श्रावण कृष्णपक्षातील एकादशीला अजा एकादशी म्हणतात.
 

श्रीकृष्ण म्हणाले की, “आता तुला अजा एकादशी व्रताचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी अयोध्येत सूर्यवंशातील वशिष्ठाचा शिष्य हरिश्चंद्र नांवाचा राजा राज्य करीत होता. तो चक्रवर्ती असून धार्मिक व अत्यंत सत्यनिष्ठ होता. त्याला तारामती नावाची एक महान पतिव्रता बायको व रोहिदास नांवाचा एक चिमुकला सदगुणी गोजिरवाणा मुलगा होता. एकदा नारदांनी इंद्रसभेत त्याच्या सत्यनिष्ठेबद्दल स्तुतिस्तोत्रे गायली. नारदमुनिच्या मुखातून आपल्या शिष्यांची सत्कीर्ति ऐकून वशिष्ठाचे प्रतिस्पर्धि जे विश्वामित्र त्यांना अत्यंत वाईट वाटले ते म्हणाले की, “या इंद्रसभेत हरिश्चंद्राची स्तुतिस्तोत्र गाण्याइतका काही तो सत्यनिष्ठ नाही. हे। मी तुम्हाला थोड्याच दिवसात दाखवितो आणि असे जर मी न दाखवीन तर आजपर्यंत मी केलेले सारे तप त्याला अर्पण करीन. ” विश्वामित्राचे ते भाषण ऐकून वशिष्ठ म्हणाले की, “खरोखरच तो सत्यनिष्ठ आहे. नारदांनी त्या सत्यनिष्ठतेबद्दल जी स्तुतिस्तोत्रे गायली त यथायोग्य आहे. माझी खात्री आहे की, राजा हरिश्चंद्र सत्यनिष्ठेपासून | रतिमात्र ढळणार नाही, आणि जर ढळला तर मी पंचमहापातकी ठरेन. सभा बरखास्त झाली वशिष्ठ अनुष्ठानाला बसले. विश्वामित्र पृथ्वीवर आला, आणि त्याने मायेच्या योगाने अयोध्येजवळ अंसख्य वाघ सोडले

ते लोकांना अत्यंत त्रास देउं लागले. तेव्हा राजा हरिश्चंद्र त्यांचा संहार करु लागला. संहार करीत वनांतून हिडत असताना, विश्वामित्रांने मायेने उत्पन्न केलेले एक सुंदर उपवन त्याने पाहिले. विश्रांति घेण्याकरिता आत गेला. तेव्हा तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. तेथे त्याने क्षणभर शयन केले. तो त्याला विश्वामित्राला सर्व राज्यदान केल्याने स्वप्न पडले. ते विश्वामित्राने मायेने पाडले होते.

थोड्याच वेळात राजा जागा होऊन उठून बसला. तो विश्वामित्र एका दरिद्री ब्राह्मणाचे सोंग घेऊन त्याच्या पुढे आला आणि औट भार सुवर्ण दक्षिणा मागू लागला. राजाने त्याला आपल्याबरोबर घरी नेले व औटभार सुवर्ण त्याच्या पुढे ठेविले. ब्राह्मण संतापून म्हणाला की, माझेच द्रव्य मला देतोस काय? तूं स्वप्नात ज्याला सर्व राज्य दान दिलेस तोच मी आहे. हीच का तुझी सत्यनिष्ठा ?” ब्राह्मणाचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की, “महाराज ! माझ्या हातून पापचरण घडत होते पण आपण त्यातून मला वाचवले आणि माझा नरकवास चुकविला.”

राजाच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्या ब्राह्मणाने आपले औट भार सुवर्ण देण्याचा तगादा लाविला आणि शेवटी सांगितले की, “तू व तुझी बायको आणि मुलगा असे तुम्ही तिघेजण माझ्या राज्यातून निघून गेले पाहिजे. माझ्या राज्यातील कोणत्याही वस्तुवर इतकेच नव्हे तर तुम्हा तिघांच्या अंगावरील वस्त्रालंकारावर सुद्धा तुमचा हक्क नाही.

ब्राह्मणांचे ते भाषण ऐकून त्या तिघांनी लज्जा रक्षणापुरती वसे अंगावर ठेवून राजा म्हणाला की, “हे ब्राह्मणा ! सात दिवसांचे आत तुझी औटभार सुवर्णाची दक्षिणा आमच्या राज्याबाहेर वाराणशी क्षेत्री आम्ही आपल्याला विकून तुला देऊ. ते तिघेजण वाराणशी क्षेत्राला जाण्याला निघाले. वनांतून पायीच मार्ग आक्रमण करु लागले. विश्वामित्राने मायेच्या योगाने त्यांच्या आसपास समुद्र कढण्यासारखे, शेषाचा माथा पोळण्यासारखे प्रखर उन पाडले. वारा बंद केला. पाणी नाहीसे केले. तिघांना अत्यंत तृष्णा लागली. मुखे म्लान

झाली. पाऊल उचलेनासे झाले. त्यात रोहिदास बाळाचा कंठ पाणी – मिळाल्यामुळे सुकला. तोंडातून शब्द निघेना. जीव कासाविस होऊ लागला अखेर जमिनीवर उन्हातच निचेष्ट होऊन पडला. तारामती त्याची आई गन है पडून रडू लागली. हरिश्चंद्राच्याहि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या या दुःखी स्थितीत विश्वामित्राने मायेच्या योगाने त्या वनाला आ लाविली. अग्निच्या ज्वाळा भडकू लागल्या. धुरांचे लोट पसरु लागले. अखेर त्यांच्या सभोवतालचा सर्व प्रदेश धुराचे लोटाने भरुन गेला कोणी कोणाला दिसेना हरिश्चंद्र व तारामती यांची ताटातूट झाली. तारामती हरिश्चंद्राचा हंबरडा फोडीत हांक मारुन शोध करु लागली आणि रोहिदासापासून दोन पावले पुढे सरकली तो तोहि तिला दिसेना. काही वेळाने तो अग्नि विझला. सुदैवाने त्या संकटातून ती वाचली. जेव्हा त्या तिघांची एके ठिकाणी भेट झाली तेव्हा त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठ्या मारल्या. अशाच प्रकारची आणखी काही संकटे विश्वामित्राने मायेच्या योगाने ती वाराणशी क्षेत्राला जाईपर्यंत त्यांच्यावर उत्पन्न करुन त्यांना सत्यापासून
ढळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ती रतिमात्रसुद्धा ढळली नाहीत. वाराणशी क्षेत्राला आल्यानंतर ती आनंदीत होऊन विश्वेश्वराची पुजा करु लागली तेव्हा तेथे एक ब्राह्मण आला आणि आपली औटभार सुवर्ण मुद्रा दक्षिणा मागू लागला.

पुजा झाल्याबरोबर हरिश्चंद्र आपणाला विकत घेण्याविषयी लोकांना विचारु लागला. तेव्हा विश्वामित्र नांवाच्या एका ब्राह्मणाने तारामतीस एक भार सुवर्ण देऊन विकत घेतली, आणि तिला घेऊन चालला. तेव्हा रेहिदास तिच्याकडे दीन वदनाने पाहू लागला. ते पाहून तिच्या अंतःकरणात कालवाकालव सुरु झाली. अखेर डोळ्यात अश्रु आणून ती त्या ब्राह्मणाला विनवून म्हणाली की, “महाराज ! मी तुमची धर्मकन्या आहे तरी कृपा करुन माझी व माझ्या वासराची ताटातूट करु नका. तारामतीची ती दीनवाणा ऐकून त्या ब्राम्हणाने पुन्हा अर्धाभार सुवर्ण देऊन रोहिदासास विकत घेतले

आणि त्या मायलेकरांना घरी घेऊन गेला. पुढे हरिश्चंन्द्राला एका वीर बाहू नांवाच्या चांडाळाने दोन भार सुवर्ण देऊन विकत घेतले. अशा रितीने स्वतःला व आपल्या बायकोला आणि मुलाला विकून आलेले औटभार सुवर्ण हरिश्चन्दाने त्या ब्राह्मणास दक्षिता म्हणून दिले. आणि पाया पडून सांगितले की, “महाराज ! आता आनंदाने अयोध्येला जाऊन राज्य करा. ब्राह्मणाने दक्षिणा घेतली आणि तेथून निघून गेला.

इकडे त्या वीर बाहू चांडाळाचे हरिश्चन्द्र पाणी आणण्याचे काम करु लागला. पण विश्वामित्रांच्या कपटामुळे चांडाळाला त्याचे काम पसंत पडेना म्हणून त्याने त्याची स्मशान राखण्याच्या कामावर नेमणूक केली. आणि सांगितले की, द्रव्य घेतल्याशिवाय कोणाच्याही प्रेताला जाळू देऊ नकोस. अशा रितीने राजा आपला काळ दुःखद स्थितीत कंठित असताना एके दिवशी गंगेच्या काठावर त्याची आणि गौतम ऋषीची गांठ पडली. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करुन आपली सर्व दुःखद स्थिती सांगितली, तेव्हा गौतमऋषीना त्याची दया येऊन ते म्हणाले की, “राजा ! जर तू अजा एकादशीचे व्रत करशील तर तुझी ही दुःखद स्थिती नाहीशी होऊन तूं आपल्या पूर्वपदाला जाशील. पुढे राजाने अजा एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात
सांगितल्याप्रमाणे) विधियुक्त केले. धर्मराजा म्हणाला की, “हे श्रीकृष्णा ! तारामती आणि रोहिदास यांची त्या ब्राह्मणाचे घरुन कोणत्या पुण्याई जोरावर सुटका झाली हे कृपा करुन सांगा. श्रीकृष्ण म्हणले की, “हे धर्मराजा ! तारामती विश्वामित्र ब्राह्मणाचे घरी दळण, कांडण वगैरे नाना प्रकारची कामे करीत असे. एके दिवशी विश्वामित्राने आपल्या शिष्याना वनातून दर्भ, समिधा, कमळ आणावयास सांगितली. त्या मुलांबरोबर गोहिदासहि गेला. मुले वनात पोचली तेथे कुणी तुळम्री, कुणी दर्भ, कुणी समिधा तोडू लागली. रोहिदास जवळ असलेल्या सरोवरातील कमले तोडू लागला. एका कमळात विश्वामित्राने मायेच्या योगाने एक सर्प बसविला. ते कमल रोहिदास तोर लागला तोच आत असलेल्या सर्पाने त्याला डंख मारिला. रोहिदास घाबरला आणि आक्रोश करुन रडू लागला. तो आक्रोश, ते रडणे ऐकून ती सर्व मुले त्याच्याभोवती जमतात न जमतात तोच तो मूर्छित होऊन तळ्याचे कांठाशी पडला. थोडयाच वेळात झेंडू फुटून त्याचा प्राण गेला. प्राण. जाताना त्याने तारामतीला आई म्हणून हाक मारली.
मुले रडत रडत विश्वामित्राचे घरी आली आणि तारामतीला रोहिदास सर्प चावून मेल्याचे सांगितले. आपला मुलगा सर्प चावून मरण पावल्याची बातमी ऐकताच ती धाडकन जमिनीवर पडली आणि देवा! कोण हा मजवर प्रसंग आणिलास या आंधळीच्या हातातील काठी हिरावून नेलीस, माझ्या मुखातला घास काढून घेतलास, माझ्याविषयी तूं इतका निष्ठुर का झाला ? आजपर्यंत मी कोणाचा घात पातहि केला नाही. असे असताना माझ्यावर का कोपलास ? बाळा ! राजसा देव कोपला म्हणून तूहि मला टाकून गेलास ना ! असा नाना प्रकारचा विलाप करुन रडू लागली. अखेर तिला मूर्छा आली.

थोड्याच वेळात सावध झाली आणि ज्या ठिकाणी तळ्याचे काठाशी रोहिदास तिचा मुलगा पडला होता त्या ठिकाणी गेली. तेथे तो दिसताच तिने त्याला मांडीवर घेतले. त्याच्या अंगावर पदर टाकला आणि त्याच्याकडे पाहून रडू लागली. क्षणाक्षणाला त्याचे मुख कुरवाळून मुका घेत असे आणि लाडक्या राजहंसा ! एकदा तरी माझ्याकडे डोळे उघडून पहा. एखादा तरी शब्द बोल, असे म्हणून हंबरडा फोडित असे. बरीच रात्र झाल्यावर तेथे विश्वामित्र ब्राह्मणाचे सोंग घेऊन आला. आणि तिला म्हणाला की, “आता शोक आवरुन या मुलाला आताचे आता जाळून टाक. सूर्योदय झाला म्हणजे चांडाळ लोक द्रव्य घेतल्याखेरीज या मुलाला जालू देणार नाही. असे तिच्याशी बोलून त्याने तिच्या जवळील ते प्रेत घेतले व तिच्यासह तो स्मशानाजवळ गंगातीरी गेला. तेथे त्याने सर्पण जमा करुन चिता रचली,
तीवर त्या प्रेताला ठेवून अग्नि लावला आणि तो निघून गेला.

चिता पेटली तेव्हा तिला रडू कोसळले. मोठमोठ्याने आक्रोश कर लागली. तो आक्रोश ऐकून वीरबाहू चांडाळाने स्मशानात राखण्यास ठेवलेला हरिश्चन्द्र तेथे धावत आला आणि द्रव्य दिल्याशिवाय येथे प्रेत जाळता येत नाही. असे म्हणत ती नुकतीच पेटलेली चिता पाण्याने विझविली. त्या हरिश्चन्द्राला ही आपली बायको तारामती आहे व तारामतीला हा आपला नवरा हरिश्चन्द्र आहे असे समजले. तेव्हा दोघांना मुलाच्या मृत्यूबद्दल अत्यंत दुःख झाले. त्या शोकभरात हरिश्चन्द्र वीर बाहू चांडाळाकडे आपल्या मुलांचे प्रेत जाळण्याकरिता परवानगी मागण्याला गेला.
इकडे पुन्हा विश्वामित्र रुप पालटून तिच्याजवळ आला. आणि म्हणाला की; “येथे फार डाकिणी आहेत. कदाचित त्यातील तुला एखादी खाऊन टाकील. करिता तुझा नवरा परत येईपर्यंत हे प्रेत घेऊन या जवळच्या देवळात बैस डाकिणीच्या भितीमुळे ती देवळात जाऊन बसली. तेथे तिला तिच्या आजपर्यंत घडलेल्या दुःखद स्थितीची आठवण झाली. आणि बेशुद्ध होऊन पडली. ही संधी साधून विश्वामित्राने ते प्रेत फाडले आणि त्याचे रक्त मास तिच्या तोंडाला व अंगाला लावून देवळात इतस्ततः विखरले नंतर तो गांवाबाहेरच्या देवळात कोणी एक डाकीण, मुले खात बसली आहे. असे ओरडत वेशीतून गांवात चालला.

वेशीत वीरबाहू चांडाळ बसला होता. त्याच्या कानी ही बातमी पडतांच तो आणि त्याचे अनुयायी तिला मारण्याकरिता धांवत आले. त्यांनी तिचे केस धरुन तिला बाहेर ओढून काढली. थोड्याच वेळात गांवातील बरेच लोक जमले आणि हरिश्चंन्द्रही तेथे आला.

शेवटी तिला मारुन टाकावे असा सर्वांनी निश्चय केला. त्याप्रमाणे चांडाळाने हरिश्चन्द्राला तिला मारण्याची आज्ञा केली. हरिश्चन्द्राने शस्त्र घेऊन घाव घालण्याकरिता हात वर केला.
यावेळी ती मनात जगन्नायाकाचा धावा करु लागली. देवाला तिची दया येऊन व हरिश्चन्द्र राजाच्या अजा एकादशीच्या पुण्याईमुळे भगवान तेथे एकदम प्रगट झाले. आणि हरिश्चन्द्राचा हात वरच्यावर धरला. रोहिदासाला कृपादृष्टीने उठविले रोहिदास उठताच आपल्या आईला तारामतीला भेटला. तिचा आनंद गगनात मावेना. देवाने त्या तिघांना हृदयाशी धरले. तेव्हा देव आकाशातून पुष्पवृष्टी करीत तेथे आले. त्यांत वसिष्ठ होते त्यांनी हरिश्चन्द्राला हृदयाशी धरले इतक्यात तेथे विश्वामित्र आले आणि त्यांनी आपल्या साऱ्या तपश्चर्येचे पुण्य हरिश्चन्द्राला अर्पण केले. पुढे हरिश्चन्द्राला, तारामतीला आणि रोहिदासाला मोठ्या थाटाने अयोध्येत नेलें व हरिश्चंनद्राला सिंहासनावर बसविले.’ जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. अजा एकादशीच्या व्रताच्या पुण्याईचे जोरावर आपली बायको तारामती व पुत्र रोहिदास यांच्यासह अयोध्येत आनंदाने व सुखाने राज्य करू लागला. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! कोणी हे अजा एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.

श्रावण कृष्णपक्षातील एकादशीला अजा एकादशी म्हणतात.

अजा  एकादशी माहात्म्य 

श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णासी । आता श्रावण कृष्ण एकादशी । हिच्या उत्तम माहात्म्यासी। कथन करी निजकृपे ।।१ ।। तो वदला धर्मा ऐक। महती सांगतो विस्तारपूर्वक । तिजविषयीचे कथानक । श्रवण करी आदरे ।।२ ।। श्रावण कृष्ण एकादशी। जाळिते समस्त पातकराशी । अशा प्रसिद्ध या तिथीसी। ‘अजा’ म्हणती नृपवरा ।।३।। भावे पूजुनी हृषीकेशाते । जो आचरितो या व्रताते । त्याचे जीवन सफल होते। सर्वार्थाने जाणावे ।।४।। कारण अजासमान श्रेष्ठ । करील इहपरलोकी हित । ऐसी अन्य तिथी सांप्रत । नाही विश्वामाजी या ।।५॥ हे असे मम सत्यवचन । आता सांगतो कथा पावन । हरिश्चंद्र नामक जाण। होता नृप तो सद्भावी ।।६।। सत्यवचनी धर्मनिष्ठ । चक्रवर्ती उदार शीलवंत । कर्मयोगे झाला राज्यभ्रष्ट । गेले वर्चस्व सर्वही ।।७।। पुढती ऐसी स्थिती आली ।। पुत्र भार्या तीही विकली। नृप असुनी त्या वेळी । दास जाहला डोंबाचा ।।८।। होता श्रेष्ठ सामर्थ्यवान । तरी सत्त्वाते सांभाळून। पडतील ती कामे करून। मालकाते तोषवी ॥९।॥। कधी जाउनी मसणवटीत । मृतांची वस्त्रेही आणावी लागत । तरी अपार सोसुनी कष्ट । करी चाकरी नेमाने ।।१० । राजा असुनी पुण्यवंत । हीन अवस्था झाली प्राप्त । त्याही प्रतिकूल स्थितीत । नच सोडिले ब्रीदाते ।।११।। निजदेहाते कष्टवीत । दुःखाचे कढत आवंढे गिळीत । अवहेलना सहन करीत । अनेक वर्षे * घालविली ।॥ १२ ॥ पुढती अगदीच निरुपाय झाला । काय करावे कळेना त्याला । अहर्निश चिंतेने व्यापला। चैन पडेना त्यालागी।|१३|। तधी एकांती चिंतन करीत । म्हणे काय हे मम भाग्यात । कोणत्या उपाये महासंकट । जाउनी सुटका होईल ।।१४।। याप्रमाणे एके दिनी। अति व्यथित असता मनी । अवचित त्या स्थळी कुणी । गौतम ऋषी पातला ।। १५।। हरिश्चंद्राची दुर्गती पाहुनी। मनी कळवळला तो मुनी। दुःख जाणून घ्यावे म्हणुनी। गेला सहजी त्यापाशी ।।१६।। तधी कुणी द्विजश्रेष्ठ । सन्मुख उभा पाहुनी तेथ । क्षणार्धात जोडले हात । आदरे त्या नृपवरे ।।१७ ।। मग जनहितास्तव भले । ज्याते ब्रह्मदेवे निर्मिले । त्या गौतमापाशी केले। उघड आपुले मनोगत ।। १८ ।। दुःखद वृत्तान्त सांगितला । तेणे ऋषीते गहिवर आला । आश्चर्य व्यक्त करुनी त्या वेळा । केला एकादशी उपदेश ।। १९ । वदला सद्भावे हे महीपती । श्रावण कृष्ण एकादशी तिथी । ‘अजा’ नामे । प्रसिद्ध जगती। असे पुण्यदा कल्याणी ।।२०।। व्रत आचरिता भाव धरूनी। जातील पातके अवधी जळुनी। तुझ्या भाग्याने आजपासुनी। सातव्या दिवशी येतसे ।।२१।। या दिनी करावे उपोषण । आणि रात्र समरी जागरण । ऐसे करिता व्रताचरण । पापक्षय तो होईल ।।२२।। राजा ऐक माझे म्हणणे । आज तुझ्याच पुण्याईने| येथे सहजचि घडले येणे। आता सुदिन येतील ।।२३।। अशा प्रकारे युक्ती सांगून । मुखे वदला आशीर्वचन । आणि त्याचा निरोप घेऊन। अंतर्धान पावला।। २४।। ऋषिवचनी विसंबुनी । राये केले व्रत त्या दिनी । तेणे समस्त पापे जळुनी। झाला निर्दोष तत्काळ ।।२५।। तयालागी जे पातक । छळणार होते वर्षे अनेक । ते समस्त भोग भयानक । गेले व्रतप्रभावे या ।।२६॥ दुरित निरसले क्षणार्धात । राव झाला दुःखरहित । पुढती पत्नीची होउनी भेट । उठला मृत पुत्रही ।।२७।। तधी समस्त सुरवरांनी । दुंदुभी वाजविल्या स्वर्गभुवनी । आणि पुष्पवृष्टी करुनी। तोषविले तयाते ।। २८।। अजा नामक एकादशीचे । माहात्म्य यापरी आहे साचे । पुनरपि निष्कंटक राज्याचे । प्राप्त झाले स्वामित्व ।।२९।। त्याने आपुल्या कारकीर्दीत। राज्य केले धर्मयुक्त । तेणे पौरजन समस्त । सुखी समृद्ध जाहले।।३०।।अंतकाळी सर्व प्रजाजन । यांनाही आपुल्यासमवेत घेऊन। हरिश्चंद्रे केले प्रस्थान । गेला स्वर्गलोकी तो ॥३१॥ युधिष्ठिरा जे सज्जन । करितात हे व्रत पावन । तेही पापमुक्त होऊन। भोगतात स्वर्गसुखे ।।३२।। अपार महिम्न या तिथीचे । कथा श्रवण पठणे साचे । फल अश्वमेध यज्ञाचे । प्राप्त होय त्या नरा ।।३३।।

।। इति श्रीब्रह्माण्डपुराणे श्रावणकृष्णैकादश्याः अजानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

शुभं भवतु !

 


 

Leave a Reply

Your email address will not be published.