#न_भूतो_न_भविष्यती #परफेक्ट_एक्जिक्यूशन
टीप:- लेख मोठा आहे त्यामुळे एका बसण्यात निवांत वाचावा. लेखाचे दोन भाग आहेत पार्श्वभूमी आणि मेगा इवेंट, दोन्ही ह्याच लेखात वाचायला मिळतील.
काल मी माझ्या मोदींच्या अमेरिका दौऱ्यासंदर्भातल्या पोस्टमध्ये हा दावा केला की मोदींची हुस्टनच्या NRG फुटबॉल स्टेडियम मधील howdy modi सभा ही २०१७ च्या मैडीसन स्क्वेअर गार्डनचे रेकॉर्ड तोडत अमेरिकेतली त्यांची आतापर्यंतची सगळ्यात ऐतिहासिक सभा ठरेल!! माझ्या काही मित्रांना माझा हा दावा पचला नाही, त्यांनी काही दाखले दिले की ट्रम्प उद्या मोदींच्या सभेत येणार नाही. ट्विटरवर काही ट्रेंड्स सुरु होते आणि त्यावरून एक गोष्ट कळत होती की ट्रम्प ह्यांच्यावर पाकसमर्थित लिबरल लॉबीचा howdy modi कार्यक्रमात न जाण्यासाठी प्रचंड दबाव होता. कारण स्पष्ट होते ह्या आधीही मोदींचे अमेरिका असो व इतर अनेक देशांत मेगा इवेंट झाले होते पण हुस्टनमधला हा इवेंट ऐतिहासिक एकमेव कारणासाठी होता तो म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ह्यांची कार्यक्रमाला असणारी उपस्थिती!! आणि जर यदाकदाचित ट्रम्प कुठल्याही कारणानी कार्यक्रमास उपस्थित राहिले नसते तर मात्र तो मोदींसाठीच नव्हे तर स्वतः ट्रम्प ह्यांच्यासाठी सुद्धा मोठा सेटबॅक असता. जे लोक ट्रम्प ह्यांचं राजकारण जवळुन अभ्यासतात त्यांना ट्रम्प ह्यांच्या लहरी स्वभावाची पूर्ण कल्पना आहे. ते दोन तासांपूर्वी ट्विटरवरून जे बोलतात त्याच्या पूर्णतः विरुद्ध ते दोन तासांनी वागतात. त्यामुळे ट्रम्प ह्यांच्या ऑफिस हॅंडलला मात्र खुलासे देत फिरावे लागते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असुनही ट्रम्प तात्या जोपर्यंत स्वतः मोदींसोबत स्टेजवर येत नाही तोपर्यंत मला तात्यांची खात्री नव्हती. वरुन मोदी पहिल्यांदा स्टेजवर आले तेंव्हा मोदींचा किंचित नर्व्हस चेहरा बघुन माझ्या पोटात गोळाच आला. पण म्हणतात ना कन्व्हेंशनल राजकारणी नसलेला माणुस कधीकधी तुम्हाला चकित करतो ट्रम्प तात्यांनी आज मला चकित केलं हे मात्र नक्की!!
#पार्श्वभूमी
राजकारणाच्या स्वतःच्या काही छटा असतात त्याचप्रमाणे राजकारणात अचूक टाईमिंग आणि सेग्रिगेशन ह्याला देखील तितकेच महत्त्व आहे. चोवीस तास राजकारण करणारे मोदी ह्या दोन्ही प्रकारात मातब्बर खेळाडू आहेत, पण ट्रम्प ह्याबाबतीत थोडे वेगळ्या प्रकारचे खेळाडू आहेत. तसं बघायला गेलं टेक्सस हे राज्य म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्लाच. जॉर्ज बुश सीनियर, जॉर्ज बुश जुनियर ह्यांनी बऱ्यापैकी शाबुत ठेवलेला टेक्ससचा बालेकिल्ला मागच्या निवडणुकीत डेमोक्रेट्स नी बऱ्यापैकी उध्वस्त केला होता. टेक्ससमध्ये इंडो-अमेरिकन भारतीयांचे प्रमाण आणि त्यांची राजकीय ताकद बऱ्यापैकी आहे. टेक्ससमध्ये ‘महात्मा गांधी डिस्ट्रिक्ट’ देखील आहे, त्यामुळे भारतीय मतं ह्यापेक्षाही इंडो-अमेरिकन लॉबीचं समर्थन हे ट्रम्प ह्यांच्यासाठी अधिक महत्वाचे होते. पण ह्याचा दुसरा एंगल म्हणजे अमेरिकतली लिबरल आणि मानवाधिकार लॉबी ह्यांच्या रडारवर येणे!! अमेरिकेत बऱ्याच लॉबी (गट) अधिकृतरित्या सक्रीय असतात. आपल्याकडे हे बेकायदेशीर आहे पण अमेरिकन पद्धतीत लॉबिंगला कायदेशीर मान्यता आहे. मागच्या निवडणुकीपर्यंत ओबामा प्रशासनात ह्या मानवाधिकार लॉबी प्रचंड बलवान होत्या. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आपोआपच ट्रम्प ह्यांना विरोध करणाऱ्या ह्या लॉबी हळुहळू का होईना ‘डायल्यूट’ झाल्या काही अजुनही थोड्याफार आहेत पण आधी जितक्या होत्या तितक्या सक्रीय नक्कीच नाही. ट्रम्प आल्यानंतर ज्यू लॉबी अचानक अमेरिकन राजकारणात बलवान झाली आणि त्याचे कारण होते जारेद कुश्नेर (ट्रम्प ह्यांचा जावई आणि त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याचा एकप्रकारे रखवालदार) पण गेल्या तीन वर्षांपासून हळुहळू का होईना इंडो-अमेरिकन लॉबी देखील पाय पसरवत होती. त्याचं बरंचसं श्रेय मोदी समर्थित अमेरिकन व्यावसायिक आणि तिथल्या काही भारतीय स्वयंसेवी संस्थांना जाते. ह्याच लॉबीचा आग्रह म्हणा की इच्छा पण ट्रम्प कालच्या कार्यक्रमात उपस्थित होते, आणि नुसते उपस्थित नव्हते तर त्यांनी चक्क ‘इस्लामिक दहशतवाद’ आणि भारताला त्याच्या सीमा सुरक्षित करण्याचा पूर्ण हक्क आहे ह्या आपल्याला अपेक्षित नसलेला स्टॅंड स्टॅंडिंग ओवेशन मध्ये घेऊन थेट षट्कारच ठोकला. कदाचित इतकी अपेक्षा स्वतः मोदींनीही केली नसावी!! त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या प्रचाराचा नारळ टेक्सस सारख्या रिपब्लिकनांसाठी अत्यंत महत्वपूर्ण राज्यात फोडून अचूक टायमिंग साधले. पण इस्लामिक दहशतवाद हा तात्यांच्या भाषणात सहज आला का?? त्यालाही कारण असावे का?? इथेच राजकारणाच्या छटा दिसतात.
मोदींच्या howdy मोदी कार्यक्रमाला विरोध करायला IHF (International Humanitarian Foundation) च्या बैनरखाली (ह्या नावाच्या भानगड़ीवर आपण येऊ) अनेक दिवसांपासून पूर्व तयारी सुरु होती. हयाबाबत मला माहिती मिळाली माझ्या एका ‘हैदराबादी’ कलीग कडुन त्याचा कुठलासा चुलत भाऊ टेक्ससमध्ये असतो तो ह्या विरोध प्रदर्शनात सक्रीय सहभागी होता. भारताबाहेर चार चौघात अनोळखी लोकात मी सहसा राजकीय विषय टाळतो त्याचे झालेच तर फ़ायदेच होतात त्यामुळे मला त्यांच्या विरोध कॅम्पेनचे रेग्युलर अपडेट्स मिळत होते. त्यांचे मुद्दे, जॉनर्स, घोषणा ह्या वरकरणी बऱ्यापैकी ‘नॉर्मल’ होत्या जेणेकरून बरेच भारतीय मोदी विरोधक देखील जमा करता येतील. त्या अनुषंगाने ते बऱ्यापैकी जमा देखील करण्यात आले. त्याचे विविध गट करण्यात आले आणि त्यांच्या गटशाहा बैठका होत होत्या. ह्या विरोधी रैलीचा मुख्य आयोजक होता फयाज खलील जो इमरान खानच्या पीटीआयचा संस्थापक सदस्य होता!! ह्या बैठकीत K1 (काश्मीर) आणि K2 (खलिस्तान) ह्यांचे उपद्व्याप करणाऱ्या लोकांचे फोटो, पीओकेचा झेंडा हा सगळा ‘असला’ तयार ठेवण्यात आला होता. ह्या बैठकीचे सगळे अपडेट्स RAW ने FBI ला दिले होते. कालच्या गार्डियनमध्ये ह्यावर सविस्तर लेख देखील आला आहे. ह्याला बॅक शेलिंग म्हणुन अमेरिकेतली पाक समर्थक मानवाधिकार लॉबी देखील सक्रीय झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर ही सभा झाली आणि ह्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प ह्यांनी डंके की चोट पर इस्लामिक दहशतवाद ह्याचा उल्लेख केला म्हणुन तो उल्लेख ‘बोल्ड आणि कॅपिटलमध्ये’ घ्यावा लागेल. ह्या सभेला अजुन एक किनार होती ती म्हणजे अफगानिस्तान!! अफगानिस्तान हे अमेरिकेसाठी जवळपास दुसरं व्हिएतनाम ठरलंय आणि त्यांना कसेही करुन ही फसलेली मुंडकी बाहेर काढायची आहे. ती बाहेर काढायची असेल तर टेल सेव्हिंग विक्ट्री तरी हवी आणि त्यासाठी अमेरिकेला भारताची नितांत आवश्यकता आहे. सध्या बातमी अशी येतेय की अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर होणारे ईराण समर्थित हल्ले थांबवायला अमेरिका सौदी अरब आणि अरब अमिरात मध्ये त्यांची सैनिकी बटालियन पाठवणार आहे. ट्रम्प ह्यांनी त्यांच्या निवडणुक आश्वासनात अफगानिस्तानातुन सैन्य माघारी घेण्यात येईल हे आश्वासन दिले होते आणि त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला देखील प्रस्ताव दिला होता पण त्याची ‘किंमत’ कदाचित अमेरिकेला जास्त वाटली असेल त्यामुळे त्यांचा हट्ट भारताने पुरवावा अशी ट्रम्पची इच्छा आहे. आता भारत त्यावर कुठली ‘किंमत’ मागतो ह्याची कदाचित ट्रम्पपेक्षा पाकलाच अधिक काळजी आहे म्हणुन इमरान आजकाल अमेरिकेतच पडून असतो. म्हणुन बाकी कुठल्याही गोष्टींपेक्षा ट्रम्प तात्यांनी केलेला इस्लामिक दहशतवादाचा उल्लेख आणि भारताच्या सीमा सुरक्षेच्या अधिकाराचा उल्लेख मला अधिक महत्वपूर्ण वाटतात. बरं ज्या IHF (International Humanitarian Foundation) चा उल्लेख वर केला त्याचं अब्रीवेशन कुठेतरी एका नामांकित संस्थेशी संलग्नित वाटते ती संस्था म्हणजे International Humanity Foundation, IHF!! ह्या संस्थेची मुख्यालये केनिया आणि इंडोनेशियात आहे आणि ह्या IHF चा वर उल्लेख केलेल्या पाकपुरस्कृत फर्जी IHF शी काडीमात्र संबंध नाही. आहे की नाही कमाल!! साला हे पाकडे काही सुधारत नाही.
#मेगाइवेंट
राजकारणात परसेप्शन, बॉडी लॅंग्वेज, आणि एक्जिक्यूशन ह्याला फार महत्त्व असते. तुम्ही नीट बघितले असेल तर मोदींचे भारताबाहेरील सगळे मोठे कार्यक्रम, सभा ह्या सहसा अतिशय सूत्रबद्धरीत्या बांधलेल्या असतात. त्यांचं एक्जिक्यूशन एकदम परफेक्ट असतं. बाकी बॉडी लॅंग्वेज आणि परसेप्शनमध्ये मोदी तसेही कसलेले राजकारणी आहेत. त्यामुळे कालची सभा हिट होणार ह्यात वादच नव्हता. आणि अपेक्षेप्रमाणे ती झाली सुद्धा!! मोदींनी त्यांच्या आधीच्या इंग्रजी भाषणात आणि नंतर ट्रम्प तात्यांच्या हातात हात घालुन जो ‘एंडोरस्मेंट वॉक’ केला त्याने एक परसेप्शन सेट केला हे मात्र नक्की!! ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ असो वा ‘आर्ट हॉफ डील’ मोदींनी एकाच दगडात ‘अनेक पक्षी’ मारले आहेत. बिर्याणी खातांना दालचिनीची चव मस्त लागते पण त्याच दालचिनीचा छोटासा तुकडा देखील बिर्याणी खातांना दाताखाली आला तर मात्र संपूर्ण चव बिघडते!! मोदींनी ह्याची पुरेपूर काळजी घेतली. ट्रम्प ह्यांच्या तोंडावर ३७० चा केलेला उल्लेख त्यात काश्मीरमध्ये आम्ही कशा प्रकारे विकासाची गंगा नेवु ह्याचा उल्लेख हे काहीकाही पंचेस पॉइंट ब्लॅंक वर होते. पण खरी गंमत कुठे आहे माहितीय आज सोमवारी ट्रम्प तात्या आणि पाक पंतप्रधान इमरान खान ह्यांची कालच्या मेगा इवेंट च्या पार्श्वभूमीवर भेट होणार आहे. त्यामुळे इमरानला ‘कश्मीरी बिर्याणीतले’ ‘गोश्त’ चावतांना त्याच्या घशात ‘ती’ दालचिनी अडकली तर काय होईल विचार करा!! त्याचबरोबर आधी इंडो-अमेरिकन काश्मीरी कुटुंबाशी भेट, विविध ऑइल कंपन्यांच्या सीईओच्या भेटी ह्या इवेंट आधी जुळून आणलेले योग हे कालच्या मेगा इवेंट नंतर ‘पे ऑफ’ झाले आहे. हे म्हणजे मोदींनी टॉस जिंकून ओपनिंगलाच डबल सेंच्युरी ठोकली आहे आणि आता प्रेशर इमरानवर आलं आहे. पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ ह्यांचं “House Full… The End” हे ट्वीट खुप बोलकं आहे की नेमका काय संदेश कालच्या सभेने दिला आहे. एक गोष्ट जी नमुद करण्यासारखी आहे ती म्हणजे आजपर्यंत बहुतांश विदेश दौऱ्यात मोदी अजित डोवल ह्यांना त्यांच्या सोबत डेलिगेशन मध्ये ठेवायचे ह्या दौऱ्यात काश्मीर मधील परिस्थिती मुळे डोवल भारतात आहेत पण आज त्यांची जागा घेतली आहे विदेशमंत्री सुब्रमण्यम जयशंकर ह्यांनी. त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन मी आताच करण्याची घाई करणार नाही पण नेतृत्वाची नवीन फळी निर्माण करण्याची मोदींची सतत मानस आणि प्रयत्न दिसतात ते वाखाणण्या सारखे आहेत. एकूण काय तर कालचा मेगा इवेंट दणदणीत यशस्वी झाला. पण मोदींच्याच शब्दात ह्याचं वर्णन करायचे झाल्यास “वो जो मुश्किलों का अंबार है वही तो मेरे हौसलों की मिनार हैं” ज्याप्रकारे कालची सभा यशस्वी झाली त्याने एक मात्र नक्की मोदींची एकूण इमेज आणि ऑरा हा न भूतों न भविष्यती वाढला आहे. ह्यामुळे भारताच्या पदरात काय काय पडतं ते बघायचे.
#HowdyModi
? प्रसाद देशपांडे
Leave a Reply