परिवर्तिनी एकादशी व एकादशी व्रताचे माहात्म्य : १७ सप्टेंबर २०२१ moderator September 17, 2021 दिनविशेष भाद्रपद शुक्लपक्षातील एकादशीला पद्मापरिवर्तनी एकादशी म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “आता तुला पद्मापरिवर्तनी एकादशीचे माहात्म्य सांगतो ते नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी त्रेतायुगात या पृथ्वीवर दैत्यवंशातील प्रल्हादाचा नातू बळी नांबाचा चक्रबर्ती राजा राज्य करीत होता. तो विष्णू भक्त होता. त्याने स्वर्गातील इंद्रपद प्राप्त होण्याकरिता नर्मदेच्या काठी १०० यज्ञ करण्याचे उरविले आणि त्याप्रमाणे कुलगुरु शुक्राचार्य यांच्या संमतीने ९९ यज्ञ केले, तेव्हा इंद्र चिंताक्रांत होऊन सर्व देवांसह क्षीरसागरी भगवान विष्णूकडे गेला, भगवान विष्णूची प्रार्थना करुन म्हणाला की, “हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका, जगदोद्वारका तूं अनाथांचे माहेर आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. पृथ्वीवरील बळी राजा १०० यज्ञ करुन माझे इंद्रपद हरण करु पहात आहे. आता त्याचे ९९ यज्ञ झाले आहेत. तरी आमच्यावर दया करुन आमचे संरक्षण कर.’ इंद्राचे ते भाषण ऐकून भगवान विष्णू म्हणाले की “हे शचिनायका ! बळीराजा महापुण्यवान असून माझा भक्त आहे. त्याच्या पुण्याचे फळ त्याला मिळालेच पाहिजे तेव्हा विनंतीचा काही एक उपयोग होणार नाही.” यावर इंद्र दीन वदनाने म्हणाला की; “हे दीनोद्वारक ! तूं आमचे हे दुःख नाहीसे करशील म्हणून आम्ही मोठ्या आशेने तुजकडे आलो होतो. देवा ! तुझ्याच कृपेने मला हे इंद्रापद मिळाले आहे. तूच जर आमच्यावर अवकृपा केलीस तर या जगात आमचे कोणीही रक्षण करु शकणार नाही. माझे हे इंद्रपद मजकडेच ठेवून त्याची समजूत अन्य उपायाने कर. याप्रमाणे इंद्राने काकुळतीचे भाषण ऐकून विष्णूंनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले. इंद्र आनंदीत होऊन तेथून निघून गेला. इकडे विष्णूनी ब्राह्मण वेशात कश्यपाचे घरी अदितीचे उदरी जन्म घेतला. तो जन्म अयोनी संभव होता. जगन्नायकाची ती आठ वर्षाची मूर्ती अत्यंत देदीप्य व मनोहर होती. कश्यपाने त्याचे जातकर्मांदी करुन वामन नांव ठेवले पुढे व्रतबंध करुन भिक्षा मागण्यास सांगितले. भगवान विष्णू वामन रुपाने भिक्षा मागण्याकरिता निघाले ते थे। नर्मदातटाकी जेथे बळीराजाचा १०० वा यज्ञ चालला होता तेथे आले. त्यांनी बळीराजाला त्रिपाद भूमी दान मागितली. राजाने ती देण्याचे कबूल केले. तेव्हा ते पाहून कुलगुरु शुक्राचार्यांनी हा विष्णू देवकार्य करण्याकरिता ब्राह्मणाचे रुप घेऊन आला आहे. म्हणून तूं याला दान देण्याचे रहित कर. असे सांगितले पण प्रत्यक्ष भगवान विष्णू ब्राह्मणाचे रुप घेऊन दान मागण्याला आपल्याकडे आले हे ऐकून बळीराजाला आनंद झाला. व त्याने वामनाच्या हातावर उदक सोडले तेव्हा वामरूपी विष्णूनी आपला देह विशाल केला. वामनरुपी विष्णूंनी आपले एक पाऊल पृथ्वीवर व दुसरे स्वर्गात ठेविले, तिसऱ्या पावलाला जागा नव्हती, तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला रसातळी घातले. तरी देखील तो विष्णूभक्ती पासून बिलकूल ढळला नाही. म्हणून त्या दिवसापासून भगवान विष्णू त्याच्या घरी द्वारपाल होऊन राहिले. तो दिवस भाद्रपद शुद्ध एकादशीचा होता. त्या एकादशीला पद्मापरिवर्तनी असे म्हणतात. श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे पद्मापरिवर्तनी एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील.” भाद्रपद शुक्लपक्षातील एकादशीला पद्मापरिवर्तनी एकादशी म्हणतात. परिवर्तिनी एकादशी माहात्म्य श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा । हे सखया दयाघना । भाद्रपद शुक्ल एकादशी महिम्ना । करी विदित मजलागी ।। १।। काय असे तिचे नाव । कळू दे दैवत पुण्यप्रभाव । आणि व्रतविधीची सर्व । सांग माहिती निजकृपे ।२।। श्रीकृष्ण वदला धर्मा ऐक । तिथिप्रभाव अलौकिक । माहात्म्य थोर पुण्यकारक । जळती पापे त्यायोगे । ३।। । या स्वर्गमोक्षदायी तिथीसी । म्हणतात ‘वामन’ एकादशी। हिची श्रेष्ठता सांगतो तुजसी । श्रवण करी आदरे।।४ । । याच वामन एकादशीप्रत । ‘जयंती’ असेही म्हणतात । कथाश्रवणे पाप समस्त । नष्ट होय तत्काळ ।॥५॥ आता गुह्य सांगतो तुज। या एकादशीखेरीज । मोक्षदात्री अशी आज। नाही तिथी हितकर्ती ।।६।। तरी हे धर्मा नृपश्रेष्ठा । मोक्षाची आस ज्याच्या चित्ता । त्याने या एकादशी व्रता । आचरावे सद्भावे ॥७ ॥ जे -जे कोणी सद्भक्त। वैष्णव मत्परायण सतत । त्यांनी तर हे पावन व्रत । करावे पूर्ण निष्ठेने ।।८। । भाद्रपद शुक्ल एकादशी दिनी । वामन-पूजन केले ज्यांनी। तिन्ही लोक पूजिले त्यांनी। निःसंशय हे जाणावे ।।९।। या व्रतप्रभावे देख । ते समस्त वामनपूजक । हरिसान्निध्य अलौकिक । प्राप्त करितात निश्चये ।।१० ।। या दिनी कमलनेत्र वामनाची। पूजा कमळांनी केली साची । त्यांनी त्रिदेवांसह जगताची । पूजा केली जाणावे ।११ ॥ आचरिता जयंती एकादशी व्रत । मनुष्यास तीनही भुवनांत । काही उर्वरित नाही उरत । अन्य कोणते कर्तव्य ।।१२।। आषाढीसी निद्रिस्त । तो शेषशायी भगवंत। या दिनी कूस बदलीत । होतो दुसर्या कुशीवरी ।।१३।। म्हणुनी या एकादशीप्रत । ‘परिवर्तिनी’ म्हणतात । पुराणेही सांगतात । माहात्म्य या तीथीचे ।।१४।। तधी युधिष्ठिर काय म्हणाला । देवा, मनी संशय उपजला। तरी करावे या समयाला । निवारण त्या शंकेचे ।।१५।। तू देव असुनी चातुर्मासी । होसी निद्राधीन कशासी। आणि या एकादशी दिवशी। का बदलसी कुशीते ।।१६ ।। तू बली दैत्याप्रत । का टाकिले बंधनात। त्याविषयीचा सर्व वृत्तान्त । कथन करावा मजलागी ।।१७।। तैं श्रीकृष्ण वदला राजश्रेष्ठा। सांगतो तुजला ती कथा । त्रेतायुगात एक होता। दैत्य बली नावाचा ।।१८।। तो केवळ मत्परायण । भक्त अनन्य साधारण । मम चरणी निष्ठा ठेवून । पूजन अर्चन करीतसे।।१९।। तो मम नाममंत्रांनी। आणि विविध सूक्तपाठांनी। दृढभावे भजन करुनी । आळवीतसे प्रेमाने ।॥२०।। त्यासवे। नित्य विप्रपूजन। करीतसे यज्ञ मनापासून । परी दूषित अंतःकरण । द्वेष करी इंद्राचा ।।२१ ॥ त्याने आधी भूलोक जिंकला । मग स्वर्गावरी धावला। जो मत्प्रसादे प्राप्त झाला। होता देवराजासी ।।२२। त्या भीषण संग्रामात । ठरले असुर यशवंत । केले बलीने निष्कासित । इंद्रासह देवांते ।।२३।। तधी पराभूत अमरगणांनी। अज्ञात स्थळी एकत्र येउनी। सारी स्थिती अवलोकुनी। एक निर्णय घेतला ।।२४।। वदले आपण सर्व मिळून । नारायणाते जाऊ शरण । आणि सांप्रत संकट सांगून । करू प्रार्थना सोडविण्या ॥२५॥| तदनंतर सुरेंद्रे जाण। देवकषींसह मज भेटून । आदरे नमन स्तवन करून । केली निवेदन हकिकत ।।२६।। देवांसह गुरूनेही । मज पूजिले त्या समयी । तेणे मम कोमल हृदयी। महाकारुण्य उपजले ।।२७ ॥। जाणुनी त्यांच्या दुरवस्थेला । मी निजमनी विचार केला। आणि कार्यास्तव भला । घेतला पंचम अवतार ।।२८।। वामनरूपे बालक होउनी। ठाकलो बलीच्या निवासस्थानी । अंती विराट स्वरूप घेउनी। केले स्थापित वर्चस्व ।।२९।। बलीनेही त्या समयी। आपुले सत्त्व सोडले नाही। ते पाहुनी मम हृदयी। अपार कृपा लोटली।।३०।। म्हणुनी त्याचे सर्वस्व घेतले । ते इंद्रासी देऊ केले । तरी तयासही दिधले । पाताळाचे स्वामित्व ।।३१।। तधी युधिष्ठिर काय म्हणाला ।। हे देवेशा सांग मजला। त्वा वामनरूपे त्या दैत्याला । कैसे परास्त केलेस ।।३२।। धन्य तुझी अवतारलीला। म्हणुनी पां हट्ट केला। तरी सांगुनी कथानकाला। पुरवावी ही जिज्ञासा ।।३३।। श्रीकृष्ण वदला तयाप्रत । त्या समयी मी केले कपट । बटू वामनरूपात । गेलो त्यासी भेटाया।।३४|॥ आणि म्हणालो दैत्यश्रेष्ठा । पुरवावे मम मनोरथा । तीन| पावले भूमी अर्पिता । पुण्य त्रैलोक्य दानाचे ।।३५|| तरी संशय न घेता । संकल्पे उदक सोड आता। दाता म्हणुनी तुझी श्रेष्ठता । गौरवितात सर्वही ॥३६|| जाणुनी मम वचनासी। तया प्रेरणाही झाली तैसी। ‘केले त्रिपाद भूमिदानासी’। बोलुनी उदक सोडिले ।।३७।। त्याने यापरी शब्द दिधला । तैसा मीही देह वाढविला । अधिकाधिक उत्तुंग केला। अंतपार ना तयाते ।।३८।। तेव्हा माझे पाय भूमीवर । गुडघे भुवल्लोकावर । स्वर्गलोकात होती कमर । उदर महल्लोकाते ।॥३९|| हृदय होते जनलोकात । कंठ तपोलोकात । मुख जरी सत्यलोकात । मस्तक वरती त्याच्याही।।४०। तधी चंद्र सूर्य नक्षत्रगण। शेष इंद्रादी देवांनी मिळून। विविध सूक्ते उच्चारून। केले मम स्तवनाते ।।४१।। तैं बलीसी हाती धरून । वदलो तव वचनी विसंबून । मी एकाच पदाने जाण । समस्त मही व्यापली ।।४२।। द्वितीय पदाने देख । व्यापिला मी स्वर्गलोक । आता उर्वरित तिसरे एक। पाऊल कुठे ठेवू हे ।।४३।। मम वचन ध्यानी घेऊन । तयाने मस्तकचि केले अर्पण । तधी त्यावरी पाय ठेवून। त्वरे दडपिला पाताळी ।।४४।। तो त्याचा विनय पाहून । तुष्टलो मी झालो प्रसन्न । वदलो असे मी जनार्दन । तू मद्भक्त निस्सीम ।।४५।। आता यापुढे सदोदित । मी असेन तुझ्यासमवेत । हे मम वचन तुजप्रत। विरोचन-पुत्रा बलवंता ।।४६ युधिष्ठिरा तेव्हापासुनी। वचनपूर्तता व्हावी म्हणुनी। चातुर्मासी दोन स्थानी । करितो मी निवसन ।।४७।। अर्थात ‘शयनी’पासुनी थेट । कार्तिकी एकादशीपर्यंत । मम एक मूर्ती पाताळात। राहते बलीसमीप ती।॥४८।। आणि त्याच वेळी मूर्ती दुसरी । श्रेष्ठतम क्षीरसागरी। विशाल शेषशय्येवरी । निद्राधीन होते पां ।।४९।। पुढती येता भाद्रपदमास । शुक्लपक्षातील एकादशीस। एकांगावरूनी दुसऱ्या अंगास । होते परिवर्तित ती।।५०।। एकादशी ही पुण्यवर्धिनी। महापातकनाशिनी। तरी दिन माहात्म्य जाणुनी। व्रत अवश्य करावे हे ।॥५१॥ त्रैलोक्य पितामह वामन । त्याचे या दिनी करुनी पूजन । रुपे तंडूल दह्याचे दान । द्यावे करावे जागरणा ।।९२।। अशा प्रकारे विधियुक्त। आचरिता हे महाव्रत । सर्व पातके होउनी नष्ट । मुक्त होतो मनुष्य तो ।।५३।। परिवर्तिनी निश्चित । शुभफलदायी अत्यंत । हिच्या प्रभावे महातेज प्राप्त । जातो नर तो स्वर्गासी।।९४ । माहात्म्य या कथेचे । तेही अलौकिक श्रेष्ठ साचे । श्रवणे सहस्त्र अश्वमेधांचे । फल लाभते भाविका ।।५५।। ॥इति श्रीस्कंदपुराणे भाद्रपदशुक्लैकादश्याः परिवर्तिनीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।। ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ।। शुभं भवतु ! Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website