आषाढ शुद्धपक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.
 
धर्मराजा म्हणाला की, “हे श्रीकृष्णा ! मला शयनी एकादशीव्रताचे माहात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तरी कृपा करुन ते सांगा.” धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की, याबद्दल तुला एक पूर्वेतिहास सांगातो तो नीट चित्त देऊन ऐक. पूर्वी एकदा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले असताना ब्रह्मदेवांनी नारदाला याच एकादशीव्रताचे माहात्म्य सांगण्याला सुरुवात केली.
ब्रह्मदेव म्हणाले की, “हे नारदा! पूर्वी या पृथ्वीवर सूर्यवंशातील मांधाता नांवाचा राजा करीत होता. तो महापराक्रमी, समर्थ व धमनि । असा होता. प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करीत असे. त्याच्या प्रजेला दुःखाची कल्पना स्वप्नांत सुद्धा येत नसे. जिकडे तिकडे सुखाचा आनंदाचा भरपूर रंग उधळला जात असे.पण हे नारदा ! दुदैवाने त्याच्या सुखात विष कालवले गेले. दुधात मिठाचा खडा पडला. त्याच्या राज्यात तीन वर्षेपर्यत अवर्षण पडले. पाऊस न पडल्यामुळे त्या तीन वर्षात धान्य पिकले नाही. चारा उत्पन्न झाला नाही. राजाच्या खजिन्यातले द्रव्य संपल्यामुळे तो चिंताक्रांत झाला व त्याचप्रमाणे प्रजेजवळ असलेला धान्याचा व चाऱ्याचा साठा संपल्यामुळे ती हवालदील झाली. सुविचाराचा लोप होऊ लागला, दुर्बुद्धीचा उदय होऊन ती थैमान घालू लागली. एकमेकांवरचा विश्वास उडू लागला, स्वार्थाकरिता नीच कर्मे सुरु झाली, धर्माचा अधःपात होऊ लागला. याप्रमाणे चोहोकडून हाहाःकार सुरु झाला, तेव्हा काही लोक राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले की, “हे राजा ! भरपूर धन धान्य न मिळाल्यामुळे लोक स्वास्थ्यापासून ढळले. स्वास्थ्य ढळल्यामुळे धर्माधर्माचा विचार सुटला. धर्माधर्माचा विचार सुटल्यामुळे स्वकर्तव्यरुपी यज्ञ होईनासे झाले. स्वकर्तव्यरुपी यज्ञ सुटल्यामुळे देवता असंतुष्ट झाल्या. देवता असंतुष्ट झाल्यामुळे पाऊस पडेनासा झाला. पाऊस न पडल्यामुळे धान्य पिकेनासे झाले. या सर्व अधःपाताचे कारण पाऊस न पडणे हेच होय. आम्ही तुझी प्रजा आहो. तरी ज्याच्या योगांने आम्हाला सुख होऊन आमची भरभराट | होईल अशी व्यवस्था लवकर कर. प्रजेचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की, तुम्ही जे म्हणता त सत्य आहे या सर्व अधःपाताचे कारण पाऊस न पडणे हेच आहे व ते तुम्हा सांगण्यापूर्वीच माझ्या ध्यानात आले होते. यावर उपाय योजण्याकरिता मा रात्रदिवस विचार आणि प्रयत्नही करीत आहे. तरी आता लवकरच तुमची या आपत्तीतून मुक्तता करितो काळजी करु नका. या प्रमाणे राजाचे आश्वासन मिळाल्यावर प्रजा निघून गेली. इकडे राजा घोड्यावर बसून जवळच असलेल्या आंगिरस ऋषीच्या आश्रमी गेला आंगिरसऋषीचे तपःसामर्थ सूर्यासारखे प्रखर होते, ज्ञान समुद्राप्रमाणे अफाट होते. ते शांतीचे मूर्तिमंत अवतार होते. आश्रमाच्या ठिकाणी आंगिरसऋषी बसले होते त्याठिकाणी राजा आला. साष्टांग नमस्कार घालून उभा राहिला. आणि हात जोडून, प्रार्थना करुन आपल्या राज्यात अवर्षण पडून प्रजा हवालदील झाल्याचे सांगितले व त्यावर उपायही विचारला.
ऋषीने राजाला बसण्यास सांगून आपल्या जवळ घेतले, आणि म्हणाले की, “हे राजा ! हल्ली कृतयुग आहे. कृतयुगात फक्त ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी. इतरांना ती करण्याचा अधिकार नाही, असे असताना तुझ्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करीत आहे. आता जर त्याला त्या तपःश्चर्यपासून पराड़मुख करशील, तर तुझ्या राज्यात पाऊस पडून तिकडे सौख्य नांदेल. जिकडे ऋषीचे ते भाषण ऐकून राजा म्हणाला की, मी जर त्याच्या तःश्चर्येचा भंग केला तर मला दोष लागेल. करिता दुसरा एकादा सोपा उपाय सांगा. त्यावर ऋषी म्हणाले की, जर तुझ्या हातून वरील उपाय होत नसेल तर शयनी एकादशीचे व्रत कर म्हणजे तुझ्या राज्यात पाऊस पडून भरपूर धान्य पिकेल व प्रजेची उन्नती होईल. पुढे राजाने शयनी एकादशीचे व्रत (सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे) विधीयुक्त केले. तेव्हा त्याच्या राज्यात पाऊस पडला. धान्य पिकले प्रजेची सर्व बाजूने भरभराट झाली व जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला.श्रीकृष्ण म्हणाले की, “हे धर्मराजा ! जे कोणी हे शयनी एकादशीचे व्रत करतील व माहात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील. आषाढ शुद्धपक्षातील एकादशीला शयनी एकादशी म्हणतात.

देवशयनी एकादशी माहात्म्य 

युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आषाढ शुक्ल एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! ही तिथी पद्मा किंवा शयनी नावाने प्रसिद्ध आहे. हिचे व्रत परम पुण्यकारक, पापनाशक, सुखदायक, तसेच ऐश्वर्य आणि मुक्ती देणारे आहे. त्रैलोक्यात हिच्यासारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने मनुष्य सर्व पातकांपासून मुक्त होतो. आता हिची (ब्रह्माण्ड) पुराणातील कथा सांगतो.

पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो धर्मानुगामी, सत्यप्रतिज्ञ, प्रतापी व प्रजाहितदक्ष होता. त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती, सुकाळच होता. पुढे त्या प्रांतात तीन वर्षे पाऊसच पडला नाही. प्रजा अन्नपाण्यावाचून तडफडू लागली. देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे आणि वेदाध्ययनादी धर्मकार्ये बंद पडली. तेव्हा सर्व लोक राजाकडे आले व – पाऊस पडून सर्वांचा योगक्षेम चालेल यासाठी काहीतरी प्रयत्न कर’ – अशी विनंती करू लागले. तेव्हा तो सैन्यासह वनात गेला. त्याने अंगिरा ऋषीची भेट घेतली. त्याला सततच्या दुष्काळामुळे राज्यावर ओढवलेली संकटग्रस्त परिस्थिती – निवेदन केली व म्हणाला, “मुने ! मी स्वधर्माचरणाने वागत असूनही हे असे का घडले मला समजत नाही. तरी कृपा करून – पर्जन्यवृष्टी होऊन लोकांचे हाल थांबतील असा काही उपाय सुचवा. “
अंगिरा म्हणाला, “राजा! या कृतयुगामध्ये तपश्चर्या हा धर्म केवळ ब्राह्मणांसाठीच सांगितलेला असूनही तुझ्या राज्यातील एक शूद्र अखंड तपश्चर्या करीत आहे. या त्याच्या धर्मविरोधी आचरणामुळेच ही परिस्थिती ओढविली आहे. तू त्याचा वध आणि. त्यामुळे हा दोष दूर होईल. राजा म्हणाला, “मुने! त्या शूद्राने माझा कोणताही अपराध केलेला नाही. त्यामुळे त्याचा वध करणे योग्य होणार नाही. तुम्ही अन्य उपाय सांगा.” ऋषी म्हणाला, “ठीक आहे. तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा एकादशीचे व्रत कर. यात सर्वांना सहभागी करून घे. याच्या पुण्यप्रभावाने तुझ्या राज्यावरचे अवर्षणाचे संकट जाईल.”

राजा आनंदाने घरी परतला. पुढे पद्मा (शयनी) एकादशीच्या दिवशी त्याने आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह श्रद्धेने व्रताचरण केले. त्यामुळे त्याच्या राज्यात सर्वत्र पर्जन्यवृष्टी होऊन लोक सुखी झाले.

श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिराने प्रश्न केला । केशवा कृपया सांग मजला। आषाढ शुक्ल एकादशीला। काय असे नाव ते ।। १ । । सांग तिची कोण देवता । व्रतविधी आणि माहात्म्य कथा। तिजविषयीची मम चित्ता। आस जाणून घेण्याची ।।२॥ श्रीकृष्ण म्हणाला महीपाला। पूर्वी विधीने नारदाला। जो कथाभाग सांगितला । तोच उद्धृत करितो मी।।३।। एकदा मुनीने ब्रह्म्यासी । पुसिले तात सांगा मजसी । आषाढ शुक्ल एकादशी । आहे कोणत्या नावाची ।।४।। तिचा प्रभाव आणि महिम्न । कृपया तेही सांगा कारण । त्यानुसार विष्णु-आराधन । करीन मी श्रद्धेने ।।५।। तैं विधाता काय म्हणाला । तू वैष्णव शोभेसी भला । कलिप्रिय तू येथ चांगला। प्रश्न केलास मजलागी ॥।६।। एकादशीसम या जगतात। नाही अन्य पवित्र व्रत । निष्पाप करुनी नरांप्रत । पुरविते समस्त कामना ।।७।। तरीही हे महान व्रत । जे जन नाही करीत । जन्म व्यर्थ त्यांते निश्चित । नरकइच्छा जाणावी ।।८।। आषाढ शुक्ल एकादशी तिथी । ‘पद्मा’ नामे प्रसिद्ध जगती। हषीकेशाची साधण्या प्रीती। आचरावी सद्भावे ।।९।। यासंबंधी मंगलकारक । कथा सांगतो पौराणिक। जिच्या श्रवणे महापातक । तेही नष्ट होते पां ॥१०।। पूर्वकाली सूर्यवंशात । होऊन गेला नृपश्रेष्ठ । चक्रवर्ती प्रतापवंत । नाव त्याचे मांधाता ।।११।। धर्मनिष्ठ म्हणून प्रख्यात । त्याते मान क्रिभुवनात । कर्तव्यदक्ष तो सतत । चिंता वाही सकलांची ॥१२॥ प्रजापालनी अखंड तत्पर । सुखी निरोगी समस्त पौर । धन धान्य समृद्धी अपार । नव्हती आधिव्याधी कुणा ।। १३ ।। त्याच्या विशाल भांडारात। अन्यायाने संपादित । असे नव्हते द्रव्य किंचित । ध्यानी घेई नारदा ।१४।। धर्मराज्य करीत त्या वेळी । सुखे बरीच वर्षे गेली । दुर्दैवाने पुढती आली। संकटस्थिती राज्यात ।।१५।। तीन संवत्सरपर्यंत । नच पर्जन्य पडला तेथ। क्षुधातृषेने त्रस्त अत्यंत । प्रजा जाहल्या उद्विग्न ।।१६।। दुर्भिक्ष्य आणि अवर्षणामुळे। यज्ञ याग तेही थांबले । वेदाध्ययनही बंद पडले । काही सुचेना कोणाते।।१७ ।॥। तेव्हा सर्व प्रजा मिळाली। मांधात्यास विनंती केली। म्हणाली महाराज अतुर्बळी । म्हणणे आमचे ऐकावे ।। १८।। उदकासी पुराणांतून । ‘नार’ ऐसे संबोधन । तेच देवाचे निवासस्थान । म्हणुनी नारायण म्हणती त्या ।।१९।। तोच सर्वांतर्यामी भगवान । पर्जन्यरूपे वर्षतो जाण । अन्ननिर्मिती त्यापासून । प्रजा वाढती त्यापुढती।।२०।। परंपरा ही सनातन । पर्जन्य नसता नष्ट जीवन । तरी होईल प्रजाकल्याण। ऐसे करावे काहीतरी ।।२१।। राजा वदला पौरजन । सत्य आहे तुमचे वचन । ब्रह्मरूप असे हे अन्न। स्थित चराचर जगतात।।२२।। अन्नापासून भूत-उत्पत्ती। समस्त जीव पोसले जाती। अशी जीवनधारा ती। चालते याचकारणे ॥२३|| तरीही नृपदोषांकारण। दुःख भोगती प्रजाजन। विस्तृत अशा पुराणांतून । विवेचन ते याविषयी ।।२४।। परी सूक्ष्म विचार करूनही । मम पातक दिसत नाही। तरी निश्चये करीन काही । यत्न सकल हितास्तव ।। २५।। नृपे तैसा निर्धार केला। उपस्थितांते शब्द दिधला । नमन करुनी विधात्याला । निघाला सैन्य घेऊन ।।२६ ।। मजल- दरमजल करीत। संचरला घनवनात। नाना आश्रमस्थाने हिंडत। तपस्व्यांते भेटला।।२७।। एके दिनी ह भ्रमंतीत । आला अंगिरा आश्रमानिकट । हा विधीचा मानससुत । होता अतीव तेजस्वी ॥२८।। पाहुनी त्या कषीला। मांधात्यासी आनंद झाला । रथातून खाली उतरला । केले वंदन आदरे ।।२९।। नृप असुनी दासासमान । उभा राहिला हात जोडून । ऋषीनेही, आशीर्वचन । देउनी केले स्वागता ।।३०।| यथोचित आदरातिथ्य । करुनी पुसले कुशलवृत्त । देशस्थिती शत्रू मित्र । केली चौकशी सकलांची ॥३१॥ तपोनिधीच्या सान्निध्यात । रमले नृपमन झाले शांत । अंगिराने तयाप्रत । कारण पुसले येण्याचे ।।३२।। तधी स्थिती वर्णन करीत । राजा वदला मुनिश्रेष्ठ । मी स्वधर्माने सतत । पालन करितो पृथ्वीचे ।।३३।। असे असूनही मम राज्यात । पर्जन्यवृष्टी नाही होत । त्याचे कारण मजप्रत। उमजेना मुनिवरा ।।३४।। त्या शंकेचे व्हावे निरसन । म्हणुनी धरिले तुमचे चरण । सुखी होतील प्रजाजन । ऐसा उपाय सागावा ।।३५।। अंगिरा म्हणाला मांधात्याप्रत । कृतयुग श्रेष्ठ सर्व युगांत। धर्म चारही चरणयुक्त । तयामाजी जाणावा ।।३६ ।। म्हणूनच उत्तम युगात या । विप्रांनीच करावी तपश्चर्या । त्याचा अधिकार राया। नाही अन्य कोणाला । ।३७ ।। असे असूनही तुझ्या राज्यात । एक हीन तपश्चर्यारत । त्याचकारणे नाही होत । पर्जन्यवृष्टी सांगतो।।३८।। हा दोष जावा म्हणून । त्याच्या वधाचा करी प्रयत्न । तेणे जलवर्षाव होऊन। पूर्वस्थिती येईल ।।३९।। तैं राजा काय म्हणाला । मम अपराध नाही केला । असे असता मी तयाला। मारू कैसे सांगावे ।।४० । म्हणुनी या अनावृष्टीची । पीडा घालविण्या साची । गरज आपुल्या मदतीची। धार्मिक उपाय सांगावा ।।४१ ।। ऋषी म्हणाला राजाप्रत ।। कळले तुझे मनोगत । तरी आषाढ शुक्ल पक्षात । करी एकादशी व्रता ।।४२|| ही तिथी पद्मा नामक । सकल उत्तम सिद्धी प्रदायक। हिच्या कृपेने सांगतो ऐक। विलय पावती उपद्रव ।।४३।। हा एकचि उपाय जाण । करावे सकलानी व्रताचरण । त्या प्रभावे दोष जाऊन। पर्जन्यवृष्टी होईल ।।४४।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी। ऋषिवचने मांधात्यासी । अत्यानंद झाला मानसी। निरोप घेतला तयाचा ।।४५। पुढती आषाढ शुक्ल पक्षात । प्रजाजनांसह समस्त । नृपे आचरिले व्रत । पद्मा एकादशी दिनी ।।४६।। त्या व्रताची आली |प्रचिती। गेला दुष्काळ झाली वृष्टी। तेणे सर्वत्र महीपृष्टी । पिके डोलू लागली ।।४७।। हषीकेशाचा प्रसाद प्राप्त । सुखी जाहले जन समस्त । यास्तव हे पवित्र व्रत । आचरावे श्रद्धेने ।।४८।। या तिथीची श्रेष्ठ महती। देते ऐश्वर्य सौख्य मुक्ती । माहात्म्य श्रवण पठणे जाती। महापातके विलयाते ।।४९ ।।

॥इति श्रीब्रह्माण्डपुराणे आषाढशुक्लैकादश्याः पद्मानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम्

। श्रीकृष्णार्पणमस्तु।

शुभं भवतु!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.