30 April 2017

ख्रिस्ताब्द ७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात बौद्धांनी वैदिक धर्माला पायदळी तुडवण्याचा आवेशपूर्वक प्रयत्न चालू केला. जैन-बौद्धांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरीत होते. या शतकात तांत्रिकांचा उदय झाला आणि तंत्रविद्येच्या नावाखाली अनाचाराचे थैमान चालू झाले. उपासनेच्या नावाखाली सामान्य लोकांची दिशाभूल केली जाऊ लागली. त्यामुळे सामान्य मनुष्य गोंधळात पडला होता. खरा धर्म गडप झाला होता. भारतात सर्वत्र धार्मिक अराजक माजले होते.

अशा वेळी आद्य शंकराचार्यांचा जन्म केरळ प्रांतातील कालाडी या गावी वर्ष ६३२ मध्ये झाला. त्यांचे नाव शंकर होते. संन्यास घेऊन आपले जीवन धर्मकार्यासाठी अर्पण करण्याकरिता त्यांनी लहान वयातच घराचा त्याग केला. गोविंदयतींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना विधिवत संन्यासदीक्षा दिली आणि ‘शंकराचार्य’ असे नामकरण केले.

जैन-बौद्धांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक यांमुळे हिंदु धर्मच संकटात आला होता. प्रचंड बुद्धीमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी जैन आणि बौद्ध या दोन्ही मतांचा पाडाव करून हिंदु धर्माची पुनर्स्थापना केली. शंकराचार्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले, धर्मातल्या विकृती दूर केल्या, काळाच्या प्रभावाने धर्मावर वाढलेली जळमटे दूर केली आणि आचारप्रधान अन् अद्वैतप्रधान अशा वैदिक धर्माचा प्रकाश भारतभूमीवर सर्वत्र भरून टाकला; धर्माला तेज प्राप्त झाले.

मोठमोठ्या नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले अन् त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले. देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात, या हेतूने शंकराचार्य यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा भारताच्या चार दिशांना चार पिठांची स्थापना करून तेथे त्यांच्या चार शिष्यांना पिठाधिपती म्हणून नेमले.

आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार आणि धर्मसाम्राज्याचे संस्थापक होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले.

संदर्भ : सनातन प्रभात

About The Author

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.