निर्जला एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : २१ जून २०२१ moderator June 21, 2021 दिनविशेष ज्येष्ठ शुक्लपक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. निर्जला एकादशी कथा १ श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! आता तुला निर्जला एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. एकदा व्यास मुनी हस्तिनापुरी भीमसेनाकडे आले. भीमसेनाने त्यांची यथाविधी पूजा केली आणि नंतर प्रार्थना करुन तो म्हणाला की, “हे भगवान् ! कुंती, द्रौपदी, धर्म, अर्जुन, नकुल आणि सहदेव सर्व स्वर्ग प्राप्तीकरिता एकादशीचे दिवशी उपास करुन ते व्रत करतात, आणि मलाही करण्याला सांगतात, पण माझ्या पोटातील अग्नी अत्यंत प्रदीप्त असल्यामुळे माझ्या हातून उपवास होत नाही. इतकेच काय पण मला नक्त नव्हे तर एकभुक्तसुद्धा राहवत नाही. मला खाण्याला पुष्कळ अन्न लागते. जर का एकादे दिवशी खाण्याला कमी अन्न मिळाले तर मला त्या दिवशी कोणताही कामधंदा सुचत नाही. त्याकरिता कृपा करुन स्वर्ग प्राप्तीचे दुसरे एखादे व्रत असले तर मला सांगा.” भीमाचे ते भाषण ऐकून व्यास म्हणाले की, “भीमा ! बारा महिन्यात प्रत्येक पंधरवड्याला काहीही खाता कामा नये. कदचित् या सर्व एकादशा जर कोणच्या हातून घडणार नाहीत तर त्याने निदान निर्जला एकादशी तरी केली पाहिजे.या एकादशीचे दिवशी पाणी सुद्धा पिऊ नये. हिचे महात्म्य फार मोठे आहे. सर्व एकादशीच्या पुण्याबरोबर हिचे पुण्य आहे करिता ही एकादशी तूं अवश्य कर. नंतर भीमाने निर्जला एकादशीने व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) विधीयुक्त केले. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे या निर्जला एकादशीचे व्रत करतील व त्याचे माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.” ज्येष्ठ शुक्लपक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. निर्जला एकादशी कथा २ एकदा भीमसेन व्यासांना म्हणाला, “महर्षी! माझी माता कुंती, चारही बंधू व द्रौपदी हे सर्व प्रत्येक एकादशीला उपवास करतात. ते मला – एकादशीला भोजन करू नकोस – असे म्हणतात. पण माझ्या पोटात वृक नावाचा अग्नी नेहमी प्रज्वलित असतो. मी खूप अन्न खातो तेव्हा तो थोडा वेळ शमतो. त्यामुळे मला एकभुक्त राहणेही शक्य नाही. मी वर्षातून एकच उपवास कसातरी करू शकतो. तरी ज्या उपवासाने मला सर्व एकादश्यांच्या उपवासांचे फल मिळेल असा एखादा उपवास सागा. व्यास म्हणाले, “ज्येष्ठ शुक्ल पक्षात सूर्य वृषभ किंवा मिथुन राशीत असताना जी एकादशी येते तिला निर्जला एकादशी म्हणतात. या दिनी केवळ स्नान आणि आचमनापुरताच पाण्याचा उपयोग करावा. एकादशीच्या सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत पाणी वर्ज्य करावे द्वादशीस स्नान, विष्णुपूजन आणि ब्राह्मणाला जलदान किंवा सुवर्णदान देऊन त्याच्यासह भोजन करावे त्यामुळे पुण्यकारक, पापनाशक, संतती-आरोग्य-ऐश्वर्य-मोक्ष देणाऱ्या सर्व एकादश्यांचे एकत्रित फल मिळते. ते ऐकून भीमाचे समाधान झाले. त्याने ज्येष्ठ शुक्ल एकादशीला उपोषण केले खरे पण तो तहानभुकेने फारच व्याकूळ झाला. त्याने दोन प्रहर कसेतरी काढले. तिसऱ्या प्रहरी उपोषण अगदीच असह्य झाले तेव्हा तो गंगेच्या पाण्यात बराच वेळ पडून राहिला. त्यामुळे त्याला थोडी हुशारी आली. ती रात्र त्याने मोठ्या कष्टाने काढली.. भीमाने या एकादशीस दोनदा स्नान ব केले. त्याचे स्मरण म्हणून व्रतस्थाने तिसऱ्या प्रहरी पुन्हा स्नान करावे. या एकादशीला शुचिर्भूत होऊन जो पाणी न पिण्याचा संकल्प करतो व पूर्ण श्रद्धेने त्याचे आचरण करतो, त्याचे पर्वताएवढे पापही भस्म होते. त्याला उपवासाच्या प्रत्येक प्रहरास विपुल स्वर्णदानाचे पुण्य मिळते. या दिवशी सुवर्ण, अन्न, वस्त्रादिक दानाचे अक्षय फल मिळते. द्वादशीस पारणे करून अन्न, पाणी, शय्या, आसन, कमंडलू, छत्र, पादत्राणे इत्यादी दाने देणारा स्वर्गलोकी जातो. भीमाने केलेली म्हणून निर्जला एकादशीला ‘भीमसेनी’ एकादशी असेही म्हणतात. या एकादशीचे व्रतमाहात्म्य श्रवण- पठण केल्याने कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते, स्वर्गपाप्ती होते. निर्जला एकादशी माहात्म्य श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर अनुज भीमसेन । याते एकदा पडला प्रश्न । तधी करण्या शंकानिरसन । व्यासमुनींते भेटला ।।१ ।। आदराने चरण वंदिले । क्षेमकुशल विचारले । मग अनुज्ञा घेउनी भले । केले निवेदन मनोगत ।।२ ।। म्हणाला हे क्रषिश्रेष्ठा । पितामहा बुद्धिवंता। आली आस्था धरुनी चित्ता । तरी करावा उपदेश ।।३।। युधिष्ठिर कुंती आणि द्रौपदी। अर्जुन नकुल सहदेव आदी। हे एकादशीस कधी । नाही सेवत अन्नाते ।।४।। उपोषण करतात सर्व जण । मलाही सांगतात समजावून । हे बलशाली भीमसेन । तूही करावा उपवास ।।५।। व्यासदेवा मग मीही । देतो उत्तर लवलाही। मज सहन होत नाही। हा भूक तुम्ही जाणता ।।६ । हे तपस्वी सुव्रता । हीच असे मम व्यथा । तुम्हांसारखा जाणता । आहे म्हणुनी आलो मी ।।७।। दाने देईन विधिपूर्वक । पूजीन केशवा मनःपूर्वक । परी उपोषण तेच एक। नच घडेल माझ्याने ।।८।। म्हणून उपवास केल्याशिवाय । एकादशी फल मिळेल काय । असल्यास एखादा योग्य पर्याय । तोही सांगा मजलागी ।।९।। व्यास म्हणाले तयाप्रत । स्वर्ग इष्ट नरक अनिष्ट । असे जर का तुजसी वाटत । उपोषणाते करावे ।।१० ।। तेव्हा भीमसेन काय म्हणाला । देवा सांगतो सत्य तुम्हांला । एक वेळ * जेवूनदेखील मजला । राहवत नाही खरोखर ।। १ १ ।। पितामह मम जठरात। वृक अग्नी सदा प्रज्वलित । अन्नग्रहण यथास्थित । घडता किंचित तो शमतो ।।१२। असे असता मजकडून। कैसे होईल उपोषण । तरी वर्षातून एक दिन । करीन प्रयत्ने उपवास ।।१३।। जेणे मिळेल श्रेय साचे । समस्त एकादशी उपोषणांचे । असे एखादे महत्त्वाचे । व्रत सांगा मजलागी ।।१४।। आपुल्या वचनी विसंबून । करीन आदरे त्याचे आचरण । तरी निश्चयाने ठरवून । सांगा मजसी दिवस तो ।।१५।। व्यास म्हणाले तयाप्रती । तू जाणसी मनुस्मृती । वैदिक धर्मांची माहिती। तीही आहे तुजलागी ।।१६।। ते धर्म कलियुगात । आचरणे शक्य नाहीत । परी त्यावरही निश्चित । अन्य पर्याय जाणावे ।।१७।। जे अल्पायासे अल्पखर्चात । होईल शक्य जनांप्रत। कल्याणास्तव ते समस्त । पुराणसार सांगतो।।१८।। त्यानुसार मासांतील एकादश्यांस । श्रद्धेने करावा उपवास । तेणे नराचा हमखास। नरकवास तो चुकतो ।। १९।। ऐकून ते व्यासवचन । महाबाहू भीमसेन । अश्वत्थपर्णासमान । थरथर कापू । लागला ।।२० ।। भयभीत होउनी मानसी । वदला पितामह व्यासांसी । कृपया मार्ग दावा मजसी। काय करावे नच कळे ।।२१।। देह असुनी बलयुक्त । उपोषणाचे नाही सामर्थ्य । तरी एकच एकादशी व्रत । सांगा महान फलदायी ।।२२ ।। तैं तयाचे सांत्वन करीत । व्यास म्हणाले हो निश्चिंत । एक पर्याय असे उचित । तोच सांगतो तुजलागी ।।२३।। ज्येष्ठ मासी शुक्ल पक्षात। सूर्य असता वृषभस्थ । अथवा मिथुन राशीत । एकादशी येते पां ।॥२४|॥ या दिनी वर्ज्य जलग्रहण । करावे आदरे उपोषण । प्रयत्नपूर्वक व्रताचरण । व्हावे पूर्ण श्रद्धेने ।।२५।। स्नान-आचमनापुरता । उदक उपयोग जाण श्रेष्ठा । अन्यथा किंचितही जल घेता। व्रतभंग तो होतसे |२६।। म्हणुनी व्रतस्थे एकादशी दिनी। प्रारंभी प्रातःकालापासुनी। सूर्योदयापर्यंत अन्य दिनी। जल प्राशन करू नये ।।२७।। हा एकचि नियम येथ । वृकोदरा तू घे ध्यानात । आल्पायासे महत्फलप्राप्त । द्वादश एकादश्यांचे ।।२८।। – अन्य दिनी द्वादशीस। उठुनी प्रातःसमयास । करुनिया स्नानास। शुचिर्भूत व्हावे पां ।।२९।। तदनंतर विप्राते सन्मानून । द्यावे जल सुवर्णदान । मन इंद्रिये स्वाधीन ठेवून । भोजन करावे त्यासवे ।।३०।। अशा प्रकारे व्रत करावे । अपार पुण्यासी प्राप्त व्हावे । त्याविषयीचे ऐकावे । विवेचन जे सांगतो ।।३१।। ज्येष्ठ शुक्ल एकादशीचे । उद्यापनासह व्रत साचे । आचरिता चोवीस एकादश्यांचे । फल मिळते त्या नरा ।।३२।। हे पूर्ण सत्यवचन । कारण सदर गुह्य कथन । मजसी केले असे जाण । चक्रधारी भगवंते ।।३३।। आता तिथीची विशेष महती । तीही सांगतो तुजप्रती । हिच्या आचरणे पुण्यप्राप्ती । समस्त तीर्थ दानांची ।।३४।। भीमसेना एका संवत्सरात। प्रतिमासी दोन्ही पक्षांत । ज्या एकादशा येतात । त्या सर्वही फलदायी।।३५|| कोणी धनधान्य देती। कोणी आयुरारोग्य वाढविती । कोणी पुण्यकारक अति । कोणी संतती देते पां।३६ ।। या समस्त एकादश्यांचे । फल व्रत -उपोषणांचे । एकत्रित प्राप्त साचे । एका निर्जल उपवासे ।।३७॥। हे नरव्याघ्रा भीमसेना । थोर महिमा घेई ध्याना। याविषयी पां तुझ्या मना । किंतु नसावा किंचित ।।३८।। जो आचरितो हे व्रत । त्याचे भवपाश तुटतात । अंतःकाळी अति सुखात । जातो नर तो वैकुंठी ।।३९।। त्या समयी विकराळ देहांचे । काळ्या पिंगट वर्णांचे । दंडपाशधारी दूत यमाचे । नच पडतात दृष्टीस ।।४०।। त्याऐवजी परमशांत । शंखचक्रधारी विष्णुदूत । आदरे घेउनी जातात । – वैष्णवलोकी त्या नरा ।॥४१।। याचसाठी प्रयत्नपूर्ण । करावे निर्जल उपोषण । उत्तम धेनू देता दान । होतो निष्पाप मनुष्य तो ।।४२ ।। व्यासवाक्य श्रवण केले। तेणे भीमाचे हृदय भरले । आदराने चरण धरिले । महर्षींचे तेधवा । ४३ । मग क्रषिवचनी विसंबून । समस्त पांडवांनी मिळून । केले पुढती उपोषण । त्या पवित्र तिथीसी ।।४४। वृकोदराने व्रत केले । त्याचे सर्वांना कौतुक वाटले । निर्जलेस म्हणू लागले । भीमसेनी एकादशी ।।४५।। पुढील काळात ही तिथी । झाली प्रसिद्ध याच नावे ती। आता भीमसेनाची स्थिती । वर्णन करुनी सांगतो ।।४६।। बंधूंसमवेत वृकोदराने । व्रत केले आदराने । परी दोन प्रहरी क्षुधातृषेने । अति व्याकूळ जाहला ।।४७।। तृतीय प्रहरी दुःख दारुण । सहन होईना उपोषण। तधी गंगेत प्रवेश करून । पडून राहिला जलात ।।४८।। बराच वेळ आंधोळ केली । तेणे किंचित हुशारी आली । कशीबशी रात्र काढली । महत्प्रयासे तेधवा ॥४९ । ज्येष्ठ शुक्ल एकादशीस। जरी पडले सायास। तरी मानुनी ऋ्रषिवचनास । व्रत केले निश्चये ।।९० । भीमाने या तिथीस । केले दोनदा स्नानास। त्या स्मरणार्थे तृतीय प्रहारास । स्नान करावे सद्भावे ।।९१।। ज्येष्ठ शुक्ल एकादशी दिनी। प्रातःसमयी लवकर उठुनी । शौचादिक कर्मे करुनी। व्हावे प्रथम शुचिर्भूत ।।५२।। मग संकल्प करावा मनी। म्हणावे देवा आज हरिदिनी। निर्जल उपवास करुनी। पारणे करीन उदईक । । ५३ । तदनंतर व्हावे पापशमन । यास्तव इंद्रिय संयम करून। श्रद्धेने पूर्ण व्रतस्थ राहून । भावे भजावा श्रीहरी । ।५४ । तेणे स्त्रियांचे वा पुरुषांचे । महापर्वत जरी पापांचे । तेही व्रतप्रभावे साचे । भस्मसात होती पां ।।५५।। या दिनी जो सामर्थ्यहीन । देऊ न शकेल धेनू दान । त्याने घट वस्त्रवेष्टित करून । सुवर्णासह द्यावा तो ।।९६।। या एकादशीस साचा । जलवर्जित उपवासाचा । नियम असेल ज्या नराचा। तो महान पुण्यवान ।।५७।। कारण या दिनी प्रत्येक प्रहरास । कोटी स्वर्णदानासम खास। पुण्य लाभते त्या नरास । महिमा असे यापरी ।।५८।। या पावन तिथीस । दान जप होम केल्यास । कृष्णवचन त्या भाविकास । अक्षय पुण्य लाभते ।॥५९।। उपोषण करिता भक्तिपूर्वक । प्राप्त वैष्णवपद अलौकिक । असे असता नियम अनेक । कासया आचरावे ते ।।६०।। या एकादशी निमित्ते द्वादरशीस । देता सुवर्ण अन्न वस्त्रास । ते दान त्या दात्यास । होते अखंड फलदायी ।।६१।। या दिनी जो अन्न खातो । तो पाप भक्षण करितो । इहलोकी अधम होतो । पावतो आंटी दुर्गती। ॥६२। परंतु जे नरश्रेष्ठ । शुद्ध भावे हे व्रत । आचरुनी दाने देतात। त्यांते मिळते मोक्षपद ।।६३ ।। गुरुद्वेषी ब्रह्महत्यारा । चोर मद्यपी खोटे बोलणारा। अशा पातकी अधम नरा । नरकयातना भयंकर ।।६४।। पण त्यानेही श्रद्धा ठेवून। केले निर्जला व्रत पावन । तर तोही निष्पाप होऊन । पावतो परम दिव्य पदा ।।६५।। ज्येष्ठ शुक्ल एकादशीचा । महिमा यापरी श्रेष्ठ साचा । म्हणुनी या दिनी करावयाचा । विशेष आचार सांगतो।।६६।। या दिनी व्रतस्थ व्यक्तींनी। इंद्रिय समूहाते आवरुनी। जलशायी नारायाणाते पूजुनी। करावे निर्जल उपोषण ।।६७।। धेनू अथवा घृताचे । दान विधिवत द्यावे साचे । प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांचे । घ्यावे आशीर्वादही ॥६८। । यास्तव द्रव्य दक्षिणा देउनी। आणि नाना मिष्टान्ने अर्पुनी। विप्रगणांते देव मानुनी। करावे आदरे संतुष्ट ।।६९॥ कारण भूदेव तृप्त होता । श्रीहरी जो मोक्षदाता । तोही संतोष पावुनी चित्ता। करितो अक्षय कल्याण ।।७०।। ऐसे माहात्म्य जाणूनही। जो व्रताते करीत नाही। त्याते चाड नुरली काही। आत्म द्रोही समजावा ।।७१ ।। तो नर अंध मूढमती । दुराचारी अति । पापबुद्धीच दुष्ट त्याच्या चित्ती । निःसंशय हे जाणावे ।।७२।। परंतु जे भाग्यवान । भगवंतावर श्रद्धा ठेवून।। करतात उपोषण जागरण । ते नर श्रेष्ठ जाणावे ।।७३।। कारण असे निग्रही पुण्यवंत । शांतचित्त भगवद्भक्त कुलउत्कर्षही साधतात । उत्तम व्रताचरणे या ।७४।। पूर्वज जरी शंतसंख्येत । त्यांनाही ते उद्धरतात । नेतात आपुल्यासमवेत । पावन विष्णुलोकासी ।।७५।।तिथी असे ही पुण्यवर्धिनी। म्हणुनी द्वादशीस पारणे करुनी । द्यावी वस्त्रे अन्न पाणी । शय्या आसन कमंडलू।।७६।। जो मनुष्य या दिवशी । पादत्राणे देतो विप्रासी। तो जातो स्वर्गलोकासी। सुवर्णयानी बैसून ।।७७। जयेष्ठ शुद्ध एकादशी कथा। तिचेही श्रेष्ठत्व सांगतो आता। भक्तीने श्रवण पठण घडता । श्रोता वक्ता उद्धरती ।।७८।। सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री। श्राद्धकर्मे जी फलप्राप्ती। तितकेच पुण्य नराप्रती । मिळते कथाश्रवणे या ।।७९।| तिथी असे ही अलौकिक। परमपावक पुण्यश्लोक । आचरणे महान सुख । हरिकृपेने लाभते ।।८०।। ॥ इति श्रीभारतपाद्मयोरुक्त ज्येष्ठशुक्लैकादश्याः निर्जलानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् । ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website