.
भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार समाप्तीचा दिवस असलेल्या या दिवशी श्री गुरूंनी आपल्या पादुका स्थापन करून गाणगापुरी प्रयाण केले … नृसिंहवाडीत पादुका स्थापन केल्या तोच हा “गुरुद्वादशी” चा दिवस…
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अश्विन वद्य द्वादशी  अर्थात  गुरुद्वादशी आहे .

शिष्य या दिवशी गुरूंचे पूजन करतात; म्हणून या तिथीला गुरुद्वादशी असेही म्हटले जाते.
गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्त्व १०० पटीने प्रक्षेपित होणे

प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी `गुरुद्वादशी’ हा दिवस दीपावलीतील इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.

१. या दिवशी शिष्याने त्याच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरूंपर्यंत पोहोचते; कारण या दिवशी वातावरण गुरुतत्त्वमय झालेले असते.
२. शिष्यपदाच्या जवळ पोहोचलेल्या प्रत्येक साधकाला या दिवशी गुरु शिष्यत्व प्रदान करतात.
3. दत्तात्रेयाचे एक अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही पुण्यतिथी होय.

आश्‍विन वद्य द्वादशीस । नक्षत्र मृगराज परियेसी ।
श्रीगुरु बैसले निजानंदेसी । अदृश्य झाले गंगेत ॥

दत्तात्रेयावतार श्री नृसिंहसरस्वती स्वामिमहाराजांनी आजच्याच दिवशी श्रीक्षेत्रा नृसिंहवाडी इथे ‘मनोहरपादुकां’ची स्थापना केली.

प्रल्हादाच्या भक्तीने प्रसन्न होवून श्री नृसिंह भगवान प्रसन्न झाले , त्यांनी एका क्षणात हिरण्यकश्यपू ला पकडले , आपल्या मांडीवर आडवे पाडून आपली धारदार नखे त्याच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली, आणि हिरण्यकश्यपू चा वध केला …. हिरण्यकश्यपू चा पोटात कालकूटा सारखे जहाल विष होते , ते विष भगवान नृसिंहाच्या नखांना लागले, असह्य दाह होऊ लागला, कोणत्याही उपायांनी त्यांना स्वस्थता लाभेना , तेंव्हा मग लक्ष्मीने औदुंबरा वृक्षाची फळे आणली , मग विष्णूंनी त्या फळात आपली नखे रोवली, आणि मग दाह शांत झाला. आणि मग विष्णूनी औदुंबर वृक्षाला वरदान दिले , ते म्हणाले , औदुंबर वृक्ष सदा फळांनी भरलेला असेल , कल्पवृक्ष म्हणून याची पूजा केली जाईल , जी व्यक्ती भक्ती भावाने सेवा करेल सर्व मनोकामना पूर्ण होतील , या वृक्षाच्या सेवेने वंध्येसहि पुत्र होतील…. हेच वरदान सार्थ करण्यासाठी या पृथ्वीतलावर सर्व जनतेस या वृक्षाची प्रचीती यावी , ईश्वर रुपाची जाण व्हावी म्हणूनच श्री गुरु परमपूज्य श्रीमद् “नृसिंह सरस्वती” स्वामी या औदुंबर वृक्षातळी वास करतात ….
.
जेंव्हा महाराज वाडी क्षेत्री वास्तव्यास होते , तेंव्हा रोज मध्यानकाली “योगिनी देवता” येवून महाराजांची सेवा करत असत , त्या रोज स्वामींना आपल्या बरोबर घेवून जात, त्यांची पूजा अर्चा करत , त्यांना भिक्षा अर्पण करत. जेंव्हा नृसिंह सरस्वतींची १२ वर्षे तप:श्चर्या पूर्ण झाली तेंव्हा श्रीगुरूंनी सांगितले आपण हे स्थान सोडून आता अन्यत्र प्रयाण करणार असे सांगितले , तेंव्हा श्री गुरु आपल्याला सोडून जाणारहि कल्पनाच योगिनी देवतांना सहन होईना, “६४ योगिनी ” देवता श्रीगुरूंची प्रार्थना करू लागल्या , आम्हास सोडून जावू नका , तुमच्या येथील, वास्तव्यामुळे नित्य दर्शनामुळे आमचे जीवन सुसह्य झाले आहे, तुमच्या जाण्याने येथील स्वर्गीय शोभा नष्ट होणार आहे , येथील पक्षी निघून जातील , सर्व वृक्ष सुकतील , अन्नपूर्णाहि या स्थानाचा त्याग करील , तुमच्या या सेवेच्या लाभास आनंदास आम्ही मुकलो तर आमच्या जीवनास काहीही अर्थ उरणार नाही, तेंव्हा कृपा करा आणि हा प्रयाणाचा विचार सोडून द्या .
.
त्यांच्या प्रेमळ व निष्कपट अंत:करणातून निघालेले हे कारुण्यपूर्ण बोल ऐकून दयावंत श्रीगुरुंचे मन गलबलले, पण तेथून जाणे तरअत्यावश्यक होते . श्रीगुरू चौसष्ठ योगीनीस आश्वासनपूर्वक म्हणाले , “शांत व्हा , मी तुमच्या पासून दूर गेल्याचे तुम्हाला कधीच जाणवणार नाही . कृष्णा पंचगंगा संगमावरील हा औदुंबर वृक्ष हेच माझे दिव्य्स्थान आहे . प्रत्यक्ष या मानव स्वरूपात जरी मी तुम्हाला दिसणार नसलो तरी गुप्तरुपात माझे वास्तव्य यावत् चंद्र दिवाकरौ येथेच असणार आहे , या माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुम्ही पण जलदेवता आहात हे विसरू नका, तुम्ही सुद्धा येथेच राहून माझ्या सोबतीने माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा … हि अन्नपूर्णा सुद्धा माझ्या आज्ञेने येथेच राहणार आहे , या संगम क्षेत्रावर व अमरेश्वर परिसरात माझे वास्तव्य जरी गुप्त राहिले तरी माझ्या श्रद्धावान भक्तांस ते नित्य जाणवेल. मी येथून निघून जाताच हा मी जेथे उभा आहे याच ठिकाणी माझी पाऊले माझ्या सश्रध्द भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी त्यांच्या सद्वासना पूर्ण करण्यासाठी या संसार सागरातून त्याना सुखरूप पणे पैलतीरी पोहचवण्यासाठी त्यांची वाट पाहत तिष्ठत असलेली आढळतील . सर्व प्रकारच्या दैवी शक्तींनी परिपूर्ण असलेला माझ्यातील देवत्वाचा अंश या “पावलात” सामावलेला आहे, तेंव्हा आता यापुढे या माझ्या पावलात तुम्ही मला पहा , सदाचार संपन्न श्रद्धाळू भक्ताने माझी व औदुंबर वृक्षाची शुचिर्भूत देहाने , मनाने, व निष्कपट भावपूर्ण अंत:करणाने सेवा केल्यास माझे सदेह दर्शनही घडेल . या औदुंबर वृक्षातळी माझ्या या पादुका राहणार आहेत . तुम्ही नित्य येथे येवून औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घाला. औदुंबराची केलेली सेवा हि माझीच सेवा घडेल . तेंव्हा आता विश्वास ठेवा कि मी या देहाने येथून जात असलो तरी येथेच आहे. श्रीगुरुंनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृष्णा पंचगंगा संगमावरील (नृसिंहवाडी) औदुंबर वृक्षातळी उमटलेली त्यांची पाऊले आजही आपले चित्त वेधून घेतात , पहाटेच्या काकड आरती व दुपारी महापूजेच्या वेळी पादुकांचे सुस्पष्ट दर्शन होते ..

gurucharan

.

औदुंबर : कल्पवृक्ष : कामधेनुश्च संगम: |
चिंतामणीर्गुरोर्पादो दुर्लभ भुवनत्रये ||

अर्थ : कल्पवृक्षरूप असलेला औदुंबर , कामधेनुरूपी कृष्णा-पंचगंगा संगम , आणि चिंतामणीरुपी श्रीगुरूचरण अश्या तिन्ही पुण्यप्रद व प्रासादिक गोष्टी एकाच ठिकाणी असणे हे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही भुवनात मिळणे दुर्लभ आहे. जे नृसिंहवाडी येथे आहे.

या दिवशी दत्तक्षेत्रामध्ये विशेषत: नरसोबाच्या वाडीस दीपोत्सव, गुरुचरित्राची पारायणे; संतर्पणे वगैरे कार्यक्रम होतात.”.

अतिशय घोर संकटात खालील पाच श्लोक असलेल्या, श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित अघोरकष्टोद्धारण स्तोत्राचा पाठ करतात.

||अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम||

श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव||
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं| त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम||
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम| भीतिं क्लेशं त्वं हरा$शुत्व दैन्यम||
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता| त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता|
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिं| सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं
भावासक्तिंचाखिलानन्दमूर्ते| घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते||

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम|
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत||

||इति श्रीमत्वासुदेवानंदसरस्वतिविरचितं अघोरकष्टोद्धारणस्तोत्रम सम्पूर्णम||

Leave a Reply

Your email address will not be published.