विजया एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २७ फेब्रुवारी २०२२ moderator February 26, 2022 दिनविशेष माघ कृष्णपक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला विजया एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते चित्त देऊन ऐक. एकदा नारदमुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले की, “मला विजया एकादशीव्रताचे माहात्म्य ऐकण्याची इच्छा आहे तेव्हा कृपा करुन सांगा.’ नारदाचा हा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की, “हे नारदा ! पूर्वी रावणादिक दैत्य फार उन्मत्त होऊन धर्मविध्वंस करु लागले, देवांना छळू लागले. तेव्हा पूर्ण ब्रह्माने त्याचा नाश करण्याकरिता व धर्मसंस्थापना करण्याकरिता अयोध्येत रघुवंशात अवतार धारण केला. रघुवंशातील अयोध्येच्या पुण्यप्रतापी दशरथ राजाला कौसल्या, सुमित्रा व कैकयी या नांवाच्या तीन बायका होत्या. व राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या नावाचे चार पुत्र होते. कौसल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण व कैकेयीचे भरत शत्रुध्न. राम हाच पूर्ण ब्रह्माचा अवतार होय. रामाचे लग्न मिथिलेच्या जनकराजाची कन्या जी जानकी हिच्या बरोबर झाले होते. दशरथाने आपल्या वृद्धत्वामुळे प्रजेच्या संमतीने युवराज रामाला राज्याभिषेक करण्याचे ठरविले होते. पण आयत्यावेळी कैकेयीच्या स्वार्थी इच्छे च्या अडथळ्यामुळे रामाला १४ वर्षे वनवासास जावे लागल त्याच्याबरोबर त्याची पत्नी जानकी व बंधु लक्ष्मण हे गेले होते. राम वनवास करीत असताना पंचवटीला रावणाने कपट करुन जानकीचे हरण केले व लंकेला नेली. जानकी आश्रमातून नाहीशी झालेली पाहून रामाला अत्यंत दुःख झाले तेव्हा तो तिचा शोध करु लागला. शोधांती रावण जानकीला बलात्काराने लंकेला घेऊन गेला आहे असे जटायुकडून कळले. लंका दक्षिणदिशेच्या समुद्रात जमिनीच्या शेवटच्या टोकापासून शभर योजने अंतरावर होती. शेवटी राम समुद्राकांठापाशी आला. वाटत त्याला हनुमंतासारखे सहकारी सेवक मिळाले. शंभर योजने समुद्र कसा ओलांडून जावा अशी रामाला काळजी पडली तेव्हा लक्ष्मण रामाला म्हणाला की, “येथून थोड्याच अंतरावर बकदालभ्यकऋषींचा आश्रम आहे. तेथे जाऊन या संकटातून मुक्त होऊन विजय मिळविण्यास त्यांना एखादा उपाय विचारु चला.रामाला लक्ष्मणाचा तो सल्ला पसंत पडून ते त्या ऋषीच्या आश्रमाकडे गेले, तेथे गेल्यावर त्यांनी ऋषीला आपल्यावर आलेले संकट निवेदन करुन त्यातून मुक्त होण्याकरिता व विजय मिळविण्याकरिता उपाय विचारला. तेव्हा ते ऋषी म्हणाले की, “तू जर विजया एकादशीव्रत करशील तर या संकटातून मुक्त होशील व शिवाय तुला विजयही मिळेल. पुढे रामाने समुद्रतीरी परत येऊन विजयाएकादशीव्रताचे (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) विधियुक्त आचरण केले तेव्हा राम, हनुमंताच्या सैन्यासह तो शंभर योजने समुद्र तरुन लंकेला गेला. तेथे त्याने रावणाशी युद्ध करुन त्याला मारिले व त्याचा भाऊ जो बिभीषण याला लंकेच्या राज्यावर बसविले. नंतर राम जानकीला घेऊन अयोध्येला गेला. अयोध्येच्या राज्यावर बसून सुखाने राज्यकारभार करु लागला. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे विजया एकादशीचे करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.” माघ कृष्णपक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. विजया एकादशी माहात्म्य श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा । हे वासुदेवा दयाघना । तुझ्या कृपेने आम्हां सर्वांना । भाग्य लाभले श्रवणाचे ।।१।। आता पुन्हा एक विनंती। पुढील तिथीची सांग माहिती। माघ कृष्ण पक्षात कोणती । एकादशी ती येतसे।।२।। कळू दे आम्हां तिचे नाव । महिमा आणि व्रतप्रभाव । श्रीकृष्ण म्हणाला सांगतो सर्व । विस्ताराने तुजलागी ।।३।। माघ कृष्ण एकादशी तिथी । ‘विजया’ नामे प्रसिद्ध जगती । जे कोणी हे व्रत आचरिती। जय मिळतो त्या नरां ।।४।। आता माहात्म्य सांगतो ऐक। तिथी असे | ही पापनाशक। त्याविषयीचे कथानक । तेही असे श्रवणीय ।।५।। एकदा नारदे। ब्रह्मदेवाला। सहज पुसिले त्या वेळा । विजया एकादशीची मजला। सांगा माहिती निजकृपे ।।६।। तैं जाणून त्याची उत्सुकता । विधि म्हणाला ऐक सुता। त्याविषयीची पावन कथा। सांगतो मी तुजलागी। ।॥७ ॥ हे विजया एकादशी व्रत । असे पुरातन अत्यंत । पापनाशक म्हणुनी प्रख्यात । तरी न कोणा सांगितले ।।८।। यायोगे पावन अवतार कथा। तीही संक्षिप्त सांगतो आता। प्रभू राम लक्ष्मण सीता। वनवास तो भोगती ॥९।। चौदा वर्षे विजनवास प्राप्त । तेव्हा राहिले पंचवटीत। परी याच ठायी काननात । महासंकट ओढवले ।। १० ।। सीता माता तपस्विनी। रावणे तिजला नेले पळवुनी। तेणे प्रभू रामचंद्र मनी। अति व्यथित जाहले।।१ १ || दु:खी विमनस्क अवस्थेत । निजभाय्येचा शोध घेत । हिंडत असता अरण्यात । जटायूसी पाहिले ।।१२।। तो गृध्र जरी मरणोन्मुख । तरी सीताहरणविषयक । सांगुनी समस्त कथानक । देह ठेविला तयाने ||१३|| सीताशोधाची दिशा गवसली । दक्षिण लक्षून पावले उचलली । मार्गी जाता अतुर्बळी । कबंध राक्षस मारिला ।।१४।। पुढती झाली सुग्रीव भेट । स्नेह प्रकटला = उभयतात। त्याने रामसाह्यास्तव अफाट । वानर सैन्ये जमविली ।।१५।। सीताशोधास्तव कपिश्रेष्ठी। संचरले महीपृष्ठी । रुद्र अवतार मारुती। लंकेमाजी प्रवेशला ।।१६।। तेथील अशोक बनात। जानकी मातेची घडली भेट । विश्वासदर्शक खूणगोष्ट। राममुद्रिका दाखविली ।।१७ ॥। तदनंतर तो हनुमंत । अशोकवनाचा विध्वंस करीत। सहस्ावधी नतद्रष्ट। असुरांते मारिले ।। १८ ।। पुढती लंकादहन केले। महत्कार्य संपादिले। रामास जाउनी सांगितले । इतिवृत्त सीतेचे ।। १९। त्यानुसार चढाईचे । पुढील बेत ठरले साचे । सैन्य घेउनी सुग्रीवाचे । राम निघाले लंकेसी ।।२०।। कपिप्रिय रघुनंदन । मार्गी चालले त्वरा करून । नद्या पर्वत ओलांडून। सागरतीरी पातले ।।२१।। जलाशय अतिविस्तीर्ण। पाहूनी चकित झाले मन । तैं किंचित हास्य करून । काय म्हणती अनुजाते।।२२।। वदले सौमित्रा काय करावे । कोणत्या पुण्याने तरून जावे । प्रयत्न मार्गी लागावे । उपाय सांगी मजलागी ।।२३।। वरुणालय हा अंतहीन । नक्रादी जलचर त्यामधून । सुखासुखी उल्लंघून । जाणे कठीण वाटते ।।२४।। तधी वदला भ्राता लक्ष्मण । बंधो ! आदिदेव तू प्राचीन । तरी उपाय सांगतो छान । उपयुक्त जो कार्यासी ।।२५।। येथून जवळच दोन कोसावर । एक बेट समुद्रावर। दिव्य आश्रम तेथवर। आहे बकदाल्भ्याचा ।।२६।। ऋषि असे हा पुरातन । महातपस्वी आयुष्यमान । त्याने आपुल्या जीवनी जाण । अनेक विधाते पाहिले ।।२७।। तुवा ‘त्याची भेट घेऊन । उपाय पुसावा आदर धरून । ऐकुनी ते शुभवचन । राम प्रसन्न मानसी ।।२८।। लक्ष्मणाचे म्हणणे ऐकले। क्रषिश्रेष्ठाच्या दर्शना गेले । साष्टांग प्रणिपाते तोषविले । बकदाल्भ्यासी तेधवा ।।२९।। तधी पुराणपुरुष परमेश्वर । तो श्रीराम मनुष्य अवतार । भेटीस पातला म्हणुनी सत्वर । ऋषी धावला स्वागता ।।३०।। आदराने क्षेमालिंगन । बैसावया दिधले आसन । उत्तम आदरातिथ्य करून। कारणं पुसिले येण्याचे ।।३१।। श्रीराम वदले विप्रश्रेष्ठा । लंकानगरी जिंकण्याकरिता । ससैन्य येथे आलो आता । परी मार्ग खुंटला।।३२|॥ सन्मुख सागर अपरंपार । पाहुनी हतबल खरोखर । तुझे साह्य झाले जर । कार्यभाग तो साधेल ।।३३ ।। सहज सत्संग घडावा। तुझा मजवर प्रसाद व्हावा । तरून जाण्याचा उपाय कळावा। म्हणुनी दर्शना आलो मी ।।३४।। दाल्भ्य म्हणाला राघवाप्रत । व्रतउपाय सांगतो येथ । दृढभावे आचरिता सहजगत । यश मिळेल तुजलागी ।३५|| दैत्य संहार घडेल । लंका तीही जिंकशील। त्रैलोक्यात कीर्ती होईल । तरी करावे सद्भावे ।।३६।। माघ कृष्ण पक्षांतर्गत । विजया एकादशी येत । त्या दिनी करिता व्रत । दुस्तर समुद्र ही तरशील।।३७।। तरी दाशरथा या व्रताचा। फलदायक विधी साचा। श्रवण करिता मानसीचा। भाव एकाग्र ठेवी पां ।३८।। दशमी दिनी व्रतारंभ । घ्यावा एक मृत्तिका कुंभ । स्वर्ण रजत वा ताम्रकुंभ। तोही उपयुक्त जाणावा ।।३९।। त्यात उदक पल्लव घालावे । सप्तधान्याचे चौरस करावे । त्या बैठकीवरी स्थापावे । अति उत्तम स्थंडिली।।४०।। जवयुक्त पूर्णपात्र। एक ठेवावे कुंभावर। त्यावर नारायणमूर्ती सुंदर । ठेवावी शुद्ध कनकाची।।४१ ।। अन्य दिनी एकादशीस। करुनी प्रातःस्नानास। कलशासह नारायण । षोडशोपचारे पूजावे ।।४२ ।। गंध धूप दीप नैवेद्ययुक्त। पूजन करावे यथास्थित । डाळिंब श्रीफळ उपयुक्त । अन्य साहित्य अर्पावे ।।४३।। नारायणाचे गुण गावे । त्या दिनी कुंभार सन्निध राहावे। भावभक्तीने भजन करावे । रात्र समयी जागरण ।।४४।। दुसऱ्या दिवशी द्वादशीस। सूर्योदयाच्या समयास। कुंभ नेउनी जलतीरास। स्थापन करावा आदरे ।।४५।। नदी तडाग अथवा निर्झर। स्थान असावे स्वच्छ सुंदर। आदरे पूजावे त्या भूमीवर। कुंभासह नारायणा ॥४६॥ नंतर कुंभ व हरिमूर्ती। द्यावी वेदज्ञ विप्राप्रती। तदनुषंगे महादाने ती। अर्पावी पूर्ण भक्तीने ।।४७ ॥ व्रत असे हे परमपावन । कपिश्रेष्ठींना समवेत घेऊन । तुवा आचरावे रघुनंदन । तेणे विजय मिळेल ।।४८।। श्रीरामे मानिले क्रषिवचन । केले व्रत भाव धरून । युद्धप्रसंगी रावण मारून। विजयश्री मिळविली ।।४९।। श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत । ब्रत आचरिता |विधियुक्त । नर होउनी जयवंत । मिळतो स्वर्गलोक तया ।५०।। म्हणुनी विजया एकादशीचे । व्रत अवश्य करावे साचे । माहात्म्य श्रवण पठणाचे । जळती समस्त पातके ।।५१।। त्या नराते सहजगत । वाजपेय यागाचे फल प्राप्त। प्रयत्नपूर्वक करता – निश्चित । होय प्रसन्न महाप्रभू ।।५२।। ।। इति श्रीस्कंदपुराणे माघकृष्णैकादश्याः विजयानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।॥। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website