कामिका एकादशी माहात्म्य
युधिष्ठिराने श्रीकृष्णाला आषाढ कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! याविषयी ब्रह्मदेवाने नारदाला जे सांगितले होते तेच तुला कथन करतो. या तिथीला कामिका म्हणतात. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने वाजपेय यज्ञाचे फल मिळते. या दिवशी भगवान विष्णूंचे भजन, पूजन, ध्यान करावे. काशी-पुष्कर-नैमिषादी क्षेत्रांची यात्रा केल्याने, गंगेत-केदारतीर्थात-सूर्यग्रहणात कुरुक्षेत्रात-सिंहस्थपर्वात गोदावरीत- किंवा गंडक-व्यतिपात योगावर पुण्यतीर्थांमध्ये स्नान केल्याने जे पुण्य मिळते; त्याहून कितीतरी अधिक पुण्य या तिथीस माधवाचे पूजन केल्याने प्राप्त होते. त्या भाविकाला देव * गंधर्व-नाग-पन्नग या सर्वांच्या पूजेचे, तसेच पृथ्वी आणि गोदानाचे पुण्य मिळते. मनुष्यांच्या उद्धारासाठी या एकादशीसारखे व्रत नाही. म्हणून जे संसाररूपी सागरात बुडालेले आहेत, पापरूपी चिखलात रुतलेले आहेत; त्यांनी या पवित्र तिथीचा आदरपूर्वक अवलंब करावा.
भगवान श्रीधरला तुळस परम प्रिय आहे. तुळशीच्या दर्शनाने पातक नाहीसे होते. तिला स्पर्श केल्याने शरीर पवित्र होते. तिला वंदन केल्याने रोगांचे निरसन होते. तिला पाणी घातल्याने यमाचे भय नाहीसे होते आणि अंगणात तिची स्थापना केल्याने भगवान श्रीहरी आपल्या घरीच निवास करतो. भगवंताला तुलसीदले अर्पण करणारा पापांपासून अलिप्त राहतो, मोक्षाचा अधिकारी होतो आणि तुलसी-मंजिरी अर्पण करणाऱ्याचे जन्मभराचे पातक श्रीहरी निजकृपेने स्वतःच धुवून टाकतो. तुळशीचे माहात्म्य असे अगाध आहे. म्हणून या दिवशी त्या परम प्रभूची तुलसीपत्रांनी पूजा करावी. जो मनुष्य या तिथीस देवघरात वा मंदिरात अखंड दीप लावतो, त्याचे पुण्य चित्रगुप्तालाही मोजता येत नाही. त्याचे पितर स्वर्गलोकी जातात व अमृत प्राशन करतात आणि तो उपासकही कोटी दिव्यांच्या प्रकाशात सूर्यलोकी जातो. ‘ही एकादशी ब्रह्महत्या व भ्रूणहत्येचे पातकही नाहीसे करणारी आहे व हिच्यासारखी पापांचा नाश करणारी अन्य तिथी नाही’ – हे मला स्वतः भगवंतानेच सांगितले आहे. पूर्वीच्या योग्यांनी कामिका व्रतानेच उत्तम सिद्धींसह ब्रह्मप्राप्ती केलेली आहे, म्हणून जाणत्या माणसाने प्रयत्नपूर्वक हे व्रत करावे.
श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला हे गोविंदा। कमलनयना नित्यानंदा। सर्वेश्वरा परमसिद्धा। नमस्कार तुजलागी ।। १ । देवा आताच आम्हांप्रत । सांगितले शयनी एकादशी व्रत । त्या निरुपणे सुखावले चित्त । श्रवणेच्छा वाढली ।।२।। म्हणुनी आता पुन्हा विनंती। आषाढ कृष्ण एकादशी तिथी । तिचे वैशिष्ट्य आणि माहिती। कथन : करावी मजलागी ।।३।। तैं श्रीकृष्ण उत्तर देत । म्हणाला हे नृपश्रेष्ठ । पूर्वी नारदे विधीप्रत ।। पुसिले होते याविषयी ।।४।। तधी तयाने निजसुतासी । जे सांगितले त्या समयासी । तेच विदित करितो तुजसी। श्रवण करी आदरे ।।५।। त्याविषयीची हकिकत । असे मधुर अत्यंत । एकदा भेटुनी पित्याप्रत । केली नारदे विचारणा ।।६।। म्हणाला सांगा मजसी तात। आषाढ कृष्ण एकादशीप्रत । काय असे नाव निश्चित । कोण तियेची देवता ।।७।। ही मम जिज्ञासा मोठी। कळू द्या व्रतविधी फलप्राप्ती। कारण सदरहू विनंती। केली जनहितास्तव ।।८।। विधी म्हणाला या तिथीचे । ‘कामिका’ ऐसे नाव साचे । फल वाजपेय यागाचे । माहात्म्य श्रवणे मिळते या ॥९।॥ आता सांगतो महती विशेष । या दिनी पूजावे श्रीधरास। त्या शंखचक्रगदाधारीस । मधुसूदन म्हणतात ।।१०।। या दिनी भगवान विष्णूचे । ध्यान भजन करिता साचे । पुण्यफल त्या साधनेचे । असे अपार जाणावे ।। ११ । ते फल इतके श्रेष्ठ । की त्याच्यासमान खचित । गंगा पुष्कर वा काशीत । नच लाभते नैमिषी ।।१२।। या तिथीस विष्णुपूजन । त्याचे फल विलक्षण । नच प्राप्त त्यासमान । पुण्य केदार दर्शने ।। १३।। कुरुक्षेत्री सूर्यग्रहणात । स्नान-दाने जे फल प्राप्त । 8 तेही किंचित जाण येथ । पुण्यपर्वता पुढती या।।१४।। सिंहस्थात गोदावरी ठायी। वा व्यतिपात गंडक योगावरही। स्नाने पुण्य लाभत नाही । हरिपूजना समान या ।।१५।। दान देता समस्त महीला । व्रत करिता या तिथीचे । फल समसमान साचे । महिमा असे यापरी।।१६ ।। धेनू देता वत्सासहित । पुण्य मिळते अगणित । परी तितकेच सहजप्राप्त कामिका व्रत केल्याने ।।१७।। आषाढ कृष्ण एकादशीस । ज्याने पूजिले श्रीधरास । फल मिळते त्या नरास। सकल देवता पूजनाचे ।। १८।। महिमा ऐसा श्रेष्ठ म्हणुनी। समस्त पापभीरू जनांनी। प्रयत्नपूर्वक या दिनी। पूजावे त्या परमेशा ।।१९।। जे भवसागरी बुडाले । पापकंदर्पी रुतून बैसले । त्यांच्या उद्धारा हेच भले । एक पावन व्रत असे ।।२०।। कारण तिथी ही पुण्यवर्धिनी। कल्याणमयी पापहारिणी। हिच्यासम अन्य कुणी । नाही महिपृष्ठी या ।।२१ ।॥ हे माझे वचन आज । तू पूर्ण खातरीचे समज । कारण पूर्वी गुह्य हे मज। स्वये भगवंते सांगितले ।।२२ ।। कुणी मनुष्य अध्यात्मविद्येत । मग्न असता जे फल प्राप्त । त्याहून अधिक लाभते निश्चित । उत्तम व्रताचरणे या ।।२३ |। या दिनी रात्रसमयी। जो भजन जागरण करितो पाही। तो अंतकाळी पाहत नाही। यमदूत ते भयंकर ।।२४।। कुर्योनी वा घोर दुर्गती। याची तयाला न होय प्राप्ती । पूर्वी योग्यांसी मिळाली मुक्ती । याच कामिका व्रताने ।।२५।| म्हणुनी जो मनुष्य जाण । ठेवितो स्वाधीन अंतःकरण । त्याने करावे आचरण । सद्भावे या व्रताचे । २६।। जो कोणी या दिवशी । भगवंताते वाहतो तुलसी । पापभावना त्या नरासी । नच स्पर्शते केव्हाही ।।२७।। पुढती त्याचे आचरण । होते कमलपत्रासमान । असंगपणाचा हा गुण । येतो अर्पणभावे त्या।।२८।। एक भार सुवर्ण वाहून । अथवा चौपट चांदी अर्पून । श्रीविष्णूचे करिता पूजन । होय अपार फलप्राप्ती ।।२९।। परी तितकेच फल निश्चित । प्राप्त होते सहजगत – तुलसी अर्पिता भगवंताप्रत । महिमा असे यापरी ।।३० ।। या पूजने जगन्नाथ । होतो जितका संतुष्ट । तितका कदापि नाही होत । हिरे माणके वाहता ।। ३१ ।। तुलसी-मंजिरी घेउनी। भावे अर्पिता केशवचरणीं । समस्त पातके नष्ट होउनी । मिळते मुक्ती भाविका ।।३२।। म्हणुनी जिचे घडता दर्शन । होते पाप निवारण । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे।।३३ |॥ जिला नमिता रोगनिरसन । जिला स्पर्शिता काया पावन त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३४।। जिला उदक करिता अर्पण । भय यमाचे जाते निघून । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३५।। जिच्या संगतीत क्षणोक्षण । स्वये श्रीकृष्ण भगवान । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे।।३६।। हरिचरणीं करिता अर्पण । जी देते मोक्ष पावन । त्या तुलसीते मनोमन । वंदन करितो आदरे ।।३७।। जो मनुष्य या तिथीस । देवगृही वा राउळास। दीप लावितो अह्निश । ते पुण्य अगम्य चित्रगुप्ता ।।३८।। त्या नराचे पितर समस्त । सुखे राहती स्वर्गात । अमृतप्राशने होउनी तृप्त । पावती सकल सौख्याते ।।३९|| या दीपार्पणे निश्चित । तो नरही भाग्यवंत । सहस्रदीपांच्या प्रकाशात। जातो सूर्यलोकासी ।।४०।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मासी। कथन केले माहात्म्यासी। म्हणुनी कामिका एकादशी। आचरावी निर्धारित ।।४१ ।। या तिथीची अपार महती। ब्रह्म-भ्रूणहत्या पातके जाती। त्या नरासी महत्फलप्राप्ती। जातो स्वर्गलोकी तो ।।४२।। कथाप्रभावही तैसाच । श्रद्धेने श्रवण घडताच । नर निष्पाप होउनी साच । जातो विष्णुधामासी ।॥४३।।
।। इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे आषाढकृष्णैकादश्याः कामिकानाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम्
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
शुभं भवतु !
Leave a Reply