमो भगवते वासुदेवाय।एकादशी व्रताचे महत्व खुप सुंदर तर्हेने मांडल्या बद्द्ल खुप खुप ध्यनवाद.

    Reply
    • Mandar Sant

      आपण आवर्जून पाठवलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत. __/\__

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published.