( सर्व संकटांचा नाश करून इच्छित फळ शीघ्र प्राप्त करून देणारे श्रीगणपतीचे व्रत ) संकष्ट चतुर्थीव्रत…प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यांत वद्य चतुर्थीच्या दिवशीं “संकष्ट चतुर्थी” असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करून, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळीं श्रीगणपतीचीं पूजा करून, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचें. अशी या व्रताची थोडक्यांत पाळणूक आहे. त्यात श्रावण महिनात येणारी वार्षिकी संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व चतुर्थ्या केल्याचे पुण्य मिळते . चतुर्थी चे उपवास नेहेमीसाठी सुरू करायचे असतील तर ते श्रावणातील संकष्ट चतुर्थीपासून चालू करतात. अंगारकी चतुर्थीपासून सुरू करणे हा दुसरा पर्याय आहे. “श्रीसंकष्टहरगणपती” हे या व्रताच्या देवतेचें नांव आहे, हे व्रत करणार्या स्त्री अगर पुरुषानें, व्रताला सुरवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशीं करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचें उद्यापन करावें. कांहींजण इच्छा पूर्ण होईपर्यत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणारांनीं उपोषण सोडवण्यापूर्वी नेहमीं, सोबतच्या ब्लॉग मध्ये दिलेले “संकष्ट चतुर्थी माहात्म्य” अवश्य वाचावें. संकष्टचतुर्थीचें व्रत करणारानें, त्या दिवशीं पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावीं. दीवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. आवश्यकतेनुसार उपवासास चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग-धंदा करावा. संध्याकाळीं रात्रौ आवश्यक वाटल्यास आंघोळ करावीं. नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी, त्यावर स्वच्छ पाण्यानें भरलेला कलश (तांब्या) ठेवावा; कलशाभोवती दोन वस्त्रें गुंडाळावी, त्यावर ताम्हन ठेवून त्यांत “श्रीसंकष्टहरगणपतीचीं” स्थापना करावीं. (श्रीगणपतीची सोने, चांदी, तांबें वगैरे धातूची मूर्ती अगर तसबीर ) त्याची षोडशोपचारे पूजा करावी. पूजा करणारानें अंगावर लाल वस्त्र घ्यावें. पूजेत वाहावयाचें “गंध-अक्षता-फूल-वस्त्र” तांबड्य रंगाचें असावें. पूजेत उपचार अर्पण करतांना, लंबोदराय नम: म्हणून गंध, कामरूपाय, नम: म्हणून अक्षता, सिध्दिप्रदाय नम: म्हणून पुष्प, सर्वार्थसिद्धिदाय नम: म्हणून फळ, शिवप्रियाय नम: म्हणून वस्त्र, गणाधिपाय नम: म्हणून उपवस्त्र, गजमुखाय नम: म्हणून धूप, मूषकवाहनाय नम: म्हणून दीप, विप्रनाथाय नम: म्हणून नैवेद्य आणि धनदाय नम: म्हणून, दक्षिणा अर्पण करावी. रक्तांगं रक्तवस्त्रं सितकुसुमगणै: पूजितं रक्तगंधै: ॥ क्षीराब्धौ रत्नदीपे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थमू ॥ दोर्भि: पाशांकुशेष्टा भयधृतिरुचिरं चंद्रमौलिं त्रिनेत्रं ॥ ध्यायेच्छांत्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेंत प्रसन्नमू ॥ नंतर आपलें संकट निवारण्याची व मनोकामना ( मनांतील इच्छा ) पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. मम समस्तविघ्ननिवृत्यर्थ संकष्टहरगणपतीप्रीत्यर्थं चतुर्थेसेव्रतांगत्वेन यथा मीलितोपचार द्रव्यै: षोडशोपचार पूजां करिष्ये ॥ असें म्हणावें. नंतर पुढें दिलेलें “संकष्ट चतुर्थी माहात्म्य” वाचावें. २१ मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आरती झाल्यावर- अशुद्धमतिरिक्तं वा द्रव्यहीनं मया कृतम् । तत सर्वं पूर्णतां यातु विप्ररूप गणेश्र्वर ॥ असें म्हणून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करून, चंद्राला अर्ध्य, (पाणी) गंध, अक्षता, फूलें वाहून त्याची पूजा करावी. “रोहिणीनाथाय नमः ” म्हणून नमस्कार करावा. नंतर उपोषण सोडावें. जेवणांत मोदक असावे, गोड पदार्थ असावेत, खारट व आंबट पदार्थ नसावेत. (चंद्रोदयाची वेळ पंचांगांत दिलेली असते.) जेवण झाल्यानंतर उत्तरपूजा करून मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवावी. धान्य वापरात घ्यावे. पाणी तुळशीत ओतावे. —————————- आपल्या हिंदू धर्मातली सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातल्या मंगलमूर्ति श्रीगणेशा ची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात. आणि चंद्रोदया नंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु हीच संकष्टी जेंव्हा मंगळवारी येते तेंव्हा हिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधिले जाते. ह्या मागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज हे महान गणेशभक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टी ला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थी चा. ” स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायाचे वरदान ” त्यानं प्रसन्न झालेल्या श्रीगणेशा कडे मागितीले. यावर गणेशानं सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, “ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवार ची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंकारीका ह्या नांवाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास २१ संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल. आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील”. “अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नांवे तुला ब्रम्हांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृत पान करशील”. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे तेंव्हा पासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थी चे व्रत/उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी की ज्यामुळे २१संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच उद्याच्या मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली वहिली अंगारकी योग असल्याने आपल्याही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्वाचे ईप्सित कामे मार्गी लागण्यासाठी, इच्छुकांनी उद्याची अंगारकी मात्र अवश्य धरावी आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणुन, चंद्रदर्शन करुनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असु द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरुन दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पध्दत मात्र अवलंबू नये. कारण मुळातच बाप्पा ला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशा नुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करुन उपवास सोडणे केंव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच. गणेश अंगारकी श्लोक गणेशाय नमस्तुभ्यं, सर्व सिद्धि प्रदायक । संकष्ट हरमे देवं, गृहाणार्घ्यम् नमोऽस्तुते ॥ कृष्णपक्षे चतुर्थ्यातु , सम्पूजितं विधूदये। क्षिप्रं प्रसीद देवेश, अंगारकाय नमोऽस्तुते ॥ चतुर्थी व्रत संदर्भातील आमचे इतर ब्लॉग इथे खालील लिंक वर वाचता येतील : श्रावण कृष्ण-वार्षिकी संकष्टी चतुर्थी व्रत संकष्ट चतुर्थी – कथा व माहात्म्य Leave a Reply Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website