सोळा सोमवार व्रतमाहात्म्य Mandar Sant July 23, 2017 दिनविशेष सोळा सोमवार व्रत ( सोळा सोमवार व्रत करणाराने पुढील प्रमाणें वागावें ) * “सोळा सोमवार” हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे. *हे श्रीशंकराचे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्र्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावयाचे असते. नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी, किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे. *हे व्रत केल्याने, दरिद्री धनवान होतो. रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते. दु:खी माणसाला सुख प्राप्त होते. मनींची चिंता नाहीशी होते. दूरदेशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते. पुत्र-कन्यांचा लाभ होतो. कुमारिकांना मनपसंत पती मिळतो. व्यापार्याला व्यापारांत फायदा होतो. नोकरीत प्रमोशन मिळते, श्रद्धापूर्वक हे व्रत करणाराची मनींची इच्छा परीपूर्ण होते. व्रत करणार्या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी, मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे. *व्रताला सुरवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी. १६ सोमवार व्रत करून येणार्या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. किंवा कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. *व्रत करणाराने सकाळी स्नान करून सोवळें किंवा धूत वस्त्र नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी. साष्टांग नमस्कार घालावा. नित्याप्रमाणे आपल्या नोकरी-धंद्यावर जावे. आपल्या उद्योगाला लागावे. दिवसभर उपास करावा. मनांत शंकराचे स्मरण करावे. [ उपास न झेपणारांनी जरूर तर “गहू, गूळ व तूप” मिळुन तयार केलेले पदार्थ उदा० शिरा, खीर वगैरे पदार्थ खावे. ] *संध्याकाळी आंघोळ करावी. मनोभावे शंकराची [ मूर्ती अगर चित्र, तसबिरीची ] पंचमोपचार पूजा करावी. पूजेत बेलाची पाने अवश्य असावी. देवासमोर बसून “सोळा सोमवार कथा.” ( कहाणी ) वाचावी. किंवा “सोळा सोमवार माहात्म्य ” ही पोथी वाचावी. “शिवस्तुती” म्हणून नंतर आरती करावी. जमलेल्या व घरांतल्या मंडळीस कणिकेच्या चूर्म्याचा प्रसाद वाटावा व आपण स्वत: घ्यावा. [चूर्मा-गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकर्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे. ] त्या हातानेकुसकरून चाळणीने चाळाव्या. यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे. याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाराने अर्धाशेर कणिकेचा चूर्मा घेऊन उपास सोडावा. चूर्मा करतांना कणिकेत मीठ घालू नये. तसेच उपासास खावयाच्या पदार्थांतही मीठ असतां कामानये या दिवशी मीठ वर्ज्य आहे. *ओळीने १६ सोमवार व्रत करून येणार्या १७ व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाचे दिवशी प्रसादासाठी पांच शेर कणिकेचा (गव्हाचे पिठाचा ) चूर्मा तयार करावा. पूजेचे साहित्य तयार करावे. स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून घ्यावा. या पूजा साहित्यांत “सोळा” वस्तू असाव्या. (अबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, बेलाची पाने नैवेद्य. ) शंकराचे देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. १०८ किंवा १ हजार ८ बिल्वपत्रे वहावी. नैवेद्य दाखवुन आरती करावी. मनांतल्यामनांत आपली इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा. चूर्म्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देऊळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग घरी आणून कुटंबातल्या सर्व मंडळींनी व स्वत: प्रसाद घ्यावा. *शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून श्रीशंकराची षोडशोपचार पूजा करावी. देवळात करावयाच्या म्हणून सांगितलेल्या सर्व गोष्टी कराव्या. ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वत:च कराव्या. *उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील १६ सोमवारांप्रमाणे “सोळा सोमवार कथा” व “सोळा सोमवार माहात्म्य” वाचावे. “शिवस्तुती” म्हणून आरती करावी. चूर्म्याचा प्रसाद सर्वांना वाटावा, आपणा घ्यावा. कुटुंबातल्या सर्वांनी, व्रत करणारासह पंचपक्वान्नाचे भोजन करावे. * मनोभावें हे व्रत करणाराची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात. ==================================================== सोळा सोमवार व्रत कथा. =============== आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होत. एके दिवशी काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली, “डाव कोणी जिंकला?” म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला “तूं कोडी होशील” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या. पुढं एके दिवशीं काय झालं ? देऊळीं स्वर्गींच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं. गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, “भिऊं नको. घाबरू नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल.” गुरव म्हणाला, “तें व्रत कसं करावं?” अप्सरांनी सांगितलं, “सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशी खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारी पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा. तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारें पूजा करावी. नंतर चूर्म्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देउळीं ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरवानं ते व्रत केलं, गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकरपार्वती पुन्हां त्या देउळीं आलीं. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, “तुझं कोड कशानं गेलं?” गुरवानं सांगितलं, “मी सोळा सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं.” पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक-स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, “आई आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो, आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?” पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यांत भेट झाली. पुढें कार्तिकस्वामीनं हें व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावे सोळा सोमवारांचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरतां फिरतां एका नगरांत आला. तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यांत हत्तिण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं, व नवरानवरींची बोळवण केली. पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशीं दोघं नवराबायको एका दिवशी खोलींत बसली आहेत, तसं बायकोनं नवर्याला विचारलं, “कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?” त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीति पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनात धरला व तें व्रत ती करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, “मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालों?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरतां फिरतां तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एकादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडलीं. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होतं आहे तों त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळी गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांतदिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील. दारिद्यानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशीं ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, “राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टान्त, अमान्य करणं हेंही अयोग्य आहे. ” मग उभयतांनी विचार केला. तिला नगरांतून हाकलून लावलं. पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊंपिऊं घातलं. पुढं काय झालं ? एके दिवशीं म्हातारीन तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरांतून हांकलून लावलं. तिथून निघाली तों एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यांतलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जातां जातां एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टि त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जातां जातां एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टि गेली, तसे पाण्यांत किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेली राहिली. पुढं काय झालं? एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टि जाऊं लागली. ज्यांत तिची दृष्टि जाई त्यांत किडे पडावे, कांही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टि लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टि चांगली होणार नाहीं असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवारांचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारांचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहींसा झाला. तिच्या नवर्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहिंकडे शोधाला पाठवले. शोधतां शोधतां तिथ आले. गोसाव्याच्या मठींत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनीं सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा, व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद.” राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीं आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करूं लागलीं. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाब्राह्मणांचे द्वारीं, गाईंचे गोठीं, पिंपळाचे पारीं, सुफळ संपूर्ण. सोळा सोमवार माहात्म्य श्रीगणेशाय नम: ॥ वैदर्भदेशीं परम पवित्र । अमरावती नामें एक नगर । तेथें शिवालय महाथोर । जें कां अपूर्व त्रिभुवनीं ॥ १ ॥ तेथें कोणे एके वेळीं । शिवपार्वती एके स्थळी । उभयतां येऊनि देउळीं । सहजस्थिती क्षण एक ॥ २ ॥ स्थळ रमणीय देखोनी । पार्वती म्हणे शूलपाणी । सारीपाट मांडोनी । खेळॊं ऎसें वाटते ॥ ३ ॥ मग शिव म्हणे आवश्यक । डाव मांडिला सम्यक । तेथें गुरव पुजारी होता एक । त्यासी गिरिजा काय बोले ॥ ४ ॥ हा डाव कोणीं जिंकिला । सत्य सांगे ये वेळां । तंव तो गुरव बोलला । शिवें जिंकिला म्हणॊनि ॥ ५ ॥ मग दुसरा डाव मांडिला । खेळतां पार्वतीनें जिंकिला । अंबा म्हणे असत्य गुरव बोलिला । तरी तूं कोडी होशील ॥ ६ ॥ असत्य बोलसी पापराशी । वेगी घेईं मम शापासी । तुज कुष्ठ होईल सर्वांगासी । विलंब यासी न लागे ॥ ७ ॥ यापरी गुरव शापुनी । उभयतां गेलीं कैलासभुवनीं । गुरव पाहे अवलोकुनी । आंगींची कांति पालटली ॥ ८ ॥ गुरव मनीं चिंता करी ।व्याधि जाईल कैशापरी । कोड आंगी दु:ख करीं । कवण उपाय असे यासी ॥ ९ ॥ तंव तेथें अप्सरा सुंदरी । घेवोनि पूजासामुग्री । पूजावया शिवगौरी । देउळाभीतरी पातली ॥ १० । तिनें पाहिलें गुरवातें । तुज कोड जाहलें कवण्या अर्थे । गुरव बोले भयभीत चित्तें । गिरिजेनें मज शापिलें ॥ ११ ॥ हें ऎकोनि अप्सरासुंदरी ।म्हणे गुरवा तूं चिंता न करीं । सोळा सोमवार व्रत निर्धारीं । करिता व्यथा जाईल ॥ १२ ॥ मग तो उठोनि पूजा करी । कर जोडोनि विनंती करी । माते हें व्रत झडकरी । मज उकलोनि सांगिजे ॥ १३ ॥ अप्सरा म्हणे अवधारी । तूं सोमवारचें व्रत करी । दिवसा असावें निराहारी । सायंकाळपावेतों ॥ १४ ॥ मग त्या दिवशीं सायंकाळीं । साङ्गपूजावा चंद्रमौळी । धूपदीप इत्यादि सकळीं । षोडशोपचारे पूजावा ॥ १५ ॥ मग अर्धशेर कणिक घेइजे । त्याचे भाग अंगारे तीन कीजे । घृतगुळेंसहित भक्षिजे । लवणरहित जाण पां ॥ १६ ॥ ऎसें सोळा सोमवारव्रत । चालाविजे यथास्थित । हें जाहलिया समाप्त । सत्रावे सोमवारीं करावें ॥ १७ ॥ कणिक घेईजे पांच शेर । त्याचे भाग अंगारे समग्र । घृतगुळेंसीं परिकर । चूर्मा तयांचा करावा ॥ १८ ॥ तो चूर्मा देऊळीं न्यावा । भावें चंद्रमौळी पूजावा । तिसरा भाग अर्पावा । सदाशिवासी तेधवां ॥ १९ ॥ दुसरा भाग देउळीं वांटिजे । उरला एक घरा आणिजे । तो आपण स्वत: भक्षिजे । कुटुंबा समवेत आदरें ॥ २० ॥ अप्सरा म्हणे अवधारीं । गुरवा हें व्रत तूं भावें करीं । कुष्ठ जाईल निर्धारीं । सत्य सत्य त्रिवाचा ॥ २१ ॥ ऎकतां गुरव धरिता जाहला । अंत:करणापासोनि आचरला । पूर्वदिशा अंग पावला । समाप्ति होतां कुष्ठ जाय ॥ २२ ॥ याउपरी एके दिनीं । ईश्वरपार्वती मिळोनी । फिरत फिरत मागुत्यानी । त्याच देउळी पातलीं ॥ २३ ॥ पूर्वी गुरवासी शाप दिधला । तें स्मरण झालें पार्वतीला । सापेक्षें पाहोनि गुरवाला । तंव कुष्ठ आंगीं दिसेना ॥ २४ ॥ पार्वती पुसे गुरवाप्रती । तुझें कुष्ठ गेलें कवणे रितीं । येरू बोले यथार्थ निगुती । श्रेष्ठ व्रतासी आचरलों ॥ २५ ॥ सोळा सोमवार व्रत करोनी । तोषविली शिवभवानी । त्यांचिये कृपावलोकनीं । आंगीचें कुष्ठ लोपलें ॥ २६ ॥ उमा ऎकोनि आश्चर्य करी । एवढी या व्रताची थोरी । मी हे व्रत आचरीन निर्धारीं । षण्मुख रुसला म्हणोनियां ॥ २७ ॥ मग हिमनगजा व्रत आचरी । पूर्णव्रताचे अवसरीं । स्वामी कार्तिक मनीं विचारी । मातेसीं रुसणें अयोग्य ॥ २८ ॥ स्वामी उठोनि तात्काळीं । धांवोनि आला मातेजवळी । पाहोनि उमा संतोषली । आनंद चित्तीं न समाये ॥ २९ ॥ स्वामी बोले जननीसी । माझे मनी न रहावें तुजपाशीं । म्हणोनि असतां अरण्यवासी । दिवस काहीं लोटले ॥ ३० ॥ आतां उद्भवली कल्पना । जावें मातेच्या दर्शना । ऎसी व्हावया मनकामना । कारण काय सांगिजे ॥ ३१ ॥ मग शैलजा म्हणे पुत्रा श्रेष्ठा । सोळा सोमवार धरोनि निष्ठा ॥ तेणें तुज जाहली उत्कंठा । माझे भेटीची सत्य पै ॥ ३२ ॥ ऎकोनि व्रताचें महिमान । स्वामी बोले स्वयें आपण । जननी व्रत हें मी करीन । मनकामना चित्ताची सांगतों ॥ ३३ ॥ माझा मित्र एक ब्राह्मण । देशांतरा गेला बहुत दिन । त्याची भेटी व्हावयालागुन । इच्छा पोटीं वसतसे ॥ ३४ ॥ या उद्देशें स्वामी कार्तिक । व्रत आरंभीतसे देख । संपूर्ण होतां तात्काळीक । फळादेश पावला ॥ ३५ ॥ रम्य वनीं सहजगती । स्वामीनें देखिला पंथीं । मित्र ओळखोनि ब्रह्ममूर्तीं । अष्टांगभावे भेटला ॥ ३६ ॥ विप्र नवल करी चित्ता । स्वामीप्रती होय पुसता । तुम्ही आम्ही मार्गी चालतां । भेटी उभयतां नवल हें ॥ ३७ ॥ मित्रासी म्हणे शिवसुत । मीं व्रत आचरलों अद्भुत । तेणें तुझी भेटी सत्य । अकस्मात पैं जाहली ॥ ३८ ॥ द्विज म्हणे चमत्कार व्रताचा । तरी मी करीन कायावाचा । मज स्वार्थ आहे लग्नाचा । म्हणोनि मज सांगिजे ॥ ३९ ॥ शिवसुत सांगे यथायुक्ती । तेंचि ब्राह्मण धरी चित्तीं । व्रत चालवी यथानिगुती । विदेशीं गमन करीतसे ॥ ४० ॥ व्रत होतांची संपूर्ण । विचित्र कर्माची गति गहन । मार्गी एक नगर शोभायमान । रम्य अपूर्व देखिलें ॥ ४१ ॥ तेथील राजा पुण्यपवित्र । त्यास एक कन्या सुंदर । तिचें मांडिलें स्वयंवर । पण दुर्धर करोनी ॥ ४२ ॥ मिळाले राजे अति अद्भुत । अठरा वर्णादि समस्त । तयांमाजी द्विजनाथ । तें कौतुक पाहूं पातला ॥ ४३ ॥ रायें हस्तिनी शृंगारोनी । तिचे सोंडीं माळ देऊनी । यथाविधी करोनि । मंडपामाजी सोडिली ॥ ४४ ॥ ती हस्तिनी फिरत फिरत । आली जेथें द्विजनाथ । गळां माळ घालोनि त्वरित । निजमस्तकी बैसविला ॥ ४५ ॥ पाहोनि राजा आनंदघन । सुखसोहळा लग्नविधान ॥ करूनि वधूवरें दोघेजण । स्वगृहासि बोळविलं ॥ ४६ ॥ उभयतां एकचित्तेंकरोनी । नांदत असतां आपुले सदनी । प्रभुत्व पावली राजनंदिनी । पूर्व वृत्तान्त जाणविला ॥ ४७ ॥ एकान्तस्थळीं समाधानीं । उभयतां असतां सुखसदनीं । निवान्त समय पाहोनी । राजकन्या प्रश्न करी ॥ ४८ ॥ मार्गस्थ असतां द्विजोत्तमा । मी कैसेनि प्राप्त जाहलें तुम्हां । कोणत्या सुकृताचा महिमा । हें मजलागीं सांगिजे ॥ ४९ ॥ द्विज म्हणे ऎकें साचार । व्रत केलें सोळा सोमवार । त्या पुण्यें मज साचार । भार्या प्राप्त जाहलीस ॥ ५० ॥ राजकन्या आश्चर्य करी । व्रत ऎकिले नवलपरी । हें आचरोनि निर्धारी । चमत्कार पाहूं याचा ॥ ५१ ॥ धरोनि पुत्राची कामना । व्रत आरंभिलें जाणा । सुफल होतांच पुत्ररत्ना । सदाशिवें दीधलें ॥ ५२ ॥ शतायुषी आणि शुचिष्मंत । ज्ञानी अनुभवी आणि विरक्त । पुण्यशील प्रतापवंत । पितृसेवेसी सादर जो ॥ ५३ ॥ आज्ञापाळक पुत्र जाहला । देखोनि द्विज संतोषला । म्हणे या व्रताचा प्रताप आगळा । तो मज वर्णिला न जाय ॥ ५४ ॥ पुत्र ज्ञानदेशेसी येतां । मातेलागीं होय पुसता । मी सर्वगुणसंपन्नता । प्राप्त कैसेनि तुम्हांतें ॥ ५५ ॥ माता म्हणे पुत्रराया । उत्तम शिवव्रत करोनियां । शूलपाणी तोषवूनियां । मनकामना पुरविली ॥ ५६ ॥ पुत्र म्हणे मातेलागून । हें व्रत सांगे कृपा करोनि । भक्तिभावें आचरीन । कामना पूर्ण व्हावया ॥ ५७ ॥ माझे मनींचा इत्यर्थ । राज्यासनीं बैसावें त्वरित । क्लेशरहित दु:खरहित । कांहीं सायास न करितां ॥ ५८ ॥ मातेसी पुसोनि व्रतविचार । यथोक्त आचरे द्विजवर । तंव एके नगरी राजा थोर । वृद्धापकाळ तयाचा ॥ ५९ ॥ तयासी पोटीं पुत्र संतान । नसतं एक कन्यारत्न । तिजलागी व्रत विचारून । ब्रह्मानंद नेमिला ॥ ६० ॥ कन्या अर्पोनि साचार । विधियुक्त केलें स्वयंवर । राज्य देवोनि समग्र । पदीं आपुले नेमिला ॥ ६१ ॥ ब्राह्मण राज्य करूं लागला । व्रतसंकल्प पूर्ण जाहला । तंव सतरावा सोमवार आला । स्त्रियेसी सांगून पाठविलें ॥ ६२ ॥ कणिक पांच शेर घेऊनी । त्याचे तीन अंगारे करूनी । तूपगुळाचा चूर्मा करोनी।सत्वरदेउळींपाठविजे॥६३॥ तिनें ऎकोनि समाचार । म्हणे एवढा राजा थोर । देउळीं चूर्मा नेतां विचार । थोरपणा कैसेनि वाटे ॥ ६४ ॥ पांचशें रुपये तबकीं भरोनी । पाठविले देउळालागोनी । तेणें व्रत भंगलें तत्क्षणीं । शूलपाणी क्षोभला ॥ ६५ ॥ शिव म्हणे राजाला । तुझे स्त्रीनें व्रतभंग केला । राज्यालागी क्षय आला । प्रत्यया येईल तुजलागी ॥ ६६ ॥ तूं या स्त्रियेसि घरी ठेवितां । सर्वक्षय होईल तत्त्वतां । तुझें राज्य रक्षिणें आतां । तरी स्त्रीस सर्वथा ठेवूं नको ॥ ६७ ॥ मग बोले प्राचीन प्रधान । तिचे बापाचें राज्य असोन । तिसी द्यावें काढोन । हें तंव निंद्य आम्हांतें ॥ ६८ ॥ ईश्वर बोले प्रधानासी । तरी तूं होशील अधमराशी । राज्य बुडेल निश्चयेंसीं । स्त्रियेसी घरीं ठेवितां ॥ ६९ ॥ मग उभय वर्गी विचार करोनीं । राजकन्या दिधली काढोनी । ती चालली दीनवदनी । बहुत खेद करीतचि ॥ ७० ॥ दु:खित मानसीं चिंताक्रात । चरणी चालली दूर पंथ । नगर देखिलें अकस्मात । माजी सुंदर प्रवेशली ॥ ७१ ॥ दुर्बळ म्हातारीचे घरीं । तेथें राहिली राजकुमारी । म्हातारी म्हणे ऎके नारी । काय तुजप्रति सांगित्यें ॥ ७२ ॥ चिवटें आणावीं विकोनी । तुज मी कांहीं देईन साजणी । अवश्य म्हणॊनि राजनंदिनी । चिवटॆं विकूं निघूं लागे ॥ ७३ ॥ शिरीं चिवटॆं ठेविलीं बांधोन । अकस्मात अद्भुत प्रभंजन । वारियानें चिवटें गेलीं उडोन । आली परतोन घरासी ॥ ७४ ॥ म्हातारीस म्हणॊं लागलीं । कीं चिवटॆं अवघीं उडाली । मग म्हातारी काय बोलली तूं जाय शीघ्र येथोनि ॥ ७५ ॥ तेथून राणी चालली । तेलियाचे घरीं राहिली । तेथेही होणार गति जाहली । तें चतुरी परिसिजे ॥ ७६ ॥ चार घागरी भरोनि तेलियाने । ठेविल्या होत्या तेलानें । तिनें पाहतां रितेपणें । तेल अवघें उडालें ॥ ७७ ॥ मग तेली म्हणे झडकर । तूं जाय आतां कृपा करी । तूं असतां आम्ही भिकारी । होऊं ऎसें वाटतसे ॥ ७८ ॥ तेली मनी आश्चर्य करी । तेल उडालें कैशापरी । ही बाई येतांच घरीं । इच्यानें नाहींसें दिसतसे ॥ ७९ ॥ तेलियानें बाहेर घातली । ती नदीतीरीं चालली । तंव नदी सर्व आटोनि गेली । पापयोग्य जाण पां ॥ ८० ॥ मग ती हिंडे वनांत । तंव सरोवर देखिलें अकस्मात । जळ निर्मळ उचंबळत । पाहून संधी पातली ॥ ८१ ॥ दृष्टि पडतां जळावर । माजी किडे पडले समग्र । आसमंतीचे गुराखी सत्वर । गायी जळप्राशनार्थ आणिल्या ॥ ८२ ॥ मुलें जळप्राशन करिती । तंव किडे देखिले अवचिती । तेही जळ त्यागूनि जाती । किडे पडले म्हणोनि ॥ ८३ ॥ गोसावी राहात होता वनीं । तो आला उदकालागुनी । एकटी पाहुनि राजनंदिनी । घेऊनि गेला आश्रया ॥ ८४ ॥ गोसावी बोले तिजलागुन । तूं मजलागी कन्येसमान । तुज नाहीं अन्नवस्त्राची वाण । स्वस्थचित्तें रहावें ॥ ८५ ॥ मग तेथे राहिली सुंदरी । घरधंदा सर्व करी । व्रतभंगाची ऎसी थोरी । नाना दु:खें भोगवीतसे ॥ ८६ ॥ अन्नोदकासी हात लावितां । त्यामाजी किडे होती तत्त्वतां । पाहोनि गोसावी चित्ता । आश्चर्य करूं लागला ॥ ८७ ॥ आतां कवण उपाय करावा । इचे पदरीं कोण दोष जाणावा । कांही एक यत्न करावा । जेणें परिहार होईल ॥ ८८ ॥ मग आरंभिलें अनुष्ठान । तेणें शिव जाहला प्रसन्न । माग म्हणे वरदान । जी कां अपेक्षा तुझे मनी ॥ ८९ ॥ मग गोसावी विनवी ईश्वरास । इचे पदरीं काय आहे दोष । तो मज सांगिजे अवश्य । कृपा करोनि स्वामिया ॥ ९० ॥ शिव म्हणे सोळा सोमवार व्रते । इनें भंगिलें माझे सत्य । त्या दोषास्तव दु:ख प्राप्त । दशा ऎशीं जाण पां ॥ ९१ ॥ गोसावी म्हणे उमापती । तूं कृपाळू होऊनि निश्चितीं । दोष परिहरोनी महासती । पूर्वस्थिती करावी ॥ ९२ ॥ शिव म्हणे सोळा सोमवार केलिया । इचे दोष पावती विलया । ही निर्दोष होऊनियां। आपुल्या स्वामीस भेटेल ॥ ९३ ॥ ऎसें बोलोनि शूलपाणी । गेला आपुल्या स्वस्थानीं । व्रत करिती जाहली कामिनी । कांहीएक दिवस ॥ ९४ ॥ तंव तिचे भ्रतारासी । स्मरण जाहलें बहुतां दिवसीं । स्त्री कोठें असेल वनवासी । शोध तिचा करावा ॥ ९५ ॥ देशोदेशी हेर पाठविले । हिंडत हिंडत त्या वनासी आले । त्यांनीं राजस्त्रियेतें ओळखिलें । मागों लागले गोसावियासीं ॥ ९६ ॥ तो कांही न बोले वचन । हेर गेले परतोन। राजापाशीं वर्तमान । सांगतां राजा हर्षला ॥ ९७ ॥ आपण आणि प्रधान । दोघे चालिले न लागतां क्षण । थोर समारंभें येऊन । गोसावी नमिला साष्टांगीं ॥ ९८ ॥ परस्परें क्षेमालिंगन। वस्त्रें भूषणें देऊन । मृदुभाषणें समाधान । योगीश्वरा तोषविला ॥ ९९ ॥ म्हणे राजेंद्रा अवधारी । माझी कन्या हे निर्धारी । आजवरी पाळिली माहेरी । आतां तुम्ही पाळिजे ॥ १०० ॥ ऎसें बोलोनि ते अवसरीं । सती दिधली राजाचे करीं । राजा उठोनि नमस्कारी । गोसावियासी तेधवां ॥ १०१ ॥ आपुली स्त्री हातीं धरोनीं । बैसविली सुखासनीं । आपण तुरंगी आरूढोनी । निज नगरा परतले ॥ १०२ ॥ वाजतगायत आपुल्या स्थळा । येवोनि महोत्सव केला । दान दक्षिणा ते वेळां । देऊनि ब्राह्मण तोषविले ॥ १०३ ॥ राजाराणीची भेट जाहली । आनंदे राज्य करूं लागलीं । सकळ प्रजा आनंद पावली । महिमा अगाध नेणवे ॥ १०४ ॥ ऎसें जो व्रत करील वरिष्ठ । कृपाळू होऊनि नीळकंठ। दोष दरिद्र क्लेश संकट । निवारील क्षणार्धे ॥ १०५ ॥ जो कोणी मनकामना धरून ॥ आदरे व्रत करील संपूर्ण । त्याचे मनोरथ होतील पूर्ण । शिवकृपेनें सत्यत्वें ॥ १०६ ॥ म्हणे राघव व्यंकटेश साचार । मजसी जाहला चमत्कार । भाव धरिल्या साचार । सर्व कामना सिद्ध होती ॥ १०७ ॥ आरोग्यवृद्धी आणि धन । पुत्रपौत्रकन्यारत्न । इच्छिली इच्छा परिपूर्ण । व्रत करितां पावेल ॥ १०८ ॥ सोळा सोमवारकथा अनेक । श्रवण पठण करिती देख । त्यां प्रसन्न उमानायक । नि:संशय जाण पां ॥ १०९ ॥ श्रीव्यास विनवी श्रोतयांप्रती । ही कथा पूर्वापार निश्चितीं । नूतन नव्हे कवण कल्पिती । चतुरीं सत्य जाणिजे ॥ ११० ॥ ॥ इति श्री सोळा सोमवारकथा संपूर्ण ॥ श्रीशंकरार्पणमस्तु ॥ श्री शिवस्तुती. कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २ ॥ जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । पंचानना विश्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥ वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी । उमानिवासा त्रिपुरांतकार । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥ उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा । दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥ ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरी सोमकांत । गंगा शिरीं दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ । कर्पूरगौरी गिरिजा विराजे । हाळाहळें कंठ निळाचि साजे । दारिद्र्यदु:खे स्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥ स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देव चुडामणि कोण आहे । उदासमूर्तीजटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥ भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा । राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ९ ॥ नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश । सदाशिव व्यापक तापहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १० ॥ भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न। तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ११ ॥ इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ । उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १२ ॥ भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र । विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १३ ॥ प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या । मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १४ ॥ कीर्ति हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना । एकाग्रनाथ विष अंगिकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १५ ॥ सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता । अंकीं उमा ते गिरिरूपधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १६ ॥ सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू । गौरीपती जो सदा भस्मधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १७ ॥ कर्पूरगौर स्मरल्या विसावा । चिंता हरि जो भजकां सदैवा । अंती स्वहीत सुचना विचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १८ ॥ विरामकाळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर । चिंतामणी चिंतनें चित्तहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ १९ ॥ सुखावसानें सकळ सुखाचीं । दु:खावसानें टळती जगाचीं । देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २० ॥ अनुहातशब्द गगनी न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २१ ॥ शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे । भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २२ ॥ पीतांबरे मंडित नाभि ज्याची । शोभे जडित वरि किंकणीची । श्रीदेवदत्त दुरितांतकारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २३ ॥ जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी । शुद्धस्वरें गर्जति वेद चारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २४ ॥ निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिर्लिंग ॥ गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २५ ॥ मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी । काशीपुरीं भैरव विश्व तारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २६ ॥ जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं । प्रताप सूर्य शरचापधारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २७ ॥ अलक्ष्यमुद्रा श्रवणीं प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे । नेई सुपंथें भवपैलतीरीं ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २८ ॥ नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा । पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी ।तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ २९ ॥ एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्य नामीं । शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभॊ मज कोण तारी ॥ ३० ॥ शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थासि जाऊं नको ॥ योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें ती नको ॥ काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टांस शंकूं नको ॥ ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥ ३१ ॥ Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website