पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे.

नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते.

7412a0_63f6ad126ec2422ea08c61c676ab899c_mv2

अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

 
थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.
 
होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.