आषाढ अमावस्या दिप अमावस्या म्हणून ओळखली जाते  आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना, गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करूणा भाकतात. या देवताना नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

deepa-pooja-on-ashada-amavasya

अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे गोड, उकडलेले दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवितात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे.ही अमावस्या विविध नावानी ओळखली जाते ‘दिवली अमावस्या‘, ‘दिव्याची आवस‘ या दिवसाची एक कहाणी ही प्रचलित आहे. काही ठिकाणी दीप पूजना वेळी हे वाचण्याची प्रथा आहे .

deep poojan e

आपण सर्वजण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी कि आपण आता जरी सगळीकडे इलेक्ट्रिक चे दिवे वापरत असलो तरी नैसर्गिक तेल / तूप वातीच्या दिव्यांच्या  दुष्ट शक्ती येवू शकत नाहीत. त्यामुळे सकाळ संध्याकाळ देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा अवश्य लावला पाहीजे.

आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला.आपल्या वरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली.

हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवांत करावी, ते स्वतः स्वतः लावावे, खडी-साखरेनं त्यांच्या ज्योतिसाराव्या , दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्या प्रमाणं ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येतं होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टिस एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवातले दिवे अदृश्य रुप धरुन झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकिकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला. बाबांनो काय सांगू? यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य दिवा असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय..? मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू ? मी ह्या गांवाच्या राजाच्या घरचा दिवा . त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला.. इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेंव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिंची चोळी पाहुण्याच्या आंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावं पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो..! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.

घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवुन घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखत्यारी दिली.ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दिपक पावला आणि तिच्या वरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच यातील संदेश.

deep poojan d

 

अलीकडे मात्र या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे‘गटारी अमावस्या ‘ आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मग या सर्वाचे शोकीन आषाढमधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद होऊन गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. अंधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच नव्हे तर निंदनीय आहे .

3 Responses

  1. Abhay Bapat

    छान माहीती आपल्या सण आणि उत्सवांबद्दल

    Reply

Leave a Reply to Abhay Bapat Cancel Reply

Your email address will not be published.