योगिनी एकादशी माहात्म्य
युधिष्ठिराने श्रीकृष्णाला ज्येष्ठ कृष्ण एकादशीचे माहात्म्य विचारले असता तो म्हणाला, “धर्मा ! योगिनी नावाने प्रसिद्ध असलेली ही तिथी सर्व पापांचा नाश करणारी, ऐश्वर्य आणि मोक्ष देणारी व भवसागरात बुडणाऱ्यांना नौकेप्रमाणे तारून नेणारी आहे. हिचे व्रत केल्याने अठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फल मिळते. हिचे माहात्म्य श्रवण-पठण केल्याने सहस्र गोदानाचे पुण्य मिळते. आता हिची पवित्र कथा सांगतो.
कुबेर हा अलका नगरीचा राजा. हेममाली हा त्याचा माळी. त्याची पत्नी विशालाक्षी ही फारच सुंदर होती आणि तोही तिच्यावर आसक्त होता. तो कुबेराला शिवपूजनासाठी मानस सरोवरातून फुले आणून द्यायचा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे फुले घेऊन आला, पण पत्नीच्या स्नेहपाशात गुंतून तिच्याशी क्रीडा करीत घरीच राहिला. कुबेराने मध्यान्ह होईपर्यंत त्याची वाट पाहिली. विलंब झाल्यामुळे तो खूपच संतापला होता. त्याने दूतांना पाठवून त्याला बोलावून घेतले. त्यांच्याकडून सर्व वर्तमान ”
समजताच त्याने त्याला शाप दिला, म्हणाला, “तू स्वकर्तव्य विसरलास, देवाची अवहेलना केलीस म्हणून तुला पत्नीचा वियोग होईल. तू श्वेतकुष्टी होशील आणि स्थानभ्रष्ट होऊन भटकशील.
त्याच्या शापाने हेममालीच्या संपूर्ण शरीरावर पांढरे कोड उठले आणि तो अरण्यात पडला. त्याला अन्नपाणी मिळेना, शीत उष्ण सहन होईना, दिवसा-रात्री चैन पडेना. अशा प्रकारे भीषण पीडा सोसत तो पुष्कळ दिवस भटकत होता. पुढे दैवयोगाने त्याची व मार्कंडेयांची भेट झाली. त्याची अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी आस्थेने चौकशी केली. त्यानेही सर्व इतिवृत्त सांगितले. तेव्हा ते म्हणाले, “तू ज्येष्ठ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचे व्रत कर. त्यामुळे तू दुःखमुक्त होशील.” त्यांच्या उपदेशानुसार हेममालीने ते व्रत केले. त्या पुण्यप्रभावाने त्याचे कुष्ट गेले. तो देवांप्रमाणे दिव्य देहाचा होऊन स्वस्थानी परतला. त्याचा व पत्नीचा पुन्हा संयोग झाला.
श्रीगणेशाय नमः ।। युधिष्ठिर म्हणाला मधुसूदना । वसुदेवसुता रुक्मिणीरमणा। तुझिया प्रसादे आम्हां सर्वांना । भाग्य लाभले श्रवणाचे ।। १ ।। तू केलेले निरूपण । ऐकून तुष्ट झाले मन । आता पुढील तिथीचे विवेचन । तेही करी परमेशा ।।२।। ज्येष्ठातील कृष्ण पक्षात । जी एकादशी तिथी येत । सांगुनी तिची कथा पवित्र । विशद करावे माहात्म्यही। ।३।। श्रीकृष्ण म्हणाला धर्मा ऐक। सांगतो तुजला व्रत एक । कथाओघात अलौकिक । कळेल महिम्न आपैसे ।।४।। ज्येष्ठ कृष्ण एकादशी तिथी । योगिनी नामे प्रसिद्ध ती । हिच्या प्रभावे नष्ट होती। महापातके भयंकर ।।५।। ही कल्याणी मंगलकारक । भोग ऐश्वर्य मुक्तिदायक । नौकेसमान होय तारक । या दुष्कर भवसागरी । ।६।। हे नराधिपा तू येथ । तिथिश्रेष्ठता घे ध्यानात । स्वर्ग-मृत्यु-पाताळात। असे सारभूत ही ।।७।। हिच्याविषयीची कथा पुरातन । सांगतो तुजला देई ध्यान । आत्मियतेने घडता श्रवण । विलय पावती पातके ।।८।। राजा अलका नगरीचा । कुबेर धनपती देवांचा । नियम त्याचा नित्याचा । शिवपूजन करीतसे ।।९।। त्याच्या सेवेत माळी एक। होता हेममाली नामक । शिवपूजेस्तव फुले सुरेख । तोचि आणून देत असे ।। १०।। त्याची पत्नी विशालाक्षी। होती सुडौल सुंदर अशी । कामपाशवश तोही तिजसी । अपार प्रीती करीतसे ।।११ ।। एकदा शिवपूजनसमयी। सुगंधी पुष्पे घेउनी काही। हेममाली करुनी घाई। कुबेर सदनी चालला ।। १२।। परी पत्नीचे मुख पाहून । मोहित झाले त्याचे मन । तैं पुढील विचार टाकून । निजसदनी प्रवेशला ।।१३ ।। मानस सरोवरातून आणलेली। पुष्ये कुबेरा नच दिधली । भार्येसमवेत त्या वेळी । क्रीडा करीत राहिला ।।१४।। इकडे तयाची वाट पाहत। कुबेर थांबला देवघरात। द्वितीय प्रहरी अत्यंत । कुप्त झाला अंतरी ।।१५।। विलंबाचे कळेना कारण । गेला पुरता वैतागून । मग म्हणाला ओरडून। शोधा लगेच त्या दुष्टा ।।१६।। दूतमंडळी निघून गेली । अल्पावधीत परत आली । म्हणाली मालक हेममाली। घरीच आहे अद्याप ।। १७ ।। भार्येवर आसक्त होऊन। प्रेमपाशी पडला गुंतून । निजकर्तव्य विसरून। सुखोपभोग घेतसे ।।१८।। ते वृत्त कानी पडले । कुबेर महाराज खवळले । त्वरित बोलावुनी घेतले। कामचुकार माळ्यासी ।।१९।। फुले नेण्याची वेळ टळली। तेणे मनी भीती दाटली। राजासन्मुख त्या वेळी । उभा नम्र लाचार।।२०।। त्याते पाहून धनपतीला। संताप अनावर झाला। उभय नयनीं दाटला । खदिरांगार भयंकर ।।२१।। मग क्रोधाने ओठ चावून । मुखे वदला शापवचन । हे पाप्या तू दुष्ट म्हणून ।। केलीस हेलना देवाची ।।२२।। यास्तव श्वेतकुष्टी होऊन। पडशील वाईट स्थळी जाऊन । स्थानभ्रष्टतेकारण । होईल वियोग भार्येचा ।। २३।। ते भीषण शापवचन । आले प्रत्यया तत्क्षण । माळिया देही कुष्ट भरून । पतन पावला घनवनी।।२४।। नशिबी आली वणवण । त्याचे मनी दुःख दारुण। मिळेना पाणी अथवा अन्न । अतिपीडित जाहला ।।२५।। कुष्टाकारण अपरिमित । रात्रंदिन होती कष्ट । परी शिवार्चनप्रभावे नष्ट। झाली नच पूर्वस्मृती ।।२६।। असे निजकर्मफल भोगीत । हिंडत असता अरण्यात । एके दिनी अवचित । हिमालयी पातला ।।२७।। तधी पूर्वसुकृताकारण । रम्य ब्रह्मसभेसमान । असा प्रशांत आश्रम पावन । पडला दृष्टीस अवचित ।॥२८।। ते सात कल्पे आयुष्यमान । त्या मार्कडेयांचे होते स्थान । त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून । प्रवेशला त्यामाजी ।।२९।। तेथ तपोनिष्ठाते पाहून । दुरून आदरे केले वंदन। तैं त्याची व्यथा जाणून। दया आली मुनिवरा ।।३० ।। परोपकार भावना प्रबळ। बोलाविले आपुल्याजवळ । आणि विचारणा सकल । केली हेममालीची ॥३१॥ म्हणाले असशी तू कोण । आलास येथे कोठून । तव निंद्यस्थितीचे कारण । तेही सांग मजलागी ।।३२।। आपुलकीने केली चौकशी। तेणे आधार वाटला त्यासी । बुद्धिमान मार्कंडेयांसी। सांगू लागला कर्मकथा ।।३३|। वदला यक्षराज कुबेराचा । मी सेवक असे साचा । हेममाली नावाचा । करितो माळीकामासी ॥३४॥ नित्यनेमे धनपतीला। शिवपूजेच्या समयाला। जाउनी मानस सरोवराला । फुले आणून देत असे ।।३५।। परी एके दिनी कामासक्त । होउनी रमलो निजसदनात । क्रीडा करिता स्त्रीसमवेत । नुरले भान काळाचे ।।३६ ।। पुष्पे देण्याची वेळ टळली। कुबेरस्वारी रागावली। मज उद्देशून त्या वेळी। शाप दिधला भयंकर ।।३७।। त्याकारणे भरले कुष्ट । झाले शरीर क्षतिग्रस्त। होउनिया स्थानभ्रष्ट । पडलो घोर काननी ॥३८॥ त्याच्या वचनानुसार मजला । स्त्रीवियोगही प्राप्त झाला। परी भाग्यवश योग आला । आज आपुल्या भेटीचा ।।३९|| साधुसंतांचे अंतःकरण । असते निर्मळ दयापूर्ण । तरी मजसी दंड करून । निवारा या दुःखाते।।४०।। कळवळून केली विनंती । अश्रू नयनी ओघळती। त्याची आर्तता जाणून चित्ती । आली करुणा मुनिवरा ।।४१ ।। ते म्हणाले हेममाली। तव वाणी सत्य बोलली। मम चेष्टा नाही केली । निजअपराध लपवुनी ।।४२ ।। तुझ्या सरळपणाने येथ । संतोष वाटला मजप्रत । म्हणुनी सांगतो एक व्रत । सिद्ध शुभकारक जे ।।४३ ॥। त्वा ज्येष्ठ कृष्ण पक्षात। करावे योगिनी एकादशी व्रत । त्या पुण्यप्रभावे निश्चित । होशील कुष्टमुक्त तू ।॥४४ । कृषी वचन कानी पडले । तेरे मन सुखावले । कोंदाटले ते काही सरले । माळियाचे त्या दुः समयी ॥४५।। कृतज्ञतेने हृदय भरले । अगदी भावविभोर झाले । दृढभावाने चरण वंदिले । महामुनींचे तेधवा ।।४६।। मार्कंडेय-उपदेशप्राप्त । त्यानुसार ज्येष्ठ मासात । केले योगिनी एकादशीव्रत । यथाविधि श्रद्धेने ।।४७।। त्या प्रभावे अल्पावधीत । गेले तयाचे कुष्ट समस्त । देवांसम दिव्यत्व प्राप्त । देह अव्यंग जाहला ।।४८।। त्याची आणि पत्नीची । पुनर्भेटही झाली साची। कालक्रमणा सुखाची । करू लागले उभयता ।।४९ ।। हे युधिष्ठिरा धर्मश्रेष्ठा । येथे पूर्ण ती कथा । तरी अधिक माहिती आता । सहजभावे सांगतो ।॥५०।। अठ्ठयांएशी सहस्र विप्र भोजन । घालता पुण्य पर्वतासमान । परी तितुकेच मिळते जाण । फल योगिनी ब्रताने ।।५१ ।। तिथी पापप्रशमनी। महापुण्यफलदायिनी। महती यापरी श्रेष्ठ म्हणुनी। प्रसिद्ध तिन्ही लोकात ।।५२।। माहात्म्य श्रवण पठणे साचे । फल सहस्र गोदानांचे। दुरित श्रोत्या-वक्त्याचे । नष्ट होते हरिकृपे ।।५३ ।।
॥ इति श्रीब्रह्मवैवर्तपुराणे ज्येष्ठकृष्णैकादश्याः योगिनीनाम्न्याः माहात्म्यं संपूर्णम् ।।
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
शुभं भवतु !
Leave a Reply