आज श्री प.प.नारायणस्वामी, नृसिंहवाडी यांची पुण्यतिथी.
अग्रपूजाधिकारी श्रीमद् नारायण स्वामींच्यासारख्या अवतारी पुरुषांच्या कृपाशीर्वादाने नरसोबावाडीतील मंडळी त्यांची सेवा करीत आहेत.
अशीच सेवा वंशोवंशी आमच्याकडून करून घेऊन निरंतर कल्याण करावे अशी सर्व पुजारी मंडळींची श्रीमद् नारायण स्वामींच्या पवित्र चरणी प्रार्थना असते!
श्रीमन् नारायणस्वामिन् । दयाब्धे तारकपद दायिन ।
स्वामी श्री नृसिंहवाडीत राहून उपासना करीत असत. देवाजवळ संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केल्यावर योग्य वेळी संन्यास होईल असे देवाचे सांगणे झाले. श्रीनारायणस्वामी नित्य पहाटे संगमावर स्नानाला जात असत. एके दिवशी नित्याप्रमाणे स्नानाला गेले असता पाय घसरून पाण्यात गेले. त्या ठिकाणी श्रीदत्त भगवान श्रीनृसिंहसरस्वतींनी स्वत: प्रणवोच्चारपूर्वक सर्व संन्यासविधी यथाशास्त्र करून त्यांना दंड दिला व श्रीनारायणसरस्वती असे नाव ठेवले. हा सर्व विधी झाल्यावर ज्या ठिकाणी हे पाण्यात गेले होते तेथूनच दंडकमंडलूसह संन्यासीवेषात बाहेर आले.
त्यांना संन्यासीवेषात पाहून तेथील मठातील महंताना वाटले की, गुरुशिवाय याने स्वतःच संन्यास घेतला आहे. हा भ्रष्ट आहे असे समजून त्यांच्यावर बहिष्कार घातला. श्रीनारायणस्वामी आपल्या खोलीचे दार बंद करून बसत असत. बाहेरून कोणी भक्ताने नमस्कार केल्यास आतून ‘नारायण’ असा शब्द येत असे. ते पाहून हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरता एके दिवशी रात्री मठाधिपती नारायणस्वामींच्या खोलीच्या दाराच्या बिळातून पाहू लागले. त्या दिवशी शनिवार असल्याने श्रीनारायणस्वामी डोळे मिटून प्रेमाने नृसिंहाचे भजन करीत होते; व एक मोठा सिंह त्यांच्या समोर बसलेला आहे असे त्यांना दिसले. ते पाहून श्रीनारायणस्वामींचा अधिकार फार मोठा आहे असे वाटून ते नारायणस्वामींना शरण गेले व ‘आपला अधिकार न समजल्यामुळे मी आपणाला भ्रष्ट समजलो’ असे म्हणाले. तेव्हा नारायणस्वामींनी त्यांना आपल्या संन्यासाची सर्व हकीगत सांगितली.
मठाधिपती त्यांचे शिष्य झाले व कृतकृत्य झाले. श्रीनारायणस्वामी शालिवाहन शके १७२७ चैत्र वद्य अमावस्येला श्री क्षेत्र नृसिंह वाडीत सदेह वैकुंठगमनाला गेले.
दत्त महाराजांना आपले शिष्य हे अतिप्रिय असतात ,नारायणस्वामी महाराज हे त्यांच्या अत्यंत प्रिय शिष्यांपैकीच एक . नृसिंहवाडीला माझ्या आधी तुझे पूजन होईल हे वरदान दत्त महाराजांनी दिले आणि आजही त्याचे पालन हे नित्य होत असते . आधी नारायण स्वामी महाराजांचे पूजन होऊन मग दत्त महाराजांचे पूजन होते .श्री माता आणि दत्त महाराज हे यांचे भजन ऐकण्यासाठी नित्य येत असत इतकी स्वामी महाराजांची योग्यता होती .
आपला इहलोकीचा काळ संपताच नारायण स्वामी महाराज हे सदेह वैकुंठलोकाला गेले आहेत . स्वामी महाराजांना नेण्याकरिता पुष्पक विमान किंकिणीचा शब्द करीत आलेले गोपाळस्वामी महाराजांनी पाहिले . त्या वेळी गोपाळ स्वामी महाराज कृष्णा प्रवाहात स्नान करीत होते . विमान आलेले पाहताच स्नान त्याग करून ते वर आले आणि नारायणस्वामी महाराजांच्या चरण कमळी मस्तक ठेवून वंदन केले आणि नंतर नारायण स्वामी महाराज पुष्पकारूढ झाले असा इतिहास आहे .
गुरुभक्त म्हणून प्रसिद्ध असणारे ढोबळे पुजारी हे नारायण स्वामी महाराजांचे शिष्य . शेकडो आरत्या आणि पदे त्यांनी केली आहेत . नृसिंहवाडीला दत्त महाराजांच्या नित्य उपासनेमध्ये बहुत करून यांच्याच आरत्या आणि पदांचा उपयोग होतो . नारायण स्वामी महाराजांच्या अनेक आरत्या गुरुभक्तांनी केल्या असून त्यातील एका आरतीत नारायण स्वामींचा उल्लेख पूर्ण ब्रह्म हा प्रभू नारायण असा केला आहे . नारायण स्वामी महाराज यांच्या वैकुंठ गमनावेळी गुरुभक्त म्हणतात
, मधुइंदू अमावस्या पुष्पकी बैसून l
आज्ञा घेऊनि दास जाति वैकुंठ भुवन ll
थोरल्या महाराजांनी ( टेम्ब्ये स्वामी महाराज ) कुमारशिक्षेत या वैकुंठगमनाचा उल्लेख करताना म्हटले ,
संस्थितो S भवददृश्यरूपतः स्वार्चकस्य स च दृश्यरूपतः ll
नारायणस्वामी महाराज चैत्रमास आमावास्या तिथीचे दिवशी अदृश्य रूपाने राहिले मात्र भक्तांना दृश्य रूपानेच आहेत .
त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव चैत्र महिन्यात अद्याप त्यांचे वंशज नरसोबाच्या वाडीला येऊन करीत असतात.
Leave a Reply