मोहरा इरेला पडला !
===============
‘’तोफेच्या तोंडी माते बांधोनी उडवा हाते !
शिर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडू द्या त्याते !
प्रिय असेन मी तुम्हाते पुरवा अंतिम इछेते !
ती निर्वाणीची वाणी डोळ्याला आले पाणी !
प्रत्येक वदे गहिंवरुनी !
‘इर्ष्येस’ वीर हा चढला, मोहरा इरेला पडला !!”
या काव्यपंक्ती आहेत कै दु.आ.तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते या पुस्तकातील आणि वसईच्या दुर्धर रणप्रसंगावर आधारित एका स्फूर्तीगीतातील !
या गीताचे चरित्रनायक आहेत रणझुंजार श्रीमंत चिमाजीअप्पा पेशवे !
पोर्तुगीजांविरुद्ध चालविलेला वसईचा संग्राम अखेरच्या टप्प्यात आला असताना विजयश्री मराठ्यांना हुलकावणी देत होती. पोर्तुगीजांना उत्तर फिरांगाणातून हुसकावून लावायचेच हा मराठ्यांचा संकल्प त्यामुळे सिद्धीस जात नव्हता.
अश्यावेळी चिमाजी आप्पांनी आपल्या सैन्यासमोर आवेशपूर्ण आणि निर्वाणीचे भाषण केले की ‘तुम्हाला जर हा कोट घ्यायला जमत नसेल, तर या तोफेच्या समोर मला उभे करा आणि माझे मस्तक तरी निदान वसईच्या कोटात जाऊन पडेल अशी व्यवस्था करा.’ चिमाजी आप्पांचे ते खडे बोल ऐकून एकूण एक मराठा खवळला.परिणामस्वरूप एकच एल्गार करून व पराक्रामची शर्थ करून त्यानी अखेर वसईच्या कोटावर भगवा फडकवलाच. तो दिवस होता फिरंगी दिनांक १२ मे १७३९ !
आजच्या दिवशी त्या रोमहर्षक प्रसंगाची विशेषे करून आठवण होण्याचे कारण म्हणजे वसईच्या मोहिमेचा सूत्रधार आणि नायक चिमाजी अप्प्पा पेशवे यांचा आज, म्हणजेच दि १७ डिसेंबर २०१७ रोजी २७७ वा स्मृतिदिवस आहे.
वसई विजयानंतर केवळ काही महिन्यातच फिरंगी दि १७ डिसेंबर १७४० रोजी समरांगणात आपल्या दिव्य आणि तेज:पुंज शौर्याने लखलखणारा मराठेशाहीचा हा तेजस्वी तारा निखळून पडला. चिमाजी अप्पांचे निधन झाले त्यावेळी ते पुण्यातच होते .पुढे पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या काठावर त्यांची समाधी उभारली गेली.
चिमाजी आप्पांची सर्वसामान्य माणसाला असलेली ओळख म्हणजे त्यानी दुर्दम्य इच्छाशक्तीने वसईच्या रणसंग्रामात मिळवलेला विजय आणि त्यातून वसई, साष्टी आदी उत्तर फिरंगाणातील हिंदू प्रजेची जुलमी पोर्तुगीज राजवटीतून केलेली मुक्तता! दुर्दैवाने ही ओळख इतकीच सिमित आहे. परंतु चिमाजी आप्पांच्या कार्य-कर्तृत्वाचा अवाका आणि प्रचंड विस्तार पाहिला की मन विस्मयचकित होते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या लेखातून त्यांच्या निधड्या छातीच्या पराक्रमाची गाथा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
चिमाजी अप्पानी स्वपराक्रमाच्या आणि कुशल युद्धनेतृत्वाच्या जोरावर अनेक रण-मैदाने गाजविली. हा रणशूर योद्धा आपल्या मोठ्या भावाच्या म्हणजेच प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांच्या तोडीस तोड होता. चिमाजी आप्प्पानी वसईच्या संग्रामात विजयश्री मिळवली तेव्हा त्यांचे वय केवळ २८ वर्ष होते.
चिमाजी अप्पांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बाजीरावाप्रमाणेच सतत घोड्यावर मांड टाकून हिंदुस्थानभर अविश्रांत घोडदौड केली. युद्धकौशल्य, लढाईतले डावपेच आणि असामान्य शौर्य यात चिमाजी अप्पा अत्यंत निष्णात होते. वीर चिमाजी आप्पांचे आपल्या सैनिकांवर निरातिशय प्रेम होते. आपल्या सैन्याची कमीत कमी हानी कशी होईल याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष असे. त्यामुळे त्यांच्या स्वाऱ्यामध्ये त्यांना सोबत करणारे शिंदे, होळकर, गायकवाड आदी सरदार आणि सामान्य सैनिक त्यांना देवासमान मानीत असत. मराठ्यांच्या सैन्यात म्हणूनच चिमाजी अतिशय लोकप्रिय होते.
अत्युच्च दर्जाच्या रणकौशल्या समवेत मनाचा मोठेपणा, उदारता आणि प्रगल्भ सहिष्णुता त्यांच्या ठायी वसली होती. या गुणविशेषाचे एक ठळक उदाहरण येथे देणे अप्रस्तुत ठरणार नाही.
फिरंगी दि २४ जानेवारी १७३९ या दिवशी सकाळी घनघोर आणि तुंबळ युद्धाची शर्थ करून तारापूरचा किल्ला चिमाजी आप्पांनी जिंकून घेतला. या युद्धात किल्ल्याचा पोर्तुगीज किल्लेदार लुईस व्हेलेझो मारला गेला. कोटातील एकूण एक माणसाना कैद करण्याची आज्ञा चिमाजी आप्पांनी आपल्या सैन्याला दिली. त्यानुसार ४००० जणांना कैद झाली आणि त्यात युद्धात मारला गेलेल्या किल्लेदाराची बायकोसुद्धा होती. आपल्या पतीवरील प्रेमापोटी ही पोर्तुगीज स्त्री शेवटपर्यंत कोटात किल्लेदाराबरोबर होती. अटक झाल्यावर या किल्लेदार पत्नीने चिमाजी आप्पांकडे तिच्या नवऱ्याची अंतिम व्यवस्था त्यांच्या धर्मानुसार व्हावी अशी विनंती केली. तेव्हा मोठ्या उदार मनाने चिमाजी अप्पांनी ती मान्य केली आणि इतकेच नव्हे तर शत्रूच्या अटकेत असलेल्या सर्व सैनिकांना त्यांच्या दर्जानुसार वागणूक द्यावी व कोणत्याही प्रकारे त्यांना उपसर्ग होऊ नये अशी सक्त ताकीदही आपल्या सैनिकांना दिली.
पाराभूत शत्रूच्या स्त्रिया आणि धर्माचा आदर करण्याच्या या चिमाजी आप्पांच्या कृतीचा आणि दिलदार मनोवृत्तीचा पोर्तुगीज इतिहासकारांनी मुक्त कंठाने गौरव केला आहे.
हिंदुस्तानच्या इतिहासात नेत्याच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाजी महाराजांचे चारित्र्य निष्कलंक होते आणि त्यामुळेच ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. चिमाजी आप्पांची तारापूरच्या युद्धातील वरील कृती, ते शिवरायांच्या थोर परंपरेचे पाईक होते हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.
बाजीराव पेशवे या आपल्या थोरल्या बंधुप्रमाणेच चिमाजीअप्पा अतिशय शूर आणि मुत्सद्दी होते. बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिमुकल्या स्वराज्याचे साम्राज्यात परावर्तन करण्याचा विडा उचलला होता. या महान राष्ट्रकार्यात चिमाजी आप्पांनी बाजीरावांना त्यांना कायम सावलीप्रमाणे साथ दिली आणि ते कार्य पुढे रेटण्यास सहाय्य केले.
खऱ्या कार्यकर्त्याला आणि सैनिकाला विश्रांती, थांबणे माहित नसते. चिमाजी आप्पांची प्रकृती तोळामासाची होती. असे असूनही ते सतत आपल्या थोरल्या बंधू प्रमाणेच स्वारी-शिकारीत अखंड कार्यरत होते.
स्वराज्यवृद्धी, हिंदुपदपातशाहीचा विस्तार आणि आपल्या थोरल्या भावाची सतत पाठराखण यासाठी चिमाजी अप्पांनी आपले अवघे आयुष्य पणाला लावले. बाजीराव आणि चिमाजी आप्पा हे दोघे बंधू इतके एकविचाराने वागत की, शत्रूला दोन बाजीराव सगळीकडे संचार करीत आहेत की काय, असा भास व्हावा.
सततच्या युद्धमोहिमात भाग घेऊनही कमालीची निर्भयता, साहसी वृत्ती आणि सळसळते चैतन्य हा चिमाजी अप्पांचा स्थायीभाव होता हे प्रकर्षाने जाणवते. आपल्या थोरल्या भावाच्या म्हणजेच बाजीरावांच्या मृत्युनंतर अवघ्या काही महिन्यातच चिमाजी आप्पा निवर्तले.
‘राष्ट्र प्रथम’ या उच्च भावनेने प्रेरित झालेली राम आणि लक्ष्मणासारखी ही दोन्ही भावंडे म्हणूनच महाराष्ट्राला ललामभूत आहेत.
अश्या या नरशार्दुलाचा थोडक्यात कालपट असा आहे.
• जन्म सन १७०६ साली झाला.
• दि ६ ऑक्टोबर १७१८ हुजुरची मुतालकी मिळाली
• दि १७ एप्रिल १७२० या दिवशी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रे मिळाली
आणि चिमाजी अप्पाना ‘पंडितराव’ ही पदवी व सरदारकी मिळाली.
• दि २९ नोव्हेंबर १७२८ च्या आमझेरा लढाईत गिरीधर बहाद्दर व दयाबहाद्दर यास ठार
केले.
• सन १७३० चिमाजी अप्पा उदाजी पवार समवेत गुजरात मोहिमेत
सामील
• दि.२० ऑक्टोबर १७३२ रोजी ग्वाल्हेरच्या स्वारीवर रवाना.
• दि १६ एप्रिल १७३६ चिमाजी अप्पा कुलाबा मोहिमेवर रवाना
• दि १९ एप्रिल १७३६ रेवस जवळ युद्धात सिद्दी सातला चिमाजी ठार
मारतात.
• दि २६ फेब्रुवारी १७३७ चिमाजी आप्प्पानी अटेर व भदावर लुटले.
• दि २२ मार्च १७३७ चिमाजी साष्टीच्या मोहिमेवर रवाना.
• दि २६ मार्च १७३७ साष्टी जिंकले
• दि ५ ऑक्टोबर १७३७ बाजीरावांसमवेत भोपाळ मोहिमेवर रवाना.
• दि २७ नोव्हेंबर १७३७ तापीच्या दक्षिणेस रहिमानखानास मारले.
• दि २६ नोव्हेंबर १७३८ चिमाजी अप्पा वसई मोहिमेवार निघाले
• दि १२ मे १७३९ वसईची मोहीम फत्ते
• फेब- मार्च १७४० नासीरजंगची भेट
• दि २५ जून १७४० चिमाजी अप्पा रेवदंडा जिंकतात
• दि १७ डिसेम्बर १७४० चिमाजी अप्पांचा पुण्यात देहावसान
चिमाजी आप्पांच्या कारकीर्दीचा असा धावता आढावा घेतला तरी त्यांच्या क्षात्रतेजाची कल्पना येते.
शत्रूपक्षाच्या सेनापती किंवा प्रमुखाला ठार मारले की राहिलेल्या सैन्याचे मनोधैर्य खच्ची होते. चिमाजी अप्पांनी हीच नीती त्यांच्या बहुतांश संघर्षात वापरलेली दिसते. गिरीधर बहाद्दर, दयाबाहद्दर, सिद्दी सात, पेड्रो डिमेलो, लुईस व्हेलेझो आणि वसईचा किल्लेदार कॅप्टन मार्टिन सिरवेल अश्या शत्रूंच्या नामांकित सेनानींचा चिमाजी अप्पांनी युद्धात पाडाव केला.
कोकणातील अत्याचारी सिद्दी सातला चिमाजी अप्पांनी ठार मारले आणि संपूर्ण कोकणपट्टी भयमुक्त केली. “शामलांची क्षिती केली. कोकणात धर्म राखीला” ही तत्कालीन वाक्ये या घटनेचे महत्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहेत. तसेच हिंदुंच्या स्वातंत्र्य व धर्मावर गदा आणणाऱ्या पोर्तुगीजांचे, उत्तर फिरांगाणातून कायमस्वरूपी उच्चाटन चिमाजीनी मोठ्या हिकमतीने केले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले. चिमाजी अप्प्पा या थोर सेनानीचे म्हणूनच हिंदुंवर अनंत उपकार आहेत असे म्हणावे लागेल.
चिमाजी आप्पांच्या समाधीवरील लेखातील ‘प्रौढप्रताप महाराष्ट्रधर्मसंरक्षक रणधुरंधर’ हे वाक्य आणि त्यातील महाराष्ट्रधर्मसंरक्षक ही त्याना दिलेली पदवी म्हणूनच अतिशय महत्वाची आणि समर्पक आहे.
रणझुंजार श्रीमंत चिमाजीआप्पा यांना कोटी कोटी प्रणाम !
पराग लिमये
दि १७ डिसेंबर २०१७
Leave a Reply