हरकारा : मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ : ले. सत्येन वेलणकर Mandar Sant October 30, 2019 चर्चा **हरकारा : मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञानाचे आधारस्तंभ** हां हां शीर्षक वाचून असे दचकू नका. मध्ययुगीन माहिती तंत्रज्ञान म्हणजे शिवकालीन लॅपटॉप किंवा वायफाय किंवा नेटवर्किंग असली कोणतीही माहिती मी येथे देणार नाहीये , काळजी नसावी. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात , “Data is the new oil ” असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे . याचा अर्थ ज्या प्रमाणे तेल आणि त्याच्याशी संबंधित उद्योग हे जगाचे भवितव्य आणि सत्तेची आणि सामर्थ्याची गणितं ठरवण्या मध्ये महत्वाचे ठरतात, त्याचप्रमाणे Data किंवा माहितीला , तेला एवढीच किंमत आणि महत्व आहे. हा वाक्प्रचार जरी अधुनिक काळात प्रचलित झाला असला, तरी योग्य वेळेला मिळालेल्या योग्य माहितीचे महत्व हे त्रिकालाबाधित आहे. या माहितीच्या जोरावर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फार मोठ्या घडामोडी होऊ शकतात, किंवा माहितीचा योग्य वापर कसा करावा हे समजलेल्या व्यक्तीला आपला कार्यभाग सहज साध्य करता येतो. वानगी दाखल इतिहासातील दोन उदाहरणे देता येतील. प्रथम माहिती दडवून ठेवण्याचा कसा उपयोग कसा होऊ शकतो ते पाहू :- ** माहिती दडवून ठेवण्याचा कौशल्याचा प्रभावी वापर ** हे उदाहरण दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून महाराष्ट्राचे महादेव, दस्तुरखुद्द शिवछत्रपतींचे आहे. शिवछत्रपतींनी आपल्या माहिती दडवण्याच्या कौशल्याचा वापर करून दक्षिण दिग्विजय कसा साध्य केला त्याची ही हकीकत आहे. ही माहिती आपल्याला इंग्रजांच्या २० एप्रिल १६७५ रोजी राजापूराहुन मुंबईला पाठवलेल्या एका पत्रा वरून समजते. या लेखाचा विषय वेगळा असल्याकारणाने या संबंधीची माहिती थोडक्यात येथे देतो. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले असताना, त्यांना उत्तरेकडून कोणताही धोका स्वराज्यावर यावयास नको होता. त्यामुळे आपण नेमके कुठे आहोत हे शत्रूला कळू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती. दक्षिणेकडून माहिती उत्तरेकडे जाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे व्यापारी, किंवा माहितीची ने आण करणारे हरकारे. दक्षिणेतून परत येई पर्यंत , शिवाजी महाराजांनी उत्तरेकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर आपल्या चौक्या-पहारे बसवून व्यापारी , हरकारे किंवा त्यांच्याकडे असलेल्या पत्रांच्या माध्यमातून दक्षिणेतली कोणतीही माहिती उत्तरेत जाणार नाही याचा बंदोबस्त केला ! या वेळी इंग्रज, शिवाजी महाराजांकडून त्यांना अपेक्षित असलेल्या एका फर्मानाची वाट पाहात होते आणि त्यांनी मोहनदास नावाच्या आपल्या एका माणसाला या पत्राची वाट पाहण्यासाठी नेमले होते. परंतु दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणतीही माहिती पोहोचत नसल्याने या मोहनदासला या पत्राची अनेक दिवस वाट पाहावी लागली. इंग्रज लिहितात :- ” The same evening the Rajah (Shivaji Maharaj) went hence and wee dispatched Mohondas to Waite upon him and gets the Phiremaund (Farman) sealed. For him wee waited this many dayes, hourely expecting him, but being lately informed that the Rajah (Shivaji Maharaj) hath sett watches suffering none to pass to the northward of the place where he is, but are searched and what papers found about taken away, shall not keep those any longer, but copy of Phiremaund (Farman) shall send hereafter. ” **माहिती जलद पोहोचविण्याच्या तंत्राचा प्रभावी वापर** महत्वाची माहिती दडवून ठेवण्या प्रमाणेच, योग्य माहिती, योग्य वेळी , योग्य व्यक्तीला जलद पोहोचवणे देखील अत्यंत महत्वाचे असते. मुघलांच्या इतिहासातले एक उदाहरण पाहू:- मुघलांच्या परंपरेचा मान राखून इतर बादशाहांप्रमाणेच शहाजहानने देखील आपल्या बापाविरुद्ध ( जहांगीर बादशहा ) बंड केले आणि तो जहांगिराच्या क्रोधापासून स्वतःला वाचविण्याकरिता निजामशाहीच्या आश्रयाला दक्षिणेत जुन्नर येथे आला. दरम्यानच्या काळात जहांगीर बादशहा मरण पावला. बादशहाचा वजीर आणि शहाजहानच्या सासरा आसफ खान (औरंगजेबाचा मामा शायिस्ताखान हा या आसफखानाचा मुलगा ) याच्या मनात शहाजहानलाच पुढचा मुघल बादशहा करावे असे होते, परंतु जहांगीराने मात्र शहाजहान ऐवजी आपला नातू दावर बक्ष ( याला सुलतान बुलाकी असे देखील म्हणत ) याला आपला वारस नेमावे असे योजले होते . जहांगीराच्या मृत्यूनंतर, शाहजहान दक्षिणेतून परत येई पर्यंत मुघल सिंहासन रिक्त राहून, ते दुसऱ्या कोणी बळकावू नये म्हणून आसफखानाने दावर बक्षाला गादीवर बसवले आणि ‘बनारसी’ नावाच्या एका हिंदू हरकाऱ्याला आपली खुणेची अंगठी देऊन दक्षिणेत शहाजहानकडे धाडले. जहांगीर बादशहाच्या मृत्यूची बातमी शहाजहानला द्यावी आणि त्याला त्वरेने उत्तरेस बोलवावे हा या मागचा उद्देश होता. हा ‘बनारसी’ हरकारा भीमबर (काश्मीर ) निघाल्यापासून २० व्या दिवशी पायी पळत पळत , रविवार दिनांक १८ नोव्हेंबर १६२७ रोजी जुन्नरला पोहोचला ! पुढे शहाजहान दिल्लीला पोहोचल्यावर आसफखानाने दावरबक्षाचा खून करवून शहाजहानचे सिंहासन निष्कंटक केले. आता हा ‘बनारसी’ हरकारा, भीमबर (काश्मीर ) ते जुन्नर एवढे मोठे अंतर पायी कापून इतक्या लवकर (२० दिवसात ) जुन्नरला कसा पोहोचला याचे वाचकांना कुतूहल वाटेल. हाच आपल्या आजच्या लेखाचा विषय आहे. ** हरकारे आणि त्यांचे प्रशिक्षण ** मध्ययुगीन कालखंडात आजच्या सारखी माहितीची जलद देवाणघेवाण करण्याची आधुनिक साधने नसल्याकारणाने उपलब्ध साधनांचा वापर करूनच माहिती लवकरात लवकर पोहोचवणे त्या काळातील लोकांना गरजेचे होते. माहिती लवकर पोहोचावी म्हणून माणसांना लहानपणापासूनच धावण्याच्या कलेत प्रशिक्षित करून, त्यांच्या माध्यमातून संदेशांची जलद देवाणघेवाण करणे हा मध्ययुगीन लोकांनी शोधून काढलेला उपाय होता. हिंदुस्थानात अशाप्रकारचे हरकारे तयार करण्याचा पुढाकार मुघल सम्राट अकबराने घेतलेला दिसतो. याविषयीची ऐन ए अकबरी मधली नोंद फार मनोरंजक आहे. अबुल फझल लिहितो , ” अकबराने राजस्थानातील मेवात प्रांतातील मेवरा समाजातील लोकांना जलद संदेशवहनासाठी प्रशिक्षित केले आहे. हे लोक मोठमोठी अंतरं जलद गतीने कापून संदेशाची किंवा कोणत्याही वस्तूची ने-आण करतात. हे लोक उत्तम गुप्तहेर देखील असतात. अकबराच्या राज्यात असे १००० लोक आहेत.” आता या हरकाऱ्यांनी जलद गतीने जाऊन संदेशवहन करावे म्हणून त्यांना काही प्रशिक्षण दिले जात असे का ? याचे उत्तर आपल्याला जेझुइट पाद्री फादर मोन्त्सेरात याच्या वृत्तांतावरून मिळते. या फादर मोन्त्सेरातने इ.स. १५८० मध्ये अकबराच्या दरबाराला भेट दिली होती. त्याने आपल्या वृत्तांतामध्ये हरकाऱ्यांविषयी पुढील माहिती लिहून ठेवली आहे :- ” अकबराकडे जलद संदेशवहन करण्यासाठी काही प्रशिक्षित माणसे आहेत. एखादा घोडेस्वार पूर्ण वेगाने, एका दिवसात जितके अंतर पार करू शकेल, तितकेच अंतर ही माणसे धावून पार करू शकतात. दम लागू नये म्हणून यांची यकृतं लहानपणीच काढून टाकली जातात (They are said to have their livers removed in infancy to remove their suffering from shortness of breath असं मोन्त्सेरातने लिहिले आहे. हा नक्की काय प्रकार होता? हा कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय आहे .) हे लोक शिशापासून तयार केलेले बूट घालून धावण्याचा सराव करतात. याच प्रमाणे, एका जागेवर थांबून टाचा कुल्याला लागतील अशा प्रकारे पाय हलवून धावण्याची नक्कल करतात ( या वरूनच कदाचित मराठी मधला, ‘जलद पळणे’ या अर्थाचा, ‘ढुंगणाला पाय लावून पळणे’ हा वाक्प्रचार आला असावा ) अशा प्रकारे शिशाचे बूट घालून पळण्याचा सराव केला असता, हे बूट काढून त्यांना पळायला सांगितल्यावर ते फारच जलद पळतात. या अशा जलद धावणाऱ्या जासूदांच्या मदतीनेच हे राजे लोक , दूरवरच्या प्रदेशात आपले संदेश आणि आज्ञा पोहोचवतात” अशा प्रकारचे हरकारे इराणच्या सफावि बादशहांकडे देखील होते आणि ते इराणच्या बादशहाचे संदेश घेऊन अशाचप्रकारे पळत पळत इराणवरून भारतात येत. मुघल हरकारे देखील अशा रीतीने संदेश घेऊन इराणला जात असत. १७ व्या शतकात भारतात अनेकदा येऊन गेलेला फ्रेंच व्यापारी झां बातीस्त ताव्हेर्निये याने इराणमध्येही प्रवास केले होते. त्याने इराण मधल्या हरकाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत पुढील नोंदी करून ठेवल्या आहेत. ” इराण मध्ये हरकाऱ्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय करणारी लोकं आहेत. या लोकांना त्यांच्या घराण्यांकडूनच धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे लोक वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच धावण्याचा सराव करू लागतात. पहिल्या वर्षी ते हळूहळू चालण्याचा सराव करतात. पुढील वर्षी ते एका वेळी एका लीगचे अंतर (फ्रान्स मधील जुना लीग, २ मैल आणि ७४३ यार्ड म्हणजे सुमारे ३.८ किलोमीटर एवढा होता ) पार करू लागतो. त्याच्या पुढील वर्षी तो, एका वेळी दोन ते तीन लीग एवढे अंतर पार करतो. हा मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला सोबत थोडं पीठ, पाण्याची बाटली आणि पिठाच्या रोट्या शेकण्यासाठी एक तांब्याचा छोटा तुकडा बरोबर देऊन या व्यवसायात आणलं जातं. हे लोक धावताना हमरस्त्यावरून ना धावता, आडवळण घेत तुलनेने कमी अंतराच्या मार्गांवरून धावतात. अनेकदा त्यांना वाळवंटी प्रदेशातून धावावे लागते, अशा वेळी त्यांच्या सोबत त्यांची खाण्यापिण्याची सोय असणे गरजेचे असते.” हिंदुस्थानातील हरकाऱ्यांबद्दल ताव्हेर्निये लिहितो:- “हिंदुस्थानातील राजे, सेनाधिकारी आणि प्रांताचे सुभेदार जी पत्रे पायी जाणार्या संदेशवाहकांबरोबर पाठवितात ती, घोड्यावरून जाणार्या संदेशवाहकांनी नेलेल्या पत्रांपेक्षा लवकर पोहोचतात कारण , प्रत्येक दोन कोसांवर काही छोट्या झोपड्या बांधलेल्या असतात आणि त्या झोपडीमध्ये २-३ संदेशवाहक बसलेले असतात. एखादा संदेशवाहक या झोपडी शेजारी आला, की तो त्याच्या हातातील पत्रं झोपडीच्या दारासमोर टाकतो. पत्र दारासमार पडले की झोपडीत बसलेला एखादा संदेशवाहक ते उचलतो आणि ते घेऊन लगेच पळायला सुरुवात करतो. संदेशवाहकाच्या हातात पत्र देणे अशुभ समजले जात असल्यामुळे ते त्याच्या हातात न देता, त्याच्या पायाजवळ टाकण्यात येते आणि ते त्याने उचलणे अपेक्षीत असते. येथे असे देखील सांगावेसे वाटते की, संपुर्ण हिंदुस्थानातील बर्याच रस्त्यांच्या कडेने झाडे लावलेली असतात आणि ज्या ठिकाणी झाडे नसतात, त्या ठिकाणी दर पाचशे पावलांवर छोट्या दगडांचे तुकडे बसविलेले असतात. तेथून जवळ असलेल्या गावातील रहिवाशांवर, हे दगडाचे तुकडे वेळोवेळी पांढर्या रंगाने रंगविण्याची जबाबदारी सोपविलेली असते. अशा तुकड्यांमुळे संदेशवाहकांना अंधार्या आणि पावसाळ्या रात्रींत रस्ता ओळखणे सोपे जाते.” ताव्हेर्निये प्रमाणे दुसरा एक फ्रेंच प्रवासी तेवनो याने देखील या हरकाऱ्यांबद्दल लिहून ठेवले आहे. जाता जाता हरकाऱ्यांसंबंधीची उत्तर पेशवाईतली एक नोंद पाहणं मनोरंजक ठरेल. हा कागद थोर इतिहास संशोधक श्री द.वा.पोतदार यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात “गुणी ब्राह्मण हरकाऱ्यांच्या शंभर जोड्या” या नावाने छापला आहे. (BISM Quarterly, Vol XIII, No.4, March 1933 लेखांक २१) या कागदामध्ये सरकारी हरकारगिरीच्या कामावर ठेवण्यात येणाऱ्या माणसाच्या अंगी कोणकोणते गुण लागत आणि त्यांची प्रतवारी कशी लावावी याबद्दल सांगितले आहे. हरकाऱ्यांचे त्यांच्या गुणांनुसार उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे तीन वर्ग करण्यात आले आहेत. उत्तम वर्गातील हरकारा वैदिक, ज्योतिषी, शरीराने सुदृढ , गायनाचे ज्ञान असणारा, धीरवंत, नाना प्रकारचे वेश धारण करू शकणार, द्रविड, कर्नाटकी, अवधी, तेलंगी आणि मराठी या पाच भाषा जाणणारा असावा. मध्यम आणि कनिष्ठ प्रतीच्या हारकाऱ्यांना वैदिक ज्ञान नसले तरी चालेल , परंतु उत्तम प्रतीच्या हरकाऱ्यांचे नाना प्रकारचे वेश धारण करू शकणारा, धीरवंत, चतुर आणि ३ ते ५ भाषांची जाण हे गुण असणे मात्र आवश्यक होते ! लेखन सीमा संदर्भ :- १) Ain I Akbari Vol 1 , Translation by Blochmann २) The commentary of Father Monserrate, S.J., on his journey to the court of Akbar ३) History Of Shahjahan Of Dihli, Banari prasad saxsena ४)The costume of Hindostan, elucidated by sixty coloured engravings ५)English Factory Records on Shivaji – 1659 to 1682 ६)The six voyages of John Baptista Tavernier ७)BISM Quarterly, Vol XIII, No.4, March 1933 लेखांक २१ (Courtsey Amol N. Bankar) ८) Empire and Information : Intelligence Gathering and Social Communication in India, 1780-1870 Cambridge Studies in Indian History and Society ; 1, Bayly, C. A. चित्र १) हरकारा ( The costume of Hindostan, elucidated by sixty coloured engravings या पुस्तकातून ) लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर पुणे दिनांक, २८ ऑक्टोबर २०१९ Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website