चैत्र कृष्णपक्षातील एकादशीला वरूथिनी एकादशी म्हणतात.

धर्मराजा म्हणाला की, “हे श्रीकृष्णा, वरुथिनी एकादशी व्रताचे माहात्म्य मला श्रवण करण्याची इच्छा आहे तरी ते कृपा करुन सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, “याबद्दल एक
पूर्वी घडलेली कथा आहे. तीच तुला सांगतो. नीट चित्त देऊन ऐक. हिमवान पर्वताला पार्वती नावाची एक मुलगी होती. ती साक्षात विश्वाची घडामोड करणारी आदिशक्ति होती. तिचे सदगुण व स्वरुप इतके सुंदर होते की व्यासासारखे सर्वज्ञ सुद्धा वर्णन करण्याला असमर्थ झाले, तिला पाहून तिच्या मातापित्याला अत्यंत आनंद होत असे. ती उपवर झाल्यावर हिमवानाने तिचा शंकराशी विवाह करण्याचे ठरविले.
हिमवंताचे घरी मोठ्या थाटाने लग्न सोहळा सुरु झाला. त्याकरिता देव, यक्ष किन्नर, गंधर्व फार काय सांगावे, इंद्र व प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा आले होते.त्या लग्न सोहळ्याचे वर्णन करण्याला शेष थकेल, सरस्वती दमेल, व गणराज आपले कलम खाली ठेवतील. पण असल्या थाटाच्या अवर्णनीय लग्नसोहळ्यात एक अदभुत प्रकार घडला. एकदा पार्वती शंकराचे मांडीवर बसली असताना ब्रह्मदेव तिच्याकडे टकलावून पापी नजरेने पाहू लागला. ब्रह्मदेवाचे ते निंद्य कर्म जेव्हा शंकराच्या नजरेला आले तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्रिशूलाने त्यांचे पांचवे मस्तक तोडले व आणखीही पुनःप्रहार करुन त्यांची राहिलेली मस्तके उडविणार तो इंद्रादिदेव मध्ये पडले आणि शंकराची प्रार्थना करुन म्हणाले की, “हे देवाधिदेवा महादेव ! विधीच्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा करा. आपण कृपेचे सागर आहांत. त्याचे एक मस्तक तोडून त्याला दिली इतकी शिक्षा पुरे झाली. याप्रमाणे देवांनी केलेली प्रार्थना ऐकून शंकर शांत झाले. व त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ब्रह्मदेवाचे एक मस्तक तोडल्यामुळे शंकराचे पाठीस ब्रह्महत्या लागली. त्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होऊ लागला. रात्रंदिवस त्यांना चैन पडेना. तेव्हा या पापातून मुक्त होण्याकरिता त्यांनी वरुथिनी एकादशीने व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) विधीयुक्त केले. पुढे त्या पुण्याच्या योगाने ती ब्रह्महत्या नाश पावून शंकराना सौख्य मिळाले.’ श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे वरुथिनी एकादशीचे व्रत करतील व त्याचे माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.’

चैत्र कृष्णपक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात

 

वरूथिनी एकादशी माहात्म्य

युधिष्ठिराने श्रीकृष्णाला चैत्र कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले. तेव्हा तो म्हणाला, “धर्मा ! या तिथीला वरूथिनी एकादशी म्हणतात. ही अत्यंत पवित्र असून व्रतकर्त्याच्या महापातकांचा नाश करून त्याला पावन करणारी आहे. ही सौभाग्य, ऐश्वर्य, इष्टभोग, इहपर सौख्य व गर्भवासातून कायमची सुटका करणारी अर्थात मोक्षदायिनी आहे. हिचे व्रताचरण करून मांधाता, धुंदुमारादी अनेक राजे स्वर्गलोकी गेले, भगवान शंकर ब्रह्मकपालापासून मुक्त झाले. दहा हजार वर्षे तपाचरण किंवा सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री विपुल स्वर्णदान केल्याने जे फळ मिळते तितकेच पुण्य हिच्या व्रताने मिळते. विद्वानांच्या मते अश्वदान, गजदान, भूमिदान, तिलदान, सुवर्णदान, अन्नदान, सालंकृत कन्यादान, सवत्स धेनुदान आणि विद्यादान ही दानाची वर चढत जाणारी श्रेणी आहे. वरूथिनी व्रत केल्याने विद्यादानाचे श्रेष्ठ फल मिळते. कन्याद्रव्यावर उपजीविका करणारे, कन्येचा मोबदला घेऊन तिचा विवाह लावून देणारे व लोभाने कन्याविक्रय करणारे प्रदीर्घकाळ नरकात जातात. त्यांना हीन जन्म प्राप्त होतात. पण जो मनुष्य कन्येला अलंकृत करून तिचे दान करतो ते अगणित पुण्य चित्रगुप्तालाही मोजता येत नाही. तेच पुण्य वरूथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्या मनुष्याला प्राप्त होते. या व्रतात दशमीला कांस्यपात्रात भोजन, मांस, मसूर, चणे, कोद्र, भाजी, मध, परान्न, दोनदा भोजन व मैथुन या दहा गोष्टी वर्ज्य कराव्यात. एकादशीला दंतधावन, तांबूल (विडा), निद्रा, द्यूतक्रीडा, क्रोध, कपट, असत्य भाषण, दुसऱ्यावर दोषारोप करणे आणि पतितांचा संपर्क या गोष्टी वर्ज्य कराव्यात. तर द्वादशीला कांस्यपात्र, मांस, मसूर, मध, व्यर्थ भाषण, व्यायाम, प्रवास, दोनदा भोजन, परा्न, हजामत, तेल लावणे व मैथुन या गोष्टी वज्ज्य कराव्यात. जो मनुष्य हे सर्व नियम पाळून वरूथिनीच्या दिवशी उपोषण, जनार्दन पूजन, भजन व जागरण करतो आणि द्वादशीला यथायोग्य सांगता करतो; तो पापमुक्त होऊन परम गती प्राप्त करतो. हे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने सहस्र गोदानाचे फल मिळते. त्या भाविकाला विष्णुलोक प्राप्त होतो.”

श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णाप्रती। हे कृपाळू जगजेठी । चैत्र कृष्ण पक्षात कोणती। एकादशी ती येते ।।१।। सांग आम्हांला तिचे नाव । कळू दे महिमा ब्रतप्रभाव । तुझ्या मुखाने शब्दवैभव । स्रवता चित्त सुखावते ।।२| श्रीकृष्ण बदला धर्मासी। चैत्र कृष्ण एकादशी। परम पावन या तिथीसी । ‘वरुूथिनी’ म्हणतात ।।३|| = आता हिच्याविषयक। विशेष माहिती सांगतो ऐक। व्रत आचरिता निरंतर सुख । प्राप्त होते ऐश्वर्य ।|४ । तिथी असे ही पापनाशक । इहपरलोकी सौभाग्यदायक । समस्त जनांसी उपकारक । भुक्तिमुक्तिप्रदायिनी ।।५।। कुणी एखाद्या अभागिनीने । व्रत आचरिले श्रद्धेने । तरी वरूथिनी कृपेने । भाग्य तिचेही उजळते ।।६।। अजब किमया या तिथीची। दुरिते जळती मनुष्यांची । पुनरपि गर्भवासाची भीती न उरते किंचित ||७|| वरूथिनी व्रत आचरुनी। मांधाता गेला स्वर्गभुवनी। धुंघुमारादी अन्य नृपांनी। तेच ईप्सित साधले ।।८।। हिच्या कृपेने शिव भगवान । मुक्त ब्रह्मकपालापासून । आजही अनुभवती जन। प्रभाव थोर अलौकिक ।।९।। दश सहस्त्र संवत्सर । तपश्चर्या करुनी कठोर। जे फल मिळवितो नर । तो श्रेष्ठ त्रयभुवनी । ॥ १० ।। परंतु त्याच बरोबरीचे । फल वरूथिनी एकादशीचे । यावरून या तिथीचे । महत्त्व आगळे जाणावे ।११ |। कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात । स्वर्णदानाचे पुण्य अगणित । परी तितकेच सहजप्राप्त । वरूथिनी व्रत केल्याने ।।१२।। जो मनुष्य श्रद्धावान । करितो आदरे व्रताचरण । तो इहपरलोकी संपूर्ण । पावतो इच्छित सं पुण्यफल।। १३।। हे धर्मा नृपश्रेष्ठा। यावरून बोध घ्यावा पुरता । वरूथिनीची महानता। पू. तीही सांगतो तुजलागी ।।१४।। अश्वदानाहून गजदान। त्याहून ज्येष्ठ भूमिदान । त्याहीपेक्षा तिलदान। अतिवरिष्ठ जाणावे ।।१५।। अत्युत्तम ते सुवर्णदान । त्याहून श्रेष्ठ अन्नदान । – त्याचा प्रभाव विलक्षण । न भूतो न भविष्यति ।।१६।। कारण मनुष्य देव पितरांची । तृप्ती अन्नदानेच साची । अनेक ग्रंथांमधून याची। महती विशेष सांगितली ।।१७।। विद्वान म्हणती अन्नदानाहून । कन्यादान ते महान । गोदानही त्यासमान । श्रीविष्णूंनी सांगितले ।।१८।। ही समस्त दाने उत्तम । त्यात विद्यादान सर्वोत्तम । कारण याच योगे परम। कल्याण होते जीवाचे ।। १९ ।। विद्यादानाच्या बरोबरीचे । फल वरूथिनी एकादशीचे । माहात्म्य या तिथीचे । असे विशेष यापरी।।२०।। जो पातकी मोहित होऊन । कन्याद्रव्यावर करितो गुजराण । त्याची अधोगती निश्चित जाण । भोगतो नरक भयंकर ।।२१।। म्हणुनी जाणत्या मनुष्याने । कन्यावित्तास स्पर्श न करणे । पालनपोषण आदराने । करावे कुलस्त्रियांचे ।। २२ ।। जे कोणी लोभी दुष्ट मती । कन्या विकुनी धन मिळविती। ते मार्जार होउनी पुढती। भोगताती कर्मफळे ।।२३|| गृहस्थे वर्तावे सावधान । व्यवहारी निजकर्तव्य जाणून । आपुलेच धन खर्चून । करावे कन्यादानाते ।।२४।। त्या पुण्यासी नाही गणती। चित्रगुप्तही नत त्यापुढती। होय तितकीच फलप्राप्ती । वरूथिनी व्रत केल्याने ।।२५। । येथे व्रतकत्यासी आवश्यक। अशा गोष्टी सांगतो ऐक । साध्या सरळ परिणामकारक । महत्त्वपूर्ण असती त्या ।।२६।। कांस्यपात्रात भोजन करणे । वा दुसर्यांदा जेवणे । किंवा परान्न सेवन करणे। सर्वथैव टाळावे ।।२७।। भक्षू नये चणे मसुरा मांस। भाजी कोद्रू मध वर्ज्य व्रतास । टाळावे मैथुन, स्त्रीसंगास। अनुकूल होऊ , नये ।।२८।। ही निषिद्ध कर्मे दश । करू नये दशमीस । अन्य दिनी एकादशीस । पुढील वर्तन टाळावे ।।२९।। या दिनी द्यूत खेळणे । अथवा निवांत निद्रा घेणे । दात घासणे विडा खाणे। आदी गोष्टी करू नये ।। ३० ।। रागावणे वा खोटे बोलणे। दोषारोप वा कपट करणे। पतिताशी भाषण करणे । हेही त्याज्य जाणावे ।।३१|| काही नियम द्वादशीचे । तेही सांगतो येथ साचे । आचरणाने व्रतकत्त्याचे । होय कल्याण निरंतर ।|३२।। या दिनी कांस्यपात्री भोजन । मद्य मांस वा मसुरा सेवन । व्यायाम प्रवास खोटे भाषण । आदी गोष्टी करू नये।।३३। पुनर्भोजन व परान्न भक्षण । परनिंदा वा वृथा भांडण । হमश्रुकर्म आणि मैथुन। पूर्ण निषिद्ध समजावे ।।३४|| श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत ।। भूलोकी जे नरश्रेष्ठ । विधीनुसार हे व्रत । आचरती ते धन्य पां ।।३५|| कारण वरूथिनी एकादशी। अशा पुण्यवान भक्तांसी। जाळुनी त्यांच्या पापराशी । देते अक्षय मोक्षपद ।।३६।। या परमपावन तिथीस। जागरण करुनी रात्रीस। भावे भजता जनार्दनास। भाग्योदय तो होतसे ।।३७।। भगवत्कृपे ते भक्त । पावती सर्व इष्टार्थ सुखी होउनी जीवनात । जाती अंती वैकुंठी। । ३८।। म्हणुनी सूर्यसुत यमराजाची । भीती जया मनी कायमची । त्यांनी प्रयत्नपूर्वक साची । आचरावी वरूथिनी ।।३९।। थोर माहात्म्य = या तिथीचे । त्याच्या श्रवण पठणे साचे। फल सहस्र गोदानाचे। प्राप्त होते भाविका ।।४०।। तोही सर्व पापांपासुनी। जनार्दनकृपे मुक्त होउनी। अति श्रेष्ठ विष्णुस्थानी। वास करितो निरंतर ।।४१ ।।

।। इति श्रीभविष्योत्तरपुराणे चैत्रकृष्णैकादश्याः वरूथिनीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।

।। श्रीकृष्णार्पणमस्तु॥ शुभं भवतु !


.
मित्रांनो एकादशीचा जन्म रात्रीचा आहे त्यामुळे एकादशीच्या रात्री भगवद्भक्ती चे कोणतेही साधन अंगीकारून भगवंतांच्या चिंतनात काल घालवणे अतिपुण्यदायक असते. एकादशीच्या व्रताचे पारणे द्वादशीस दिवसा करावे.

ब्रह्मज्ञानी श्री सुतमुनी ब्रह्मवृन्दांना संबोधित करताना सांगतात कि ,
१] चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहणातील स्नान
२] अन्नदान अथवा जलदान
३] सुवर्ण दान
४] भूमिदान
५] कन्यादान
६] अश्वमेध आदी महान यज्ञ
७] चारधाम सारख्या मोठ्या तीर्थयात्रा

या महान पुण्यकारक गोष्टींपेक्षाही मोठे पुण्य एकादशीच्या व्रताने मिळते.

Redbus

२] एकादशी व्रताचे महत्त्व
================

अ. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे
पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च ।
एकादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।
[ पद्मपुराण ]

अर्थ : अनेक सहस्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे ६ १/४ प्रतिशत इतकेही महत्त्व नाही.
===
एकादशी केल्याने साधकाच्या साधनेतील बाधा नाश पावतात.

मनाचे पावित्र वाढते .बुध्दी सात्विक होते.

शरिरातील रक्त शुध्दी होते जे अपवित्र अन्न खाल्याने अशुध्द झालेले असते.

यश आल्याने धन प्राप्ती होते.

साधनेसाठी दृढ श्रध्दा व विश्वास निर्माण होतो.आपल्या सांगण्यावरुन कोणी एकादशी केली तर सांगणारा आर्धे फल प्राप्त होते.

एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते,नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.

एकादशीला हरीवासार म्हटले आहे, हरिवासार म्हणजे श्रीहारींचा दिवस! आजचा दिवस श्रीहारींसाठी आहे. त्यामुळे खाणे-पिणे बंद, केवळ हरींचे भजन, हरींचेच स्मरण, हरिनामाचा जप, हरींसाठी रात्रीचे जागरण, हरिकथा श्रवण, केवळ हरीच संपूर्ण एकादशी व्रत आहेत.

Image 28 - Tukaram maharaj

समस्त वेद शास्त्रांचे सर आपल्या अभंगातून सांगताना संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात-

ज्यासी नावडे एकादशी। तो जिताची नरकवासी।।
ज्यासी नावडे हे व्रत। त्यासी नरक तोही भीत॥
ज्यासी घडे एकादशी। जाणे लागे विष्णुपाशी।।
तुका म्हणे पुण्यराशी। तोचि करी एकादशी।।

“ज्याला ही एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणी नरकाचा रहिवासी आहे. ज्याला हे वर्त आवडत नाही, त्याला नरकसुद्धा घाबरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो, त्याला निश्चित वैकुंठाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गतजन्मात पुण्यराशी गोळा केल्या आहेत, तोच एकादशी व्रताचे पालन करतो.”

प्रत्येक मासातून येणाऱ्या दोन्ही एकादशीना भोजन न करण्याचे उल्लेख शास्त्रांमध्ये आहेत. त्याचे सार श्री तुकाराम महाराजांनी पुढील प्रमाणे सांगितले आहे-

एकादशीस अन्नपान। जे नर करती भोजन।।
श्वान विष्ठेसमान। अधम जन ते एक ॥
तया देही यमदूत। जाले तयाचे अंकित।।
तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलिया।।

“जे लोक एकादशीस अन्न भक्षण करतात, भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण ते जे भोजन करतात ते कुत्र्याच्या विष्ठेसमान असते. जो हे व्रत करीत नाही, त्याच्यासाठी यमदूत आहेतच, तो त्यांचा अंकित होतो, म्हणजे तो नरकवासी होतो.”

पंधरा दिवसा एक एकादशी ।
कां रे न करिसी व्रतसार ।।1।।

काय तुझा जीव जाते एका दिसे ।
फराळाच्या मिसे धणी घेसी ।।2।।

स्वहित कारण मानवेल जन ।
हरिकथा पूजन वैष्णवांचे ।।3।।

थोडे तुज घरी होती ऊजगरे ।
देऊळासी कां रे मरसी जाता ।।4।।

तुका म्हणे कां रे सकुमार झालासी।
काय जाब देती यमदूता ।।5।।

एकादशी व्रत सोमवार न करिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।6।।

काय करुं बहू वाटे तळमळ ।
आंधळी सकळ बहिर्मुख ।।7।।

हरिहरासी नाही बोटभरी वाती।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।8।।

तुका म्हणे नाही नारायणी प्रिती ।
कोण त्यांची गती होईल नेणो ।।9।।

एकादशीस अन्नपान। जे नरकरिती भोजन ।अधम ते जन एक।।
ऐका व्रताचे महिमान । नेमे आचरती जन । गाती ऐकती हरिकिर्तन। ते समान विष्णुशी ।।
अशुध्द विटाळशीचे खळ। विडा भक्षिती तांबूल। सापडे सबळ काळाहाती ना सुटे ।।

शेज बाज विलास भोग ।
करिती कामिनीचा संग ।
तयाजोडे क्षय रोग ।
जन्मव्याधि बळवंत ।।

आपण न वजे हरिकिर्तना ।
आणिका वारी जाता कोणा ।
त्यांचे पापा जाणा ।
ठेंगणा तो महामेरु ।।

तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलिया ।।

करविता व्रत अर्ध पुण्य लाभे।
मोडविता दोघे नरका जाती ।
शब्दबुध्दी होय दोघा एक मान ।
चोरासवे कोण जीव राखे ।

आपुले देवूनि आपलाचि घात।
नकरावा थीत जाणोनिया ।
देवुनिया वेच धाडी वाराणसी
नेदावे चोरासी चंद्रबळ।

तुका म्हणे तप तिर्थ व्रत याग।
भक्ती हे मार्ग मोडू नये ।

छत्रपती श्री शिवरायांना उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतात-

आम्ही तेणे सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखि॥
तुमचे येर वित्त धन। जे मज मृतिके समान॥
कंठी मिरवा तुळशी। व्रत करा एकदशी॥
म्हणावा हरिचे दास। तुका म्हणे मज हे आस॥

” अहो, शिवराय, आपण मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ. आपली धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यात तुळशी माल घालून ते भूषण म्हणून लोकात मिरवा आणि एकादशी व्रताचे पालन करा. स्वतःला हरींचे दास म्हणवून घ्या, हीच माझी एकमेव इच्छा आहे.”
—————————————————————————————————

३]  शास्त्रानुसार एकादशी व्रत कसे करावे ?
========================

एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला फक्त एक वेळ जेवण करावे. एकादशीला उपवास करावा. संपूर्ण दिवस धार्मिक ग्रंथांचे वाचन, सज्जनांचा सहवास, भजन, कीर्तन अथवा नामस्मरण अशा चांगल्या कृत्यात घालवावा.

दूसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा म्हणजेच पारणे करावे. शक्य असल्यास उपवास सोडताना अतिथीलाही भोजन द्यावे.अन्नदान करावे.

द्वादशीलाही एकच वेळ जेवण करावे. या सर्वांमुळे वृत्ती शांत, समाधानी आणि आनंदी राहण्यास मदत होते.
शरीराचे आरोग्य आणि मनाची शुद्धी या दोन्हीसाठी एकादशीचे व्रत लाभदायक असते.

एकादशी हे महाव्रत असल्याने जे हे करतात त्यांची पितृपिडा कमी होते, नातलगातील प्रेत पिश्चाच योनीतील जीवांना मुक्ती मिळते.

Image 10C -shri vishnu

 

 

 

Urban Ladder

Leave a Reply

Your email address will not be published.