मौला, माऊली आणि सर्वधर्मसमभाव - ले. सत्येन वेलणकर Mandar Sant November 7, 2019 चर्चा मौला, माऊली आणि सर्वधर्मसमभाव अलीकडेच गाण्याबजावण्याचा ‘नवा ध्यास’ घेतलेल्या दूरचित्रवाणी वरील एका कार्यक्रमात, एका स्पर्धकाने आपल्या गाण्यामध्ये ‘नवा आविष्कार’ घडवत, तेराव्या शतकातील ‘सुफी संत ‘ अमीर खुस्त्रो ‘साहेब’ आणि साधारण त्या काळाच्या आसपास होऊन गेलेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज उर्फ माऊली यांच्या रचनांचा मिलाफ घडवत, लोकांना सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. यावर कडी करुन , त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या एका ‘विद्वान’ अभिनेत्रीने, मौला आणि माऊली हे एकच असल्याचा ‘दिव्य’ उपदेश समस्त प्रेक्षकांना केला आणि या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम पहाणाऱ्या दोन प्रसिद्ध गायकांनी देखील तिच्या या म्हणण्याला पुष्टी दिली. हल्ली या गाणीबजावणी करणाऱ्या गवयांना आणि थातुरमातुर अभिनय करणाऱ्या नट-नट्यांना, आपल्या मध्ये एक फार मोठा इतिहासकार दडला असल्याचे साक्षात्कार वारंवार होत असतात आणि मग हे असे इतिहास आणि अध्यात्माचे झटके आले, की ते आपल्या उपदेशाचे बोधामृत प्रेक्षकांना पाजताना दिसतात ! मुळातच हिंदू समाज हा अत्यंत भोळाभाबडा आहे. अध्यात्म आणि देव म्हटलं की देहभान विसरून आणि आपली विवेकबुद्धी गहाण टाकून, तो एखाद्याच्या भजनी लागतो. त्यातच अलीकडे ‘सुफी संत’, ‘अमीर खुस्त्रो’, ‘शायरी’ वगैरे शब्द कानी पडले की काही माणसं उपदेश करणाऱ्याच्या पायी लोळणंच घेतात. समोरचा माणूस ज्या माणसांची नावं घेतोय ती माणसं कोण होती ? त्यांचे विचार काय होते? खरंच त्यांचे विचार आपल्या कडील संतांशी मिळतेजुळते होते का? असा कोणताही सारासार विचार न करता, किंवा माहिती घेण्याची तसदी न घेता, तो बोलणाऱ्या माणसावर आंधळेपणाने विश्वास ठेऊन मोकळा होतो. या निमित्ताने अमीर खुस्त्रो कोण होता? त्याचे विचार काय होते? आणि ते खरंच ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांशी मिळतेजुळते होते का? हे सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच करत आहे. **हिंदुंचा भोळेपणा** एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे यात काही गैर नाही. देवावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु या श्रद्धेचा अतिरेक झाला की काय होते ते दाखवण्यासाठी मी दोन घटना तुमच्या समोर ठेवणार आहे. या दोन्ही घटनांचे तपशील प्रसिद्ध इंग्रज पुरातत्त्वतज्ञ्न अलेक्झांडर कनिंगहॅम याने लिहून ठेवले आहेत. इ.स. १८८०-८१ मध्ये कनिंगहॅम जुन्या वास्तूंचा शोध घेत बिहार राज्यात फिरत होता , त्यावेळी त्याने पाहिलेल्या गोष्टी त्याने लिहून ठेवल्या आहेत. कनिंगहॅम लिहितो, “बिहार मधील मधुबन या गावापासून नैऋत्येला अर्ध्या मैलावर ‘बेदीबन’ नावाचं हिंदूंचं एक देऊळ आहे. या देवळातील मूर्ती म्हणजे एक अरबी भाषेत लिहिलेला शिलालेख आहे ! येथील लोक या शिलालेखाची , ” भगवान का चरण पद ” म्हणजे “देवाची पावले” म्हणून पूजा करतात ! हा शिलालेख असलेला दगड २ चौरस फूट असून, त्याची जाडी १ फूट एवढी आहे आणि त्यावर सात ओळींचा अरबी भाषेत लिहिलेला मजकूर आहे. या शिळेवर रोज होणाऱ्या तूप आणि पाण्याच्या अभिषेकामुळे, त्यावरील अक्षरे आता पुसट झाली आहेत. परंतु मला त्या शिलालेखातील सन मात्र वाचता आला. तो “सन सबा अरबैन” म्हणजेच हिजरी सन ८४७ असा आहे. या शिलालेखात ‘महमूद’ असे नाव देखील आहे. हे नाव जर इथल्या राजाचे आहे असे धरले, तर ते हिजरी सन ८४४ ते ८६३ मध्ये येथे राज्य करणाऱ्या जौनपूरच्या महमूद शर्की या राजाचे असेल” दुसरा असाच प्रसंग कनिंगहॅमने लिहून ठेवला आहे, तो पुढील प्रमाणे:- ” सीता मढी येथून मी पश्चिमेकडे प्रवास करत असताना, तिथे एका ठिकाणी नुकत्याच पडलेल्या उल्केची बातमी मला समजल्यामुळे, त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी मी निघालो. २ डिसेम्बर १८८० रोजी ‘अंधार’ नावाच्या एका छोट्या खेड्याजवळ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास, बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला, आणि दोन ब्राह्मणांनी आकाशातून एक दगड खाली पडताना पाहिला ( उल्का ) . त्यांनी तो दगड उचलला तेव्हा तो हाताला अद्याप गरम लागत होता. मी ३० डिसेंबर रोजी सकाळी त्या गावात पोहोचलो तेव्हा पाहिले की लोकांनी त्या उल्केची ‘अद्भुतनाथ’ या नावाने पूजाअर्चा करायला सुरवात केली होती ! त्याच दिवशी एका गावकऱ्याला त्या ठिकाणापासून पश्चिमेकडे अर्ध्या मैलावर असलेल्या शेतात उल्केचा दुसरा एक तुकडा सापडला. पहिली उल्का ज्या दिशेकडून आली होती त्याच दिशेला हा तुकडा सापडला आणि तो पहिल्या उल्केच्या भागावर चपखल बसल्यामुळे तो त्या उल्केवर बसवण्यात आला. मी हा दगड पाहिला तेव्हा त्याचा घेर १६ ३/४ इंच होता. त्याची लांबी ६ १/४ इंच एवढी होती . रुंदीला तो साडेचार इंच होता आणि त्याची उंची देखील तेवढीच होती. ” (संदर्भ :- Report of Tours in North and South Bihar in 1880-81, VOL XVI , Alexander Cunningham ) संपूर्ण भारतातील अशी शेकडो उदाहरणे देता येथील, वानगी दाखल येथे फक्त दोन दिली आहेत. तात्पर्य काय, तर हिंदू लोकांना पूजाअर्चा करण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा माणूस चालतो , मग ती आकाशातून पडलेली उल्का असो, एखादा अरबी भाषेतील शिलालेख असो किंवा एखादा तथाकथित सुफी संत असो. आपण कोणाला पूजतोय ? ज्या माणसाला पूजतोय त्याचे विचार काय होते ? याचा यत्किंचितही विचार न करता भोळेभाबडे हिंदू त्या वस्तूची किंवा व्यक्तीची आराधना करण्यास सुरवात करतात. यालाच कदाचित सद्गुणविकृती म्हणत असावेत ! असो. आता अमीर खुस्रो कोण होता? आणि त्याचे विचार काय होते ते पाहू. **अमीर खुस्रो** अमीर खुस्रो याचं संपूर्ण नाव अबुल हसन यामीनुद्दीन खुसरो असं होतं. त्याला अमीर खुस्रो देहलवी म्हणून देखील ओळखतात. तो प्रसिद्ध सुफी संत(?) निझामुद्दीन औलिया याचा शिष्य होता. तो बहुतकरून त्याच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहे. अमीर खुस्रोचा जन्म इ.स. १२५३ मध्ये उत्तरप्रदेशातील पतियाली येथे झाला. त्यावेळी हिंदुस्थानावर दिल्ली सल्तनतीचे राज्य होते. अमीर खुस्रोचा बाप अमीर सैफुद्दीन याला त्यावेळचा दिल्लीचा सुलतान शमसुद्दीन इल्तुतमिश याने पतियाली जिल्ह्यातील थोडी जमीन इनाम म्हणून दिली होती. सुरवातीच्या दिवसात खुस्रोने त्या काळात दिल्ली सल्तनतीवर असलेला सुलतान घियासुद्दीन बल्बन याच्या पुतण्याच्या सैन्यात नोकरी पत्करली. आपल्या कवितांमुळे तो याआधीच प्रसिद्ध झाला होता. आता सैन्यात भरती झाल्यामुळे त्याची किर्ती राजदरबारापर्यंत पोहोचली आणि त्याला सुलतानाच्या मुलांकडून कविता ऐकवण्यासाठी आमंत्रणं येऊ लागली. कालांतराने दिल्लीच्या तख्तावर जलालुद्दीन खिलजीने कब्जा केला आणि दिल्लीवर खिलजी वंशाचे राज्य सुरु झाले. जलालुद्दीन खिलजीला काव्याची आवड होती, त्यामुळे खुस्रोचे त्याच्या दरबारात चांगले बस्तान बसले. या दरम्यानच त्याने जलालुद्दीन खिलजीने युद्धात मिळवलेल्या विजयांचें वर्णन करणारे आणि त्याची प्रशंसा करणारे ‘मिफ्ता उल फुतुह’ म्हणजे विजयांची गुरुकिल्ली नावाचे पुस्तक लिहिले. पुढे जलालउद्दीन खिलजीच्या खून करून त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी गादीवर आला. त्याच्या सेवेत असताना खुस्रोने “खजाईन उल फुतुह” म्हणजे विजयांचे खजिने हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्याने अल्लाउद्दीन खिलजीने केलेली युद्ध आणि इतर प्रशासकीय कामे यांचे वर्णन केले आहे. या खजाईन उल फुतुह मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापती मलीक काफूर याच्या मलबार ( आजचा केरळ ) वरील स्वारीचे वर्णन करताना हिंदूंबद्दल आणि त्यांच्या देवतांबद्दल अमीर खुस्रो काय म्हणतो पहा :- ” कंदूर येथे हत्तींच्या शोधात असताना मलिक काफूर याला कळले की ब्रह्मस्थपुरी येथे हिंदूंचे एक मोठे देऊळ असून, त्या देवळात सोन्याची एक मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी बरेच हत्ती पाळलेले आहेत. काफूरने लगेचच त्या देवळावर हल्ला केला आणि ते मंदिर जमीनदोस्त केले. तिथल्या ब्राह्मणांची आणि हिंदूंची मुंडकी काफूरने उडवली आणि त्यावेळी तिथे रक्ताचे पाट वाहिले (अमीर खुस्रो हे सर्व अभिमानाने आणि आनंदाने लिहितोय बरं का ! ) या ठिकाणी लिंग महादेवाच्या मूर्ती होत्या (शिवलिंग) त्या आत्तापर्यंत इस्लामच्या घोडदळाच्या लाथांपासून वाचलेल्या होत्या. मुसलमान सैन्याने ही सर्व लिंग फोडून टाकली आणि हे पाहून हिंदूंचा देव भगवान नारायण खाली पडला आणि इतर देव घाबरून लंका द्वीपावर पळून गेले ! या लिंगांना पाय असते तर ती देखील भितीने पळून गेली असती. या ठिकाणी भरपूर सोने आणि रत्ने मुसलमानांच्या हाती पडली. बीरधूल येथील सर्व देवळं मुसलमानांनी पाडली आणि हे ‘पवित्र कार्य’ उरकून ते १३ जिल्काद ७१० हिजरी ( एप्रिल १३११ इसवी) रोजी परतले. (संदर्भ :- खजाईन उल फुतुह, अमीर खुस्रो, इंग्रजी अनुवाद मुहम्मद हबीब , पृ. १०३-१०४) “मथनवी इ दावल रानी खिज्र खान” या कवितांच्या पुस्तकात अमीर खुस्रो हिंदूंबद्दल पुढील शब्दात लिहितो :- “इस्लामच्या योध्यांच्या तलवारीचे मी आभार मानतो ! त्यांच्या तलवार रुपी आगीमुळे या भूमीतील जंगले तेथे असलेल्या काट्यांपासून (हिंदूंपासून) मुक्त झाली आहेत ! इस्लामच्या तलवारीच्या प्रभावामुळे इथले काफिर धुळीला मिळाले आहेत. हिंदूंमधील बलाढ्य योध्यांना पायाखाली चिरडून त्यांना जिझिया कर भरण्यास इस्लामने भाग पाडले आहे ! इस्लाममुळे हिंदूंवर एवढी नामुष्की आली आहे की इस्लामी शरिया कायद्याने जर जिझिया कर घेऊन हिंदूंना जगू दिले नसते तर हिंदू या देशातून मुळासकट नामशेष झाला असता !” (संदर्भ :- मथनवी इ दावल रानी खिज्र खान, अमीर खुस्रो, अनुवाद रशीद अहमद सलीम अन्सारी , पृ . ४६ ) “मथनवी इ नुह सिपीहीर” या कवितांच्या पुस्तकात अमीर खुस्रो हिंदूंबद्दल पुढील शब्दात लिहितो :- “दीर्घ काळापासून कायम झालेल्या या जगरहाटीला अनेक धन्यवाद ! जगाच्या या नियमानुसार हिंदू हा कायम तुर्कांचे (मुसलमानांचे) सावज बनला आहे ! तुर्क (मुसलमान) आणि हिंदू यांच्या या नात्याला एकच उपमा चपखल बसते, ती म्हणजे तुर्क (मुसलमान) हे वाघ आहेत आणि हिंदू म्हणजे हरणं आहेत ! हिंदू हा तुर्कांच्या (मुसलमानांच्या) उपभोगासाठीच उत्पन्न झाला आहे हा या जगाचा नियम आहे. तुर्काच्या मनात येईल तेव्हा तो हिंदूवरती विजय मिळवतो, त्याला पकडतो, आणि मनाला येईल तशी त्याची खरेदी-विक्री करतो. हिंदू हा सर्व बाबतीत अत्यंत नीच गुलाम असल्यामुळे त्याच्यावर जबरदस्ती करण्याची काहीच गरज नाही ! (जोर जबरदस्ती ना करताच तुम्ही त्याच्याशी हवे तसे वागू शकता !) जेवणासाठी आणलेल्या बकऱ्यावर कोणी रागावते का ? फक्त हिंस्त्र नजर रोखली असता जो मरून पडेल, त्याच्यासाठी धारदार तलवार वापरण्याची काय गरज ?” (संदर्भ :- मथनवी इ नुह सिपीहीर, अमीर खुस्रो, अनुवाद वाहिद मिर्झा, पृ ८९, १३०-१३१ ) अमीर खुस्रोचं बरचसं साहित्य असं हिंदूद्वेषाने भरलेले आहे. आणि याचे आणि ज्ञानेश्वर माऊलींचे विचार एकाच आहेत बरं का ! **”सर्व हिंदू नरकात जाणार आहेत” – निझामुद्दीन औलिया** हे विचार दुसरे तिसरे कोणाचे नसून अमीर खुस्रोचा गुरु महान (?) सुफी संत (?) निझामुद्दीन औलिया याचे आहेत. मोईनुद्दिन चिश्ती याला वयाच्या सत्तराव्या वर्षी मुहम्मद पैगंबराचा दृष्टान्त झाला की तू लग्नाच्या बाबतीत माझ्या आयुष्याचे (सुन्नाह) अनुकरण केले नाहीस. या दृष्टान्तानंतर लगेचच चिश्तीचा शिष्य मलिक ए खिताब याने एका हिंदू राजाच्या मुलीला पळवून आणले आणि तिला बाटवून तिचे लग्न ७० वर्षाच्या चिश्ती सोबत लावून दिले. तिचे नाव बिबी उम्मतुल्ला असे ठेवण्यात आले आणि पुढे तिला चिश्ती पासून मुलं देखील झाली. (संदर्भ:- शहाजहानचा मुलगा दाराशुकोह याने रचलेले सफीनात उल अवलिया या सुफींच्या चरित्रातील मोईनुद्दिन चिश्तीचे चरित्र, याच काळातील अब्दुल हक मुहद्दीत देहलवी याने लिहिलेल्या “अखबार उल अखयार” या पुस्तकात सुद्धा ही हकीकत दिलेली आहे. ) मोईनुद्दिन चिश्तीचा शिष्य कुतुबुद्दीन बख्तियार काकी, काकीचा शिष्य फरिदउद्दिन गंजशकर आणि गंजशकरचा शिष्य प्रसिद्ध सुफी निझामुद्दिन अवलिया. या निझामुद्दिन अवलियाने आपल्या शिष्यासोबत केलेले संवाद, “फवैद अल फवाद” या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यात निझामुद्दिन अवलिया म्हणतो की ” सर्व मुसलमान स्वर्गात आणि सर्व हिंदू (इस्लाम न स्विकारल्याने) नरकात जाणार आहेत” यावरून या पंथाची शिकवण काय होती हे तुमच्या लक्षात येईल. **सात्त्विकता आणि शांतरसाचे प्रतीक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली** वर आपण अमीर खुस्रो आणि त्याच्या गुरु परंपरेची विचारधारा काय होती हे पाहिले. आता दूरचित्रवाणीतील विद्वान अभिनेते या सर्वांची तुलना ज्या ज्ञानेश्वर माउलींशी करतात त्यांचे विचार काय होते ते पाहू :- आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥ वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥ किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥ तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥ आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥ दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांचा सत्कर्मे करण्या मध्ये स्वायस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥ पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥ सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥ जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥ जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥ तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥ हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥ यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥ या लेखाद्वारे मी अमीर खुस्रो , त्याची गुरु परंपरा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांचे विचार तुमच्या समोर ठेवले. आता ते सारखे आहेत का वेगळे आहेत हे ठरवणे तुमचे काम आहे ! त्याचप्रमाणे यातलं अमृत कोणतं आणि विष कोणतं हे ओळखण्यास देखील आपण सुज्ञ आहात ! बहुत काय लिहिणे ! लेखन सीमा . संदर्भ :- १) Report of Tours in North and South Bihar in 1880-81, VOL XVI , Alexander Cunningham २) खजाईन उल फुतुह, अमीर खुस्रो, इंग्रजी अनुवाद मुहम्मद हबीब ३) मथनवी इ दावल रानी खिज्र खान, अमीर खुस्रो, अनुवाद रशीद अहमद सलीम अन्सारी ४) मथनवी इ नुह सिपीहीर, अमीर खुस्रो, अनुवाद वाहिद मिर्झा ५) फवैद अल फवाद, इंग्रजी अनुवाद, अब्दुल हाफीज मुहम्मद ६) Myth Of Composite Culture , Harsh Narain ७) Islamic Jihad, M.A.Khan चित्रे :- १) अलेक्झांडर कनिंगहॅम याला बेदीबन येथे आढळलेला अरबी शिलालेख (ज्याची भगवान का चरण पद म्हणून पूजा केली जाते) २) अमीर खुस्रो ३) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज लेखक:- सत्येन सुभाष वेलणकर , पुणे, ७ नोव्हेंबर २०१९ (लेख मोठा आहे आणि सत्य इतिहास कथन करणारा आहे. *अमीर खुस्त्रो – आणखी काही माहिती व खुलासे* नमस्कार, माझ्या *मौला, माऊली आणि सर्वधर्म समभाव* या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे शतशः आभार आणि धन्यवाद. अनेक जणांनी माझा लेख फेसबुक आणि व्हॉट्सअप च्या माध्यमातून पुढे पाठवून हा लेख आवडला असल्याची पावती मला दिली. काही जणांनी फोन करुन देखील लेख आवडला असल्याचे मला सांगितलं. आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. या लेखाबद्दल जसे अनेक लोकांचे अभिप्राय आले, त्याचप्रमाणे काही जणांनी, “अमीर खुस्त्रो याने उर्दू आणि अवधी भाषेत काही दोहे रचून त्यामध्ये हिंदू देव देवतांची प्रशंसा देखील केली आहे, मग तो हिंदूद्वेष्टा कसा?” अशी शंका देखील उपस्थित केली. या मित्रांचे देखील मी आभार मानतो, कारण त्यामुळे या संबंधी अधिक संशोधन करण्याची संधी मला प्राप्त झाली. परंतु दुर्दैवाने या लोकांनी हिंदू देवदेवतांची स्तुती असलेले अमीर खुस्त्रो चे हे दोहे नेमके कोणते आहेत, आणि ते त्याच्या कोणत्या पुस्तकात उपलब्ध आहेत, आणि हे दोहे नक्की त्यानेच लिहिले आहेत, याचे काही समकालीन संदर्भ आणि पुरावे उपलब्ध आहेत का? यासंबंधी कोणतीही माहिती पुरवली नाही. म्हणून मग मी, माझे फारसी आणि उर्दू भाषेचे गुरु आणि फारसी भाषा तज्ज्ञ श्री राजेंद्र जोशी [एम. ए. उर्दू व एम. ए. फारसी (फर्स्ट क्लास फर्स्ट , गोल्ड मेडलिस्ट)]यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी दिलेली माहिती आपल्या समोर ठेवावी आणि या संबंधी आपल्याला अधिक माहिती द्यावी या उद्देशाने लिहीत आहे. *अमीर खुस्त्रोचे हिंदवी कलाम* अमीर खुस्त्रो याने उर्दू मध्ये (हिंदवी कलाम) काही रचना करुन त्या आपल्या काही मित्रांना वाटून टाकल्या होत्या ही गोष्ट खरी आहे, परंतु त्या रचना कोणत्या होत्या आणि कशा संबंधी होत्या या बद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. किंबहुना, खुस्त्रो याच्या फारसी साहित्याबद्दल जशी समकालीन माहिती उपलब्ध आहे, तशी समकालीन माहिती, त्याच्या उर्दू किंवा अवधी साहित्याबद्दल मिळत नाही. खुस्त्रो च्या नावावर सापडलेले जे उर्दू साहित्य किंवा अवधी भाषेतील साहित्य आहे, ते त्याच्या मृत्यूनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षांनी मिळालेले आहे ! त्यामुळे ते खरंच खुस्त्रो ने लिहिले आहे? का अन्य कोणी लिहून खुस्त्रोच्या नावावर त्याची ‘नोंद’ झाली आहे? हे सांगणे कठीण आहे असे खुस्त्रो वरील बहुतेक सर्व तज्ज्ञांचे आणि अभ्यासकांचे मत आहे. ते या साहित्याला ‘मनसूब’ अशी संज्ञा वापरतात. ‘मनसूब’ याचा अर्थ इंग्रजी मध्ये Attributed to किंवा खुस्त्रोचे नाव वापरुन लिहिलेले असा होतो. खुस्त्रोचे उर्दू किंवा अवधी साहित्य उत्तरकालीन आहे याचा एक उत्तम पुरावा देतो. उर्दू भाषा तज्ज्ञ व अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रोफेसर मिर्झा खलील अहमद बेग यांनी ‘उर्दू की लिसानी तश्कील’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. कसले पुस्तक आहे हे ? तर उर्दू भाषेची उत्क्रांती कशी झाली? आणि त्या भाषेत कालमानानुसार बदल कसे होत गेले ? या संबंधीचे हे पुस्तक आहे. उर्दू भाषेचा इतिहास या पुस्तकात दिला असल्यामुळे, आणि अत्यंत दुर्मिळ माहिती त्यात असल्यामुळे इतिहास संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे. खुस्त्रो ची म्हणून उर्दू आणि अवधी अशी मिश्र भाषेतील एक प्रसिद्ध रचना आहे, त्याच्या काही ओळी पुढील प्रमाणे :- “ज़िहाल ए मिस्कीं मकुन तगल्लूफ दुराये नैना बनाए बतियाँ की ताब ए हिजरा न दारम ऐ जान ना लेहो काहे लगाए छतियाँ ” प्रोफेसर बेग आपल्या पुस्तकात म्हणतात की या रचनेचे हस्तलिखित खुस्त्रोच्या मृत्यूनंतर सुमारे ३०० ते ४०० वर्षानंतर सापडले ! खुस्त्रोचं जे समकालीन साहित्य आहे त्यात या कवितेचा कुठेही उल्लेख नाही ! या शिवाय हे पद्य अन्य कवींच्या नावाने देखील सापडले आहे ! आता, खुस्त्रोच्या मृत्यूनंतर ४०० वर्षांनी मिळालेली त्याच्या नावाची ही कविता, नक्की त्यानेच लिहिली हे कसं खरं मानायचं ? यात काहीही तथ्य नाही, खुस्त्रो ने लिहिलेल्या तथाकथित सर्व उर्दू आणि अवधी साहित्याची हीच स्थिती आहे. दुसरं एक उदाहरण देतो, ‘बरसात की रात’ या हिंदी चित्रपटात साहिर लुधियानवी यांनी रचलेले ‘ ना तो कारवाँ की तलाश है’ असे एक गाणे आहे. त्यातल्या काही ओळी अशा आहेत :- “बहुत कठिन है, डगर पनघट की अब क्या भर लाऊँ मैं जमुना से मटकी मैं जो चली जल जमुना भरन को देखो सखी री मैं जो चली जल जमुना भरन को नंद को छोरो मोहे रोके झाड़ो तो क्या भर लाऊँ मैं जमुना से मटकी अब लाज राखो मोरे घूंघट पट की” आता अमीर खुस्रोची म्हणून देखील अशीच एक रचना आहे. अर्थात वर नमूद केल्याप्रमाणे ती अमीर खुस्रोनेच ‘केली आहे याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही ! ती पुढील प्रमाणे आहे :- बहुत कठिन है डगर पनघट की। कैसे मैं भर लाऊँ मधवा से मटकी मैं जो गई थी पनिया भरन को दौड़ झपट मोरी मटकी पटकी निजामुद्दीन औलिया मैं तोरे बलिहारी लाज रखो तुम हमरे घूँघट की। लाज राखो मोरे घूँघट पट की। निजाम तोरी सूरत पे बलिहारी सब सखियन में चुंदर मोरी मैली देख हँसे नर नारी अब के बहार चूँदर मोरी रंग दे, निजाम पिया रख ले लाज हमारी। सदका बाबा गंज शकर का, रख ले लाज हमारी निजाम पिया निजाम तोरी सूरत के बलिहारी, मेरे घर निजाम पिया। कुतुब-फरीद मिल आए बराती खुसरो राजदुलारी ख्वाजा निजाम तोरी सूरत के बलिहारी निजाम पिया रख ले लाज हमारी। खुस्रोच्या या रचनेत श्रीकृष्णाची नव्हे तर त्याचा गुरु निजामुद्दीन औलिया याची स्तुती केलेली आहे ! पुढे कदाचित साहिर लुधीयानवी यांनी या ओळी घेऊन त्यामध्ये श्री कृष्णाचे नाव घातले असावे ! रचनेतील शब्दांच्या साधर्म्यामुळे काही भोळेभाबडे हिंदू, अमीर खुस्रोने कृष्णाचीच स्तुती किंवा त्याचा उल्लेख केला आहे असे समजून हातोहात फसतील ! *सरड्याचे बदलते रंग !* पाकिस्तानी मनोवृत्तीचे काही धर्मान्ध लोक हिंदूंच्या संगतीत राहिल्यामुळे सुरवातील बिघडले होते , परंतु नंतर ते सुधारले असल्याचे दिसून येते. काही उदाहरण पाहू :- “सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा ” ही रचना करणारा इकबाल हा सुरवातीला असाच बिघडलेला होता , तो प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख आपल्या एका रचनेत इमाम-ए-हिंद असा करतो . ते शब्द पुढील प्रमाणे :- “है राम के वजूद पे हिन्दोस्ताँ को नाज़ अहल-ए-नज़र समझते हैं उस को इमाम ए हिंद ” – ( संदर्भ :- ‘नया शिवाला’ या १९०५ साली प्रकाशित झालेल्या आलामा इकबाल यांच्या कविता संग्रहातून ) पुढे लवकरच हा इकबाल सुधारला, आणि मग त्याने लिहिले:- “चीन ओ अरब हमारा, हिन्दोसताँ हमारा मुस्लिम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा तौहीद की अमानत, सीनों में है हमारे आसाँ नहीं मिटाना, नाम ओ निशाँ हमारा दुनिया के बुतकदों में, पहले वह घर ख़ुदा का हम इस के पासबाँ हैं, वो पासबाँ हमारा तेग़ों के साये में हम, पल कर जवाँ हुए हैं ख़ंजर हिलाल का है, क़ौमी निशाँ हमारा मग़रिब की वादियों में, गूँजी अज़ाँ हमारी थमता न था किसी से, सैल-ए-रवाँ हमारा बातिल से दबने वाले, ऐ आसमाँ नहीं हम सौ बार कर चुका है, तू इम्तिहाँ हमारा ऐ गुलिस्ताँ-ए-अंदलुस! वो दिन हैं याद तुझको था तेरी डालियों में, जब आशियाँ हमारा ऐ मौज-ए-दजला, तू भी पहचानती है हमको अब तक है तेरा दरिया, अफ़सानाख़्वाँ हमारा ऐ अर्ज़-ए-पाक तेरी, हुर्मत पे कट मरे हम है ख़ूँ तरी रगों में, अब तक रवाँ हमारा सालार-ए-कारवाँ है, मीर-ए-हिजाज़ अपना इस नाम से है बाक़ी, आराम-ए-जाँ हमारा इक़बाल का तराना, बाँग-ए-दरा है गोया होता है जादा पैमा, फिर कारवाँ हमारा ” (संदर्भ :- ‘बांग ए दरा’ या १९२४ साली प्रकाशित झालेल्या आलामा इकबाल यांच्या कविता संग्रहातून. या कवितेला ‘तराना ए मिल्ली’ असं म्हणतात ) मुसलमानांसाठी म्हणून भारतापासून तोडून वेगळा देश करावा, ही कल्पना प्रथम पुढे आणणारा माणूस म्हणजे हा इकबाल. मुघल बादशहा अकबर सुद्धा नंतरच्या काळात असाच बिघडला होता. तो रोज सूर्य सहस्त्रनाम म्हणू लागला होता आणि भर दरबारात मुहम्मद पैगंबराची टिंगल देखील करु लागला होता ! मुंतखाब -उत- तवारिख या अकबराच्या चरित्रात बदाऊनि या अकबराच्या चरित्रकाराने हे लिहून ठेवले आहे. तो अकबराचा समकालीन होता आणि अकबराच्या दरबारात धर्मासंबंधीच्या कामासाठी त्याची नेमणूक झाली होती. तो कर्मठ मुसलमान होता आणि त्याला अकबराचे हे वागणे (सूर्यसहस्रनाम म्हणणे वगैरे ) आवडत नसे. ‘मुंतखब -उत- तवारिख’च्या खंड-२, पान नं २६८ आणि ३३२ (इंग्रजी भाषांतर ) मध्ये अकबराच्या सूर्य उपासनेचा संदर्भ मिळतो. भानूचंद्र नावाच्या एका जैन साधूने अकबराला सूर्यसहस्रनाम शिकवले असा उल्लेख भानूचंद्राचा संस्कृत चरित्रकार सिद्धचंद्र याच्या, “भानूचंद्र चरित्र” या संस्कृत ग्रंथात येतो. हा भानूचंद्र इ.स. १५८७ ला लाहोर येथे अकबराच्या दरबारात आला होता. बदाऊनी पुढे म्हणतो की, अकबराने कपाळावर हिंदूंप्रमाणे गंध लावायला सुरवात केली, मशिदी बंद करून त्यांची कोठारे केली आणि नमाज देखील बंद करवला. ‘मुंतखाब -उत- तवारिख’ खंड-२, पान नं २६८ वर अकबराने गोहत्या आणि गाईचे मांस खाण्यावर देखील बंदी आणली असा देखील उल्लेख केलेला आहे. अर्थात हा बदल अकबराच्या शेवटच्या काळात झाला . कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात तो कट्टर मुसलमान आणि हिंदूद्वेष्टा होता. त्याने चित्तोडगडा वरील स्वारीत, तीस हजार (३०,०००) निष्पाप हिंदूंची कत्तल केली हे त्याचा दरबारी इतिहासकार अबुल फजल याने आपल्या ‘अकबरनामा’ या पुस्तकात लिहून ठेवले आहे. (संदर्भ:-अकबरनामा , अबुल फझल , इंग्रजी अनुवाद – बेव्हरीज , खंड २, पृ.४७५) चित्तोड जिंकल्यानंतर अकबराने जो ‘फतहनामा’ किंवा ‘विजयाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये तो म्हणतो की, “हे युद्ध म्हणजे काफिरांना ( हिंदूंना ) मारण्यासाठी केलेला ‘जिहाद’ आहे. ” या जाहीरनाम्यात ‘जिहाद’ हा शब्द किमान तीन वेळा आला आहे. (संदर्भ:- FATHNAMA—I CHITOR, MARCH 1568 AN ANNOTATED TRANSLATION, Ishtiaq Ahmed Zilli and Ishtiaq Ahmad Zilli, Proceedings of the Indian History Congress, Vol. 33 (1971), pp. 350-361) पुढे अकबराला, त्याने हिंदूंना जबरदस्तीने बाटवल्याचा पश्चात्ताप झाला आणि या बद्दल आपण शरमिंदा आहोत असे तो म्हणतो! अकबराने उच्चारलेले हे शब्द त्याचा दरबारी इतिहासकार अबुल फझल याने ‘ऐन ए अकबरी’ आणि ‘अकबरनामा’ या पुस्तकात लिहून ठेवले आहेत. अकबर काय म्हणतो पहा :- *१) “मी पूर्वी लोकांना जबरदस्तीने माझ्या धर्मात, म्हणजे इस्लाममध्ये आणत असे . परंतु माझे ज्ञान जसे जसे वाढले तसे तसे मला या कृत्याबद्दल स्वतःची फार लाज वाटू लागली. एखाद्याला जबरदस्तीने मुसलमान करण्याचे माझे हे कृत्य योग्य नव्हते” (संदर्भ – ऐन ए अकबरी, इंग्रजी अनुवाद , जारेट, खंड ३, पृ.३८४)* *२) “बाहेरून भपकेबाजपणा दाखवणाऱ्या, परंतु आतून (मनातून) वाईट असलेलया लोकांशी जवळीक असलेले लोक, बाह्यात्कारी आभासाला आणि इस्लामच्या कायद्याला भुलून , मनाला पटले नसतानाही वाईट वागतात. मी देखील याच भयापोटी अनेक हिंदूंना पूर्वी बाटवले आणि त्यांना माझ्या पूर्वजांच्या धर्मात (इस्लाम) आणले. परंतु आता माझ्या मनात सत्याचा प्रकाश पडल्यामुळे, मला हे कळून चुकले आहे की अंहकाराने भरलेल्या या दुःखमय जगात, विवेकबुद्धीची आणि पुराव्यांची मशाल हातात घेतल्याशिवाय एक पाऊल देखील चालणे अशक्य आहे ! ज्या धर्माकडे किंवा जातीकडे ही विवेकबुद्धी असेल त्याच जातीचा किंवा धर्माचा विजय होईल ! मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की सुलतानाच्या धाकामुळे , कातडीचा तुकडा काढणे (सुंता) आणि स्वतःचे मस्तक जमिनीला टेकवणे (नमाज) या कृत्यांचा पुरस्कार करणाऱ्या धर्माचे (इस्लामचे) अनुकरण करून देवाचा शोध घेता येणार नाही !” (संदर्भ- अकबरनामा, अबुल फझल, इंग्रजी अनुवाद बेव्हरीज, खंड ३, पृ. ३७१)* आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल निदान पश्चात्ताप व्यक्त करणारा मुघल बादशहा अकबर हा बहुदा एकमेव सुलतानी शासक आहे ! हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की एखाद्या सुलतानी शासकाने किंवा व्यक्तीने यदाकदाचित हिंदू देवदेवतांची थोडी स्तुती केली असली, तरी एवढ्यावर लगेच हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही. त्याच्या या दोन पैशाच्या स्तुतीमुळे किंवा पश्चात्तापामुळे, त्याने हिंदूंच्या बाबतीत पूर्वी केलेली अमानुष पापे कदापि धुतली जाणार नाहीत ! *केवळ पश्चाततापाने किंवा स्तुतीने पूर्वी केलेल्या पापांचे परिमार्जन होईल काय ?* एखाद्या सुलतानी शासकाने किंवा व्यक्तीने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले आणि नंतरच्या काळात त्याला आपल्या या कृत्याचा पश्चातताप झाला आणि त्याने “माझ्या हातून ही चूक झाली !” असे लिहून ठेवले तर हिंदूंनी या पश्चात्तापाला गोड मानून पूर्वी केले सर्व अत्याचार विसरून जायचे का ? पश्चात्तापाचे दोन शब्द बोलले किंवा लिहिले की संपलं का सगळं ? एक उदाहरण देतो :- वाहतुकीचे नियम न पाळता, बेदरकारपणे गाडी चालवत असताना समजा माझ्या गाडीची धडक एखाद्या पादचाऱ्याला बसली आणि त्यामुळे त्याचे दोन्ही पाय कायमचे अधू झाले. मला याबद्दल फार वाईट वाटले आणि माझ्या हातून चूक झाली आणि त्यामुळे त्या माणसाचे मोठे नुकसान झाले, म्हणून मी त्याची माफी मागितली आणि त्याला टाटा करून तिथून निघून गेलो! हो झाली माझी चूक, पण मी माफी तर मागितली ना ? मग झालं तर ! The End ! असं होत नसतं. मला जर मनापासून त्या कृत्याचा पश्चात्ताप होत असेल तर मी पुढील गोष्टी करणे अपेक्षित आहे :- १) त्या माणसाची मनःपूर्वक माफी मागणे २) माझ्या चुकीने त्या माणसाचे पाय गेले आणि त्याचे जन्माचे नुकसान झाले, या बद्दल काही आर्थिक मदत करून त्याचे पुनर्वसन करणे. ३) माझ्या या कृती करता मला शिक्षा म्हणून काहीतरी प्रायश्चित्त भोगावे लागणे, जेणे करून आपल्या कडून खरंच ही चूक झाली आहे आणि त्याबद्दल आपल्याला ही शिक्षा झाली आहे याची जाणीव मला व्हावी. या तीन गोष्टी मी केल्या तरच मला खरंच पशात्ताप झालाय असे म्हणता येईल ! मी जे उदाहरण दिले ते केवळ काल्पनिक आहे, परंतु प्रत्यक्ष इतिहासात हिंदूंनी हजारो वर्ष सुलतानी शासकांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार भोगले आहेत ! आणि या अत्याचारांमध्ये लाखो हिंदूंना त्यांचे जीव हकनाक गमवावे लागले आहेत ! मग या मेलेल्या लाखो निष्पाप जिवांची आणि त्यांच्यावर केलेल्या अत्याचारांची किंमत स्तुतीच्या दोन-चार कोरड्या शब्दांनी भरून येईल असं तुम्हाला वाटतं का? फारसी मध्ये एक म्हण आहे :- ” तारीख आईना ए गुजस्त अस्त व दर्स ए हाल ! ” म्हणजे, “इतिहास हा गतकाळाचा आरसा आणि चालू काळासाठीचा धडा असतो !” आता इतिहासाच्या या आरशात नुसतं पाहात बसायचं, का त्यातून काही धडा शिकायचा ? हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे! बहुत काय लिहिणे ! तरी तुम्ही सूज्ञ असा ! लेखन सीमा संदर्भ :- १) उर्दू की लिसानी तश्कील- मिर्झा खलील अहमद बेग २) ऐन ए अकबरी, इंग्रजी अनुवाद , जारेट, खंड ३ ३) अकबरनामा , अबुल फझल , इंग्रजी अनुवाद बेव्हरीज , खंड २ ४) मुंतखाब -उत- तवारिख, बदाऊनी , खंड-२, ५) https://sufipoetry.wordpress.com/2009/11/06/zehaal-e-miskeen-amir-khusro/ ६) http://ignca.nic.in/coilnet/amir0016.htm ७) https://urdushahkar.org/naya-shivala-1905-iqbal/ ८) FATHNAMA—I CHITOR, MARCH 1568 AN ANNOTATED TRANSLATION, Ishtiaq Ahmed Zilli and Ishtiaq Ahmad Zilli, Proceedings of the Indian History Congress, Vol. 33 (1971), pp. 350-361 लेखक :- ©सत्येन सुभाष वेलणकर पुणे , दिनांक, १० नोव्हेंबर २०१९ *_ता.क. :- अमीर खुस्रोच्या हिंदवी (उर्दू व अवधी) कलामांबद्दलच्या बहुमूल्य माहिती बद्दल मी माझे फारसी भाषेचे गुरु फारसी तज्ज्ञ श्री राजेंद्र जोशी यांचा शतशः आभारी आहे._* Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website