मोक्षदा एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : १४ डिसेंबर २०२१ moderator December 13, 2021 दिनविशेष मार्गशीर्ष शुक्लपक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “आता तुला मोक्षदा एकादशीव्रताचें माहात्म सांगतो ते ऐक. पूर्वी गोकुळांत वैखानस नावाचा एक राजा सुखाने राज्य करीत होता. त्याची धर्मावर अत्यंत श्रद्धा होती. एके दिवशी तो झोपला असताना त्याला स्वप्न पजले की, आपला पिता नरकात गेला आहे, व अत्यंत कष्ट सोशित आहे आणि “हे पुत्रा । माझी यातून मुक्तता कर” असे मोठमोठ्याने ओरडत आहे. थोड्याच वेळात जागा होऊन, पडलेल्या स्वप्नाची आठवण झाल्याबरोबर दुःखी झाल, त्याचे मुख म्लान झाले, कोठेही चित्ता लागेना, विलास भोगण्याकडे मन घेईना. ज्याचे पूर्वज स्वतःच्या अगर त्या पूर्वजांच्या कोणत्याही वाईट कृत्याने नरकाला गेले असतील तर असतील तर उद्धार करणे हे त्यांच्या वंशजाचे कर्तव्य आहे. त्याच्या त्या दुःखी स्थितीत तो आपल्या पित्याची मुक्तता करण्याकरिता नानाप्रकारचे उपाय योजित होता, पण शेक्टी ज्ञानी व अनुभवी मनुष्याचा विचार घेऊनच कोणता तरी उपाय अमलात आणावा असा स्वतःशी विचार – करुन मनाशी निश्चय ठरवून त्याच्या राजधानी जवळ असलेल्या एका रम्य पर्वतावर राहणाऱ्या महाज्ञानी मुनीकडे जाण्यास निघाला. तो पर्वत मनोहर व रमणीय असा होता. त्या पर्वतावर नानाप्रकारचे | हिरवेगार लतावृक्ष फुललेल्या पुष्पांनी बहरले होते, त्या पुष्पांचा सुगंध दशदिशात दरवळून गेला होता चित्र विचित्र पक्षी त्या लतावृक्षावर मधुर फळे भक्षण करुन त्यावर आनंदाने वास्तव्य करित होते. क्षणाक्षणाला या | वृक्षावरुन त्या वृक्षावर भराऱ्या मारीत बागडत होते. मधून मधून वरुन सुस्वर असे गायन करीत होते. आणि त्याच लतावृक्षांच्या जवळपास गळझुळ वाहाणाऱ्या झऱ्याचे शीतल असे पाणी पीत असत. सिंह व्याघ्रांदि हिस्व प्राणी व गाईसारखी गरीब जनावरे याच झऱ्यावर एकाच वेळी पाणी पिताना दृष्टीस पडत ! अशा त्या रम्य पर्वताचे मध्यभागी त्या मुनीची पर्णकुटीका होती. मुनिवर त्या पर्णकुटिकेच्या बाहेर तोंडाशीच मृगाजिनावर बसलेले होते. त्यांच्या मस्तकावर जटाजूट होता, कटीलाकौपिन होती, सर्वांग भस्माने चर्चित होते. व चेहरा ज्ञानामुळे सतेज दिसत होता, इतकेच नव्हे तर त्याच्या भोवती सुद्धा त्या ज्ञानाची दिव्य प्रभा पसरली होती. असा तो महाज्ञानी मुनिवर त्याच्या भोवती बसलेल्या शिष्यागणांना “ब्रह्म सत्य जगन्मिथ्या” याचा पाठ सांगत होता. अशा स्थितीत वैखानस राजा तेथे आला व त्या मुनिवराला साष्टांग नमस्कार घालून हात जोडून उभा राहिला. पण लगेच त्या मुनींने राजाला आपल्या जवळ बसविले आणि विचारले की, “हे राजा ! तूं आणि तुझी प्रजा सुखी आहे ना ? तुम्ही उभयता स्वधर्मानेच आचरण करिताना ? बा वैखानस, धर्म हा जगाचा प्राण आहे, धर्मानेच जगाचे धारण-पोषण होते म्हणून परमेश्वराने त्याच्या रक्षणार्थ राजाला उत्पन्न केले.” मुनीचे हे भाषण ऐकून राजा म्हणाला की, “आपल्या कृपेने सर्व काही कुशल आत्ते, पण एका गोष्टीने मी दुःखी आहे. ती गोष्ट म्हणजे हीच की, एके दिवशी मी झोपलो असताना मला एक स्वप्न पडले, आणि त्यात माझा पिता नरकात पडून अत्यंत क्लेश सोशित आहे असे पाहिले. तेव्हा महाराज, यातून त्यांची मुक्तता कोणत्या उपायाने होईल हे सांगा आणि दुसरी गोष्ट माझा पिता पुण्यवान असताना नरकात कसा गेला हेही सांगा.” मुनिवर त्रिकाल ज्ञानी असल्यामुळे त्यानी अंतर्ज्ञानाने लगेच राजाचा पिता नरकात का गेला हे जाणिले. आणि सांगितले की, राजा ! तुझा पिता स्वधर्माने चालणारा पुण्यवान असा होता ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्या हातून एक दोष घडलेला आहे तुला माहितच आहे की, तुझ्या पित्याला अनेक स्त्रिया होत्या. त्यापैकी एक रुपाने अत्यंत सुंदर होती. तिचा तो सुंदरपणा तिच्या उत्कृष्ट व तेजस्वी अशा गुणांनी व जे गुण पातिव्रत्याच्या देदिप्यमान तेजाने अधिक तेजस्वी झालेले होते अशा गुणांनी विशेष खुलून दिसत होता. परंतु तुझ्या पित्याला ती आवडत नव्हती. एकदा ती नवयौवना ऋतुस्नानानंतर चौथ्या दिवशी मदनाच्या बाणाने विव्हल झाली, तिच्या सुकुमार कोमल देहाचा दाह होऊ लागला, तेव्हा ती नटून विलास भोगण्याकरिता श्रृंगार मंदिरात राजाकडे आपल्या पतीकडे गेली पण राजाने तिचा तिरस्कार करुन तिला झिडकारले. तरीही पण तिने पुनः “महाराज ! यावेळी मला झिडकरु नका” असे म्हणून त्याच्या गळ्याला मिठी मारली, वक्षःस्थलावर मान टाकिली आणि चुंबनाकरिता आपला गुलाबी गाल पुढे केला पण राजाने पुनः तिला झिडकारुन त्या श्रृंगार मंदिराचे बाहेर घालविले तेव्हा ती दाराबाहेर विव्हळ होऊन पडली. राजा ! याच दोषाने तुझा पिता नरकाला गेला आहे. पलनि कामुक होऊन विलास भोगण्याकरिता पतीकडे गेली असतां पतीने जर तिला विलास भोग दिला नाही तर पतीला त्याचा दोष लागतो. आता तू मोक्षदा एकादशी व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) करशील व ते पुण्य तुझ्या पित्याला अर्पण करशील तर तुझ्या पित्याची नरकातून मुक्तता होईल. याप्रमाणे त्या मुनीचे भाषण श्रवण करुन तो राजा परत आपल्या जवाड्याकडे आला, व पुढे मोक्षदा एकादशीचे व्रत विधीयुक्त केले तेव्हा त्याच्या पित्याची नरकातून मुक्तता होऊन तो सद्गतीस गेला. हे धर्मराजा ! हे मोक्षदा एकादशीचे व्रत जे कोणी करतील व माहात्म्य एकतील ते सर्व पापापासून मुक्त होऊन अंती सद्गतीला जातील. मार्गशीर्ष शुक्लपक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशी माहात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला मार्गशीर्षातील शुक्ल एकादशीविषयी विचारले. तेव्हा तो म्हणाला, “धर्मा ! ही एकादशी मोक्षदा नावाने ओळखली जाते. ही सर्व पापांचे हरण करणारी आहे. या तिथीस भगवान विष्णूंची पूजा करावी. उपोषण, भजन, जागरण करावे. आता आता हिची कल्याणप्रद कथा सांगतो. ती श्रवण केल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते आणि अधोगतिप्राप्त पितर स्वर्गलोकी जातात. पूर्वी गोकूळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राहत असे. तो आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करीत असे व ब्राह्मणांचा विशेष आदर करीत असे. एके दिवशी त्याला स्वप्नात असे दिसले की त्याचा पिता नरकात गेला आहे. त्यामुळे तो फारच खिन्न झाला. दुसऱ्या दिवशी त्याने श्रेष्ठ विप्रांना हा वृत्तान्त कथन केला आणि वडिलांच्या उद्धारासाठी काय उपाय करावा असे स्पष्ट विचारले. ते म्हणाले, “राजा! तू पर्वत ऋषींचा सल्ला घे. ते त्रिकालज्ञानी असल्यामुळे तुला योग्य ते मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे तो भूपती पर्वत ऋषींना भेटला. त्याच्या आगमनाचे कारण कळल्यावर त्यांनी अंतर्दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, “राजा! पूर्वी एका जन्मात तुझ्या पित्याला दोन बायका होत्या. एकदा त्यांच्यापैकी एकीने त्याच्याकडे समागमाची मागणी केली. पण तिची उपेक्षा करून तो दुसरीवर कामासक्त झाला. या त्याच्या वर्तनामुळे पहिल्या स्त्रीला निरतिशय दुःख झाले. म्हणूनच तो नरकयातना भोगत आहे. आता त्याच्या उद्धाराचा उपाय ऐक. मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षा’ किंवा मोक्षदा’ म्हणतात. ही तिथी विष्णूंना फारच प्रिय आहे. म्हणून या दिवशी तू आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह उपोषण, भजन, पूजन, जागरण कर. ते व्रतपुण्य आपल्या पित्याला अर्पण कर. त्या प्रभावाने तो नरकातून मुक्त होईल.” पर्वतांचा निरोप घेऊन वैखानस नगरात परतला. त्याने आपल्या भार्यापुत्रादिकांसह मोक्षदा एकादशीस व्रत केले. त्या सर्वांचे एकत्रित पुण्य आपल्या पित्याला संकल्पपूर्वक अर्पण केले. तेव्हा त्याच्यावर स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि इकडे त्याचा पिताही नरकातून उद्धार होऊन ऊर्ध्वलोकी निघाला. अंतरिक्षातून जात असताना तो आपल्या पुत्राला उद्देशून म्हणाला, “बाळा! तुझे निरंतर कल्याण असो !” तेव्हा आपल्या पित्याला शुभ गरती मिळालेली पाहून त्याला अपार आनंद झाला.’ श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला भगवंता । जिज्ञासा उपजली मम चित्ता । जनहित, पापक्षयास्तव आता। प्रश्न पुसतो तुजलागी ।।१ । । देवा! मार्गशीर्ष शुक्ल एकादशी । सांग तियेचे नाव मजसी । आणि व्रतविधीसह त्या दिवशी । पूजन करावे कोणाचे ।।२।। हे माधवा विस्तारपूर्वक । करी निरूपण कथानक । श्रीकृष्ण म्हणाला हा तू एक। उत्तम प्रश्न केलासी ।।३।। राजा ! बुद्धी तव साधुसम । निरामय आणि अनुपम । हा दिनमहिमा असे परम । कथन करितो तुजलागी॥४।॥ ‘एकादशी’ मज प्रिय अत्यंत । असे सर्वत्र = अति प्रख्यात । मम देहातून ‘मुरू’ वधार्थ। झाली तियेची उत्पत्ती ।।५। याविषयीची सर्व कथा। तुज सांगितली कुरूश्रेष्ठा। तिजसी विश्वात महामान्यता । शुभकारिणी ती असे ।।६।। आता मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचे । माहात्म्य सादर करितो साचे । ‘मोक्षदा’ ऐसे नाम तियेचे । करिते निष्पाप उपासका ।।७ । दामोदर-पूजन या दिनी । करावे प्रयत्ने उपचारांनी। भजन गायन नृत्य करुनी । तोषवावे भगवंता ।।८।। हे राजेन्द्रा ! ऐक आता । या तिथीची पुराण कथा । आदराने श्रवण घडता । फल वाजपेय यागाचे ।।९।। आणि ज्यांते अधोगती प्राप्त । असे माता तात वा सुत। या श्रवण-पुण्यप्रभावे निश्चित । तेही जाती स्वर्गपदा ॥१० ।। म्हणूनी हे धर्मराज । मोक्षा एकादशी महिमा आज। करी श्रवण हा योग सहज । कथा सांगतो यापुढती ।।११ ।। पूर्वकाळी गोकूळ नगरीत । राजा वैखानस राज्य करीत। आपुल्या प्रजेचे पुत्रवत । पालन करीतसे प्रेमाने ।।१२।। विप्र चतुर्वेद पारंगत । राहती त्याच्या राजधानीत । तोही सुखाने राज्य करीत। असता काय घडले पां ।।१३।। त्याते एकदा स्वप्न पडले । त्यात पित्यासी नरकात पाहिले। तेणे बहु आश्चर्य वाटले । मनी व्यथित तो झाला ।।१४।। प्रातःकाळी विप्रसमूहात । केला प्रकट स्वप्न-वृत्तान्त । सांगू लागला नरकात । पिता खितपत पडलासे।।१५।| तो वदला मज अधोयोनी प्राप्त । करी उद्धार होता सांगत । ते दृश्य पाहुनी साक्षात । सुख शांती हरपली।।१६।। मम राज्य जरी विस्तृत । अश्व गज रथ अगणित । भांडार जरी ऐश्वर्ययुक्त । नच रुचते मजलागी ।।१७।। नच दारा सुत आवडती। काय करू घोर प्रश्न पुढती। कुठे जाऊ अति विचार चित्ती। दाह होतसे देहाचा ।।१८।। तरी ज्यायोगे मम पितरांसी । मिळेल मोक्षगती आपैसी। ऐसा उपाय सांगा मजसी । योग दान वा तप व्रते।। १९ ।। ज्याचा पिता नरकात गेला। तो पुत्र जरी बलवान असला। काय अर्थ त्याच्या जगण्याला। निरर्थक तो या लोकी । ॥२० ।। तैं विप्र वदले तयाते । ‘पर्वत’ ऋषिआश्रम जवळच येथे । ते जाणती भूत भविष्य, त्यांते । भेटता कार्य होईल ।।२१।। ऐकुनी ते विप्रवचन । नृपवर तो खिन्न-मन । पर्वत ऋषींचे घेण्या दर्शन । गेला निघून तत्काळ।।२२।। तो आश्रम अतिविस्तीर्ण। अनेक ऋषिंनी चे निवासस्थान । पौरजनांसह शांत ब्राह्मण । तेही राहती सभोवती ।।२३।। चतुर्वेदी मुनिजनांत । निवांत शांत ऋषी पर्वत । स्वरूप अद्वितीय खचित । वाटला दुसरा विधीच तो ।।२४।। पाहुनी त्या , तपस्व्याला। नृपे साष्टांग प्रणिपात केला। पर्वतातेही हर्ष वाटला। केले स्वागत आतिथ्य ।।२५।। पुसिले कुशल मंगलासी । राज्याविषयी केली चौकशी । आस्थेने समयासी। सर्व जाणून घेतले ।।२६।। राजा म्हणाला हे ऋषिश्रेष्ठ । तुरमचिया प्रसादे सर्वही युक्त । सप्तांगसंपन्न राज्य समस्त । मीही खुशाल त्यासवे ।।२७। समस्त सुखे मज त्या अनुकूल। तरीही एक विघ्न प्रबळ । पाहिले स्वप्नी कंठीत काळ। पिता नरकात पडलासे ।।२८।। करी उद्धार मज विनविले । तेणे चित्त व्याकूळले । मन संभ्रमात पडले । था काय करावे समजेना ।।२९।। म्हणून मोठी त्वरा करून । मी आलो तुम्हांसी शरण । तरी – करावे मार्गदर्शन । हीच एक प्रार्थना ।।३०।। नृपहृदयीची व्यथा ऐकून । पर्वत ऋषिंनी नी मिटले नयन । ध्यानात भूत-भविष्य पाहन । काय बोलले रायाते ।।३१।॥ वैखानसा तव पित्याचे येथे । जाणिले दूषित पूर्वकर्म ते । दोन स्त्रिया होत्या त्याते । मागील जन्मी ऐक पां।॥३२।। एके दिनी एक कांता । त्याते विनवुनी क्रतुदान मागता । मनोभंग केला पुरता। नच दिधला सहवास ।।३३।। तिची इच्छा अतृप्त ठेविली। परी कामासक्त होउनी त्या वेळी । अन्य पत्नीशी जवळीक केली। म्हणुनी व्यथित ती नारी ।।३४।। गृहस्थ कर्तव्य नच पाळले । ते हे । कर्म असे भोवले । म्हणून त्याच्या नशिबी आले । नरकभोग दारुण ।।३५।। ते नृपे धरिले पाय । वदला मुनिवरा सांगा उपाय । पितृमुक्तीस्तव करू काय । ब्रत दाने वा अन्य ते ।।३६।। पर्वत म्हणाले तयाप्रत । मार्गशीर्षमासी शुक्लपक्षात ।। जी एकादशी तिथी येत । ‘मोक्षा’ म्हणती तिजलागी ।।३७।। हरिप्रिय या एकादशीस । तुम्ही सर्वांनी उपवास । करुनी त्या पूण्यास । अर्पण करावे जनकासी ।।३८।॥ त्या प्रभावे उद्धार होईल। तव पित्यासी मोक्ष मिळेल । ऋषिवचनी विश्वास प्रबळ । राजा परतला निजगृही।।३९।। पुढती मोक्षा एकादशी दिनी। नृपासवे त्याच्या दारापुत्रांनी। आदरपूर्वक उपोषण करुनी। पुण्य दिधले संकल्पे ।।४०।। ते अर्पिता पुष्पवर्षाव झाला । वैखानसपिता स्वर्गास गेला । गंधर्व अप्सरादी गणमेळा । नित्य स्तवितो त्या धामा ॥४१॥। गगनपंथे करिता गमन । देत पुत्रासी आशीर्वचन । म्हणे पिता तो आनंदून। कल्याण होईल निरंतर ।।४२ ।। कृष्ण म्हणाला धर्माप्रत । मोक्षदा एकादशी करतात । त्यांची पापे होउनी नष्ट । पावती ते परमपदा।।४३ । हिच्यासम विमल शुभ तिथी । नाही अन्य पां या जगती । अपार पुण्य ब्रतकत्त्याप्रती । नाही सीमा तयाते ।।४४ । प्रभाव चिंतामणीसमान । देतसे स्वर्ग-मोक्षरूपी धन । माहात्म्य पठता करिता श्रवण । फल वाजपेययागाचे ।।४५।। ।। इति श्रीब्रह्माण्डपुराणे मार्गशीर्षशुक्लैकादश्याः मोक्षदानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website