*जंगली म्हणजे काय?*

जंगलात राहतात म्हणून जंगलीमहाराज असे नांव ठेवले गेले असे लोक समजतात, पण ते बरोबर नाही. योगामध्ये जांगल नांवाचा एक पंथ असून त्याचे काही विशिष्ट आचार आहेत. त्यात एक आचार असा आहे की या पंथाचे लोक आच्छादन असलेल्या कोणत्याही स्थलात रहात नाहीत. ऊन, वारा, पाऊस ही सहन करुन उघड्यावर राहण्याचा यांचा सांप्रदाय आहे व तो ते अत्यंत कडक रितीने पाळतात. म्हणून या पंथाला प्रतिक्षेची पराकाष्ठा करावी लागते. योगातील या पंथाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. श्री जगद्गुरू भगवान पूज्यपाद श्री शंकराचार्य महाराज यांनी आपल्या योगतारावली या स्तोत्रात नमस्काररूप मंगल करीत असतांना ‘जांगलिक’ असा उल्लेख केला आहे. तो जांगलिक पंथ हाच आहे. त्याच पंथाचे अनुयायी महाराज होते म्हणून त्यांना प्राकृत भाषेत जंगली असे म्हटले जात होते.
महाराजांची शरीराकृती ही मुळातच दिव्य होती. ते आजानुबाहू होते तसेच योग्याची दिव्य लक्षणे जन्मत: त्यांचे अंगी होती. हिमालयात दुसऱ्या यात्रेच्या निमित्ताने ते हिंडत असतांना त्यांची व श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची भेट झाली. नानासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्य युद्धाची अंधुक कल्पना श्री महाराजांना दिली होती पण आपण साधू आहोत तेव्हा आपण काय मदत करू शकणार असे महाराज म्हणाले तेंव्हा नानासाहेबांनी आशिर्वाद मागितला. तेव्हा आशिर्वाद देण्याचे माझे सामर्थ्य नाही पण मी आपणास योगाने सहाय्य करीन असे त्यांनी सांगितले.
प्रत्यक्ष युद्धाचा वणवा पेटल्यावर महाराज नानासाहेबांचे सेनापती श्री तात्या टोपे यांना भेटले व त्यांनी सैनिकांना अन्न पुरविण्याचे काम हाती घेतले. आपल्या शिष्याकडून व आपण स्वत: ते अन्नाची रसद सैनिकांना पोहचवीत असत. कित्येक प्रसंग असे आले की तात्यांच्या फौजेचा पराभव होऊन त्यांच्याकडील सर्व सामग्री इंग्रज पक्षीय लोकांनी लुटून नेली तरी दुसरे दिवशी तात्यांचे सैनिकांना अपेक्षित अन्नसामग्री मिळालेली दिसत होती. याचे आश्चर्य इंग्रज पक्षीय लोकांप्रमाणेच तात्यांच्या लोकांना वाटत असे. महाराजांनी स्वत: शस्त्र हातात घेतले नाही. पण अनेक युद्धात ते जातीने अगदी महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित असत. त्यामुळे तलवारीचे कितीतरी वार महाराजांच्या अंगावर झाले होते. चार महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना गोळ्या लागल्या होत्या. तीन महिने त्यांनी हे काम पूर्ण केले. त्यानंतर तात्यांना त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी तू पायांनी चालत जा असे सांगितले. तात्यांचे शरीर थकून गेले होते. तात्यांनी तो आदेश पाळण्याचा प्रयत्न केला. पण तो पूर्णपणे पाळला गेला नाही. म्हणून तात्या इंग्रजांना सापडले. पण तात्यांवरील हे संकट टळावे म्हणून त्यांनी १० तरी तात्यांसारखे लोक निर्माण करून इंग्रजांची खोड मोडली होती. श्रीमंत नानासाहेबांनी तो आदेश पाळल्यामुळे नानासाहेब इंग्रजांच्या हाती कधीच सापडले नाहीत.
सैनिकांना अन्नपुरवठा करतांना त्यांनी शिधासामग्री कोठून आणली याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. फक्त ते कामात श्री जगद्गुरु श्रीशंकराचार्य महाराज यांचा कनक-धारा या स्तोत्राचा अहर्निश पाठ करीत असत. यापेक्षा त्यांच्या या उद्योगाची माहिती कोणासही लागली नाही. महाराजांच्या जीवनातील हा मोठा चमत्कार नाना व तात्या या दोघांनाही विस्मयकारक वाटत होता. याची जाणीव नानांनी नेपाळ-नरेशांना करून दिली होती. तेव्हा अशा साधुचे दर्शन व्हावे अशी नेपाळ नरेशांची इच्छा होती. त्यांनी नानांना साधूचा पत्ता विचारला पण नानांना तो नीट सांगता आला नाही.
श्री क्षेत्र काशी येथील विश्वेश्वर मंदिरात पुण्याच्या साधूने एक सोन्याचा तोडा अर्पण केला आहे अशी नोंद आहे. हा साधू कोण याचा शोध घेतला असतांना तो श्री जंगलीमहाराज होते असे दिसून येते. या तोड्यासंबंधीतला इतिहास असा आहे की एका साधूसंमेलनात आताचे साधू हे नामधारी असून त्यांचे सामर्थ्य नष्ट झाले आहे. सर्वच लोक ढोंगी आहेत असे विवेचन एकाने केले. त्यावर महाराज म्हणाले साधू ढोंगी नाहीत यासाठी आपणास काय प्रमाण देऊ? त्यावर प्रथम वक्ता म्हणाला ही समोर बाई बसली आहे तिच्या पायात चांदीचे तोडे आहेत ते आपण सोन्याचे करा. त्याबरोबर ठीक आहे असे म्हणून त्या बाईला उभे राहण्यास सांगितले. त्याबरोबर तिच्या पायातील तोडे सोन्याचे झाले. सर्व सभा चकित झाली.
त्या बाईने त्यातील एक तोडा महाराजांना अर्पण केला. त्यांनी तो काही दिवस वापरलाही व शेवटी विश्वेश्वरास अर्पण केला. महाराजांची ही कीर्ति नेपाळ नरेशांच्या कानावर गेली तेव्हा नाना सांगत होते तो हाच तर साधू पुरुष नाही ना असा त्यांना संशय आला व त्यांनी शोध करण्यास प्रारंभ केला. पण महाराजांची गाठ पडली नाही. तेव्हा नेपाळ नरेशांना फार मोठे दु:ख झाले. एके दिवशी स्वप्नात त्यांना असा आदेश मिळाला की आपल्याकडे अनेक साधु येतात तेव्हा आपण त्यांना फक्त तीन दिवसच आपल्या नगरात राहू द्यावे. तीन दिवसांनी नगराबाहेर घालवून द्यावे. अशांमध्ये जो साधू बाहेर पडतांना आपली पेटलेली धुनी आपल्या वस्त्रात गुंडाळून नेईल तोच नानांनी सांगितलेला साधू असे तुम्ही समजा असे त्यांना सांगितले. अलिकडे नेपाळ नरेशांची साधुवर वक्रदृष्टी झाली असून तेथे साधूंचा अवमान होत आहे असे महाराजांच्या कानावर आले व त्यांनी नेपाळला जाण्याचा निश्चय केला. ते नेपाळला गेले, तेथे उतरले. तीन दिवस झाल्यावर राजाज्ञेप्रमाणे त्यांनी नगरी सोडावी असा आदेश झाला. साधूचे महत्त्व राजाला कळले नाही हे ध्यानात यावे म्हणून महाराजांनी आपली धुनी भरली, ती कापडात बांधली व ते घेऊन निघाले. राजाने आपल्या सेवकांना सूचना देऊनच ठेवली होती. त्यांनी ताबडतोब राजाला हे वृत्त कळविले. नेपाळचा राजा सर्व लव्याजम्यासह महाराजांना सामोरा गेला व महाराजांचे स्वागत केले व आपण आपल्या भेटीसाठी ते सर्व घडविले होते व त्यासाठी झालेला स्वप्नदृष्टांता त्यांनी सांगितला व त्याप्रमाणे गेली तीन वर्षे मी आपली वाट पाहिली. त्याकाळात माझ्याकडून साधूंना जो त्रास झाला त्याची मला क्षमा करा म्हणून विनंती केली. महाराजांचा सत्कार केला व एक रत्नजडित हार महाराजांना अर्पण केला. महाराजांनी आपण साधू आहोत, आपणास हा काय करावयाचा आहे म्हणून प्रसादरूपाने परत केला. तेव्हा नेपाळ नरेशाने प्रार्थना केली की महाराज हा हार आपण कोणत्याही देवाला आमच्यासाठी अर्पण करा त्याप्रमाणे तो हार महाराजांनी पंढरपूरच्या विठोबाला अर्पण केला.
काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेत त्यांची गोरक्षनाथांबरोबर प्रत्यक्ष भेट झाली व गोरक्षनाथांनी त्यांना असा आदेश दिला की आपल्या संप्रदायांपैकी एक मोठा भाग श्रीज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रात चालवीत आहेत. तेथे त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बसले आहेत तेव्हा त्यांच्या सान्निध्यात आपण आता पुढील वास्तव्य करावे म्हणून महाराजांचे वास्तव्य पुण्यास झाले.
महाराज योगी होते तसेच ते मंत्रशास्त्रार्थातही निष्णात होते. जांगलिक पंथातील लोकांना विषारी प्राण्याचे विष नष्ट करण्याचे व विष उतरविण्याचे मंत्रज्ञान असते. पण महाराजांनी मंत्रशास्त्राचाही अभ्यास करुन ते शरीरातील योगिनी व शक्ती यांचा संयोग घडविणारे अनेक प्रयोग करू शकत होते. शरीर अतिशय हलके करण्याच्या वेळी ते अदृश्य करणे किंवा अतिशय जड करणे ही क्रिया ते सहज करीत असत. मंत्रशास्त्राचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यवर्गाला करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या शिष्यात या परंपरा अद्याप चालू आहेत.

महाराजांची दिनचर्या

महाराज ब्राह्म मुहुर्तावर उठून आपले शरीर हलके करीत व योगमार्गाने ते काशीस जात असत. तेथे मनकर्णिका घाटावर स्नान करुन गुप्तशिवलिंगाचे दर्शन घेत. भैरवाचेही दर्शन घेत असत. रोज एक बिल्वदल वाहण्याचा त्यांचा नियम होता. येतांना एक निर्माल्यदल ते घेऊन परत येत असत. कलशाचे दर्शन करुन त्र्यंबकेश्वरास जात. तेथे त्र्यंबकेश्वर भगवंताचे व निवृत्तीनाथांचे दर्शन घेऊन आळंदीला श्रीज्ञानेश्वर महाराज व श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे अदृश्य रूपानेच राहत असत. त्यानंतर विविध भक्तांच्या उद्धाराचे कार्य ते दिवसभर करीत असत. ही त्यांची दिनचर्या ध्यानात घेतल्यावर महाराज कोण व त्यांचा सांप्रदाय व आचार काय हे सहज ध्यानात येते व त्यांच्या संबंधीच्या सर्व विपरित भावना आपोआप विरून जातात.

तीर्थयात्रा

नित्यक्रमाप्रमाणे कधी कधी ते दूरदूरच्या तीर्थानाही पुन्हा पुन्हा जाऊन येत असत व त्यासंबंधीच्या गोष्टीही सांगत. विशेषत: गरुड व हनुमंताच्या युद्धाची माहिती ते फार रसभरित अंत:करणाने वर्णन करीत असत. पूर्वी केलेल्या पदयात्रेप्रमाणे ते पुण्यास राहून पुन्हा पुन्हा यात्राही करून येत असत.

एक गंमतीदार प्रसंग

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात एक प्रसंग असा आला की, महाराज इंग्रज विभागाच्या सैनिकांच्या हाती सापडले. हा विचित्र मनुष्य पाहून त्यांना नैनिताल येथील दाट अरण्यात सोडण्यात आले. कारण त्यांच्यावर तलवारीचे घाव घातले. बंदुकीच्या गोळ्या मारल्या पण शरीरावर काहीच परिणाम होईना. तेव्हा निबिड अरण्यात सोडण्यावाचून दुसरा उपाय नाही म्हणून असे करण्यात आले. पण त्याच वेळी महाराजांना अश्वत्थाम्याचे दर्शन झाले व त्यांनी महाराजांना मार्गदर्शन केले. नेपाळ यात्रेच्या वेळी त्यांना हनुमंत व परशुराम यांचे दर्शन झाले. परशुरामांनी महाराजांना श्रीविद्येचा उपदेश केला आणि सिद्ध श्रीविद्यापासनेप्रमाणे ते ध्यानस्थ बसले असतांना त्यांच्या मस्तकावर स्पष्ट गुरूपादुका दिसत असत व भक्तिमार्गाची दीक्षा त्यांना प्रत्यक्ष हनुमंतांनी दिली होती. त्यामुळे योगविद्या, श्रीविद्या व भक्तिविद्येचे ते सिद्ध आचार्य होते व त्यांचा प्रचार त्यांनी जन्मभर केला. त्यांचे योगी शिष्य ह्र्षिकेश येथे होते व श्रीजंगलीमहाराजांना आपले गुरू मानीत असत. महाराजांच्या समाधीनंतर त्यातील काही योगी पुण्यास येऊन गेले होते.
एकाच वेळी विविध ठिकाणी त्याच देहाने दर्शन देणे हा जो एक योगप्रकार आहे त्याची ही प्रचिती श्रीजंगलीमहाराज यांच्यासंबंधी आलेली होती. कारण ते एका देहाने पुण्यास दिसत त्याच वेळी त्यांच्या कृष्णाकाठीही वास होत असे.
श्रीमहाराज एकदा कृष्णाकाठी फिरत असतांना कुरूगड्डीला गेले होते. येथे श्रीपाद वल्लभांची समाधि असून बेटासारखे होऊन कृष्णेचे दोन प्रवाह झाले आहेत. तेव्हा कृष्णेचा प्रवाह ओलांडल्याशिवाय समाधीच्या दर्शनाला जाता येत नाही. येथे बाजांना भोपळा लावून बाजेवरुन नदीपार करण्याची पद्धत आहे. दुर्दैवाने ज्या दिवशी नावाड्याच्या बाजेचे भोपळे फुटले होते तेव्हा पलिकडे कसे जावे हा प्रश्न निर्माण झाला. महाराजांनी नावाड्यांना बाज प्रवाहात टाकावयास सांगितले पण नावाडी तयार होईना. तेव्हा महाराजांनी आपल्या हाताने बाज उचलून पाण्यात टाकली. बाज प्रवाहाबरोबर वाहू लागली तेव्हा नावाडी फार दु:खित झाले. हे पाहून महाराजांनी पाण्यात उडी घेतली व बाज आणली व नावाड्यांना त्यात बसावयास सांगितले. भोपळ्यावाचून बाज कशी तरंगणार याची चिंता नावाड्यांना होती. पण महाराजांनी आपला हात लावला व बाज तरंगू लागली. अशाच स्थितीत दुसऱ्या काठाला नाव गेली. आता पुन्हा परत कसे जावयाचे हा प्रश्न नावाड्यांपुढे होता. महाराजांनी कमंडलुमधील पाणी शिंपडले व बाज परत घेऊन जा असे सांगितले व ते कार्य पूर्ण झाले.
कुरगड्डी येथे विंचू व साप यांचा फार उपद्रव होता. महाराज तेथे गेले त्या दिवशी पुजाऱ्याच्या भाच्याला विंचू चावला व तो फार विव्हळत होता. महाराजांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्याच्या वेदना नाहीशा झाल्या. महाराजांनी मी येथे असेपर्यंत कोणत्याही सापाने किंवा विंचवाने कोणास दंश करू नये अशी आज्ञा केली व त्याचप्रमाणे महाराज तेथे असेपर्यंत कोणासही दंश झाला नाही. या आज्ञेवरून महाराजांचे सामर्थ्य सर्वांच्या ध्यानात आले. कन्यागतामध्ये कृष्णेला महत्त्व येते. त्या वेळी साधुंच्या स्नानासाठी कृष्णा नदीच्या तीरावर महाराजांनी पुष्कळ सोयी केल्या आहेत. नरसोबाच्या वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती बऱ्याच जणांना आली आहे.
हे एक अत्यंत पवित्र व जागृत असे अध्यात्म केंद्र आहे. त्याच बरोबर ते सहज सुलभ पुण्यनगरीत मध्यवर्ती ठिकाणी आहे. प्रत्येक भक्तगणांनी येथे जाऊन नतमस्तक व्हावे व श्रींचा कृपाशिर्वाद घ्यावा.

जंगली महाराजांची आवडती स्थाने

श्री क्षेत्र नरसोबाची वाडी व श्री क्षेत्र गाणगापूर ही दोन श्री सद्गुरू जंगली महाराजांची अत्यंत आवडती ठिकाणे. महाराजांचे गुरु श्री स्वमी समर्थ हे श्री नृसिंहसरस्वती महाराजांचे अवतार. श्री नृसिंहसरस्वतींचा पूर्ण कृपाशीर्वाद महाराजांना लभलेला होता.
नरसोबची वाडीत नृसिंहसरस्वती महाराज चे वास्तव्य एक तपाहून अधिक झालेले होते. त्यांच्या तपाने पवित्र झालेल्या तपोभूमीचे व नृसिंहसरस्वतीनी केलेल्या चमत्कारचे महाराजांना विलक्षण आकर्षण असायचे.
गाणगापूर येथे संगमावर महाराज दिवस न दिवस अनुष्ठानात घालवित असत. अत्यंत बारकाईने पहिल्यास श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण पगडा श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या जीवनात आढळून येते. ब्राम्ह मुहूर्तावर उठणे, स्नान शुचिता, सूर्यादयापासून मध्यान्ही पर्यत अनुष्ठान, दुपारी मधुकरी मागणे, विश्रांती, चर्चा, उपदेश, भक्तांच्या अडचणी सोडविणे, तीन वेळा आरती, मृतदेह उठविणे, एकाचवेळी अनेक रुपे धारण करणे, विविध चमत्कार करणे, धातुचे सोने करणे, अडलेल्या भक्तांना साधकांना तीर्थयात्रे च्या निमित्ताने मार्ग दाखविणे, नामवंत सिद्ध तयार करणे, अनेक ठिकाणी वास्तव्य करुन तेथे जणू तीर्थ क्षेत्रच करणे, समाधीला पुष्पांच्या विमान आसनातून जाणे या व असे अनेक प्रसंग समान वरशाची अनुभूती देवून जातात.
वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती ही बऱ्याच जणांना आली. तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे श्री नृसिंहसरस्वतीस्वामी यांच्या आरती वेळी श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या प्रेरणेने केलेले श्री गुरुदेवदत्तावरील भजन (पद) आजही म्हणतात. श्री दत्त भजनमाला व करुणा त्रिपदी या आरती संग्रहात सदरचे भजन (पद) आढळते.

श्री सद्गुरू जंगली महाराज, महासमाधी सोहळा!

शुक्रवार ४ एप्रिल १८९० चैत्र शुद्ध चतुर्दशी रोजी सायंकाळी ५•३० वाजले होते. महाराजांनी अष्टांगयोग धरणेच्या साधनेत डोळे मिटून अत्यंत गहन ध्यान लावले आणि नाडी बंद झाली. महाराज समाधिस्थ झाल्याच्या तारा सगळीकडे पाठवण्यात आल्या ही वार्ता सर्वत्र वाऱ्या सारखी पसरली हजारो भाविक आपल्या या साक्षात्कारि आजानुबाहु संताच्या अखेरच्या दर्शनासाठी येऊ लागले पुष्पांचा खच पडला. पुष्पहारांना आणखीनच टवतवी येऊ लागली. गुलाल, बुक्का हजारोच्या मुठीनी उधळला जावू लागला. “श्री सद्गुरू जंगली महाराज की जय” अशा जायघोषांनी दिशा निनादून गेल्या. भांबुर्ड्यातला प्रत्येक जण पोरका होऊन म्लान मुख करून महाराजांकडे पाहत होता.
भावी तयारीसाठी आम जनते कडून सुवासिक वस्तुंचा, अंबीर, बुक्का कापुर वगैरे वस्तुंचा पाऊस पडू लागला. एक सुंदर असे भव्य पुष्पांकित विमान तयार करण्यात आले. टेकडी वरील समाधीची जागा महाराजांनी पूर्वीच शिष्य मंडळाना दाखवून ठेवली होती. सायंकाळ पासून लोकांनी दर्शन घेता घेता दूसरा दिवस उगवला. त्या नंतर तयार केलेल्या विमनातून समाधी कडे नेण्यासाठी महाराजांची स्वारी मठातून बाहेर पडली. पुष्कळ भजनाच्या दिंडया कर्तव्यकर्मात निमग्न होत्या. पुष्कळ मिस्लिम बांधव पवित्र कुराण वाचत होते. पाऊल ठेवण्यास रस्ता कोणास मिळेना. इतकी गर्दी झाली असून कुणी लोक सोन्या-रुप्याची फुले, कोणी चवल्या पवल्या, खारीक खोबरे असे उडवीत होते. भजनाच्या दिंडया व कुराण वाचन एकाचवेळी चालू होते. विमानासा सर्व जातीचे लोक खांदा देत होते. पुष्पांचे सडे पडत होते. मठातून समाधी टेकडी जवळ असता पोचण्यास ५-६ तास लागले. हिन्दू-मुस्लिम धार्मिक विधी व भजन, पठण आशा रितीने शिष्यानी महाराजांना गुहेत जड अंत:कारणाने ठेवले. प्रकाश झोत इतके तळपत होते की, रात्र का दिवस हेही कळत नव्हते. गुहेत आच्छादना साठी ८ पल्ले अंबीर, ४ पल्ले कपूर चारी बाजूस दाटीने अंथरण्यात आले. समोर पोथी ठेवली. दोन्ही बाजूस समया लावून ठेवण्यात अल्या. “श्री सद्गुरू जंगली महाराज की जय” असा जयघोषणा करून व आरती करून शिष्य मंडळी गुहेच्या बाहेर आली. त्या नंतर गुहेचे दार बंद करण्यात आले. महाराज निजानंद निमग्न झाले.
चैत्र शुद्ध चतुर्दशी हा महाराजांचा समधीचा दिवस. महाराज समाधिस्थ झाले त्या वेळी विमानपुष्पातून महाराज राहत असलेले मठ (रोकडोबा मंदिर) येथून टेकडी पर्यत नेहण्यात आले. आजही या दिवशी रात्री ८-९ वाजता महाराजांच्या रोकडोबा मंदिरात असलेल्या गादी मंदिरातील पादुका पालखीत ठेवून पालखी सोहळा काढण्यात येतो. महाराजांनी चालू केलेले भजन आज महाराजांच्या नावाने श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ हे मोठ्या श्रद्धेने, भावयुक्त अंत: कारणाने भजन करीत असतात. सोहळा हळूहळू पुढे सरकत असतो. पुणे व सबंध महाराष्ट्रातील भक्तजन या सोहळ्याला उपस्तिथी लावतता. सोहळा भजन करीत करीत समाधी मंदिरात साधारणता मध्य रात्री १-२ च्या सुमारास येतो. पालखीत असणाऱ्या महाराजांचे वस्त्र गलफ शाल, संदल, पुष्पांची जाळी, हार बुक्का, अंबीर या सर्व पूजा साहित्य ने महाराजांची षोडषोपचार पूजा करण्यात येते. यावेळी प्रचंड मोठे भजन चालू असते. भजनातून महाराजांनी रचलेली पदे, संवाद, फकिरके सवाल, अनेक प्रकार अत्यंत भारदस्त भजने होतात. पहणाऱ्यांचे व ऐकणाऱ्यांच्या कानाडोळ्याचे पारणेच फिटून गेल्याशिवाय राहत नाही. त्या नंतर पहाटे ५ सुमारास आरती होऊन पालखी पुन्हा रोकडोबा मंदिरात येते. ही प्रथा तेव्हा पासून आजतागायत गावातील भजनी मंडळ, भक्तमंडळीनी चालू ठेवली व या पुढेही ती तशीच राहील.
मातोश्री निजानंद स्वरूपी रखमाबाई गाडगीळ (आई साहेब)

श्री सद्गुरु जंगली महाराजांच्या मुख्य शिष्या मातोश्री निजानंद स्वरूपी रखमाबाई गाडगीळ (आई साहेब)

समाधी काल-शके माघ वाद्य षष्ठी १८२४ सन १७ फेब्रुवारी १९०३
कुरुंडवाडच्या राजदरबारी ख्यातनाम असणारे श्रीमंत विष्णुभट गाडगीळ यांचे चिरंजीव रामचंद्र यांच्या रखमाबाई गाडगीळ (आई साहेब) त्या पत्नी होत्या. लग्न झाल्या वर गर्भवती असतानाच त्यांच्या पतीचे देहांत झाले. पतीच्या निधना नंतर त्यांना मुलगा झाला जंगली महाराजांच्या दर्शनाला त्या दोन तीन वर्षाच्या धोंडो या त्यांच्या मुलाना घेऊन जात असत महाराजांच्या पुढे उभे राहताच अष्टसात्विक भाव उमलुन येत व कृतज्ञतेने हात जोडून पायी मस्तक लीन होत असे. एके दिवशी दर्शनाला आल्या असताना त्यंचा मुलगा धोंडो हात सोडून नदीच्या घाटावार गेला व घसरून नदीत पडला व मृत्यू पावला. महाराज लोकांच्या समाराधनेत गर्क होते. त्या वेळी रखमाबाई आपल्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन महाराजान कडे आल्या व ओक्साबोक्शी रडू लागल्या, महाराज त्यांना सांगत होते रडू नकोस! माझे गुरु तुझे रक्षण करतील! महाराज अंतरज्ञानी होते. महाराजांनी डोळे मिटून गुरुचे स्मरण केले श्री दत्त गुरुना प्रर्थाना केली. मग पुटपुटून अंगावर तीर्थ शिंपडले. धोंडो जागा झाला आई कडे धावत जाऊन मिठी मारली. आईला रडू आवरत नव्हते. समोरील जनताही स्फुंदत होती. सर्वान समोर घडलेला तो चमत्कार! रखमाबाई नी महाराजांचे चरण घट्ट धरले व म्हणाल्या ‘महाराज आता हे चरण मी कधी सोडणार नही, माला आपल्या बरोबर घेऊन चला. आजन्म मी आपल्या चरणसेवेशी रहीन’. ईशीत सिद्धिच्या जोरावर महाराजांनी ओळखले होते की याच स्त्री पुढे आपल्या पट्टशिष्य होणार.
महाराज रखमाबाईना आई म्हणून हाक मारू लागले. जन्म जन्मांतरीची तयारी पाहून पूर्णत्वाला नेण्याचा निश्चय केला. सुमारे बारा वर्षा पर्यन्त अनेक साधनांती उपदेश करून न कळत त्यांना साधन चतुष्टय संपन्न बनविले व आपुले समान करून टाकले. महाराजांची आई सहेबांनी खूपच एक निष्ठेने व मनोभावी सेवा केली होती. महाराज त्यांच्या वर खूप प्रसन्न होते. महाराजांनी त्यांची सर्व मालकी, समानसुमान व देखभालीचे अधिकार आईसहेबांना दिले. माघ वाद्य षष्ठी शके १८२४, फेब्रुवारी सन १९०३ रोजी आईसहेबांनी आपला देह ठेवला.

*संः-अनुजा ठोसर*


 

Leave a Reply

Your email address will not be published.