जगद्-गुरू आद्य शंकराचार्य जयंती – लेखक सुजीत भोगले Mandar Sant May 9, 2019 दिनविशेष आदि शंकराचार्यांची आज जयंती. त्यांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणाम. बौद्ध आणि जैन मताच्या प्रभावाने सत्यसनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी नष्ट करून अद्वैत सिद्धांत पुनः स्थापित करून देवपंचायतन पूजा पद्धती सामान्य जनांना प्रदान करून भक्तीमार्गावर दृढ करणारे आचार्य सर्वकाल वंदनीय रहातील. चिंतनातून ज्ञानप्राप्ती हे वेदांचे सूत्र कालौघात क्षीण पडले. यज्ञ हाच उपासना मार्ग होऊ लागला. भ्रमित झालेले सामान्य जन यज्ञ, त्यातून निर्माण झालेले कर्मकांड आणि पशु हत्या याने त्रासला. राजांना सुद्धा आर्थिक दृष्ट्या न झेपणारे खर्चिक यज्ञविधी सामान्य लोकांना धर्माच्या पासून दूर नेऊ लागले. याच कालखंडात गौतम बुद्धाने यज्ञ आणि यज्ञ हिंसा यांचा निषेध करत परत एकदा चिंतनातून ज्ञानप्राप्ती हा मार्ग समाजाला पुनः सांगितला. हे कार्य धर्माला आलेली यज्ञ आणि कर्मकांड रुपी ग्लानी नष्ट करणारे होते म्हणून आचार्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित केले. गौतम बुद्धाने जरी चिंतनातून ज्ञानप्राप्ती हा मार्ग सांगितला तरी सुद्धा त्याची वैचारिक बैठक हि निराशावादी आणि समाजाला कर्तव्य विन्मुख करणारी, संपूर्ण समाजाला संन्यासधर्माकडे लोटणारी होती. पुरेसे वैराग्य जागे न होता घेतलेला संन्यास हा अनाचाराला जन्म देणारा ठरला होता. समाजाचा समतोल ढासळू लागला होता. बुद्ध भिक्कू आपल्या मताच्या प्रचारासाठी वेदातील निवडक ऋचा या बुद्धाची वचने म्हणून बिनदिक्कत पणे प्रसारित करू लागले होते. त्याच वेळेला आपले मत अधिकाधिक राजांनी आणि समाजाने स्वीकारावे या अट्टाहासापायी त्यांनी वेदनिंदा करण्यास सुरुवात केली होती. दुसर्या बाजूला जैन मत सुद्धा याच मार्गाचा अवलंब करून सत्य सनातन वैदिक धर्माला उखडून टाकण्याचा प्रयत्न करू लागले होते. जैन मत हे वेदातील विचार स्वतःचे म्हणून जसे प्रसृत करत तसेच ते तांत्रिक अंगाने सुद्धा अधिक समृद्ध होते आणि त्यामुळे त्यांचा तत्काळ प्रभाव निर्माण होत असे. हि दोन्ही वैचारिक आंदोलने सत्य सनातन धर्माला दोन्ही बाजूने नष्ट करण्याच्या प्रयत्नात होती. यांचा प्रतिवाद करण्याच्या ऐवजी सत्य सनातन धर्माचे अनुयायी यज्ञसंस्कृतीच्या जोडीला द्वैतमताला शरण गेले होते. समाज मूर्तीपूजा प्रधान होऊ लागला होता. त्यात सुद्धा पाच मुख्य मते प्रचलित झाली होती. शैव , वैष्णव, गाणपत्य, शाक्त आणि निसर्गपूजक सूर्योपासना करत होते. जोडीला कापालिक आणि इतर वाममार्ग उपासक सुद्धा होतेच. धर्मावर येणारे आक्रमण ठामपणे परतवून लावण्याच्या साठी धर्म शुद्धी आवश्यक होती. धर्माला आलेली ग्लानी नष्ट करणे आवश्यक होते. आपल्या धर्मात घुसलेल्या चुकीच्या रूढी, परंपरा यांचे जोखड फेकून देणे त्याचा कायमचा त्याग करणे अत्यावश्यक होते. परंतु धर्म मार्तंड म्हणवले जातील असे सगळे लोक मात्र द्वैतवादाच्या आहारी जाऊन आपले आपले संप्रदाय राखत आपल्या भोवती स्तुतिपाठक जमा करून आलेला दिवस ढकलत होते. त्यांचे हे वर्तन सत्य सनातन धर्माचा शेवट घडवू शकले असते परंतु स्वार्थाने बद्ध झालेली ती मने समजून घेण्याची पात्रता सुद्धा गमावून बसली होती. प्रत्येक विचार, प्रत्येक मत मांडणारा व्यक्ती हा निःसंशय ज्ञानी होता. प्रकांड पंडित होता पण तो स्वार्थाने लिप्त होता. तो केवळ आपल्या पायाच्या पुरता विचार करणारा होता. आणि त्यामुळे बौद्ध मताचे किंवा जैन मताचे आव्हान समजून घेण्याची त्याची बौद्धिक कुवत नष्ट झाली होती. भारतभूमीवरील राजे एक तर जैन किंवा बौद्ध धर्म स्वीकारत आहेत आणि त्यामुळे वैदिक धर्माचा पायाच नष्ट होतो आहे. राजाश्रय नसेल तर धर्म अधिक काळ टिकणे शक्य होत नाही. हे सत्य उमजून घेण्याची त्यांची वैचारिक क्षमताच नव्हती. सत्य सनातन वैदिक धर्माचा या मुळे संकोच होतो आहे. द्वैत मत अधिकाधिक प्रसृत करताना आपण सांगत असलेले कर्मकांड सामान्य लोकांना धर्माच्या पासून विन्मुख करते आहे हे मान्य करण्याची त्यांची तयारीच नव्हती. जोडीला माझी उपास्य देवता हि सर्वश्रेष्ठ आहे हा अहंकार होता. मग शैव मताचे साहित्य, श्लोक , स्तोत्रे लीला या सगळ्या स्वरूपात केवळ आणि केवळ शिवस्तुती करणारे लेखनच करत होते. तेच साहित्य प्रसारित होत होते. तोच प्रकार इतर उपासकांच्या बाबतीत सुद्धा चालू होता. मग नृसिंह अवतार विष्णूचा प्रसिद्ध आहे म्हणून त्याला प्रत्युत्तर म्हणून शरभ अवतार सुद्धा प्रसवला गेला. माझी उपास्य देवता हेच परब्रह्म आहे आणि इतर सर्व देवी देवता त्याच्या चरणी लीन आहेत हे पाचही संप्रदाय आणि जोडीला अजूनही भिन्न भिन्न मार्गाने उपासना करणारे वामाचारी अहमहमिकेने मांडत होते. आपापसातील या लढाया. हो शैव आणि वैष्णवांच्यामध्ये युद्धे सुद्धा झालेली आहेत केवळ हे ठरवण्याच्या अट्टाहासात कि माझी उपासना तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझा देव तुझ्या पेक्षा श्रेष्ठ आहे. हे सगळे आपापसातील भांडण पूर्ण ताकदीने लढले जात होते आणि सत्य सनातन धर्माची अनंत शकले होतील का अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. हे कमी होते म्हणून बौद्ध आणि जैन मत धर्माच्या पायाला अर्थात वेदांच्या सिद्धांतांना उखडून टाकणारी विचार प्रणाली रुजवत होते. वेदातील आपल्याला हव्या असणाऱ्या ऋचा काढून त्याचा आपल्याला हवा असणारा अर्थ लावून तो आमचा विचार आहे सांगितले जात होते आणि त्याच ऋचांचा संदर्भ वापरून वेदांची निंदा सुद्धा यथेच्छ केली जात होती. एकीकडे शैव आणि वैष्णव होऊन राजे मंडळी सत्य सनातन धर्माच्या पासून नाळ तोडून बसली होती आणि दुसरीकडे जे राजे जैन आणि बौद्ध मत स्वीकारत होते तिथे त्या धर्माचे भिक्कू वैदिकांची सरसकट कत्तल करण्यास त्या राजांना उद्युक्त करत होते. या सगळ्या निराशाजनक स्थितीत आदि शंकराचार्यांचा जन्म झाला. त्यांना करायची असणारी कार्ये काय होती ? अनंत संप्रदायात विखंडीत झालेल्या आपल्या धर्म बांधवांना आपल्या धर्माचे मूळ तत्व समजावून सांगणे. अद्वैत सिद्धांताशी सगळ्यांना एकरूप करणे. आणि त्यानंतर संप्रदाय वादाचा त्याग करून सत्य सनातन वैदिक धर्मात पुन्हा एकदा लीन करणे. हे कार्य करताना आचार्यांनी आपली अमोघ वाणी, शास्त्रांचा परिपूर्ण अभ्यास, तैलबुद्धी आणि प्रकांड पांडित्य पणाला लावून या सगळ्या संप्रदायी मंडळीना शास्त्रार्थात पराभूत केले. त्या नंतर त्यांना अद्वैत सिद्धांत स्वीकारायला लावला. पण प्रत्येक संप्रदायाच्या व्यक्तीची आपल्या इष्ट देवतेवरील भक्ती अशी क्षणात शून्य होऊ शकत नाही हे समजून त्यांनी देव पंचायतन पूजा पद्धती रूढ केली आणि सगळ्यांनी ती स्वीकारली पाहिजे हे आग्रहाने प्रतिपादन केले. याचा मुख्य लाभ प्रत्येक व्यक्तीला त्याचा इष्ट देव नित्य सेवेस/ उपासनेस प्राप्त झाला. परंतु त्याच वेळी इतर चार देवतांची सुद्धा तो उपासना करू लागला. त्याची श्रद्धा आणि भक्ती त्यांच्या चरणी सुद्धा स्थित होऊ शकली आणि त्या मुळे अन्य साम्प्रदायांशी असणारे वैर कायमचे गाडले गेले. द्वैतात असणारी सगळी मंडळी त्यांनी शास्त्रार्थ करून पराभूत करून अद्वैतात आणली आणि त्यातून द्वैतमताचा प्रभाव नष्ट केला. पण जे द्वैती अद्वैत स्वीकारतात त्यांचा शिरोमणी असणारा मंडन मिश्र त्याचे रुपांतर आचार्य सुरेश्वराचार्य म्हणून घडवतात आणि त्यांना पहिल्या मठाची जबाबदारी देतात. या पद्धतीचे भिन्न मताच्या व्यक्तींना आदर देण्याचे कृत्य आचार्यांना मोठे आदराचे स्थान मिळवून देते. याचा लाभ होऊन सगळी भिन्न मताची मंडळी आचार्यांच्या मार्गावर येतात त्यांच्या चरणी लीन होतात. सत्य सनातन वैदिक धर्माची हि होऊ पाहणारी शकले या मार्गाने आचार्यांनी बंदिस्त केली. वामाचारी मंडळीना शाक्त उपासनेत स्थिर केले. त्यांच्या उपासनेतील वामाचार हा सन्मार्गावर आणण्याची पद्धती विकसित केली. कापालिक आणि अन्य वामाचारी संप्रदाय सुद्धा आचार्यांनी शास्त्रार्थात पराभूत केले आणि त्यांना बऱ्याच त्याज्य उपासनांचा त्याग करायला लावला. काही उपासना आणि काही संप्रदायांना समाजापासून विन्मुख राहून उपासना करण्यास प्रेरित केले जेणेकरून त्यांच्या मार्गाकडे लोक आकृष्ट होऊन त्यांचे अधःपतन होणार नाही. भविष्यातील धर्मावरील सशस्त्र आव्हानांचा विचार करून नागा साधूंची परंपरा विकसित केली जेणेकरून सर्व संग परित्याग केलेले हे धर्मयोद्धे भविष्यातील हिंदू धर्माच्या वरील आक्रमणे आपल्या परीने उलथून देतील. या नंतर त्यांनी जैन आणि बौद्ध मताला शास्त्रार्थ करून पराभूत केले. बौद्ध धम्माचा तर त्यांनी या पातळीवर जाऊन अभ्यास केला आणि मग बौद्ध मताला पराभूत केले कि बौद्ध भिक्कू त्यांचा उपहासाने उल्लेख प्रच्छन्न बुद्ध असा करू लागले. जैन आणि बौद्ध मताला पराभूत करून त्यांचा राजाश्रय नष्ट केला आणि या धर्मांना त्यांनी संकुचित स्वरूपात या देशात अस्तित्व राहील याची काळजी घेतली. बौद्ध धाम्मिय भिक्कुंना शास्त्रार्थात पराभूत करणारे आचार्य मात्र बुद्धाच्या चिंतनातून ज्ञान या मार्गाचा मात्र यथोचित आदर करतात आणि गौतम बुद्धाला ते विष्णुपद देतात हे त्यांच्या दिलदार प्रवृत्तीचे द्योतक आहे. एकंदर आदी शंकराचार्य धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा नीटनेटकी बसवतात. धर्माला आलेली ग्लानी पूर्ण नष्ट करतात. भक्तिमार्ग प्रशस्त करतात. त्याला मंत्र तंत्र आणि यंत्र तिन्ही मार्गांनी सामन्यांच्या साठी उपास्य करतात. श्लोक आणि स्तोत्रांच्या रूपाने सामान्य नागरिकांना सहज आणि सोपे ज्ञान धन देतात जे त्यांची सहज आत्मिक प्रगती घडवू शकेल आणि उपास्य देवतेच्या गुणवैशिष्ट्यांच्यासह त्यांना त्याच्याशी एकरूप करू शकेल. देव पंचायतन पूजा पद्धती देऊन प्रत्येक घरात सुद्धा सर्व विचारांचे आणि ईश्वरी शक्तींचे पीठ राहील याची काळजी घेतात. हे सगळे कार्य आचार्य आयुष्याच्या केवळ ३२ वर्षांच्या कालखंडात पार पाडतात. त्यात ते आसेतु हिमाचल दोन वेळेस पायी परिक्रमा करतात. तत्कालीन संन्यास धर्माच्या कठोर नियमांचे पूर्ण पालन करतात. भारतातील सगळ्या प्रमुख प्राचीन धर्मस्थळांना भेटी देतात. तेथील ईश्वरी शक्तीशी क्षणार्धात तादात्म्य पावून तिच्या स्तुतीपर श्लोक किंवा स्तोत्र रचतात ते सुद्धा इतके चपखल कि आजही तो श्लोक किंवा स्तोत्र ऐकले तर या पेक्षा काही अधिक वर्णन करणे अशक्य आहे याची आपल्याला जाणीव होते. आचार्य फक्त अद्वैत प्रतिपादन करत नाहीत तर ते अद्वैत अक्षरशः जगतात. आचार्यांचे आयुष्य या एका श्लोकात बद्ध केले आहे. “अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान भाष्यं द्वात्रिशे मुनीरभ्यगात” सारेच विलक्षण सारेच अद्भुत आणि तरीही ते प्रत्यक्ष घडलेले. वेद काळाच्या नंतर मला आदि शंकराचार्य हा व्यक्ती परिपूर्णतेचा मापदंड वाटतो आहे. ज्याने शास्त्र पूर्ण पणे आत्मसात केली. जो प्रकांड पंडित आहे ज्ञान सूर्य आहे पण तो रुक्ष नाही तर अत्यंत रसिक आहे कलासक्त आहे त्यांचे प्रत्येक श्लोक आणि स्तोत्रे याची ग्वाही देतात. स्वतः बाल संन्यासी असणारे आचार्य सौंदर्यलहरी मध्ये ज्या रसिकपणे शिवपार्वतीच्या मिलनाचे वर्णन करतात ते वाचून आपण थक्क होतो आणि सरतेशेवटी आचार्य हि पुस्ती सुद्धा जोडतात आपल्या धर्मपत्नीच्या सह हे सुख अनुभवा. आयुष्याला परिपूर्णत्व हे चारही आश्रमांचे पालन करूनच येते हे बाल संन्यासी असणारे आदि शंकराचार्य इतक्या सुंदर पद्धतीने समजून सांगतात कि वाचून आपले मन तृप्त होते. आयुष्याच्या सर्व सुखांचा आणि दुख्खांचा अनुभव घ्या. तृप्त व्हा त्यातून तुमचे वैराग्य जागे होऊ दे. सश्रद्ध असा. भक्तीच्या मार्गावर चाला तुमचा इष्टदेव / देवता तुमचा पुढील मार्ग प्रशस्त करेल हे ठामपपणे सांगणारे आचार्य आपण कधी समजूनच घेतले नाहीत. त्यांना समजून घ्यायची पात्रता ज्ञानेश्वरांच्या शिवाय कोणीच कमवू शकला नाही आणि त्यामुळे आपल्या धर्माचे आणि समाजाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. जर आचार्यांचे विचार नंतर येणारे धर्ममार्तंड, संत आणि गुरु पचवू शकले असते तर आपल्या कडे स्त्रियांची अशी दारुण अवस्था कधीच होऊ शकली नसती. आचार्यांनी चांडाळाच्या चरणी लोळण घेऊन त्याला गुरु करून घेणे जर आपला समाज समजू शकला असता तर आपल्या कडे अस्पृश्यता अभिशाप होऊन समाजाचे दोन भाग करूच शकली नसती. ज्या स्वार्थी द्वैतवादाला, संप्रदायवादाला आचार्यांनी परिपक्व पणे शमवले आणि तत्कालीन त्या संप्रदाय प्रमुखांना अद्वैताकडे आणले पुढे त्यांचेच अनुयायी स्वार्थाच्या पोटी परत एकदा उफाळून वर आले आणि त्यांनी पुन्हा हिंदू समाजात शकले घडवली. जैन आणि बौद्ध मत स्वतःच्या कर्माने उच्च पदाला पोचले आणि आपल्याच कर्माने पुन्हा पुन्हा नामशेष झाले. परंतु त्यांच्या अतिरेकी अहिंसेच्या मुळे आपल्यावर परतंत्र येऊ शकले. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा आपल्या देशात प्रवेश होऊ शकला. केवळ स्वार्थ प्रधान मानून कार्यरत असणाऱ्या सगळ्याच प्रवृत्ती आचार्यांच्या नंतर पुन्हा प्रबळ होत गेल्या आणि त्यांनी वारंवार हिंदू धर्माला ग्लानी आणली. संत ज्ञानेश्वरांच्या मुळे महाराष्ट्र मोठा काल या सगळ्या द्वेषपूर्ण विचारसरणी पासून मुक्त राहून भागवत धर्माच्या छायेत सुखात राहिला. आदि शंकराचार्यांच्या कार्याला आपण अभिवादन कसे करू शकतो ? त्यांच्या चेतनेचे आपण स्मरण कसे करू शकतो ? याचे एकच उत्तर आहे आपल्याला आज आपल्याकडे बोकाळलेल्या संप्रदायवाद, द्वैतवाद, भोंदू गुरु परंपरा यांना कायमची मुठमाती द्यावी लागेल. देव पंचायतन हि पूजा पद्धती परिपूर्ण आहे. शिव आपल्याकडे निर्गुण ब्रह्म आणि आदिगुरु मानला गेला आहे. त्यामुळे जे कोणी कोणत्याही गुरूची उपासना करत असतील त्यांनी शिवाच्या उपासनेस प्रारंभ करून गुरु उपासना रुपी द्वैताचा त्याग केला पाहिजे. विष्णू हा पालनकर्ता ईश्वर आहे. त्याची सगळी रूपे हि पूज्य आणि वंदनीय आहेतच. परंतु विष्णू किंवा त्याच्या अवताराच्या उपासनेत स्थिर होणे आणि द्वैतभावाचा त्याग करून एका कोणत्यातरी विष्णू रुपात स्थिर होणे आवश्यक आहे. देवी हे सर्वसमावेशक आदिमायेचे प्रकट रूप आहे. तीच महाकाली आहे , तीच महालक्ष्मी आणि तीच महासरस्वती. नाम गुण आणि कार्य भिन्न आहे पण शक्ती तत्व एकच आहे. तिला भिन्न रुपात पाहण्याचा द्वैत भाव लोप पावून आपल्या इष्ट देवतेच्या रुपात हे सगळे गुण स्थित मानून तिची उपासना करणे आवश्यक आहे. गणपती हि विद्येची ज्ञानाची देवता आहे. विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य अश्या गणपतीची उपासना सुद्धा वरदायी रुपात करणे हे आवश्यक आहे. सूर्य नारायण हा संपूर्ण सृष्टीचा पिता आहे त्याच्या शिवाय आपण आपल्या अस्तित्वाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. म्हणून सूर्याची उपासना हि एक प्रकारे संपूर्ण सृष्टीची निसर्गाची उपासना आहे. या पंचायतन देवांची उपासना हि भक्तिमार्गाने विश्वातील सगळ्या चर आणि अचर शक्तींची उपासना आहे. मग यात तुमचा कुलदेव किंवा कुलस्वामिनी जी असेल तिचे स्वरूप या पैकी एक असेल मग त्या शक्तीतत्वाची त्या रुपात उपासना करा अन बाकी चार आपल्याला इष्ट रुपात उपासना करा. देव पंचायतन हि एक प्रकारे पंचमहाभूतांची उपासना सुद्धा आहे. या पंचायतन शिवाय आपल्याकडे अन्नपूर्णा या सहाव्या ईश्वरी तत्वाची उपासना केली जाते. ती घरातील गृहिणी जी आपली क्षुधा आणि तृष्णा तृप्त करते म्हणून ती उपास्य आहे. गृहलक्ष्मीचे उपास्य रूप म्हणजे अन्नपूर्णा आहे. फक्त हि उपासना पद्धती स्वीकारून आणि अन्य सगळ्या उपासना पद्धतींचा त्याग करून आपण आचार्यांना खरी आदरांजली वाहू शकतो. कारण ज्यावेळी आपण हे देव पंचायतन स्वीकारू आपण संप्रदायवाद आणि द्वैतवादाच्या पासून मुक्त होऊ. आपला संपूर्ण हिंदू समाज पुनः एकजिनसी होऊ शकेल आणि मग भविष्यात उभे राहणारे आणि आत्ता सुद्धा उभे राहिलेले इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचे आव्हान आपण सक्षमपणे पेलू शकू. प्रत्येकाने याचा शांतपणे विचार करावा हि विनंती. आचार्यांवर सुरेश्वराचार्यानी रचलेल्या या श्लोकाने मी या लेखाचा शेवट करतो. आरात ज्ञानगभस्तिभिः प्रतीहृतश्चन्द्रायते भास्करः | तस्मैशंकरभानवे तनुमनोवाग्भिर्नमः स्यात सदा || अर्थात ज्याच्या दूरवरून आलेल्या ज्ञानकिरणांच्या तेजस्वीतेमुळे सूर्यदेखील चंद्रासारखा मंद दिसतो आहे. त्या शंकर ( आचार्य ) रुपी सूर्याला तन , मन आणि वाचा यांनी नमन असो. धन्यवाद. ©सुजीत भोगले. o Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website