शांत हो, श्री गुरुदत्ता – भावार्थ रोहन उपळेकर Mandar Sant December 3, 2019 स्तोत्र शांत हो श्रीगुरुदत्ता” करुणात्रिपदीचा भा oवार्थ करुणात्रिपदी या सुंदर रचनेचा पूर्ण अर्थ – प. प. श्री. थोरले महाराज भगवान श्रीदत्तप्रभूंची विनवणी करताना पहिल्या पदात म्हणतात, शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥ तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥ तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥ तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥ सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥ श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांच्या मनमानी कारभारावर कोपाविष्ट झालेल्या श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकताना स्वामी महाराज म्हणतात, “हे श्रीगुरु दत्तराया, आपण नेहमी शांतच असता. आपल्याला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी आपण धारण या कृतक कोपाने माझ्या मनाला अस्वस्थता आलेली आहे, तेवढी घालवून आपण मला शांती प्रदान करावी ॥ ध्रु.॥ ( प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी एका प्रवचनात फार मार्मिक सांगितले होते की, करुणात्रिपदीमधील ‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ मध्ये, ‘अहो शांत श्रीगुरुदत्ता’ असाच अधाहृत पाठ आहे. तेथे ‘शांत’ हे श्रीदत्तप्रभूंचे विशेषण आहे. स्वभावत:च जे नित्यशांत आहेत, त्यांना आणखी कशाला बरे स्वामी महाराज शांत व्हा म्हणतील?) देवा, आपणच आमची माता आहात, आम्हांला जन्माला घालणारे जनितेही आपणच आहात. आपणच आमचे सर्व बाजूंनी हित करणारे आमचे आप्त, जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, आमचे वाडवडील, बंधू आणि आमचे रक्षणकर्ते आहात. प्रसंगी आम्ही नीट वागावे म्हणून भय दाखविणारे व ती सुयोग्य जाणीव झाल्यावर ते भय हरण करणारेही आपणच आहात. म्हणूनच तुम्ही दंड धारण केलेला आहे. शिवाय तो दंड आमच्या संकटांचा, शत्रूंचा नाश करण्याच्या आपल्या लीलेचा द्योतकही आहे. म्हणूनच श्रीदत्तराया, तुमच्याशिवाय आम्हांला अन्य कोणीही माहीतच नाही. देवा, आपणच आमच्यासारख्या आर्तांचे एकमात्र आश्रय आहात. ॥१॥ हे दयाळू भगवंता, आपण चुकलेल्यांना अपराधांची शिक्षा देण्यासाठीच हा दंड हाती धरलेला आहे. हे जरी यथार्थ असले तरी आम्ही अपराधी भक्त, आमच्या चुकांची कबूली देऊन, तुमची यशोगाथा गाऊन तुमच्या चरणीं मस्तक नमवून करुणा भाकत आहोत. तरीही आपण आम्हां अज्ञ लेकरांना दंड देणार असाल, तर मग आम्ही कोणाचा धावा करावा? तुमच्याशिवाय आम्हांला संकटांमधून सोडवणारे कोण आहे दुसरे? ( एरवी तुम्हीच आम्हांला सर्व संकटांमधून बाहेर काढता, आता जर तुम्हीच संकट रूपाने समोर उभे ठाकलात तर आम्ही बापुड्यांनी जायचे कुठे?) ॥२॥ हे दत्तात्रेयप्रभो, आम्ही सुधारावे म्हणून आपण नटाप्रमाणे क्रोधाचा आवेश आणून आम्हां पापी जीवांना एकवेळ दंड द्याल. पण आम्ही अज्ञानी, संसारी जीव पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणार. तेव्हा आपण आम्हांवर असे रागावू नका. पडून पडून आम्ही जाणार कुठे? तुमच्याच चरणांवर पडणार ना? तेव्हा आमच्यावर आता आपण निजकृपेचा वर्षाव करावा हीच आमची कळकळीची प्रार्थना आहे. ॥३॥ हे पतितपावना, आपल्या पदांचा एकदा का आश्रय घेतला, की समजा चुकून आडमार्गावर पाउल जरी पडले, तरीही आम्हांला त्या परिस्थितीतून सांभाळून सुखरूप पुन्हा आपणच योग्य मार्गावर आणता. हेच आपले भक्तवात्सल्याचे अलौकिक ब्रीद आहे. तेव्हा आता त्याच आपल्या ब्रीदाची आठवण काढून, हे करुणाघन गुरुनाथा, आपण आपला कोप सोडून पुन्हा आमच्यावर कृपावंत व्हावे. ॥४॥ सहकुटुंब, सहपरिवाराने, अवघ्या घरादाराने आम्ही आपलेच दास आहोत. आपल्याच श्रीचरणीं आम्ही आमचा हा असार संसारभार, आमची सर्व कर्मे अर्पण केलेली आहेत. त्या कर्मांच्या जडभाराचा परिहार करून, हे करुणेच्या सागरा, दीनानाथा, आमच्या उत्तम बांधवा, हे दत्तात्रेयप्रभो, आपण आमचे ते सर्व पाप हरण करावे. त्या पापांच्या लवलेशानेही आमच्या सेवेत इथून पुढे कसलीही बाधा आणू नये, हीच कृपा आम्हां दीनदासांवर आता आपण करावी, अशी मी ‘वासुदेव’ आपल्याला प्रार्थना करीत आहे. ॥५॥ श्रीदत्तात्रेयप्रभूंची अशी कळकळीने प्रार्थना करूनसुद्धा ते कृपावंत होतील की नाही, अशी शंका वाटल्याने, आता दुस-या पदात श्री स्वामी महाराज त्यांना त्यांच्याच श्री नृसिंह सरस्वती अवतारातील लीलांचा दाखला देऊन पुन्हा विनवणी करताना म्हणतात, श्रीगुरुदत्ता जय भगवंता, तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥ चोरें द्विजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥ पोटशुळानें द्विज तडफडतां, कळवळले ते कळवळो आता ॥२॥ द्विजसुत मरतां वळलें तें मन, हो की उदासीन न वळे आतां ॥३॥ सतिपति मरता काकुळती येतां, वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥ श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता कोमल चित्ता, वळवी आता ॥५॥ हे भगवंता श्रीगुरु दत्तात्रेया, तुमचे मन असे निष्ठुर करू नका. ॥ध्रु.॥ पूर्वी तुमचा भक्त असणा-या वल्लभेश द्विजाला जेव्हा चोरांनी मारले, तेव्हा तुमचे जे मन कळवळले तेच आताही आमच्यासाठी कळवळो. ॥१॥ वासर क्षेत्री असह्य पोटदुखीने व्याकूळ झालेल्या, तडफडणा-या द्विजाला पाहून जे मन कळवळे तेच आताही कळवळो. ॥२॥ शिरोळ ग्रामीच्या गंगाधर द्विजाचा तुमच्याच कृपेने जन्मलेला लहान मुलगा धनुर्वाताने मेल्यावर जे कळवळले, तेच तुमचे मन आता का बरे आमच्याविषयी उदासीन होऊन कळवळा दाखवत नाहीये? ॥३॥ माहूरच्या गोपीनाथांच्या दत्त नामक पुत्राच्या पत्नीने, त्याच्या मृत्यूमुळे काकुळतीला येऊन प्रार्थना केल्यावर, जे मन करुणेने कळवळले, तेच आता का बरे आमच्यावर कृपा करीत नाहीये? ॥४॥ श्रीगुरु दत्तात्रेयप्रभो, आपण आम्हां दीनदासांविषयीची आपली ही निष्ठुरता त्यागावी व आपल्या कोमल चित्ताने आमच्यावर पुन्हा करुणाकृपा वर्षवावी, हीच कळकळीची प्रार्थना. ॥५॥ या दोन पदांमधून करुणा भाकल्यावर आता श्री स्वामी महाराज तिस-या पदामध्ये, श्रीदत्तप्रभूंच्या करुणामय स्वरूपाला कळवळून साद घालून निर्वाणीची प्रार्थना करताना म्हणतात, जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु.॥ निजअपराधें उफराटी दृष्टी । होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥ तूं करुणाकर कधी आम्हांवर । रुससी न किंकरवरद कृपाघन ॥२॥ वारी अपराध तूं मायबाप । तव मनी कोप लेश न वामन ॥३॥ बालकापराधा गणे जरि माता । तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥ प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव । पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥ माता अनसूयेचे सुपुत्र असणा-या, आपल्या निजभक्तांचे जीवन असणा-या करुणाघन श्रीदत्तप्रभूंचा जयजयकार असो. हे जनार्दना, आपणच आता आमचे रक्षण करावे. ॥ध्रु.॥ आमच्याच अपराधांमुळे आम्ही खजिल होऊन भयभीत झालेलो आहोत. आता दृष्टी वर करून आपल्याकडे पाहण्याची हिंमत देखील राहिलेली नाही आमची. ( त्यामुळे आम्ही मान खाली घालूनच उभे आहोत.) ॥१॥ हे दासांना वर देणा-या करुणाकर दत्तदेवा, कृपेचे मेघ असणारे आपण आमच्यावर कधीच रुसणे शक्य नाही. ( आपण आमच्यावर असे रुसू नये.) ॥२॥ हे मायबापा, आमच्याविषयीचा कोपलेश बाजूला सारून, आम्हांला आपले अपत्य मानून आमचे सर्व अपराध आता आपणच घालवा. हे दयामय वामना, मी आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना करतोय. ॥३॥ अहो देवा, मातेनेच बालकाचे अपराध मानले, तर मग त्या अजाण बालकाला कोण जीवन देणार? त्याचे रक्षण कोण करणार? ॥४॥ हे देवा अत्रिनंदना, हा ‘वासुदेव’ आपल्या श्रीचरणीं प्रेमादराचा भाव विदित करून प्रार्थना करतो की, आपण सदैव आपल्या चरणींच मला ठाव द्यावा, मजवर कृपा करून मला कायमचे आपल्याच सेवेमध्ये रत ठेवावे. ॥५॥ सद्गुरु श्री थोरल्या महाराजांची करुणात्रिपदी हे अत्यंत प्रासादिक असे अजरामर प्रार्थनाकाव्य आहे. आजवर लाखो भक्तांनी या त्रिपदीच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तप्रभूंच्या करुणाकृपेची अद्भुत प्रचिती घेतलेली आहे. श्री स्वामी महाराजांनी या तीन पदांमधून श्रीदत्तप्रभूंच्या करुणाप्राप्तीचा राजमार्गच तुम्हां आम्हां भाविकभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यात शंका नाही. तेव्हा आजच्या पावन दिनी या अलौकिक करुणात्रिपदीचे अनुसंधान करून, श्री स्वामी महाराजांच्या शब्दात श्रीदत्तचरणीं कायमचा ठाव देण्याची श्रीगुरुचरणीं प्रेमप्रार्थना करू या !! लेखक – रोहन विजय उपळेकर करुणा त्रिपदीचे महत्व श्री गुरुमुर्ती चरित्रात करुणा त्रिपदीचे महत्व काय आहे ह्याचे सर्व भाविकांना अतिशय उदबोधक असे वर्णन दिसुन येते. मंत्ररुप प्रसादीक व दत्त भक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्र ग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यात करुणा त्रिपदीचे महत्व विशद केले आहे. ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा :- काही आपत्ति येता जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणती ही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्ति चे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एक वीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल. भक्तांसाठी करुणा त्रिपदीचे हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे. म्हणजेच त्रिपदी नियमितपणे म्हणत जा ही कृपावंत सदगुरुं चीच आज्ञा आहे व नाना महाराजांचे ही आग्रहपुर्वक हेच सांगणे आहे. म्हणुन आपण त्यांच्या आज्ञाचे पालन करुया व सदगुरुंना प्रिय होण्याचे प्रयत्न करुया. राष्ट्र संत प. पु. श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या श्री क्षेत्र नर्सी नामदेव. जि, हिंगोली येथे शके १८२७, इ. १९०५ मध्ये प. पुज्य श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांचा १५ वा चातुर्मास संपन्न झाला . याच वेळी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली व हा अघटीत प्रकार पाहून वाडीची मंडळी घाबरून गेली. आता वाडीवर मोठे संकट येणार असे सर्वांना वाटले. या संकटाच्या नीरसनार्थ ही मंडळी प. पु. सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामींना भेटण्यासाठी नर्सी येथे मुक्कामी आली. नरसोबा वाडी येथे श्री दत्त सेवेत काही चुका झाल्या मुळेच हा प्रकार झाल्याचे स्वामींना समजले. तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपा संपादना साठी श्री क्षेत्र नर्सी येथे स्वामीं कडून सुप्रसिद्ध सिद्ध मंत्र करूणा त्रिपदी काव्याची रचना झाली, तीच्या नित्य पाठातून सर्व विघ्ने होतील असा आशिर्वाद मिळाला पुढे ही करूणा त्रिपदी सर्व दत्तोपासनेत प्रचलित समाविष्ट झाली. मित्र हो आपण कुठेही असा प्रवासात घरी दारी न चुकता आपल्या पठनात ठेवा. आर्तभावनेने त्रिपदी पठन करा मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तर मित्रहो दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांन पर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार करा. || दत्तगुरू || || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website