आषाढी एकादशी – मंदार संत Mandar Sant July 1, 2020 दिनविशेष 1 आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत सन्मार्गांने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यात सांगितले आहे. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कोणी नाकारु शकत नाही. मानव व पशु यातील महत्त्वाचा फरक निती अनितीचे परिक्षण करणारी बुद्धि हाच म्हणावा लागेल. ” परोपकाराय पुण्याय ” हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याचे आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्मकठीण गोष्ट आहे. याची कमीअधिक प्रचिती प्रत्येकास येतच असते. आपणास प्रयत्नपुर्वक या सन्मार्गदायक महासुत्राचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठानाचे उच्चतम ध्येय मनाची स्वभाविक चंचलता कमी करुन सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे. उपनिषदांचे मत शरीर रथ, इन्द्रिय घोडे व मन लगाम आहे , त्यामुळे मनावर नियंत्रण यशाचा राजमार्गच म्हणावा लागेल. दहा इन्द्रियांनंतर मनास अकरावे इन्द्रिय म्हणून शास्त्राने मान्यता दिली आहे, म्हणून एकादशीस ( अकराव्या तिथीस) भारतीय संस्कृतीत असाधारण महत्त्व आहे. मनावर अंकुश ठेवायचा असेल तर त्यादृष्टीने एकादशीस व्रत करणे फलदायी ठरते. आपण कोणतेही व्रत करतो तेव्हा ते मूलतः काम्यव्रत असते म्हणजे उत्तम नोकरी, व्यावसायिक प्रगती , सांसारीक सुख हा प्रामुख्याने हेतु असतो. व अशाप्रकारची व्रते ऐच्छिक असतात ती कोणी निसर्गतः स्वीकारत नसतो. उदिष्ठपुर्तीसाठी दैवीउपासना हे त्यांचे लक्ष असते. मात्र एकादशी व्रत हे श्वासोश्वास करणा-या मानवाने जाणीवपूर्वक आपल्या सर्वांगिण प्रगतीसाठी करावे असे सांगितले आहे. उपवास व हरिस्मरण हा या व्रताचा मुख्य भाग आहे. आहारशास्त्राचा विचार केला तर लंघन करणे हे शरीरास आरोग्यदायक ठरते, जसे शरीराचे आरोग्य आवश्यक आहे तसेच मनास सामर्थ्यसंपन्न करण्यासाठी एकादशीस हरिस्मरण करणे हितकारक ठरते. एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या रात्री उपवास सुरु करुन एकादशीस पूर्ण दिवस उपवास करुन व्दादशीस महानैवेद्य दाखवून उपास सोडावा. प्रातःस्मरणीय तुकाराम महाराजांचे एकादशी संदर्भातील पुढिल अभंग या संदर्भात प्रेरणादायी आहेत- एकादशीस अन्न पान। जे नर करिती भोजन । श्वानविष्ठेसमान। अधम जन तो एक॥ ऎका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन। ते समान विष्णूशी॥ अशुद्ध विटालशींचे खळ । विडा भक्षिंती तांबूल। सांपडे सबळ। काळाहातीं न सुटे॥ शेज बाज विलास भोग । करि कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग। जन्मव्याधी बळिवंत॥ आपण न वजे हरिकिर्तन। आणिकां वारी जातां जन। त्याच्या पापा जाणा। ठेंगणा महामेरु तो॥ तया दंडी यमदूत। झाले तयाचे अंकित। तुका म्हणे व्रत। एकादशी चुकलीया॥ एकादशीचे व्रतमाहात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकिर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात. ना कोणता यज्ञ, ना वेद पठण, ना मोठी खर्चीक अनुष्ठाने, ना कठोर व्रताचरण, ना हटयोग ना विद्वत्तेचे जाहिर प्रदर्शन तरी देखील “नर का नारायण” होणे सहज साध्य असल्याचे महाराज सांगतात. श्रीविठ्ठला बद्दल निरपेक्ष प्रेमभाव हे असाधारण बळ प्रदान करणारे ठरते. आषाढी एकादशीला लाखो लोक विठोबाचे दर्शन घेण्यास मंगलमय वारीत सहभागी होतात. त्याचे एकमात्र कारण विठठलाचे प्रेमस्वरुप नाम ॥विठोबाचे नाम सुलभ सोपारे। तारी एकसरें भवसिंधु॥ येणा-या प्रत्येकावर समानभावाने प्रेमकरणारा व भवसिंधु तरुन जाण्यास तळमळीने साह्यभुत होणारा विठठल हाच सकालांचा आधार ठरतो. हरिस्मरण हाच मुख्य धर्म आहे असे मानणे, व त्यानुसार आचरण करणे मानवास सात्विक बनवते. अशा हरिभक्ताच्या मनातील हरिचिंतनाची सहजस्पंदनाने भूमंडलातील अमंगलाचे अघमर्षण व मांगल्याचे प्रक्षेपण करत असते आणि तेही निरपेक्ष आणि अविरत. कलीयुगात अशा ज्ञातअज्ञात हरिभक्तांच्या पुण्यप्रभावानेच सन्मार्गाने जाणा-यांना अपयशाच्या महाद्वारात उभे राहूनही हरिनिष्ठ राहण्याचे अभेद्य बळ मिळत असते. यशापयशाच्या आलेखावरुन आपल्या भक्तिचे किंवा इश्वरीकृपेचे मुल्यांकन आपण करु शकत नाही. मनातील असंतुलीत आंदोलने, अनामिक भय, सर्वसाधनसंपत्तीने सालंकृत असूनही निद्रादेवीची अवकृपा व सतत असमाधानाचे बीजारोपण, या लक्षणांच्या यादीत चढत्या भाजणीने होणारी वाढ थांबवणे हे आपले उदिष्ठ असणे अगत्याचे आहे. कारण विठठलाचे स्वरुप तर शांताकारम् आहे. आम्ही अल्पसंतुष्ट मनोवृत्तीचा पुरस्कार करत आहोत असे कदापि समजू नये. नित्यस्पर्धेतील सर्वोत्तम स्पर्धक अशी आपली ख्याती जरुर असावी, मात्र त्याच बरोबर शाश्वत सर्वोत्तमाचा ध्यासही घ्यावा. आणि त्यासाठी आषाढी एकादशी हा अत्युत्तम मुहूर्त आहे हे वेगळे सांगावयास नको. २. इतिहास ‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. ३. महत्त्व अ. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. आ. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे. ४. व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे. रात्री हरिभजनात जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. ५. पंढरपूरची वारी हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते. चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो. सर्व भाविकांना प्रिय असणारी ही आषाढी एकादशी. तिचं महात्म्य असं आहे.. ज्यास मान्य एकादशी। तो जिताची मुक्तवासी। किंवा एकादशी, एकादशी। जया छंद अहर्निशी व्रत करी जो नेमाने। तथ वैकुंठाचे पणे नामस्मरण जाग्रण। वाचे गाय नारायण तोचि भक्त सत्य याचा। एका जनार्दन म्हणे वाचा। पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे. अश्वेमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।। अर्थ : अनेक सहस्र अश्वपमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही म्हणजे ६ टक्के इतकेही महत्त्व नाही। आता आपल्या मनात प्रश्नव निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे, तर एकादशीपासून लाभतरी नेमका कोणता होतो ? पद्मपुराणामध्ये पुढे म्हटलेले आहे – स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी । सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी । न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् । न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । – पद्मपुराण आदिखंड अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे। गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही। एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करतांना, व्रतारंभ करतांना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही, यावरून आपल्याला लक्षात आले असेल की, संकल्प न करतासुद्धा म्हणजे विधीवत् ईश्ववराला न सांगतासुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्तम पाणी व सुंठ-साखर घेतल्यास सर्वोत्तम होय. या दिवशी विष्णुपुजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसर्यां दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात. आषाढी एकादशी वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्तीग अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीतला ईश्वजरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत. आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, श्रीविष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव चित्रकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला. त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला मारले. ही जी शक्तीदेवी तीच एकादशी देवता आहे. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’ म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. आषाढी एकादशीचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तीं पासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या आषाढी एकादशीचे महत्त्व खुप मोठे असून या एकादशी व्रताने सर्व पापांचा नाश होतो, अशी वारक-यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक-यांचादृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजाविधी : या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. पंढरपूरची वारी : वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. श्री विठ्ठलाला तुळस आणि मंजिरींचा हार का वहातात ? तुळस तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो. तुळशीची मंजिरी मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्याु चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते. मंजिरींचा हार श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. पंढरपूरची काही वैशिष्ट्ये ‘पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे. आद्य शंकराचार्यांनी या क्षेत्राला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. (त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणारे ‘पांडुरंगाष्टकम्’ सुद्धा म्हटले आहे.) पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील रासक्रीडेचे गोकुळच आहे. यासंदर्भात पुराणांत निरनिराळ्या कथा आहेत. चंद्रभागा : पंढरपूरला जी ‘चंद्रभागा’ आहे, ती भीमाशंकरच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे ‘भीमा’ झाली. तीच पंढरपुरात मांड खडकापासून विष्णुपद स्थानापर्यंत पाऊण मैल चंद्रकोरीप्रमाणे वहाते; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते.’ लोहतीर्थ : एकदा शंकर-पार्वती वरुण-राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली. तेव्हा ते भीमानदीच्या काठावर थांबले. तेथे शंकराने त्याच्या त्रिशूळाने पाताळगंगेला वर आणले. ती वर येताच दोघांनी आपली तहान भागवली. त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने त्या प्रवाहाला ‘लोहतीर्थ’ हे नाव दिले. चंद्रभागेच्या जवळच ‘लोहतीर्थ’ आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्रीकृष्णतत्त्व आणि श्रीविष्णुतत्त्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी, म्हणजेच सगुण, तसेच निर्गुण मार्गाने उपासना करणार्यांतसाठी ही मूर्ती लाभदायक आहे. तसेच ब्रह्मगण, शिवगण आणि अनेक शक्तीगण यांनाही अंगाखांद्यावर खेळवणारी ही मूर्ती असल्याने सर्वच स्तरांवरील उपासकांना चैतन्याची फलप्राप्ती करून देणारी आहे; म्हणून सर्वच स्तरांवरील भक्तगण श्री विठ्ठलाच्या मूर्तीला भजणारे आहेत. पंढपूरची वारी आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांरकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्ति योगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्तिजयोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो. विठ्ठल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत तत्त्व श्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्त्गण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्ताहचे रक्षण करणारी आराध्यदेवता’, असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. `पांडुरंग’ या नामाचे वैशिष्ट्य श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच श्रीकृष्णाने श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. त्यामुळे शास्त्रांत व पुराणांत पांडुरंगाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकाने तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला `पांडुरंग’ म्हणतात. श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नीठ असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी रहाते. भक्तािच्या हाकेला लगेच `ओ’ देणारी देवता श्री विठ्ठल भक्तााच्या हाकेला लगेच `ओ’ देणारी देवता असल्याने ती पुरुष देवता असूनही त्याला भक्तागण `विठूमाऊली’ या नावाने संबोधतात. श्री विठ्ठल खूप मायाळू व प्रेमळ अंत:करणाचा असल्याने `तो भक्तांिसाठी धावत येणारच आहे’, असा भक्तांिचा ठाम विश्वाळस असतो. त्याच दृढ भावापोटी विठूमाऊलीने भक्तांंची दळणे दळली, गोवर्या थापल्या व भक्तावची सेवा केली. मूर्तीविज्ञान काळया रंगाची, बटबटीत डोळयांची, दोन्ही हात कमरेवर ठेवलेली व विटेवर उभी, अशी विठ्ठलाची मूर्ति असते. पुंडलिकाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेने प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला दर्शन द्यायला आला. त्या वेळी पुंडलिकाने विठ्ठलाकडे वीट फेकून तिच्यावर त्याला उभे रहायला सांगितले; कारण त्याला आईवडिलांच्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. त्याच्या सेवेकडे कौतुकाने पहात विठ्ठल उभा राहिला. इतर देवांच्या मूर्तींत हातात शस्त्र असते किंवा एखादा हात आशीर्वाद देणारा असतो. तसे या मूर्तीत नाही. काही न करता सर्वत्र साक्षिभावाने पहाणारा विठ्ठल त्यात दाखविला आहे. कमरेच्या वर ज्ञानेंद्रिये आहेत, तर खाली कर्मेंद्रिये आहेत. कमरेवर हात ठेवलेला म्हणजे कर्मेंद्रिये ताब्यात असलेला. ======================================== आषाढी एकादशी : आषाढ महिना म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पंढरपूरच्या वारीचा काळ असतो. आषाढी एकादाशीच्या दिवशी अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचतात. त्यांसोबत लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत, विठोबाचे वारकरी म्हणून मोठ्या श्रद्धेने पंढरीला पोहोचतात. वारकर्यांलत जात, पंथ, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा जराही भेदभाव नसतो. इसवी सन १२९१ मध्ये आषाढी एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी पहिली दिंडी निघाली होती असे म्हटले जाते. या वारीसाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यांतूनही विठ्ठलभक्त नियमितपणे दिंडीत सामील होतात. वारकरी लाखोंच्या संख्येने विठ्ठलनामाचा गजर, भजन- प्रवचन-कीर्तन करत पायी चालतात. असंख्य तरुणही त्यात हौसेने व भक्तिभावाने सामील होतात. परदेशी लोकही मुद्दाम या सुमाराला ही विठ्ठलभक्तीची वारी पाहण्यासाठी भारतात येतात आणि या अनोख्या परंपरेचा अनुभव घेतात. गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि तोंडाने विठुनामाचा गजर करणारे हे वारकरी खांद्यावर पताका, हातात टाळ, डोक्यावर तुळस घेऊनही चालतात. अनेकांच्या गळ्यात मृदंगही असतो. वर्षानुवर्षे वारीला जाणारे लाखो लोक निग्रहाने चालतात, वाटेत होईल तशी विश्रांती घेतात, मिळेल ते जेवण-खाण घेतात. वारीचे, विविध पालख्यांचे प्रवास-निवास-भोजन यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन हाही एक अनुभवण्याचा विषय आहे. आषाढातील ही एकादशी उपवास करून घरोघरी साजरी होते. पावसाळ्याची सुरुवात असल्याने ताजी रताळी, नवा बटाटा, खजूर, फळे, वर्यानचे तांदूळ, खिचडी असे विविध उपवासाचे पदार्थ या दिवशी ग्रहण केले जातात. या एकादशीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्र्वरांची, देहूतून संत तुकाराम, त्र्यंबकेश्र्वरहून संत निवृत्तीनाथ, सासवडहून सोपान देवांची, पैठणहून संत एकनाथंची, मेहूणहून संत मुक्ताबाईंची, औंढ्या नागनाथहून संत विसोबा खेचरांची, तेरहून संत गोरा कुंभारांची – अशा अनेक पालख्या पंढरपूरला जायला निघतात. संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला निघते. ती आषाढ शुक्ल दशमीला रात्री पंढरपूरला पाहोचते. गोष्ट १ आषाढी एकादशीची : संपूर्ण वर्षभरामध्ये साधारणता: चोवीस एकाद्शी येतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक व शुक्ल् पक्षात एक. दोन एकादशी ह्या अधिक मास असल्यास जादा असतात. या सर्वांमध्ये आषाढी व कार्तिकी एकाद्शीस अनंन्य साधारण महत्वी आहे. असे मानण्यात येते की, आषाढी एकाद्शीस भगवान श्रीविष्णु हे झोपी जातात म्हणुन त्यांस शयनी एकादशी म्हणतात व कार्तिकी एकादशीस प्रबोधिनी एकाद्शी, कारण या दिवशी भगवान श्रीविष्णु जागे होतात म्हणुन म्हणतात. आपल्या हिंदू संस्कृतीत ही एक गोष्ट मात्र नक्की आहे कि कोणत्याही रुढीला, परंपरेला काहीतरी एक कारण आहे किंवा त्यामागे एखादी गोष्ट आहे. त्याप्रमाणे या एकादशीबद्दल सुद्धा एक गोष्ट आहे. असे सांगितले जाते कि, मुदुमान्य नावाच्या राक्षसाने एकदा खूप मोठी तपश्वर्या भगवान शंकराची केली. भोळे शंकर भगवान त्याच्या कडक तपश्चर्येने प्रसन्न झाले व त्याला वर दिला की ’तु फक्त एका स्त्रीच्या हातून मरशील.’ राक्षसच तो, मृदुमान्य या वरामुळे अधिकच उन्मत्तत झाला त्याने सगळीकडे संहार चालु केला. त्याने सर्व देवतांना लढाईत पराभूत करुन टाकले. सर्व हरलेले देव शंकर भगवानांकडे गेले पण स्वता:च त्याला वर दिला असल्यामुळे, शंकरभगावानांचे त्याच्या पुढे काही चाले ना! सर्व देव एका गुहेत जाऊन लपले. त्या गुहेत सर्व देवता दाटीवाटीने बसले होते तेथे सर्वांच्या श्वासातुन एक देवता निर्माण झाली. तीचे नाव एकादशी. एकादशीने मृदुमान्य राक्षसाला ठार करुन सर्व देवतांची सुटका केली. सुटका झालेले देव परतत असताना पाऊसात सर्वांना स्नान घडले व गुहेत लपुन बसल्यामुळे त्यांना काही खायला मिळाले नाही, त्यामुळे उपवास ही घडला. हिच परंपरा पुढे एकादशीच्या दिवशी रुढ झाली. म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची. एकादशीचे व्रत कसे साजरे करावे यासाठी आपल्या शास्त्रात सांगितले आहे कि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेवते बरोबर विष्णूची पूजा करावी. पुजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने वाहावीत, उपवास करावा. उपवास तुळशीपत्र घेऊन सोडावा. त्यादिवशी रात्री भजन-किर्तन करावे, हरी कथा श्रवण करावी. दुस-या दिवशी सूर्यादयानंतर पारणे सोडावे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या एकादशीला भाविक साधा पाण्याचा एक थेंब देखील घेत नाहीत. त्यामुळे या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. महीना आषाढ महिन्यातील एकादशी ही फार पवित्र मानण्यात येते. याला महाएकादशी असे म्हणतात. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी लांबचा प्रवास करुन पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीस देहूहुन तुकाराम महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीदनाथांची, पैठणहून एकनाथ महाराजांची, सासवडहून सोपानदेवांची, दहिठण्याहुन दहिठणकरांची तसेच उत्तार भारतातून संत कबीरांची पालखी निघते. या सर्व पालख्या व त्याबरोबर लाखोंच्या संख्येने येणारे वारकरी सर्व जण चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात. सर्व वारकरी टाळ-मृदुंगाच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत, लेकी-सुना, आया-बहिणी डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, तर कधी रस्त्यात फुगडी घालत, आपल्या पोराबाळांसह पांडुरंगाच्या भेटीसाठी येतात. आषाढी एकादशीचा दिवस हा पवित्र दिन. या दिवसाची वाट पाहत विठ्ठल चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी खुप लोक पंढरपुरला येऊन निस्वार्थ भावाने जनसेवा करतात. विठ्ठल भकतीरच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपुरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. अशी ही महापवित्र हिंदू संस्कृतीतील आषाढी एकादशी कथा २ – युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा.’ श्रीकृष्ण म्हणाले, ‘हे पृथ्वीचे पालन करणार्याल राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली, तीच आश्चर्यकारककथा मी तुला सांगतो.’ नारदाने विचारले, ‘पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? व तिचे माहात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे?’ ब्रह्मदेव म्हणाले, ‘कलियुग आवडणार्याव मुनीश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस. तू खरोखरच वैष्णव आहेस. त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही. हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते, व सर्व इच्छा पूर्ण करते. ज्या मनुष्यांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही, त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे. आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे. ह्रषीकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे. आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो. ही कथा ऐकल्यानेही महापापाचा नाश होतो. पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता. तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरसपुत्राप्रमाणे करीत असे. त्याच्या राज्यात कधीहे दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधीव्याधी नव्हत्या. त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले. व भुकेने आर्त झाले. राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, पितृयज्ञ, अग्निहोत्रे व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले. तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, ‘राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक. पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला ‘नारा’ असे म्हटले आहे. तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंतांचे घर-आयन-आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात. नारायण सर्वांच्या ह्रदयात राहतो. हा भगवान विष्णू पर्जन्यरूपच आहे. पर्जन्याची वृष्टी तोच करतो. त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते. ‘हे राजा, असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो. तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर.’ राजा म्हणाला, ‘प्रजाजनांनो, तुम्ही सांगितलेत ते अगदी खरे आहे. अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे. सर्व चराचर जग अन्नामुळेच स्थिर आहे. सर्व भूतमात्र-प्राणीमात्र अन्नातूनच निर्माण होतात. जगाचे जीवन अन्नावरच चालते. पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की, राजांच्या अनाचराम्ळेच प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते. मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे. मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही. तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन.’ राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला. तेथे तप करणार्या् श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या. त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिराऋषी दिसला. त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या. तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय, असे वाटत होते. त्या ऋषीला पाहून मांधाता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्यापुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला. त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान, मित्र, भांडार, देश, किल्ले व सेना या राज्याच्या सात अंगाविषयी कुशल विचारले. राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले. नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले. मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, ‘मुनि श्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो. तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी, याचे कारण मला समजत नाही. माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपया पायांपाशी आलो आहे. तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा. अंगिरा ऋषी म्हणाला, ‘राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात. या युगात ब्राह्मणधर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत. या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे. असे असता, राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे. करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाहीत. तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे दोष दूर होईल.’ राजा म्हणाला, ‘तपश्चर्या करणार्या् त्या शूद्राने माझा काहीच अपराध केलेला नाही. तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही. तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा. ऋषी म्हणाला, ‘राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर. या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल. ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे. राजा, तू आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर.’ मुनीचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला. आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा (म्हणजेच शयनी) एकादशीचे व्रत केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र या चारी वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले. राजा, त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. ह्रषीकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याकरिता पद्मा एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे. हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे. या एकादशीचे माहात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ One Response Dipak Gopal Joshi July 1, 2020 Very good Sir ??✔️? Reply Leave a Reply to Dipak Gopal Joshi Cancel Reply Your email address will not be published.CommentName* Email* Website