भाद्रपद कृष्णपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.

श्रीकृष्ण म्हणाले की “आता तुला इंदिरा एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. ” पूर्वी कृतयुगात महिष्मती नगरीत इंद्रसेन नांवाच राजा राज्य करीत होता. तो सकल गुणसंपन्न व पराक्रमी होता. त्याच्या राज्यतील सर्व लोक सुखी व आनंदी होते. एके दिवशी तो सभेत बसला असता तेथे नारदऋषी आले. त्याने त्यांचा आदरसत्कार करुन यथाविधी पूजा केली. आणि त्याप्रमाणे प्रार्थना करुन येण्याचे कारण विचारले.

तेव्हा नारद म्हणाले की; “मी नुकताच यमलोकी गेलो होतो. तेथे तुझा पिता वास्तव्य करीत आहे. यमराज त्याचा मानसन्मान करितो पण तेथे प्राण्यांना होत असलेल्या यातना पाहून तुझ्या पित्याला अत्यंत दुःख होत आहे. म्हणून त्याने तुला या दुःखातुन माझी मुक्तता कर. असा मजबरोबर निरोप पाठविला आहे. आणि इंदिरा एकादशीचे व्रत करुन त्याचे पुण्य मला

अर्पण कर. असा उपायाहि सांगितला आहे. असे सांगून नारद निघून गेले. इकडे इंद्रसेनाने इंदिरा एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) यथाविधी केले आणि त्या व्रताचे पुण्य आपल्या पित्याला अर्पण केले. तेव्हा त्याचा पिता वैकुंठाला गेला. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी या इंदिरा एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पापातून मुक्त होऊन पुण्यवान होतील व अंती सद्गतीला जातील.”

भाद्रपद कृष्णपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.

 

इंदिरा एकादशी माहात्म्य 

युधिष्ठिाराने श्रीकृष्णाला भाद्रपद कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! या तिथीला इंदिरा म्हणतात. हिचे व्रत केल्याने महापातकांचा नाश होतो आणि अधोगतीस गेलेल्या पितरांनाही मुक्ती मिळते. हिचे माहात्म्य श्रवण पठण केल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते. तो मनुष्य भूलोकी सर्व प्रकारचे उत्तम भोग भोगतो आणि निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. आता हिची पुरातन कथा सांगतो.

कृतयुगात महिष्मती नगरीत इंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो धर्मानुगामी, स्वधर्मनिष्ठ आणि विष्णुभक्त होता. एके दिवशी तो राजसभेत असताना नारदांचे आगमन झाले. प्रारंभिक आदरातिथ्य व कुशल वार्ता झाल्यानंतर राजाने त्यांना आगमनाचे प्रयोजन विचारले. तेव्हा ते म्हणाले, “मी ब्रह्मलोकातून यमलोकी गेलो होतो. तेथे तुझ्या पित्याची, सत्यवानाची भेट झाली. तो धर्मपरायण आणि पुण्यवान होता. म्हणून त्याला तेथे पाहून मला मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात तो म्हणाला, “मुने ! पूर्वजन्मी घडलेल्या व्रतवैगुण्यामुळे मला यमलोकी राहावे लागत आहे. म्हणून तुम्ही माझ्या पुत्राकडे, इंद्रसेनाकडे जा. त्याला माझी हकिकत सांगून असा निरोप द्या की तू इंदिरा एकादशीचे व्रत करून ते पुण्य मला अर्पण कर. त्या प्रभावाने मी स्वर्गलोकी जाईन.” ते ऐकून राजाला मोठे नवल वाटले. त्याने व्रतविधी विचारला असता ते म्हणाले, “भाद्रपद शुक्ल दशमीला सकाळची स्नानसंध्यादी नित्यकर्मे झाल्यावर मध्यान्हसमयी पितरांसाठी म्हणून नदी, तलाव किंवा विहिरीवर स्नान करावे रात्री भूमीवर शयन करावे. इंदिरा एकादशीस सकाळी मुखप्रक्षालन व स्नानसंध्या झाल्यावर दुपारी शाळिग्रामासमोर पितरांसाठी श्राद्ध करावे. ब्राह्मणाचा यथायोग्य सन्मान करावा. दिवसभर उपोषण करावे श्रीहरीचे पूजन व रात्रसमयी जागरण करावे द्वादशीस विष्णूचे पूजन करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यथाशक्ति दानधर्म करावा व आप्तगणांसह भोजन करावे.”

त्यांच्या सूचनेनुसार इंद्रसेनाने आपल्या संपूर्ण परिवारासह आणि सेवकांसह भक्तिभावाने व्रताचरण केले. ते पुण्य आपल्या पित्याला अर्पण केले. त्यामुळे त्याच्या पित्याचा उद्धार झाला. तो गरुडावर बसून वैकुंठास गेला. कालांतराने निष्कंटक राज्याचा उपभोग घेऊन तो राजाही स्वर्गलोकी गेला.

श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला योगेश्वरा । हे मधुसूदना रुक्मिणीवरा । निजकृपेने श्रीधरा। सांग पुढील माहात्म्यही।।१॥ भाद्रपद मासी कृष्ण पक्षी । येते कोणती एकादशी।। तिचे नाव सांगूनी मजसी। विशद करावे कथानक ।। २।। तधी वदला द्वारकानाथ । भाद्रपद कृष्ण एकादशीप्रत । ‘इंदिरा’ ऐसे म्हणतात । आता माहात्म्य सांगतो ।।३॥ या पावन एकादशीचे । व्रत आचरिता साचे । पर्वत महापातकांचे । नाश पावती तत्काळ ।।४ । हिचा प्रभाव इतका श्रेष्ठ । की ज्यांते अधोगती प्राप्त । ते पितरही उद्धरतात । मिळते ऊर्ध्वगती तयां ।।५।। धर्मराजा या एकादशीची। कथाही परम पवित्र साची। श्रवणे वाजपेय = यागाची। फलप्राप्ती होय नरा ।।६।। पूर्वी कृतयुगात । महिष्मती नामक नगरीत । इंद्रसेन राजा प्रख्यात । होता प्रिय सकलांते।।७।। धर्मानुगामी त्याचे आचरण । तेणे यश मानसन्मान। प्रजापालन राज्यरक्षण । करितसे अहर्निश ॥८।। नृपहदयी विष्णुभक्ती। त्याच्या कृपे संपन्नता होती। उत्तम संतती आणि संपत्ती। सर्व काही त्यापाशी ।।९।। तो भूपती मुक्तिदायक । गोविंद-नामावली सुरेख। नित्य उच्चारी आदरपूर्वक । श्रद्धा धरुनी मानसी।। १० । अध्यात्म आणि वेदान्तविचार । तोही करीतसे साचार । भगवद्ध्यानात निरंतर । काळ आपुला घालवी।। ११। । एके दिनी तो नृपश्रेष्ठ । बैसला असता राजसभेत । देवर्षी नारद अवचित । प्रकट झाले त्याठायी ।।१२।। तैं पाहुनी विधिसुताला । त्याला मोठा आनंद झाला । हात जोडुनी सन्मुख गेला । चरण वंदिले आदरे ।।१३।। मग बैसवुनी उच्चासनी। विधियुक्त पूजन करुनी। महामुनीते तोषवुनी । पुसिले कुशल वृत्ताते ।।१४।। नारदांनीही त्या समयासी । पूर्ण आस्थेने केली चौकशी । देश काल परिस्थितीसी। जाणुनिया घेतले।। १५।। वदले शासन किल्ले प्रदेश । अमात्य मित्र सैन्य कोश। ही राज्य- सप्तांगे विशेष । आहेत ना सुखरूप ।| १६ ।। तुझी बुद्धी धर्माचरणात । आणि मन विष्णुभक्तीत । आहे ना सुस्थिर सांप्रत । सांग मजसी नृपवरा ।।१७।। ऐकून ते ब्रह्मर्षिवचन । काय वदला इंद्रसेन । मुने आपली कृपा म्हणून । कुशल मंगल सर्वत्र ।॥१८।। आज आपण येथे येऊन। मजला निजकृपे दिधले दर्शन । तेणे माझे यज्ञ संपूर्ण । सफल झाले निश्चये ।।१९।। तरी मजवर कृपा करून । येथे येण्याचे सांगा कारण । नारद म्हणाले इंद्रसेन । तेही कळेल तुजलागी ।।२० ।। ऐकून मम वचनासी । विस्मय उपजेल तब मानसी। तरी सावध चित्तासी। श्रवण करी सद्भावे ।।२१ ।। आज सहजचि ब्रह्मपुरीहून । मी यमलोकी आलो जाऊन । तेथ त्यानेही केले जाण । माझे उत्तम आतिथ्य ।॥ २२।। श्रेष्ठ आसनी बैसवून । आदराने केले पूजन । तोच अवचित तेथे जाण । तव पित्यासी पाहिले ।।२३।। तुझा तात ‘सत्यवान’ । होता धर्मपरायण । त्यासी यमसेवेत पाहून । महदाश्चर्य वाटले ।।२४।। तो महान नृपश्रेष्ठ। होता जरी पुण्यवंत । काही वैगुण्य घडले ब्रतात । तेणे प्राप्त ही दशा ।।२५।। हे स्वयेच कथन केले । तेणेयोगे मज कळले। त्यानेच मजसी पाठविले। तव भेटीस नृपवरा ।।२६।। निरोप देता तव पिता । म्हणाला महिष्मतीस जावे आता। भेटुनिया मम सुता। हकिकत ही सांगावी ॥२७॥ म्हणावे पूर्वजन्मी जे घडले । त्या व्रतवैगुण्यामुळे । मज राहणे भाग पडले । यमलोकामाजी या ॥२८।। तरी इंदिरा एकादशी व्रत। आचरुनी विधियुक्त । पुण्य अर्पुनी मजप्रत । धाडी स्वर्गलोकाते।।२९।। तो संदेश द्यावा म्हणून । मी मुद्दाम आलो जाण । तरी करुनी व्रताचरण। द्यावी तयास ऊर्ध्वगती ।।३०।। तैं ऐकून त्या वार्तेला। नृपमनी आला कळवळा। हात जोडुनी त्या वेळेला । केली विनंती आदरे।।३१ । म्हणाला हे मुनिश्रेष्ठा । कृपा करुनी मजसी आता। सांगावे इंदिरा एकादशी व्रता । मी अनभिज्ञ त्याविषयी । ।३२।। परम पावन असे हे व्रत । येते कोणत्या महिन्यात । कैसे करावे विधियुक्त । विस्ताराने सांगावे ।।३३।। तधी त्याची विनंती ऐकून । नारद वदले इंद्रसेन । त्या व्रताचे सर्व विधान । सांगतो मी तुजलागी ।।३४।। भाद्रपदातील कृष्ण पक्षात । येणाऱ्या एकादशीप्रत । इंदिरा ऐसे म्हणतात। करी श्रवण विधीते ।।३५।। एकादशीआधी दशमीस । करुनी प्रातःस्नानास । संध्यादी नित्यकर्मांस। आचरावे श्रद्धेने ।।३६।। मग माध्यान्हसमयासी। जावे कूप तडाग सरितेसी। करावे पुनरपि स्नानासी। पितृहिताकारणे ।।३७।। आणि व्रतस्थ राहून। करावे नक्त भोजन । रात्रसमयी भूमीशयन । स्मरावे त्या भगवंता ।।३८।। अन्य दिनी एकादशी । शांत प्रातःसमयास। करावे मुखप्रक्षालनास । बारा चुळा भरुनिया।।३९।| तदनंतर भक्तिभाव धरून । उपोषण नियम करावा ग्रहण । पुंडरिकाक्षा संबोधून। संकल्प करावा यापरी ।।४०।। म्हणावे सर्वभोगविवर्जित । आज राहीन आहार = विरहित । आणि उदईक निश्चित । करीन व्रत-पारणा मी ।।४१।॥ तरी देवेशा हे अच्युता व्हावे मम रक्षणकर्ता । तूच विश्वचालक त्राता । अससी तुझिया भक्तांचा ।॥४२ ॥ उच्चारुनी या वचनासी। सद्भावे मध्यान्ह समयासी। करावे श्राद्धविधीसी। शालिग्रामा सन्मुख ।।४३।। आणि भोजन दक्षिणा देऊन । अर्चने तोषवावे विप्रगण । तदनंतर पंचोपचार पूजन । करावे हषीकेशाचे ।॥४४ ॥ त्या रात्रीस भजन कीर्तन । गावे देवाचे गुणगान । अशा प्रकारे जागरण । करावे परम भक्तीने ।।४५।। द्वादशीस अन्य दिनी। प्रभाती भगवंताते पूजुनी। ब्राह्मणांते सन्मानुनी। भोज द्यावा आदरे ।।४६।। तदनंतर आप्त मित्रगण । बंधूपुत्रादिक पाचारून । व्रतस्थे स्वतः मौन धरून । भोजन करावे एकत्र ।।४७।। नारद वदले इंद्रसेनाप्रत । आले ना ध्यानी हे व्रत। आचरिता तव पित्यागत । मुक्ती मिळेल . निश्चये ।।४८।। या व्रतप्रभावे जाण । तव समस्त पितृगण । मुक्त होउनी यमलोकातून । जातील स्वर्गलोकासी ॥४९ । अशा प्रकारे तयाप्रत । सांगुनी ब्रतविधी समस्त । नारद ते विप्रश्रेष्ठ । अंतर्धान पावले । ।५०।। तदनंतर पुढील काळात। नृपवरे हे श्रेष्ठ व्रत । दारा पुत्र भृत्यांसहित । आचरिले निष्ठेने ।॥५१ । आणि तयाचे पुण्य समस्त । अर्पण केले पित्याप्रत । तेणे मुक्त होउनी त्वरित । गेला विष्णुधामी तो ।।५२।। सत्यवान उद्धरला । स्वर्गातून पुष्पवर्षाव झाला । त्याते वैकुंठी न्यावयाला । गरुड आला त्या समयी।।५३।। राजा इंद्रसेनही पुढती । राज्योपभोग घेउनी अंती । पुत्रास बैसवून गादीवरती। गेला स्वर्गलोकासी ।।५४।। आज तव जिज्ञासा जाणून । इंदिरा एकादशी महिम्न। तुजलागी केले कथन । कुरुश्रेष्ठा युधिष्ठिरा ।।५५॥॥ या व्रताची श्रेष्ठ महती। कथा श्रवण-पठणे ती। समस्त पातके जळुनी अंती। होतो निष्पाप मनुष्य तो ।।५६ । । असा नर तो पुण्यवान । या लोकी उत्तम भोग भोगून । पुढती विष्णुलोकी पावन । वास करितो चिरकाल ।।५७।।

।। इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे भाद्रपदकृष्णैकादश्याः इंदिरानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।।

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु !

 

Leave a Reply

Your email address will not be published.