मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं.

तमाम मुंबईकरांचं हे आराध्य दैवत. नवरात्र हा तर साक्षात देवीचा सण, उत्सव. अखंड भारतीत नवरात्राचे हे नऊ दिवस मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात. देशाची लक्ष्मी मुंबई आणि मुंबईची लक्ष्मी महालक्षुमी, तिचं नवरात्रातलं स्वरुप तर याची डोळा पाहावं असं असतं. या नऊ दिवसांत महालक्ष्मीच्या परिसराचं स्वरुप स्वर्गापेक्षा जराही उणं नसतं. आपल्या आजुबाजूला देवीचा वावर आहे असा सततचा भास या नऊ दिवसांत सर्वच ठिकाणी होत असतो आणि महालक्ष्मी मंदिर परिसरात तर श्रद्धेच्या दागिन्यांनी मढलेल्या, नटल्या-सजलेल्या, गरीब-श्रीमंत घरच्या असंख्य प्रसन्न वदना ‘गृहलक्ष्मीं’चे साक्षात दर्शन होत असते. देवळावर केलेली नयनरम्य रोषणाई, पाना फुलांची सजावट, भक्तीभावाने ओथंबलेले दर्शनाला आलेल्यांचे चेहेरे आणि याहीपेक्षा देवीच्या मुर्तीवर चढलेलं तेज हे स्वत: अनुभवण्यासारखं. हा जिवंत सोहळा अप्रतिम असतो आणि तो याची देह, याची डोळा बघण्यासाठी तमाम मुंबईकर, विशेषत: घरोघरच्या महालक्षुमी मोठ्या भक्तिभावाने वरळी नजिकच्या महालक्षुमीच्या देवळात आपली हजेरी लावतात..

मुंबईतील महालक्षुमीचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे तो सारा परिसरच ‘लक्ष्मीपुत्रां’चा आणि ‘लक्ष्मीकन्यां’चाही. देवळाच्या समोरच पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’ मध्ये, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या सारख्याच लाडक्या असलेल्या कन्या मंगेशकर भगिनी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथांसोबत राहतात. देवळाला लागून असलेल्या ‘शिवतीर्थ’ इमारतीत मराठीची एकेकाळची आघाडीची नायिका ‘जयश्री गडकरां’चं वास्तव्य होत. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती श्री. मुकेश अंबानीही इथून हाकेच्या अंतरावर राहतात. मला माहित असलेली ही काही मोजकी उदाहरणं. शेजारचा ‘ब्रीच कँडी’, देवळापासून काही अंतरावर असलेला ‘कार मायकेल रोड’, ‘पेडर रोड’, ही ठिकाण म्हणजे देशाच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या मोठ-मोठ्या उद्योगपतींचा. या सर्वच परिसरावर महालक्षुमीचा वरदहस्त असून इथे सहज म्हणून फेरफटका मारला तरी ‘महालक्षुमी’चं दर्शन उघड्या डोळ्यांनी अगदी सहजरित्या घडते..

अश्या या ठिकाणी आई महालक्षुमीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी, महाकाली आणि महासरस्वती, यांच्यासोबत साधारणतः १७८४-८५ पासून असलं तरी, त्यांना अतिशय मोठा इतिहास आहे. सदरचा लेख महालक्षुमी आणि तिच्या दोन बहिणीं सध्याच्या ठिकाणी कशा प्रकट झाल्या त्याची कहाणी सांगणारा आहे.

आताच्या महालक्षुमी मंदिराचा इतिहास साधारणत: अडीचशे वर्ष मागे जातो. मुंबई त्याकाळात सात बेटांची होती. दोन बेटांमधील उथळ खाडी भरून बेत जोडायचा कार्यक्रम ब्रिटीशनी आखला होता. मुंबईचे सन १७७१ ते १७८४ या काळात गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी यांनी मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा बेत आखला होता. व्यापारी असलेल्या इस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा खर्चिक पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी हा पठ्ठ्या हिम्मत हरला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक, म्हणजे सध्या आपल्या महालक्षुमीचे देऊळ आहे ते आणि उत्तरेच्या दिशेला असणारं समोरचं वरळी बेट, म्हणजे सध्या मुंबई महानगरपालिकेचे ‘लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र’ किंवा ‘अत्रीया मॉल’ आहे ते, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस इथून आत घुसणारं समुद्राचं पाणी, पार आताच्या पायधुनी -भायखळ्या पर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटाच्या पूर्वेकडून पश्चिम दिशेला असलेल्या वरळी-महाल्क्ष्मीकडे जायचं तर होडीशिवाय पर्याय नसायचा. मोठी यातायात असायची ही सारी. समुद्राचे पाणी जिथून आत घुसायचं त्या भागाला ब्रिटिशानी ‘द ग्रेट ब्रीच’ असे नाव दिलं होतं. ब्रीच म्हणजे खिंडार. मुंबईच्या सात बेतांमधे असलेल्या समुद्राच्या खाड्यांमधे ही खाडी सर्वात मोठी होती, म्हणून ती ‘ग्रेट’..! ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने ही खाडी भरून काढायचं आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचं काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केलं. ‘वरळीचा बांध’ बांधण्याचे काम असं या कामाला त्यावेळी म्हटलं गेलं होतं. हाच सध्याचा ‘लाला लजपतराय मार्ग’, पूर्वीचा ‘हॉर्नबी वेलॉर्ड’. कृतज्ञता म्हणून लॉर्ड हॉर्नबीचे नाव मुंबईकर जनतेने या रस्त्याला दिलं होतं.

या बांधाच्या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू समाजातील तरुण इंजिनिअरकडे सोपवण्यात आलं होतं. बांध घालण्याचे काम सुरु झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून मोठ्या बोटी इथे येऊ लागल्या. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी करण्याचे काम सुरु झाले. पण होई काय की, बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेट्याने बांधलेला बांध कोसळून जाई आणि पुन्हा सुरुवात करावी लागे. असं बरेच महिने चाललं. त्याकाळचं तंत्रज्ञान लक्षात घेता हे तसं कठीणच काम होतं. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिम्मत हारली नाही..ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले, परंतु पुन्हा पुन्हा तेच व्हायचं..!

अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्षुमीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, ‘मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल..!”. त्याकाळात सर्वच जनता भाविक आणि श्रद्धाळू असायची आणि त्याला रामजी शिवजीही अपवाद नव्हता. साहजिकच रामजी शिवजीने त्याला मिळालेल्या दृष्टान्तावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजीने त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तींचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. होर्नबी पक्का ब्रिटीश. या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणंच शक्य नव्हतं, परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हतं हे ही खरं होतं. बांध पुन्हा पुन्हा कोसळत जोता. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बांध बांधायला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हा ही प्रयत्न करून बघू, म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तींचा शोध घेण्याची परवानगी दिली.

झाले रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छिमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि खरंच, एके दिवशी जाळी वर काढताना हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्षुमी, महासरस्वती आणि महाकाली अशा तीन महादेवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि या देवींच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही उदारपणे सध्याच्या महालक्षुमी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असं सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितलं. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरुपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने आताच्या जागी महालक्षुमीचे देऊळ बांधून त्यात तिच्यासोबत महाकाली व महासरस्वती या तिच्या दोन बहिणींची मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. आताचे हे देऊळ सुमारे सन १७८४-८५ च्या सुमारास (काही ठिकाणी सन १७६१ते १७७१ असाही म्हटलं आहे) बांधलं गेलं आहे. महालक्षुमीच्या जन्माची ही आख्यायिका आहे.

या आख्यायिकेमागील श्रद्धेचं पांघरून थोडंसं बाजूला केलं, तर लक्षात येईल की, साधारण चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकात मुसलमानांची आक्रमणं मुंबंईवर झाली, त्यात हिन्दूंची अनेक देवालयं उध्वस्त करण्यात आली होती. त्यात मुंबादेवी आणि महालक्षुमीच्या देवळांचाही समावेश होता. ‘Rise of Bombay’ या एडवर्ड यांच्या सन १९०४ साली लिहिलेल्या पुस्तकात तसा उल्लेख आहे. कदाचित प्रभादेवी, वाळकेश्वराचंही देऊळही याच दरम्यान उध्वस्त करण्यात आलं असावं. त्यानंतर १६व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पुन्हा सर्व पूर्ववत होतंय न होतंय तोवर पोर्तुगीजांचं आक्रमण आलं आणि त्यांनीही तोच कित्ता गिरवला. प्रभादेवीच्या मूर्ती परकीयांकडून विध्वंस होऊ नयेत म्हणून जश्या पाठारे प्रभु समाजाच्या लोकांनी विहिरीत लपवून ठेवल्या होत्या, तशाच महालक्षुमी आणि तिच्या सोबतच्या मूर्तीही तिच्या भाविकांनी समुद्राच्या उथळ पाण्यात सुरंक्षित दडवून ठेवल्या असाव्यात आणि मग ब्रिटीश काळात सर्व स्थीरस्थावर झालंय असं लक्षात आल्यावर पुन्हा पाण्यातून वर काढून त्यांची प्रतिष्ठापना केली असावी, असं म्हणता येतं..पुढे कधीतरी त्यावर कथेचं आवरण चढवलं असावं.

मुंबईतल्या इतर देवतांसारखीच महालक्षुमीही अतिशय प्राचीन दैवत. त्या देवतांप्रमाणे, ही देवीही मुळची कोळ्यांनी स्थापन केली असावी असं म्हटल तर चुकणार नाही. प्रथम मुसलमानी आणि नंतर पोर्तुगीज आक्रमणात महालक्षुमीचं पूर्वीचं जुनं देऊळ इतर देवळांप्रमाणे उध्वस्त करण्यात आलं, परंतु मूर्ती मात्र तिच्या भक्तांनी सुरक्षित ठेवल्या, असं वरच्या कथेवरून स्पष्ट होतं. याचा अर्थ महालक्षुमीचं सध्याचं मंदिर जरी १७८४-८५ च्या दरम्यान बांधलं गेलं असलं, तरी त्यातील प्रतीमा मात्र किमान सात-आठशे किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षाचा इतिहास लेवून उभ्या अाहेत असं म्हटल्यास चुकू नये. जुनं मंदिर एक किंवा दोन वेळेला उध्वस्त केलं गेलं असावं. मंदिराची मूळ जागा मात्र आता आहे तिच असावी..!!

श्री महालक्षुमीच्या मंदिरात चैत्र आणि अश्विनातली नवरात्री मोठ्या धामधुमीने साजरी होते. अलम मुंबई या वेळी महालक्षुमीच दर्शन घेण्यासाठी लोटते. दसऱ्याचा दिवसही मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. दिवाळीचे पाचही दिवस, विशेषत: लक्ष्मीपूजनाचा दिवस तर साक्षात लक्ष्मीचा..! लक्ष्मीची आपल्यावर सदा कृपा असावी म्हणून लहान थोर, गरीब-श्रीमंत आणि सर्व जातीचे लोक महालक्षुमीच्या मंदिरात तिच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. पूर्वी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथे जत्रा भरत असे, मात्र आता जागेच्या ही जत्रा बंद करण्यात आली आहे. तशीही या देवीला जत्रेची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक दिवशी या मंदिरात जत्रेवढीच गर्दी असते. हल्ली मार्गशीर्ष महिन्यातही देवीच्या दर्शनाला स्त्रियांची प्रचंड गर्दी होते. नवीन लग्न झालेली जोडपी मुंबईची ग्राम देवता आई मुंबादेवीच्या दर्शानंतर आई महालक्षुमीच दर्शन घेतात. ही प्रथाच पडून गेली आहे. कारण त्याशिवाय लग्नाला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही.

महालक्षुमी मंदिराच्या आवारात इतरही मंदिरं असली तरी, त्यातील केवळ धाकलेश्वर मंदिराची माहिती सांगतो. आहे. हे मंदिर धाकजी दादाजी प्रभू ह्या त्या काळातील नामांकित पठारे प्रभू समाजाच्या व्यापारी गृहस्थाने सन १८३२ साली बांधलेलं आहे. हे मंदिर मुख्यता: श्री महादेवाचं. देवालय स्थापन करणाराने देवाला स्वत:चे अथवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे नांव देण्याच्या त्या काळच्या प्रथेप्रमाणे, या महादेवाचे नांव ‘धाकलेश्वर’ असं ठेवण्यात आलं होत. शेजारीच मयुरेश्वर, म्हणजे जी गणपतीची मूर्ती आहे, त्या गणपतीच नांव धाकजींचा मुलगा ‘मोरेश्वर’ याच्या नांवावरून ठेवण्यात आलं आहे तर, तिसऱ्या स्त्री मूर्तीचं नांव धाकाजींची पत्नी रमाबाई वरून ‘रमेश्वरी’ असं नामकरण करण्यात आलं होत. चौथी मूर्ती हरीनारायणाची असून हे नांव धाकजींचा अन्य पुत्र ‘नारायण’ यांच्या नांवावरून ठेवण्यात अल होत. आणखी एक विनायाकादित्याची मूर्ती आहे. हे मंदिर बांधण्यास त्याकाळात ८०००० रुपयांचा खर्च आला होता अशी माहिती श्री. गोविंद नारायण माडगावकर यांच्या .मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात आहे.

श्री महालक्षुमी मंदिराच्या पूर्वेकडे, म्हणजे आताचा पेडर रोड जिथून सुरुवात होतो त्या कोपऱ्यावर पूर्वी शेठ तुलसीदास गोपालजी किंवा तुलसीदास गोपालदास नांवाच्या व्यापाऱ्याने बांधलेलं एक तळं होत, जे आता बुजवण्यात येऊन ती जागा मोठ्या समारंभासाठी भाड्याने देण्यात येते.

वरळीच्या बांधाने मुंबईच्या ‘महालक्षुमी’ला जन्म दिला हे तर खरंच, परंतू त्याने ‘मुंबई’च्या रूपाने देशाच्या पदरात खरीच ‘लक्ष्मी’ टाकली हे ही खरंच..! वरच्या आख्यायिकेचा एक असाही अर्थ लावता येतो. मुंबईवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघता देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगतातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतंही शहर हिसकावून घेऊ शकलेलं नाही. मुंबईवर महा’लक्ष्मी’चा वरदहस्त आहे, नव्हे, मुंबई हे ‘महालक्षुमी’चे साक्षात प्रतिक आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईला ‘महालक्षमी’चं देऊळ आणि त्यातील दगडी मूर्ती तर मिळाल्याच, परंतु खऱ्या महा’लक्ष्मी’च्या रुपात साक्षात मुंबईच मिळाली. असं म्हटले तर वावगं ठरणार नाही.

देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांपैकी, ‘लक्ष्मी’ हे एक रत्न आपल्याला मिळालं, असं पुराणकथांमध्ये म्हटलेलं आहे. या पुराणकथेमध्ये आणि वरळीच्या समुद्रात केलेल्या समुद्रमन्थनाच्या घटनेत मला कमालीचं साम्य वाटतं. समुद्र मन्थनातून देवांना ‘लक्ष्मी’ मिळाली, आणि आपल्याला साक्षात ‘मुंबई’ मिळाली. दोन्हींचा काळ वेगळा असला तरी, अर्थ एकच..!

-नितीन साळुंखे

Leave a Reply

Your email address will not be published.